रूपरेषा बदललेल्या गुन्हेकादंबऱ्या सध्या खूप मोठय़ा प्रमाणावर गाजताहेत. गिलियन फ्लिन यांच्या ‘गॉन गर्ल’ कादंबरीच्या यशाचा जणू पाठलाग करीत या वर्षांत दाखल झालेली ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ कादंबरी विक्रीचे नवे विक्रम रचत जगभरात आवडीने वाचली जात आहे. त्या कादंबरीसोबत क्राइम फिक्शनच्या नव्या ट्रेण्डवर टाकलेला दृष्टिक्षेप.
रहस्य-गुन्हेकथांमधील अॅगाथा ख्रिस्ती यांच्या काळापासून लोकप्रिय झालेला ‘हू डनिट’चा प्रकार २०१२ साली दाखल झालेल्या गिलियन फ्लिन हिच्या ‘गॉन गर्ल’ या कादंबरीपर्यंत येताना ‘हू डनिट’सोबतच ‘हाऊडनिट’सुद्धा झाला. ‘गॉन गर्ल’ने आजच्या गुन्हेकथन शैलीतच केवळ बदल घडविला नाही, तर अनेक मूलभूत बदल ‘क्राइम फिक्शन’मध्ये घडविले. अॅगाथा ख्रिस्ती किंवा ढिगाने लोकप्रियतेचे नवनवे विक्रम करणाऱ्या पारंपरिक गुन्हेकादंबरी लेखकांमध्ये आणि गिलियन फ्लिनच्या कादंबरीमध्ये फरक आहे, तो तिने समाजातील बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा, नाती आणि नीती यांच्या घसरत्या व्यवस्थेचा कथा घडविण्यासाठी केलेला वापर. फ्लिनच्या कादंबऱ्यांमध्ये टोकाचे गुन्हे असले, तरी ते बऱ्यापैकी स्वच्छ वातावरणात घडतात. त्यात रक्ताळलेली अतिरंजित किंवा मानवी विकृतीची ओंगळवाणी वर्णने नाहीत. गुन्हेकादंबऱ्यांमधील पारंपरिक अधोलोक, गुन्हेगारी पाश्र्वभूमी, वाईट कृत्यांमध्ये अडकलेली माणसे तिच्या कोणत्याच कादंबरीमध्ये येत नाहीत. ढासळत्या कुटुंबव्यवस्थेतील मूल्यरचना हरवत चालल्याने वागणाऱ्या, भले-बुरेपणा सारखाच अस्तित्वात असलेल्या सर्वसाधारण व्यक्ती फ्लिनच्या कादंबऱ्यांच्या केंद्रस्थानी असतात. या कुटुंबगुन्हेगाथांनी अनपेक्षित चवबदल वाचकाला दिला असल्याने त्या खपविक्रमी ठरल्या. सोबत तिने तयार केलेल्या मार्गावर गुन्हेकादंबऱ्या लिहिणाऱ्या नव्या लेखिकांचा तांडाच तयार झाला. ‘फिल्म न्वार’ या लोकप्रिय चित्रप्रकाराविषयीचे प्रेम त्याच तोडीच्या गुन्हेकथांतून व्यक्त करणारी अमेरिकी लेखिका मेगन अबॉट (क्वीनपिन, ‘डेअर मी’), हेरकथांच्या जुन्या स्वरूपात खूनरहस्याचा नवा फॉम्र्युला तयार करणारी आयरिश लेखिका ताना फ्रेन्च (इन द वुड्स) या फ्लिनसमांतर लेखिकांनी रूढ गुन्हेकथांची चौकट बऱ्यापैकी मोडत त्याला कुटुंबसाज चढविला आहे. ई. एल. जेम्स यांच्या ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’च्या तुफानी खपानंतर या शृंगारातिरेकी कादंबरीला ‘ममी पोर्न’ (मध्यमवयीन महिलांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ही संकल्पना कादंबरीला डकविण्यात आली.) संबोधण्यात आले होते. तसेच या खूप खपल्या जाणाऱ्या आजच्या नव्या क्राइम फिक्शनला ‘ममी क्राइम’ म्हणता येईल. मध्यमवयीन कौटुंबिक नायिका-निवेदिका, गरजेनुसार या नायिकांचे ‘अँग्री यंग वुमन’मध्ये होणारे परावर्तन आणि वाचकाला रक्ताळलेली वर्णने न देता गुन्हय़ांची स्वच्छ वृत्तशैलीय बैठकीत माहिती देणाऱ्या, कुटुंब आणि समाजबदलाचे वैश्विक भान देणाऱ्या समसमान वैशिष्टय़ांच्या या कादंबरी-गर्दीत सध्या अग्रस्थानी आहे ती ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ ही ब्रिटिश लेखिका पॉला हॉकिन्स यांची ताजी कादंबरी. वर्षांच्या सुरुवातीला प्रकाशित झालेली ही कादंबरी (नुकतेच स्टीव्हन किंगचे कोरे पुस्तक येईस्तोवर) ‘न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर’ यादीच्या पहिल्या क्रमांकावरून उतरली नव्हती. दशलक्षांच्या पटीत खप आणि तितकाच वाढत्या बोलबाल्याने या कादंबरीची गिलियन फ्लिनच्या ज्या ‘गॉन गर्ल’शी तुलना केली जात होती, तिलाही ती मागे टाकण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘गॉन गर्ल’ आणि ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ यांतील साम्य रूपबंधापासून आशयापर्यंत अनेक ठिकाणी उघड आहेत. असे असले, तरी ती एक सशक्त आणि परिपूर्ण कादंबरी आहे. तिच्यातील रहस्याचा गुंता किंवा ‘हाऊडनिट’चा भाग भिन्न आहे. वाचक कादंबरीच्या गुरुत्वाकर्षणात आल्यानंतर त्यातील धारदार आणि चलाख मांडणीने गुंतामुक्तीसाठी पुरता अडकतोच. वर गुंता सोडविताना वरवर साध्या दिसणाऱ्या कुटुंबात घडू शकणाऱ्या ‘हाय व्होल्टेज’ थराराने चकित होतो.
असूया, आस्था आणि कुतूहल
न्वार फिल्ममधील प्रमुख घटकाप्रमाणे इथली अजिबात साधीसुधी नसलेली अग्रनिवेदक रेचल ही कादंबरी शीर्षकातील ट्रेनमधील मध्यमवयीन तरुणी आहे. घटस्फोटिता आणि अट्टल मद्यपी असलेली रेचल लंडनमधील एका उपनगरात सकाळी ऑफिसच्या दिशेने ८.१०च्या आणि आश्रयास असलेल्या मैत्रिणीच्या घरात संध्याकाळी ६.४०च्या ट्रेनने प्रवास करते. या प्रवासात विशिष्ट ठिकाणी बराच काळ सिग्नलमध्ये रखडणाऱ्या गाडीतून दिसणाऱ्या परिसराचा देखावा डोळ्यांत भरून घेणे हा तिचा रोजचा आवडीचा उद्योग असतो. तिला सोडून देणाऱ्या पतीसोबत तिचे याच परिसरात बराच काळ वास्तव्य असल्यामुळे या परिसराविषयी आणि तेथे राहणाऱ्या सुखासीन कुटुंबांविषयी तिच्या मनात एकाच वेळी असूया, प्रेम आणि आस्था भरून येत असते. आता आपल्याच जुन्या घरात दुसऱ्या महिलेशी संसार थाटणाऱ्या पतीविषयी कुतूहल शमविण्याची दिवसातील एक छोटी पण महत्त्वाची संधी म्हणून रेचल या रेल्वे प्रवासाकडे पाहत असते.
कादंबरीला सुरुवात होते तेव्हा रेचलच्या आधीच बिघडलेल्या परिस्थितीत नवनव्या वाईट गोष्टींची भर पडू लागली असते. त्यामुळे तिची आधीपासूनच असलेली तल्लख निरीक्षणशक्ती अधिक प्रखर बनते. ट्रेनमधील खिडकीतून आपल्या जुन्या घरासोबत एका शेजारी घरातील खूपच सुखवस्तू दिसणाऱ्या कुटुंबातील व्यवहारांचेही तिला दर्शन होत असते. आदर्श जोडप्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या कुटुंबातील सुख-समाधान आणि प्रेमाच्या दर्शनाने दररोज ती भारावून जात असते. आपल्या दु:स्थितीची तुलना ती तेथील मध्यमवयीन स्त्रीच्या सुस्थितीशी करीत असते. एका रेल्वेच्या प्रवासातच रेचलला या सुखवस्तू कुटुंबात काही तरी बिनसल्याची जाणीव होते. त्याच्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांत त्या कुटुंबातील ती मध्यमवयीन स्त्री हरविल्याची बातमी तिला पाहायला मिळते आणि कादंबरी रहस्यवळणाच्या उगमापाशी दाखल होते.
आलटून-पालटून तीन निवेदिका या कादंबरीतील घटनांमध्ये एकसूत्रता आणतात. रेचल, हरविलेली (सुखवस्तू) स्त्री मेगन आणि रेचलच्या पूर्वआयुष्यातील पतीची दुसरी पत्नी अॅना या तिघी उघडपणे इथल्या न-नायिका आहेत. त्या आपल्या बिघडलेल्या आयुष्याचा पट मांडता मांडता वाचकाला घटनांमधील गुंत्यामध्ये गुंडाळून टाकतात. यात रेचल आणि अॅनामध्ये अप्रत्यक्ष शत्रुत्व आहे आणि रेचल आणि मेगन यांच्यामध्ये रेचलकडून मेगनविषयी कमालीचे कुतूहल आहे. ज्या दिवशी मेगन बेपत्ता होते, त्याच दिवशी रेचलने ट्रेनमधून तिला घराच्या गच्चीवर परपुरुषासोबत पाहिलेले असल्याने पोलिसांना व मेगनच्या चिंताग्रस्त पतीला याबाबत कळविणे हे रेचलला आपले कर्तव्य वाटू लागते. ती या सगळ्या गोष्टी करते तोवर मेगनचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला असतो आणि खून कोणी केला, याच्याबाबत कोणतेही धागेदोरे शिल्लक राहिलेले नसतात.
बदलते नाते, बदलती कादंबरी
‘हूडनीट’ आणि ‘हाऊडनीट’ या संकल्पनांशी खेळ खेळत रेचल, मेगन (हत्या होण्याआधीचा खूप मोठा काळ) आणि रेचलच्या घराजवळ सतत दिसण्याने आयुष्य कडू झालेली तिची सवत अॅना यांचे तल्लख निवेदन कादंबरीरहस्य अधिकाधिक तीव्र करीत नेतात. पती-पत्नींमधील बदलते नातेसंबंध, लग्नसंस्थेचे तथाकथित स्थैर्य आणि प्रेम, नाती यांच्या काळानुरूप बदललेल्या व्याख्या कादंबरी दाखवून देते. रहस्यकादंबरीचा वाचकाला गरगरून सोडणारा पारंपरिक नियमही इथे व्यवस्थित राबविलेला दिसतो. मुळात तीन निवेदक आणि जेमतेम पाच-सात पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी गुंताउकल होईस्तोवर प्रत्येकावर संशयाचे बोट ठेवते. रेचलच्या एकूण निवेदनातून तिने पेरलेल्या काही संदिग्ध घटनांभोवती फिरताना, अॅनाच्या रेचलविषयीच्या घृणेतून तिच्या स्वभावाविषयी मत तयार करताना कादंबरी अस्वस्थतेचे आणि अंदाजाचे अशक्य चकवे वाचकाला देते.
दीड महिन्याच्या कालावधीत घडणाऱ्या या कादंबरीतील रेचलचा ट्रेनमधून सकाळ आणि संध्याकाळचा न चुकता होणारा प्रवास, या खून प्रकरणात कुतूहल दाखविल्यामुळे होणारी मानसिक दमछाक, तिच्याकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या चुका, तिचे अट्टल मद्यपी रूप, धूसर झालेल्या स्मृती, स्वप्ने आणि पूर्वायुष्याचा तुटलेला धागा जोडण्यासाठीचा आटापिटा या विचित्र परिस्थितीत घडणारी ही कथा आहे. रहस्य उलगडताना ती वाचकाच्या मेंदूला जोरदार गुद्दा देतेच, त्याशिवाय आजच्या बदलत्या कादंबरीचे सुंदर उदाहरणही समोर ठेवते.
पत्रकारांनी साहित्यात ‘मास्टरपीस’ देण्याची शतकांची परंपरा आहे, पण कादंबऱ्यांमध्ये फिक्शन आणि नॉनफिक्शनच्या सीमारेषा धूसर करून नवा कादंबरीचा घाट तयार करण्यात अलीकडचे पत्रकार-साहित्यिक खूप मोठय़ा प्रमाणावर गुंतले आहेत. आजच्या क्राइम फिक्शनच्या आराखडय़ावर सर्वाधिक पगडा पाडणारी कादंबरी ‘गॉन गर्ल’ लिहिणाऱ्या गिलियन फ्लिनही पत्रकार आहेत आणि त्या आराखडय़ाच्याच अनुयायी असलेल्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’च्या लेखिका पॉला हॉकिन्सही पूर्वाश्रमीच्या पत्रकारच आहेत. आजची बेस्टसेलर कादंबरी नुसती आकर्षक, चकचकीत, सहजसोपी या वैशिष्टय़ांवर अडलेली नाही, तर त्याहीपुढे टोकाचे समाजभान देण्यासाठी इच्छुक आहे, हे पत्रकार-साहित्यिक आपल्या कलाकृतींमधून दाखवून देत आहेत.
त्यामुळेच या कादंबऱ्यांची वाचकव्याप्ती निव्वळ गुन्हेकथा आवडणाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ‘गर्ल ऑन द ट्रेन’च्या आर्थिक आणि प्रायोगिक यशातून ते स्पष्टच होते आहे.
गर्ल ऑन द ट्रेन
प्रकाशक : रिव्हरहेड बुक्स (अमेरिका)
डबलडे (ब्रिटन)
पृष्ठे : ३२६
किंमत : फ्लिपकार्ट (पेपरबॅक) : ४१९,
अमेझॉन (हार्डकव्हर) : १२९२.