जागतिक मातृभाषा दिन २१ फेब्रुवारीला झाला आणि मराठी राजभाषा दिनही कालच साजरा झाला..  म्हणजे पुढलं वर्षभर, अशा दिनांखेरीज आपण जे करतो तेच करायला मोकळे आहोत.  मिरचीसारखं झोंबत राहणाऱ्या, भाषेबद्दल अनेक प्रश्न पाडणाऱ्या एका छोटेखानी पुस्तकाची नुसती ओळख करून देऊन भागणार नाही. ती आहेच इथं, अगदी प्रकरणवार.. पण लेखिका जपानी, आपण वाचक मराठी- मग पडतात म्हणजे कोणते प्रश्न? – याचं उत्तरही इथेच..

मला नेहमी वाटतं की पुस्तकं ही चांगल्या मित्रांसारखी असतात. अगदी ज्या वेळेला हवी तेव्हा समोर येतात, सांगायचं ते सांगतात, काम करतात आणि शांतपणे बाजूला होतात. बाजूला होताना मात्र जो परिणाम करायचा तो करतात. ही मित्रमंडळी काही फार मोठे विचारवंत असतात, फार थोर असतात असं नाही, साधीच असतात ती. पण नेमक्या वेळी नेमका सल्ला देऊन जातात. ज्याचा परिणाम मात्र तुमच्या मनावर खोलवर झालेला असतो. कायमसाठी.
या पुस्तकाचं असंच आहे. ‘द फॉल ऑफ लँग्वेज इन द एज ऑफ इंग्लिश’ हे त्याचं नाव आहे, आणि लेखिका आहेत मिनाई मिझुमुरा नावाच्या जपानी भाषेत लिहितात अशा कादंबरीकार. कोलंबिया युनिव्हर्सटिी प्रेससारख्या ख्यातनाम प्रकाशन संस्थेचं हे प्रकाशन आहे. ‘इंग्रजीच्या जमान्यात भाषेची हार’ असं त्याचं sam06मराठीत भाषांतर करता येईल. भाषेची हार म्हटलंय बरं का. अमुक एका भाषेची किंवा स्थानिक भाषेची हार असं म्हटलेलं नाही, तर ‘भाषा’ याच गोष्टीची हार, पडझड, पराभव.
या पुस्तकाचं शीर्षक जितकं आकर्षक आहे तितका त्याचा आशय फार खोल आणि फार मोठा नाही. सध्या ‘भाषा’ या आपल्या अंगगुणासमोर, कौशल्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्या सर्व आव्हानांची उत्तरंदेखील इथे देण्याचा प्रयत्न केलेला नाही. पुस्तक छोटं आहे. सात प्रकरणांत संपवलं आहे पण या छोटय़ा, सोप्या पुस्तकात जाता जाता एकूणच माणसासमोर असलेल्या एका मोठय़ा प्रश्नाची सुलभ मांडणी केली आहे. अतिशय सहज. आपल्या व्यक्तिगत, रोजच्या अनुभवापासून सुरुवात करून.
सहज साध्या वाटतील अशा गोष्टी, असं साहित्य खळबळ माजवतं. तसंच या पुस्तकाचं झालं. २००८ मध्ये जेव्हा हे पुस्तक जपानी भाषेत जपानमध्ये प्रकाशित झालं, तेव्हा जपानमध्ये संतापाची लाट आली. ‘ही कोण आजकालची, दोन-चार पुस्तकं नावावर असलेली लेखिका आमच्या महान जपानी भाषेला नावं ठेवणारी? फुटकळ? साहित्य कशाशी खातात माहीत नसलेली?’ असं म्हणून मिनाई मिझुमुरांवर टीका झाली. एक समाज म्हणून आपण आपल्या साहित्याची मशागत करत नाही आणि म्हणून आपण आपली भाषा हरवत चाललो आहोत. कसदार साहित्याची निर्मिती सध्या आपल्या भाषेत होत नाही कारण इंग्रजीच्या जमान्यात आपल्याला त्या भाषेबरोबर कसं वागायचं ते नीट कळलेलं नाही. इंटरनेट, जागतिकीकरणाचा रेटा यांमुळे इंग्रजी सर्वदूर पसरत असताना एक समाज म्हणून आपण आपली जपानी भाषा कशी टिकवायची हे आपल्याला कळत नाही, आपण गोंधळलेलो आहोत असं सगळं मिझुमुरा त्यांच्या पुस्तकात म्हणत होत्या. त्यामुळे एकच आवई उठली, त्यांच्यावर जपानमध्ये जहरी टीका झाली, पण पुस्तकाच्या प्रतीही बाजारात भरपूर खपल्या. जपानमध्ये जपानी भाषेविषयी चर्चा सुरू झाली.  
सात प्रकरणांच्या या पुस्तकाची सुरुवात एका व्यक्तिगत अनुभवापासून आहे. अमेरिकेतील आयोवा विद्यापीठात २००३ साली एका आंतरराष्ट्रीय लेखन-कार्यशाळेसाठी लेखिकेची निवड झालेली आहे आणि त्या तीन महिन्यांच्या काळात मिझुमुरा जगातल्या वेगवेगळ्या देशांतल्या लेखकांना भेटताहेत, चर्चा करताहेत, त्यांचं साहित्य समजावून घेताहेत. मग थोडी गंमत करत, इंग्रजी भाषेची, अमेरिकन माणसाची, त्याच्या अमेरिकन भाषेची खिल्ली उडवत उडवत, इंग्रजी भाषेनं वेगवेगळ्या देशांत काय काय परिणाम घडवला ते आपल्याला सांगताहेत. बरे, वाईट दोन्ही परिणाम.  दुसरं प्रकरण आहे फ्रेंच भाषेवर. इंग्रजी भाषेनं मराठीसारख्या भाषेवर काय आक्रमण केलं आहे हे आपण बोलतोच; पण एके काळी जगभर प्रभाव असलेल्या, जगातल्या फार मोठय़ा समूहाची भाषा असलेल्या आणि साहित्याची एक मोठी परंपरा असलेल्या फ्रेंच भाषेचीदेखील काय अणि कशी अवस्था झाली आहे याचं वर्णन मिझुमुरा करतात. त्यांचं त्यावर फ्रान्समध्ये, फ्रेंच भाषेतून जे भाषण झालं त्यावरही मिझुमुरा फार मार्मिकपणे लिहितात.
या दोन प्रकरणांच्या वाचनापर्यंत ही लेखिका आता आपल्या व्यक्तिगत अनुभवाच्या पलीकडे जाणार आहे की नाही असं वाटतं, पण इथेच एक वेगळा विषय आपल्याला भेटतो. जगात सध्या तीन पातळ्यांवर भाषा असल्याचं त्या सांगतात. एक पातळी ‘विश्वभाषे’ची- जी सध्याची इंग्रजी आहे. दुसरी पातळी आहे, ‘राष्ट्रीय भाषे’ची – जेव्हा राष्ट्र-देश बनले तेव्हा तेव्हा शासनाची, राजकारणाची एक भाषा ठरवली, ठरली किंवा घडत गेली ती. आणि, तिसरी पातळी म्हणजे: ‘स्थानिक’ भाषा जी मुख्यत: बोलण्यातून, ऐकण्यातून आपल्याला भेटते, घराघरांतून बोलली जाते. ज्यातून लोकांच्या भावना, आशा-आकांक्षा व्यक्त होतात. मिझुमुरा म्हणतात, अशा वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या कामांसाठी असणं माणसाला नवीन नाही. माणसाच्या इतिहासात कायमच बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची-वाचण्याची भाषा वेगळी राहिलेली आहे. कायमच व्यवहाराची, व्यापाराची भाषा आणि घरातली भाषा वेगळी राहिली आहे. ज्ञानाची भाषा एक आणि लोकांच्या रोजच्या तोंडातली भाषा दुसरी असं कायमच राहिलेलं आहे. तशी त्यांनी उदाहरणंही दिली आहेत. जसं लॅटिन आणि फ्रेंच, आणि इतरही. किंवा जसं : आपल्याकडे संस्कृत आणि पाली, फारसी आणि मराठी. त्यांच्या मते भाषेला एक उतरंड आहे. जी त्या त्या वेळच्या अर्थव्यवहारावर, व्यापारावर, सत्तेवर ठरत असते. त्यांच्या पुढच्या प्रकरणाचं नावच आहे : जगभर लोक लिहिताना बाहेरच्या भाषेत लिहितात.
पुस्तकाचं चौथं प्रकरण आहे जपानी भाषेवर. पाचवंही आहे ते सध्या जपानी भाषेची काय आणि कशी अवस्था आहे यावर. या दोन्ही प्रकरणांची जपानमध्ये फार गंभीरपणे आणि कडवटपणे दखल घेतली गेली. एखादी भाषा कशी कृश होत जाते, अशक्त होत जाते याचं दर्शन या प्रकरणांमध्ये होतं. मराठी भाषेविषयी गंभीर असलेल्यांनी ही प्रकरणं फार आवर्जून वाचली पाहिजेत. सहाव्या प्रकरणाचा भर आहे तो इंटरनेटच्या आगमनामुळे जगभरचा भाषाव्यवहार कसा होत चालला आहे त्यावर आणि त्यामुळे होत असलेल्या इंग्रजीच्या वाढत्या प्रभावावर. या प्रकरणात खरं म्हणजे त्यांना अधिक खोलात जाता आलं असतं पण तसं झालेलं नाही. जी चर्चा सध्या जगभराच्या भाषानिरीक्षकांमध्ये चालू आहे त्यापलीकडे मात्र मिझुमुरा गेलेल्या नाहीत.
सातवं प्रकरण मौलिक आहे. जे आहे आपल्या आपल्या राष्ट्रीय भाषेचं महत्त्व काय यावर. तेही आपण मराठी भाषकांनी आवर्जून वाचायला पाहिजे असं आहे. त्या त्या सरकारांनी आपल्या आपल्या भाषा टिकवण्यासाठी, आणि अधिक समृद्ध करण्यासाठी काय धोरणं आखायला लागतील, काय उपाययोजना करायला लागतील याचं दिशादर्शन या शेवटच्या प्रकरणात आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा सध्या आपल्या मराठी भाषेचं पुढच्या २५ वर्षांचं काय धोरण असावं यावर विचार करत आहे. त्यांनासुद्धा हे प्रकरण आणि एकूणच हे पुस्तक उपयोगाचं आहे. मिझुमुरा ज्याला राष्ट्रीय भाषा असं म्हणतात ती आपल्या राज्यात मात्र िहदी नसून मराठी आहे हे आपण ओळखलं पाहिजे. एका मोठय़ा समाजाची प्रशासनभाषा, व्यवहारभाषा, व्यापारभाषा, ज्ञानसंकलनभाषा म्हणजे दुसरी पातळी. ती आपल्याकडे मराठी भाषा आणि तिसरी पातळी म्हणजे आपल्या बोली भाषा : अहिराणी, मालवणी, कोरकू, खडीसारख्या ज्या आपल्या स्थानिक भाषा असं याकडे पाहायला लागेल.
जेव्हा लेखक आपल्या भाषेत न लिहिता दुसरी भाषा निवडतो तेव्हा त्या भाषेतील वाचकाचाही त्याच्या भाषेवरचा विश्वास उडू लागतो. त्यामुळे भाषा लिहिती, वाचती, बोलती, ऐकती, गाती, वाजती ठेवली पाहिजे. अनुवादाचं मोठं काम समाजात सुरू केलं पाहिजे. अनुवादाला समाजात मानाचं स्थान मिळायला पाहिजे. आपल्या भाषेतून दुसरी भाषा, आणि त्या भाषेतून आपल्या भाषेत साहित्य आलं-गेलं पाहिजे. दोन भाषा असलेली ही संस्कृती आपली आहे आणि ती तशीच राहणार आहे असं मानलं पाहिजे. त्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे, आपली भाषा आणि आपली ओळख टिकवली पाहिजे असे काही मूलमंत्र हे पुस्तक आपल्याला देतं.
पुस्तक तसं वाचून लवकर संपतं. छोटं आहे. पण कधी गंमत होते बघा. खाताना काही वाटत नाही पण नंतर मिरची खाल्लेली जाणवते तसं होतं. मिरची नंतर लागते. पुढे बराच काळ या पुस्तकाचा प्रभाव मनावर राहतो.
वाटलं, मराठी समाजालाही काही प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. पुढची दहा, वीस.. पन्नास वर्षे तरी, किमान जोपर्यंत चीन जगातली एक नंबरची महासत्ता होत नाही आणि अ‍ॅपलपेक्षा दुसरी एखादी चिनी कंपनी चिनी भाषेत आपल्याला यायला लावत नाही तोपर्यंत, इंग्रजी ही विश्वभाषा राहणार आहे. मग त्या भाषेशी वागायचं कसं? संबंध ठेवायचे कसे? रागावून दूर सारायचं की सहकाराची भूमिका घ्यायची? कशात मराठी समाजाचं भलं आहे? एक समाज म्हणून आपल्याला आपल्या स्वत:च्या भाषेविषयी तळमळ, आस्था कशी निर्माण करता येईल? कशी वाढवता येईल?
कुणालाही – मग ते माणसाला असो, सरकारला असो की संपूर्ण समाजाला असो-  योग्य वेळी, योग्य प्रश्न पडायला हवेत आणि त्या वेळी आपली मन:स्थिती योग्य पाहिजे, म्हणजे मग उत्तरं आपणहून समोर येतात, आपणहून. सवाल हा आहे की या वेळी हा प्रश्न मराठी समाजाला पडतोय का? आणि, तो पडला तर त्या वेळी त्या प्रश्नाला भिडण्याची मराठी समाजाची योग्य अशी मन:स्थिती आहे का? आज सांगता येणं अवघड आहे. जे आहे ते काळ ठरवील.
मात्र एका छोटय़ा, साध्या पुस्तकानं हे असे प्रश्न उभे केले हे मात्र खरं आहे. साहित्याकडून आपली दुसरी काय अपेक्षा असते? नाही का?
*‘द फॉल ऑफ लँग्वेज इन द एज ऑफ इंग्लिश’’
मूळ लेखक : मिनाई मिझुमुरा
भाषांतरकार :  मारी योशिहारा आणि ज्युलिएट विन्टर्स कारपेन्टर
कोलंबिया युनिव्हर्सटिी प्रेस, न्यूयॉर्क