पेशाने वकील असलेले आणि गेली काही वर्षे निवृत्त आयुष्य जगणारे ९१ वर्षांचे हेंक झनोली अगदी आठवडय़ापूर्वी- १० ऑगस्टपर्यंत-  कुणालाही माहीत नव्हते. ते आधी कुणाला माहीत असावेत, असे त्यांचे कर्तृत्व असल्याच्या नोंदी आज आठ दिवसांनंतरही सापडत नाहीत. शोधलेच, तर एक नोंद सापडेल : ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पंचविशीच्या झनोलींनी माणुसकीचे दर्शन घडवले होते..  हिटलरी आक्रमणाच्या रेटय़ात हेंक यांनी आई योहाना हिच्या संमतीने एल्चानन नावाच्या ११ वर्षांच्या ज्यू मुलाला आपल्यासह घेतले, घरात लपवून ठेवले.. थोडीथोडकी नाही, तब्बल दोन वर्षे (युद्ध संपेपर्यंत) हा मुलगा झनोली कुटुंबात वाढला आणि पुढे निवासी शाळेत गेला. महायुद्धात ज्यूंना मिळालेल्या माणुसकीबद्दल बिगर-ज्यूंना ‘याद वशेम पदक’ देण्याचा इस्रायलचा प्रघात आहे.. तो इस्रायलने झनोली यांना २०११ साली हे पदक देऊन पाळला.
झनोलींना जगभर प्रसिद्धी मिळते आहे, ती मात्र गेल्याच आठवडय़ात (११ ऑगस्ट) केलेल्या एका कृतीमुळे. ‘माणुसकी कधीच पक्षपाती नसते आणि माणुसकी असणारा माणूस केवळ स्वार्थाचा विचार करत नाही’, या साध्याच सत्यांवर जगाचा विश्वास पुन्हा बसावा, अशी त्यांची ती कृती असल्यामुळे एवढी प्रसिद्धी मिळणे रास्तही आहे.
झनोलींनी एवढेच केले की, इस्रायलने त्यांना तीनच वर्षांपूर्वी सन्मानाने दिलेले ते पदक इस्रायली वकिलातीला परत केले.. सोबत, हे पदक परत करण्यामागची व्यक्तिगत आणि वैचारिक कारणे देणारे पत्रही दिले. यापैकी व्यक्तिगत कारणे पत्राच्या पहिल्या पानावर असून, दुसऱ्या पानाची सुरुवात वैचारिक कारणांपासून होते. ‘इस्रायल या देशाबद्दल किंवा झायोनिस्ट (ज्यूंच्या) राष्ट्रभावनेबद्दल जी सकारात्मकता होती, ती संपली आहे. इस्रायल हे फक्त ज्यूंचेच राष्ट्र असले पाहिजे अशा वंशवादी भूमिकेतून अन्य वंशीयांचा संहार इस्रायलने आरंभल्याचे दिसले आहे. या पाश्र्वभूमीवर, मला तुम्ही दिलेला सन्मान आवश्यक नाही’, अशा अर्थाची वाक्ये या पत्रात आहेत. अर्थात, झनोलींनी गाझामध्ये मृत झालेल्या एका कुटुंबाशी आपले कसे लांबचे नाते आहे, त्यामुळे निरपराध नातलगांचाच बळी घेणाऱ्या इस्रायलचे पदक आपण ठेवू शकत नाही, असेही लिहिले आहे.
झनोलींचा हा निव्वळ स्टंट आहे, वगैरे कट्टर इस्रायली उत्तरबाजी आता सुरू झालीच आहे; शिवाय झनोलींचे कौतुक करणाऱ्या (न्यूयॉर्क टाइम्स आदी) प्रसारमाध्यमांना नावे ठेवण्याचे प्रयत्नही काही इस्रायलप्रेमी करीत आहेत. ‘आमच्यावर हल्ला होतोय, दिसत नाही का?’ असा सवाल झनोलींचे कौतुक मान्य असणाऱ्यांना विचारला जातो आहे. तरीही झनोलींच्या भूमिकेचा रास्तपणा जगभरच्या लोकांना पटतो आहेच.