अतिउपलब्धतेमुळे वस्तू-सेवेची व्यक्तीलेखी किंमत कमी होते, हा सीमांत उपभोगाचा अर्थशास्त्रीय नियम चित्रपटाच्या आस्वादाबाबतही लागू होतो. पिढीगणीक कुण्या एका काळातल्या सिनेमाच्या भक्तीने पछाडलेले भारतीय सिनेरसिक मात्र या नियमाला मुबलकपणे पायदळी तुडवताना दिसतात. महिनाभरानंतर शंभर करोडी गल्लाभरू सिनेमांची नावे आणि ‘सुपरहीट’ गाण्यांचे मुखडे विसरले जाण्याच्या आजच्या काळातच जुने सिनेभक्त मात्र गाणी, चित्रपट, साल, गायक-गायिकांचे किस्से सांगताना उत्साहाचे sam05‘चर्वणप्राश’ घेतल्यासारखे बोलू लागतात. जुन्याला कवटाळून बसण्यात वावगे काहीच नसले, तरी यातून नव्याला एकगठ्ठा नाकारणारी दुराग्रही मानसिकता तयार होते. पण या गोष्टीकडे लक्ष न देता हे भक्तगण आपली ‘जुने ते..’ची उगाळणी कायम ठेवतात. ‘द मेकिंग ऑफ डॉन’ हे डॉन चित्रपटाच्या कल्पनाअवस्थेपासून त्याच्या आजच्या रिमेकपर्यंतच्या सूक्ष्म घटकांना सामावण्याचा प्रचंड मोठा आवाका ठेवणारे छोटेखानी पुस्तक प्रथमदर्शनी अशाच दुराग्रही मानसिकतेचे प्रतिबिंब असेल हा आपला भ्रम पानागणीक उतरवत नेते.
भारतीय चित्रपट त्याच्या प्रेक्षकांनी अगदी अलीकडेपर्यंत दिग्दर्शकांचे उत्पादन मानले नव्हते. सुरुवातीच्या काळापासून लोकांच्या मनदेव्हाऱ्यात अभिनेत्याची पूजा होत असल्याने चित्रपट पाहायला जाताना तो कोणत्या दिग्दर्शकाचा आहे, याऐवजी त्यात कोण अभिनेता/अभिनेत्री आहे, हे महत्त्वाचे असे. प्रेक्षकांना आवडणारा सर्वात महत्त्वाचा घटक नायक आणखी देवपदी बनला, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘अँग्री यंग मॅन’चा मुखवटा धारण केला. आणीबाणीउत्तर काळ, विद्रोही वातावरण, चळवळ, तरुणांची घुसमट यांचा परिपाक म्हणजे या अभिनेत्याचे स्टारपद होते. त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ची उभारणी ज्या चित्रपटांनी पक्की केली त्यात ‘डॉन’ या न- नायकाचा लक्षणीय वाटा आहे. चंद्रा बारोट या नवख्या-अननुभवी आणि मनमौजी दिग्दर्शकाने चार वर्षे स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करीत पूर्ण केलेल्या चित्रपटाची गाथा क्रिश्ना गोपालन यांनी ‘द मेकिंग ऑफ डॉन’ या पुस्तकाद्वारे मांडली आहे. एखाद्या खूप यशस्वी झालेल्या चित्रपटाची काही वर्षांनंतर भलामणयुक्त आठवण काढण्याच्या आजच्या फॅशनहून हे पुस्तक नक्कीच वेगळे आहे.
गोपालन यांच्या लिखाणाचे खरे वैशिष्टय़ त्यांचे हट्टाग्रही भावूक सिनेभक्त न बनण्यात आहे. ‘डॉन’च्या झळाळत्या यशाचे साक्षीदार असलेल्या गोपालन यांनी शेकडो मुलाखती आणि सांगोवांगीच्या घटनांची मिसळ करून बनविलेला हा पुस्तकी आराखडा कुणाएकाची भलामण करण्याच्या हेतूने नाही. तत्कालीन मुंबईतील समाजजीवन, सामान्य माणसाच्या नजरेतला सिनेमा आणि एकूण वैश्विक साहित्य-चित्रपटांचा चित्रकर्त्यांवरचा परिणाम यांचे सूक्ष्म अवलोकन त्यांनी पुस्तक लिहिताना केले आहे. त्यामुळे मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलच्या अल्प-इतिहासापासून ते संगीत कंपन्यांच्या कामकाजाचा भाग येथे भरपूर माहिती देऊन जातो. मूळ भाग ‘डॉन’च्या निर्मितीवर असला, तरी त्या निर्मितीत असंख्य डोंगर कसे होते, याचा उद्बोधक तपशील यात आला आहे. हिंदूी चित्रपटसृष्टीतील मान्यवर नावांच्या भल्या-बुऱ्या-गमतीशीर किश्श्यांचेही यात दस्तावेजीकरण झाले आहे. छोटय़ा प्रकरणांमधून वेगवान मालिकांसारखी अनुभूती ते वाचताना येत राहते.
सिनेमॅटोग्राफर नरिमन इराणी यांच्या कर्जफेडीसाठी त्यांच्या शिष्यमित्राने अंधारात घेतलेली दिग्दर्शकीय उडी म्हणजे ‘डॉन’ची निर्मिती होती. कसलाही अनुभव नसताना केवळ आत्मविश्वासाच्या बळावर आणि तेव्हा स्टारपदी नसलेल्या अमिताभ बच्चन व इतर कलाकारांशी असलेल्या खास मैत्रीच्या जोरावर चंद्रा बारोट यांनी ‘डॉन’ बनवायला घेतला, तेव्हा तेव्हाच्या प्रतिष्ठितांनी त्यांची खिल्ली उडविली. त्याच्या तिरपागडय़ा नावापासून अ‍ॅण्टीहीरो पटकथेपर्यंत अनेकांनी भरभरून हसून घेतले. मात्र तरीही त्यांनी अल्प बजेटमध्ये सिनेमा बनविण्याचा विचार सोडला नाही. इतर चित्रपटांची शूटिंग झाल्यानंतर त्यांच्या राहिलेल्या सेट्समध्ये चित्रीकरण उरक, एखाद्या ओळखीच्या कलाकाराचा बंगला, एखाद्या हॉटेलचा परिसर मिळवून त्यात चित्रीकरण संपव, अशा काटकसरींमध्ये त्यांनी सिनेमा पूर्ण केला. त्यातले सहअभिनेते, छोटय़ा भूमिकांमध्ये वावरणारे कलाकार चित्रपटात समाविष्ट कसे झाले आणि आजही श्रवणमूल्य टिकून असलेल्या गाण्यांची निर्मिती कशी झाली याच्या सविस्तर सत्यकथा वाचकाला अडकवून ठेवणाऱ्या आहेत.
आपल्या चित्रपटसृष्टीची साठ-सत्तरीच्या काळातील मानसिकता, आजूबाजूच्या निर्दयी जगाला विसरायला लावणारे माध्यम म्हणून चित्रपटाकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांची गरज आणि त्याच वेळी प्रगट होणाऱ्या कलाकृतींना कच्चामाल म्हणून वापरण्याची चंद्रा बारोट यांची कल्पकता यांवर सुरेख दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. बारोट यांच्या या पहिल्याच प्रयत्नाने त्या वर्षांच्या दिग्गज कलाकृतींना मागे टाकत तीन फिल्मफेअरवर नाव नोंदविले होते. पण त्यानंतर त्यांचे चित्रप्रकल्प फसत कसे गेले, त्याचाही लेखाजोगा द्यायला गोपालन विसरले नाहीत.
चित्रपटाची भलामण करण्यासाठी ‘तेव्हा सगळेच थोरच होते आणि आता सगळेच ‘पोर’खेळयुक्त कसे आहे’, असा सूर कटाक्षाने टाळत गोपालन यांनी वाचकांना विश्वासात घेतले आहे. त्यामुळे दोन नवे ‘डॉन’ चित्रपट अनुभवलेल्या आजच्या पिढीला आपल्याच चित्रपटसृष्टीतील कैक अज्ञात घटकांची ओळख या पुस्तकाने होऊ शकेल. मागील पिढीला या ‘डॉना’यणात रममाण होण्यासाठी कुणीच रोखू शकणार नाही.
द मेकिंग ऑफ डॉन : क्रिश्ना गोपालन,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : १७२, किंमत : १९५ रुपये.