कवयित्री आणि लेखिका अशी चिरस्थायी ओळख निर्माण करून, वयाच्या ८६ व्या वर्षी माया अँजलो यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे जग केवळ अमेरिकेपुरते नव्हते. तरुणपणी आफ्रिकेत त्यांनी काही नोकऱ्या केल्या होत्या म्हणून नव्हे, तर जगभरच्या पिचलेल्यांना- दलितांना सृजनाची प्रेरणा देण्याची धमक माया यांनी दाखवली होती. ‘आय नो व्हाय द केग्ज बर्ड सिंग्ज’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक (१९७०) म्हणजे अशा प्रेरणेचा केंद्रबिंदू ठरले होते.
 लहानपणीच अत्याचार झाल्याने माया यांची वाचा गेली. सात ते १२ वर्षे या वयात माया एकही शब्द बोलल्या नाहीत. मग मात्र थेट गाऊ लागल्या, नाचूही लागल्या. नृत्य-गान शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्तीही मिळवली आणि १९५४ ते ५८ हा काळ गाजवला. पण ‘त्या’ अबोल पाच वर्षांत केलेले भरपूर वाचन त्यांना भाषेकडे घेऊन गेले. संपादकीय पदांवर काम करण्याइतके भाषाप्रभुत्व असल्याने १९६० साली (लग्नानंतर) इजिप्तमध्ये, कैरो येथील ‘द अरब ऑब्झव्‍‌र्हर’च्या संपादक, १९६१ मध्ये घाना विद्यापीठाच्या नाटय़विभागात नृत्याचे अध्यापन आणि तेथेच ‘द आफ्रिकन रिव्ह्यू’ आणि ‘घानियन टाइम्स’साठी लेखन अशी त्यांची लेखणी सुरू झाली.
माया यांचे स्वतंत्र लिखाण कवितांतून सुरू झाले, पण कवितेचा झरा कायम राखून त्यांनी आत्मपर कादंबऱ्या आणि इतर गद्यलेखनही केले. १९६४ मध्ये अमेरिकेत परतल्यावर वर्णद्वेषविरोधी अमेरिकी लढय़ाचे नेते माल्कम एक्स यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी या चळवळीत काम सुरू केले. एक्स यांच्या हत्येनंतर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी मायांकडे विभागीय प्रमुखपदही दिले. हा लढा यशस्वी होत असतानाच माया यांची कविता बहरू लागली होती. १९७० सालच्या यशस्वी गद्य पुस्तकानंतर, १९७२ मध्ये ‘जॉर्जिया’ या चित्रवाणीपटाच्या संगीत-दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले आणि मग, लिखाणासोबत अधूनमधून संगीतकार, अभिनेत्री, गायिका अशा भूमिका माया निभावू लागल्या.
पण या अनेक भूमिकांमागला चेहरा होता तो अतिशय मेहनती, जग आपले मानणाऱ्या आणि खमक्या महिलेचा. त्या चेहऱ्यानेच अमेरिकी वर्णभेदविरोधी, मानवी हक्कांच्या चळवळीत माया वावरल्या आणि चळवळीच्या दैनंदिन कामापासून दूर गेल्यावरही अन्य क्षेत्रांत काम करताना त्यांनी चळवळीची मूल्ये कायम ठेवली. स्त्रीवादी मूल्ये जगलेल्या पहिल्या काही लेखिकांपैकी त्या होत. या मूल्यांचे सत्त्व माया यांच्या जगण्याकडे पाहून कळावे. अमेरिकी सर्वोच्च नागरी पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले; पण हे पुरस्कारमंडन नसते तरीही स्वत:चे जगणे सुंदर करण्याची ताकद माया यांनी जगून कमावलेली होतीच.