शिक्षणाचे बाजारीकरण आणि शैक्षणिक संस्थांनी चालवलेली दुकानदारी लपून राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत न्यायालयांनीसुद्धा या बाजारीकरणावर ताशेरे ओढत शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल आणण्याच्या असंख्य सूचना केल्या आहेत. मात्र, ‘सरस्वती’च्या नावाखाली ‘लक्ष्मी’ची पूजा मांडलेल्या शिक्षणसम्राटांनी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारनी याकडे कधीच गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे आज भारतात शिक्षणव्यवस्था विशेषत: उच्च शिक्षण ही गरीब व सर्वसामान्यांसाठी जणू चनीची गोष्ट बनली आहे. तरीदेखील शिक्षणाच्या दुकानदारीकडे असलेला ग्राहकरूपी विद्यार्थी-पालकांचा ओघ आटताना दिसत नाही. विशेषत: अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रांकडे तरुणवर्गाचा ओढा वाढत चालल्याने अशा प्रकारच्या शिक्षणसंस्थांचे पेवच  फुटले आहे. कोणीही धनदांडगा उठतो व आलिशान इमारती उभारून मोठमोठाली मॅनेजमेंट स्कूल्स किंवा इन्स्टिटय़ूट उभ्या करतो. सरकारी पातळीवरील खाबूगिरीमुळे अशा संस्थांना त्यांच्यातील शैक्षणिक दर्जाची शहानिशा न करता ‘दुकानदारी’चे परवाने मिळतात. त्याच्या जोरावर विद्यार्थ्यांकडून वारेमाप शुल्क आकारून या संस्था आपली भरभराट करतात, असे चित्र सध्या जागोजाग पाहायला मिळत आहे.
अशा भुक्कड शिक्षणसंस्थांमधील एकूणच यंत्रणा किती भुक्कड, अकार्यक्षम, तकलादू व हीन दर्जाची असते, हेदेखील कालांतराने उघड होतेच. शिक्षणाचा बाजार आणि त्यातील राजकीय दलालीचे चित्रण करणारी ‘द स्कूल ऑफ कोअर इन्कॉम्पिटन्स’ ही आर. चंद्रशेखर यांची कादंबरी नेमक्या याच गोष्टींवर प्रहार करते. एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारख्या उभारण्यात आलेल्या व्यवस्थापन महाविद्यालयांत ढिसाळ व्यवस्थापन हाच कसा कळीचा मुद्दा ठरतो, याचे व्यंगात्मक वर्णन करणारे ही कादंबरी शिक्षणव्यवस्थेला दाखवलेला आरसा म्हणावा लागेल.
कोईम्बतूरमधील सुंदरमबाल इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या शिक्षणसंस्थेतील घडामोडींभोवती या कादंबरीचे कथानक फिरते. महाविद्यालयाचा दर्जा तपासण्यासाठी आलेल्या मूल्यमापन समितीला संस्थेच्या कॅन्टीनमध्ये दोन उंदीर आढळतात. त्यामुळे संस्थेचे मानांकन खालावण्याच्या भीतीने संस्थेच्या ‘आत्ममग्न’ संचालकाला एक समिती स्थापन करावी लागते. तेथून हे कथानक सुरू होते. कारकुनापासून प्राध्यापकाच्या पातळीवर पोहोचलेल्या संबंधम या प्रोफेसरला समितीचे अध्यक्षपद बहाल केले जाते आणि अन्य प्राध्यापकांना समितीत स्थान दिले जाते. परंतु, उंदरांना रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या या समितीतच प्राध्यापकांमध्ये उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो. ब्राह्मण-दलित संघर्ष, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय मतभेद आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यातच समिती रंगून जाते. त्यातच ज्या दिवशी मूल्यमापन समितीचा पाहणी दौरा असतो, त्याच दिवशी योगायोगाने संस्थेच्या संस्थापक खासदाराला डॉक्टरेट पदवी देण्याचाही कार्यक्रम आयोजित होतो. मग नव्या गोंधळास सुरुवात होते. त्यात पंतप्रधानांचे खासगी योग गुरुजी, सरकारी अधिकारी वर्ग या पात्रांचाही समावेश होतो आणि सरतेशेवटी या साऱ्यांचेच पितळ उघडे पडते. शिक्षणसंस्थांमधील राजकारण, राजकारण्यांचे शिक्षणसंस्थांशी असलेले लागेबांधे, राजकारण्यांमुळेच फोफावलेली बुवाबाजी आणि सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार या सर्वाना ही कादंबरी विनोदी ढंगाने लक्ष्य करते, पण तेही मार्मिकपणे. महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये शिरलेल्या उंदरांपासून सुरू झालेली ही कथा प्रत्येक वळणावर वाचकाला हसवते आणि विचारही करायला लावते.
पुस्तक वाचायला सुरू करायच्या आधी तिचे मुखपृष्ठ आपले लक्ष वेधून घेते. कारण ते कादंबरीचा बाज आणि विषय नेमकेपणाने सांगणारे आहे. त्यामुळे त्याचे वर्णन केलेच पाहिजे. एखाद्या महाविद्यालय किंवा शिक्षणसंस्थेची जाहिरात असल्यासारखे हे मुखपृष्ठ  आहे. त्यावर सरळ सरळ ‘आमच्या वातानुकूलित महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांना सर्वोत्तम उपाहारगृह, मोफत विदेशवारी, १०० टक्के कर्ज, १०० टक्केनोकरी, मोफत लॅपटॉप अशा सुविधा मिळतील,’ असा आकर्षक मजकूर आहे. तो शिक्षणाच्या बाजारीकरणाचे दर्शन घडवतो. अध्यापनाचा दर्जा सोडून बाकी फुटकळ गोष्टींवरच अधिक भर देऊन विद्यार्थ्यांना फशी पाडणाऱ्या शिक्षणसंस्थांसाठी हे मुखपृष्ठ चपराकच म्हणावी लागेल.
आर. चंद्रशेखर यांच्या कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यातील प्रकरणांना व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विषयांचे मथळे दिले आहेत. उदा. विद्यार्थ्यांमार्फत संस्थेची वाईट प्रसिद्धी होऊ नये म्हणून त्यांना जादा गुण देण्यासंदर्भातील प्रकरणास ‘अंडरस्टँिडग यूअर कस्टमर’ असे शीर्षक दिले आहे. अशाच प्रकारे प्रत्येक प्रकरणातील घटनेचे मार्मिक शब्दांत विश्लेषण करणारे शीर्षक या कादंबरीची रंजकता अधिक वाढवते. पुस्तकातील व्यक्तिरेखांचे वर्णन आणि त्यांच्या तोंडी असलेले संवादही आजच्या व्यवस्थेशी तंतोतंत जुळणारे आहेत. काही ठिकाणी एखाद्या घटनेची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी लेखकाने जास्त वेळ आणि शब्द वाया घालवले आहेत. मात्र, विनोदी वाक्ये आणि संवाद यांमुळे त्यात रटाळपणा येत नाही.
आर. चंद्रशेखर हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले प्रथितयश अर्थतज्ज्ञ आहेत. याआधी त्यांनी लिहिलेली ‘द गोट, द सोफा अ‍ॅण्ड मि. स्वामी’ ही भारत-पाकिस्तानातील संबंध आणि नोकरशाहीवर प्रकाश टाकणारी कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली होती. ‘द स्कूल ऑफ कोअर इन्कॉम्पिटन्स’ हीदेखील वाचकांना भावेल, अशीच आहे.
 

द स्कूल ऑफ कोअर इन्कॉम्पिटन्स :
आर. चंद्रशेखर,
प्रकाशक : हॅचेट इंडिया,
पाने : २७२, किंमत : २९५ रुपये.