फ्रेंच भाषा शिकलेल्या, पॅरिसमध्ये बालपणाचा काही काळ गेलेल्या अनुराधा कुंटे यांची इंदिरा गांधी यांच्याशी भेट योगायोगानेच झाली, पण पुढे स्नेह वाढला आणि दिल्लीप्रमाणेच पॅरिसच्याही राजकीय वर्तुळात अनुराधा परिचित झाल्या..
कधी कधी एखादे वैशिष्टय़ माणसाला अकल्पित उंचीवर नेऊन पोहोचविते. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या माजी प्रमुख प्रा. अनुराधा कुंटे यांचाही जीवनप्रवास असाच आहे. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्वामुळे अनुराधा यांचा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क आला आणि सामान्य भासणाऱ्या कारकीर्दीला अनपेक्षित कलाटणी लाभून दिल्लीचे राजकारण जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली.
अनुराधा कुंटे (ठकार) यांचा जन्म नाशिकमधील १ सप्टेंबर १९३८ चा, सुखवस्तू घरातला. ब्रिगेडियर दामोदर नारायण आणि विमला ठकार यांच्या त्या कन्या. ब्रि. ठकार चीनमधील भारतीय लष्कराचे पहिले अटॅची होते. त्यानंतर त्यांची बदली पॅरिसला झाली. वयाच्या १२ व्या पॅरिसच्या शाळेत त्यांची फ्रेंच भाषेशी तोंडओळख झाली. ठकार यांची मुंबईला बदली झाल्यानंतर सेंट कोलंबा शाळेत आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण करीत फ्रेंचमध्ये एम.ए. केले. महाविद्यालयात असताना त्या ‘मिस एलफिन्स्टन’ होत्या आणि १९५८-६० दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या टेनिस आणि बॅडमिंटनच्या विजेत्याही. अनुराधा त्यानंतर फ्रान्सची शिष्यवृत्ती घेऊन सॉरबाँला गेल्या. फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांच्या दुभाष्याची भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापकाच्या प्रेरणेने तिथे त्यांनी इंटरप्रेटरचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९६२ साली नौदलात अधिकारी असलेले नागपूरचे मुकुंद कुंटे यांच्याशी त्यांचा पुण्यात विवाह झाला. मुकुंद यांच्या बदल्या होत असताना दिल्ली, पुणे, मुंबईमधील वास्तव्यात त्यांनी फ्रेंच साहित्यात पी.एचडी. केली. यूजीसी फेलोशिप मिळविली. पुण्यातील रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये अंशकालीन अध्यापक आणि मुंबई विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी करीत फ्रान्सची शिष्यवृत्ती मिळाली. विशाखापट्टणममध्ये आंध्र प्रदेश विद्यापीठात फ्रेंच भाषेचा विभाग सुरू केला. मग १९७४ साली कुंटेंची बदली दिल्लीला झाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तेव्हा विदेशी भाषा विभाग नुकताच सुरू झाला होता. त्या वेळी जी. पार्थसारथी कुलगुरू होते. मुकुंद कुंटे यांची सतत बदली होत असताना ही नोकरी कशी कराल, असा रास्त सवाल पार्थसारथींनी केला, पण अनुराधांना कुठल्याही परिस्थितीत ही संधी गमवायची नव्हती आणि अखेर त्यांनी ती मिळविली. दहा वर्षांनंतर ‘तुम्ही पतीला दिल्लीत ठेवण्यात यशस्वी ठरलात,’ अशी ‘प्रशस्ती’ पार्थसारथींना देणे भाग पडले, कारण तोपर्यंत अनुराधा कुंटेंची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी घट्ट मैत्री झाली होती.
अनुराधांचा इंदिरा गांधींशी परिचय अपघातानेच झाला. १९७९ साली मोरारजी देसाईंचे सरकार गडगडविणारे चौधरी चरण सिंह यांच्या राष्ट्रपती भवनातील शपथविधीला अनुराधा उपस्थित होत्या. तिथे राजनारायण एका बास्केटमध्ये लाडू घेऊन सर्वाना वाटत होते. ते दृश्य बघून कुंटेंना राष्ट्रपती भवनात थांबावेसे वाटले नाही. राष्ट्रपती भवनातून गाडी घेऊन बाहेर पडलेल्या अनुराधा सरळ १२, विलिंग्डन क्रिसेंटपाशी थांबल्या. त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या इंदिरा गांधींचे ते निवासस्थान होते. योगायोगाने त्याच वेळी बाहेरून येत असलेल्या इंदिरा गांधींची अनुराधांशी दृष्टादृष्ट आणि परिचय झाला. अनुराधा जेएनयूमध्ये फ्रेंच भाषेच्या प्राध्यापिका आहेत, हे कळल्यानंतर तरुण वयात कमला नेहरूंवरील उपचारांसाठी स्वित्र्झलडमध्ये असताना इंदिरा गांधी फ्रेंच शिकल्या होत्या. पॅरिसच्या साक्रे कोर चर्चच्या पायऱ्यांवर फिरोज गांधींनी त्यांना विवाहासाठी प्रपोज केले होते, या रोमँटिक आठवणीनेही कदाचित इंदिरा गांधींना फ्रेंचविषयी पुन्हा ओढ निर्माण झाली असावी. अधूनमधून फ्रेंचमध्ये गप्पा मारायला येण्याचे त्यांनी अनुराधांना निमंत्रण दिले. इंदिरा गांधी आणि अनुराधा कुंटे यांच्यातील या ‘फ्रेंच कनेक्शन’चे घनिष्ठ मैत्रीत रूपांतर झाले आणि त्यातून अनुराधा यांना इंदिरा गांधींच्या खासगी विश्वात डोकावण्याची संधी मिळाली. इंदिरा गांधी त्यांच्या बंगल्यात, कार्यालयात, संसद भवनात त्यांना वेळ असेल तिथे कुंटेंशी फ्रेंचमध्ये संवाद साधायच्या. १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर भारताच्या भेटीवर येणारे पहिले विदेशी पाहुणे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष व्हॅलरी जिस्कार्द होते. त्यांना इंग्रजी येत नव्हते. त्या वेळी नरसिंह राव परराष्ट्रमंत्री आणि राम साठे परराष्ट्र सचिव होते. या भेटीत कुंटेंनी इंटरप्रेटर म्हणून गांधींसोबतच राहावे, अशी साठेंनी सूचना केली. तेव्हापासून अनुराधांच्या तोंडूनच इंदिरा गांधी विदेशी पाहुण्यांशी फ्रेंच बोलत आणि ऐकत राहिल्या. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वां मितराँ आणि इंदिरा गांधींसोबतची छायाचित्रे त्यांनी जतन करून ठेवली आहेत. इंदिरा गांधींच्या सहवासामुळे वसंत साठे, विठ्ठलराव गाडगीळ, एन.के.पी. साळवे, नरसिंह राव, माधवराव शिंदे आदी बडय़ा नेत्यांच्या त्या संपर्कात आल्या. दिल्ली आणि पॅरिसच्या राजकीय वर्तुळात त्यांचे महत्त्व वाढले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, माधवराव शिंदेंनी त्यांना भारतीय शिष्टमंडळात समावेश करून युनेस्कोला पाठवले. एकदा फ्रेंच भाषेत करावयाच्या भाषणासाठी त्यांनी माधवराव शिंदेंसोबत रेल्वे भवन आणि क्रिकेटच्या मैदानावर फ्रेंचचा सराव केला.
इंदिरा गांधींच्या अनेक खासगी क्षणांच्या अनुराधा साक्षीदार ठरल्या. त्यांची निर्णयक्षमता, जटिल प्रश्न हाताळण्याचे कौशल्य, तपशिलात शिरण्याची संवेदनशीलता, संजयच्या निधनानंतर मनेकाशी उद्भवलेला तणाव आणि राजीव, सोनिया, राहुल यांच्याशी असलेला स्नेह, बाहेर कठोर, पण वैयक्तिक जीवनातील निर्मळ आणि निरागसतेसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार जवळून न्याहाळता आले. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये एका समारंभात पंतप्रधान इंदिरा गांधी चोहोबाजूंनी इच्छुकांच्या गर्दीने वेढल्या असताना चार-पाच मिनिटे फक्त अनुराधांशी बोलत होत्या आणि आदल्या रात्री मनेकाने त्यांचे निवासस्थान सोडले तेव्हा काय घडले ते सांगत होत्या. राहुल गांधी डून स्कूलमध्ये शिकत असताना त्यांच्यासाठी फ्रेंच गोष्टीची पुस्तके मागवली होती. एकदा आपण लोमे या आफ्रिकन देशाला जात असल्याचे अनुराधांनी त्यांना सांगितले. तेव्हा तो तर फ्रेंच भाषिक देश आहे, असे पटकन लक्षात आणून देत इंदिरा गांधींनी अनुराधा यांना तेथील प्रसारमाध्यमांसाठी फ्रेंच भाषेत भारताची वैशिष्टय़े उलगडून दाखविण्याची सूचना केली आणि तसे मुद्देही तयार करून दिले. एकदा पुस्तक प्रदर्शनाला भेट देत असताना एका पुस्तकात काश्मीरचा नकाशा कसा छापला आहे, हे त्यांनी आवर्जून बघितले. मॉरिशसमध्ये पोर्ट लुई येथे इंदिरा गांधींना फ्रेंचमध्ये भाषण करायचे होते. उच्चारात चूक होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी त्यांनी अनुराधांना आपल्या भाषणातील एक शब्द बदलायला सांगितला.  
एल. के. झा यांची आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी ते बुद्धिवान आणि उत्तम विश्लेषक असले तरी त्यांचा सर्वसामान्यांशी कसा संपर्क नाही, हे त्या अनुराधांना सांगायला विसरल्या नाहीत.
इंदिरा गांधींच्या उत्कट सहवासामुळे त्यांचा राजकारणाकडचा कल वाढला. काँग्रेसच्या त्या नकळत समर्थक बनल्या. सक्रिय राजकारणात उतरण्याचा मोहही झाला. जेएनयूचेच प्राध्यापक रशीदुद्दीन खान राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी संधी मिळेल काय, असे इंदिरा गांधींना विचारण्याचे धाडसही त्यांनी केले; पण वैयक्तिक मैत्री आणि राजकारणात इंदिरा गांधी गल्लत करीत नव्हत्या. राज्यसभेवर नियुक्ती करताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो, असे सांगून त्यांनी सौम्य शब्दांत पण ठामपणे तसे शक्य नसल्याचे सांगितले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अनुराधा राजीव गांधींच्या संपर्कात आल्या. त्यांना राज्यसभेवर घेणे शक्य आहे काय याची राजीवनीही शीला दीक्षितांच्या मदतीने चाचपणी केली. एम. के. नारायणन गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागवून घेतली, पण पुढे काहीच झाले नाही. एम.के. नारायणन यांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती. राजीव सत्तेत नसताना देशातील राजकीय घडामोडींची माहिती मिळावी म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या न्यूज वॉच या समूहाच्या संयोजक म्हणून अनुराधांनी टॉम वडक्कन, अर्चना दालमिया आदींसोबत काम केले. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना सुरुवातीच्या काळात त्यांनी अ. भा. काँग्रेसच्या तक्रार निवारण केंद्रातही सरोज खापर्डे आणि अर्चना दालमिया यांच्यासोबत काम केले. अनुराधांचे पती मुकुंद कुंटे भारतीय नौदलात कोमोडर होते, पण केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर निवृत्तीपर्यंत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. कुंटेंच्या थोरल्या कन्या राधिका टंडन दिल्लीतच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नेत्रशल्य विभागाच्या प्राध्यापिका आहेत. पुत्र संदीप आणि त्यांच्या पत्नी शुचिश्री दोघेही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेले आणि इंग्लंड, अमेरिकेत बँकर म्हणून काम केल्यानंतर आता दिल्लीत बार्कलेज बँकेत नोकरीला आहेत. धाकटय़ा कन्या अरुंधती पती विजय पंत यांच्यासोबत न्यूयॉर्कला स्थायिक आहेत. जेएनयूमध्ये तीस वर्षे प्राध्यापक आणि विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर तिथून जवळच असलेल्या मुनीरका एन्क्लेव्हमध्ये राहणारे अनुराधा आणि त्यांचे पती मुकुंद या वयातही टेनिस आणि बॅडमिंटन खेळतात. इंदिरा गांधी आणि गांधी कुटुंबीयांसोबत व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणींमध्ये त्यांचे रंगून जाणे स्वाभाविकही आहे.. ‘फ्रेंच कनेक्शन’मुळे लाभलेला इंदिरा गांधींचा सहवास त्यांच्या सामान्य भासणाऱ्या आयुष्याला नाटय़मय कलाटणी देणारा ठरला आहे.