संरक्षण सामग्रीची आयात वाढवताना या सामग्रीमागचे तंत्रज्ञानही घेणे, या सामग्रीची देखभाल देशांतर्गत व्हावी, यासाठी यंत्रणा उभारणे याला प्राधान्य द्यावे लागते. संरक्षणमंत्री अँटनी यांच्या कारकिर्दीत हे झाले नाही, म्हणून हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सही देशाबाहेर धाडावा लागला..

लॉकहिड मार्टिन कंपनीतर्फे बनवले जाणारे हक्र्युलिस सी-१३० जातीचे विमान कोसळून त्यात देशातील अव्वल अशा पाच वैमानिकांचा अंत झाला. पुण्यातील प्रशांत जोशी यांच्यासह हवाई दलाचे अन्य चार अत्यंत प्रशिक्षित असे तरुण यात कामी आले. प्रशांत यांचे कुटुंबच हवाई दलाशी संबंधित असून त्यांचे वडील आणि पत्नी हेदेखील हवाई दलाच्याच सेवेत होते. कै. प्रशांत यांच्या तीर्थरूपांनी पोटच्या मुलाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच या दु:खात समाधान हेच की तो देशासाठी गेला असे म्हटले. हा जोशी यांच्या मनाचा मोठेपणा झाला. परंतु आपल्या संरक्षण मंत्रालयाबाबत असे म्हणता येणार नाही. त्याचमुळे या पाच जणांच्या अकाली मृत्यूबाबत दु:ख व्यक्त होत असतानाच त्यांच्या मृत्यूमागील कारणांमुळे संताप निर्माण होऊ शकतो. इतके दिवस आपले वैमानिक मिग विमानांच्या कोसळण्यात हकनाक जात असत. मध्यंतरी पाणबुडय़ांच्या अपघातात आपले काही नौसैनिक असेच प्राणास मुकले. आता हक्र्युलिसदेखील कोसळले. या सर्वामागील कारणे समान दिसतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे संरक्षण मंत्रालयाची अनास्था.
हक्र्युलिस सी-१३० हे एक विमान साधारण ९६० कोट रुपयांना पडते. अशी आपण सहा विमाने अलीकडे अमेरिकेकडून घेतली. जगातील अद्ययावत अशा विमानांमध्ये त्याची गणना होते आणि ३३ हजार किलो वाहून नेण्याची त्याची क्षमताही अजोड मानली जाते. या विमानांचा इतिहास हे दर्शवतो की आतापर्यंत त्याला फक्त एकमेव अपघात झाला असून त्यात वैमानिकांची चूक आढळली. दुसरा अपघात हा गेल्या आठवडय़ात ग्वाल्हेरजवळ झालेला. त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही कारण त्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहितीचे अद्याप विश्लेषण झालेले नाही. विमानांच्या अपघातात ही ब्लॅक बॉक्स मोलाची असते. कारण त्यातून विमानाच्या अपघाताआधीच्या निर्णायक क्षणांचा तपशील मिळू शकतो. परंतु हक्र्युलिस सी-१३० या विमानाबाबत आपल्याला ही माहिती स्वतंत्रपणे मिळणार नाही आणि अमेरिकी कंपनी जे काही सांगेल त्यावरच समाधान मानावे लागेल. कारण या विमानाचा ब्लॅक बॉक्स वाचायचे तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. हक्र्युलिस सी-१३० च्या ब्लॅक बॉक्सला अपघातात काही इजा झाली असून तीमधील माहितीचे पृथक्करण करण्यात काही धोका नको म्हणून ती अमेरिकेत कंपनीकडे पाठवण्यात आल्याचे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. म्हणजेच ही माहिती वाचण्याची तांत्रिक क्षमता आपणाकडे नाही. संरक्षणमंत्री ए के अँटनी यांच्या काळात आपल्या संरक्षण सिद्धतेत जी काही सार्वत्रिक चालढकल झाली आहे, त्यामुळेच हे ब्लॅक बॉक्स पृथक्करण तंत्रज्ञान आपल्याकडे नाही असे म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. या विमानांच्या देखभालीसाठीचे लॉकहिड मार्टिनबरोबरचे आपले कंत्राट संपुष्टात आले होते आणि त्याच्या नूतनीकरणाचा निर्णय पडून होता. याच्याच बरोबरीने या विमानाच्या नियंत्रण यंत्रणेसाठी लागणारे सुटे भाग हे उच्च दर्जाचे नव्हते असेही समोर आले आहे. हे सुटे भाग चिनी बनावटीचे आणि दर्जाने दुय्यम होते, असे प्रसिद्ध झाले आहे. तसे असेल तर त्याबाबतचा हलगर्जीपणा हा गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणावा लागेल. मूळ कंपनीच्या सुटय़ा भागांपेक्षा चिनी उत्पादने अर्थातच स्वस्त असणार. परंतु काटकसर कोठे करायची याचेही काही भान असणे आवश्यक असते. हवाई दलात आघाडीवर लढणारी विमाने म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या किंगलाँग या हलक्या दर्जाच्या बस गाडय़ा नव्हेत. तेव्हा याचीही जाणीव सुटली असेल तर संबंधितांना केवळ घरी पाठवून भागणार नाही. त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटलेच भरावयास हवेत. कारण संरक्षण मंत्रालयात सध्या हे जे काही सुरू आहे, त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. गेल्या दहा वर्षांत, म्हणजे २००४ पासून आजतागायत, भारत हा जगात सर्वाधिक संरक्षण सामग्री आयात करणारा देश बनला असून आपली शस्त्रास्त्र खरेदीची गती ही चीन वा पाकिस्तान या शेजारील देशांपेक्षादेखील किती तरी अधिक झाली आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या अहवालानुसार हा शस्त्रास्त्र खरेदीचा दर १११ टक्क्यांनी गेल्या दशकात वाढलेला आहे. याचा अर्थ चीन हा आपल्यापेक्षा संरक्षण सिद्धतेत कमी आहे असा अर्थातच नाही. चीनपेक्षा आपली आयात अधिक झाली याचा अर्थ देशांतर्गत संरक्षण साधनांच्या निर्मितीत आपल्याला आलेले अपयश. संरक्षणमंत्री अँटनी यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून संरक्षणाबाबत स्वदेशीचा धोशा लावला होता. परंतु त्यांचा तो बहुप्रसिद्ध निर्धार फक्त कागदावरच राहिला. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात संरक्षणासाठी देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित झालेच नाही. म्हणजे एका बाजूला आयात वाढली आणि त्याच वेळी आयात झालेल्या मालाला हाताळेल अशी यंत्रणाच आपण उभारू शकलो नाही. बऱ्याच संरक्षण कंपन्या आपापल्या उत्पादनांसमवेत त्याबाबतचे तंत्रज्ञानही खरेदीदाराला देत असतात. त्यानुसार खरेदीदार देशाने आवश्यक त्या सुटय़ा मालाची निर्मिती व्यवस्था उभारणे अपेक्षित असते. हक्र्युलिस सी-१३० या विमानाबाबत नक्की काय झाले याचा साद्यंत तपशील पुढे आलेला नाही. परंतु जे नौदलाच्या अपघातग्रस्त पाणबुडय़ांबाबत झाले तेच हवाई दलाच्या विमानांबाबतही झाले असणार असे का मानू नये हा प्रश्न आहे.
 हे अँटनी महाशय २००६ सालातल्या ऑक्टोबर महिन्यात संरक्षणमंत्री झाले. त्यांना त्या पदापर्यंत घेऊन गेली ती त्यांची स्वच्छ प्रतिमा. अँटनी यांच्या सुमारे चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर कोणताही डाग नाही की किटाळ नाही. या त्यांच्या गुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. परंतु संरक्षण दलाची कार्यक्षमता त्या खात्याच्या मंत्र्याच्या चारित्र्यावरून ठरत नाही. युद्धजन्य परिस्थिती अवतरल्यास केवळ मंत्री सज्जन आहे म्हणून भारताची गळकी पाणबुडी तरणार नाही की विमान पडायचे थांबणार नाही. तेव्हा चारित्र्यापेक्षा अँटनी यांची कार्यक्षमता ही अधिक महत्त्वाची ठरते. त्या आघाडीवरील निष्क्रियतेबाबत त्यांची स्पर्धा थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशीच होऊ शकेल. भ्रष्टाचाराचे आरोप होतील म्हणून कंत्राटे देण्यास विलंब करणे वा कोणा एका कंपनीस झुकते माप दिले असा बभ्रा होईल म्हणून निर्णय लांबवणे हे असले प्रकार अँटनी यांच्या राजवटीचे व्यवच्छेदक लक्षण बनले असून आपल्या खात्यात जो काही हाहाकार सुरू आहे त्याबाबत या तथाकथित स्वच्छ मंत्र्यास चाड आहे, असेही जाणवत नाही. त्यात देशाचे पाप हे की गेल्या काही वर्षांत डॉलरचा दर प्रचंड प्रमाणात वधारला. त्यामुळे ही आयात अधिकच महाग पडू लागली. तेव्हा अशा वेळी देशांतर्गत संरक्षण उत्पादनास वाव देण्याऐवजी या अँटनी यांनी आयात निर्णयच लांबणीवर टाकले. परिणामी आपले संरक्षण दल जेवायला न वाढणारी आई आणि भीकही मागू न देणारा बाप यांच्या कात्रीत सापडले आहे.    
आपले संरक्षणमंत्री पद हे संतपदाच्या वाटचालीत अडथळा आहे, असे अँटनी यांचे मत दिसते. त्यामुळे ते सर्वच निर्णय घेणे टाळतात. निर्णय घेतलाच तर भ्रष्टाचाराचा आरोप होईल ही भीती. तेव्हा त्यांनी हे भ्रष्टाचार आरोप टाळून जरूर संतपद मिळवावे. आम्हालाही त्यात आनंदच होईल. परंतु हे संतपण मिळवत असताना आपली निष्क्रियता इतरांच्या स्वर्गप्राप्तीस कारण ठरत आहे, हेही ध्यानात घ्यावे. हे पाप आहे.