अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारी सुरू झाले की दुसऱ्या दिवशी, शनिवारी अध्यक्षीय भाषणातील महत्त्वाचे विचार प्रमुख वृत्तपत्रांनी छापायचे, असा प्रघात पडून गेला आहे.. त्याऐवजी, आजवरच्या काही संमेलनाध्यक्षांचे निवडक विचार आम्ही येथे छापतो आहोत.. साहित्यिक स्वतला समाजाशी कसे जोडतात याची विविध रूपे दाखवणारे हे विचार, आजही कालसुसंगत ठरणारे आहेत. अर्थात, अनेक संमेलनाध्यक्षांनी आजवर महत्त्वाचे विचार व्यक्त केले होते आणि त्यातून केलेली ही निवड केवळ प्रातिनिधिक आहे..

विविध प्रकारचे दु:ख हा विनोदाचा एकमेव विषय
प्रतिगामी, अगतिक आणि जीर्ण समाजाची बिंगे हासत हासत बाहेर काढण्यास विनोदासारखे दुसरे प्रभावी साधन नाही ही गोष्ट (श्रीपाद कृष्ण) कोल्हटकरांनीच दाखवून दिली. विनोदाचे मूळ स्वरूप मुळी असेच आहे. मानवी जीवनात रोग, जरा, मरण, अपघात, हानी, पराभव, निराशा, अपमान, अज्ञाना, मूर्खपणा इत्यादी अनंत दुखे भरलेली आहेत. या दुखाकडे गांभीर्याने पाहिल्यास ती दुणावल्याखेरीज राहणार नाहीत, म्हणून त्यांच्याकडे खेळकर दृष्टीने बघून जीवन सुखावह करण्यासाठी मनुष्याला विनोदाची देणगी मिळालेली आहे. विविध प्रकारचे दुख हा विनोदाचा एकमेव विषय आहे. समाजातील अनिष्ट रूढी आणि सवयी नाहीशा करावयाच्या असतील तर त्यांच्यामधील अनिष्टपणा आणि निर्थकपणा हा विनोदाच्या साहाय्याने समाजापुढे उघडा करून दाखविला पाहिजे. श्रावणी, शिमगा, सोवळेओवळे, निर्जळी एकादशी, धर्मातर, मृताचे अंत्यसंस्कार इत्यादी विषयांवर विनोदी निबंध लिहून कोल्हटकरांनी समाजातील अनिष्ट आचार, विचार, समजुती यांच्यावर फारच मार्मिक टीका केली आहे. कोल्हटकरांचे हे लिखाण पुरोगामी वाङ्मयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. गंभीर तऱ्हेचा हल्ला एकवेळ सहन करता येतो; पण विनोदाच्या माऱ्याला तोंड देता येत नाही. माणसाचा मूर्खपणा विनोदान जितका उघडा होतो तितका दुसरा कशाने होत नाही, म्हणून मूर्ख लोक विनोदाचे नेहमीच वैरी असतात. विनोद हा ग्राम्य, अश्लील किंवा बीभत्स कधीच असू शकत नाही. तो करणारा माणूस किंवा ऐकणारा माणूस हा ग्राम्य, अश्लील किंवा बीभत्स असतो. ज्यांना निषेध करावयाचा असेल त्यांनी पाहिजे तर ग्राम्यतेचा, अश्लीलतेचा किंवा बीभत्सपणाचा निषेध करावा, पण ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ या न्यायाने विनोदाची तरी  बदनामी करू नये. विनोदाची गंमत अशी आहे की, लेखक पट्टीचा कुशल नसेल तर त्याच्या हातून नेमका विनोद निर्माण व्हावयाच्या ऐवजी पांचटपणा किंवा अश्लीलताच निर्माण होते.
– आचार्य प्र. के. अत्रे, १९४२, नाशिक

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

समाजात आत्मज्ञान वाढत राहिले पाहिजे..
मनुष्याची बुद्धि हा ब्रह्मदेव आहे अशी प्राचीन कल्पना आहे; कारण ती नवी सृष्टि निर्माण करूं शकते. पण अहंकार हा रुद्र आहे. बुद्धि जर केवळ विषयनिष्ठ बनली व तिला अहंकारानें पछाडलें तरी जगाचा प्रलय करील. जुन्या सामाजिक सृष्टीचाच केवळ प्रलय झाला तर कोणास दु:ख करण्याचें कारण नाहीं, पण त्या जुन्या सामाजिक सृष्टीबरोबर सर्व मानवजातच जर भस्मसात झाली तर जुन्या सृष्टीबद्दल रडणार कोण आणि नवी सृष्टी निर्माण तरी करणार कोण?
म्हणून बुद्धीला अहंकार व ममत्व यांच्यापासून मुक्त करणारें आत्मज्ञान समाजांत जिवंत व वाढतें राहिलें पाहिजे आणि विषयसुखाप्रमाणें आत्मसुखाचा आस्वाद रसिकांना देणारें शांति, भक्ति व क्रांतिरसांनीं भरलेलें आत्मोन्नतिकारक व समाजोन्नतिकारक श्रेष्ठ साहित्य समाजांत निर्माण झालें पाहिजे.
– आचार्य शं. द. जावडेकर, १९४९, पुणे</strong>

निराशावाद हा आज अनेकांचा धंदा
साहित्य संकुचित करण्याच्या किंवा त्याला विपरीत रूप देण्याच्या उद्योगामागे काही सामाजिक प्रवृत्तीही आहेत हेही आपण लक्षात घ्यायला हवे. गेल्या पाच हजार वर्षांत घडल्या नाहीत इतक्या घडामोडी अलीकडच्या पन्नास वर्षांत घडल्या आहेत. ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात नव्हे, तर समाजव्यवस्थेच्या क्षेत्रातही, शतकानुशतके आपण गृहीत धरलेल्या तत्त्वांचे स्तंभ उन्मळून पडत आहेत. जुन्याचा लय होत आहे आणि नियतीच्या गर्भातून नव्याने हुंकार कानावर येत आहेत. हे साऱ्या जगात घडत आहे आणि प्रगत राष्ट्रातील त्याच्या तीव्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला दिसत आहेत, जाणवत आहेत. सर्व चराचर गोष्टींकडे तुच्छतेने, तिरस्काराने पाहणारा एक ‘मायावाद’ पूर्वी आमच्याकडे होता. आज असाच एक पक्ष साहित्याच्या व विचाराच्या जगात अवतीर्ण होत आहे. त्याच्या अनेक परी आहेत. उसासे आणि जांभया हेच आजच्या युगाचे परमधर्म आहेत असे मानण्यापासून, मानवी जीवन हे तळ फुटलेल्या भांडय़ासारखे कायमचे रिकामे, भकास आणि क्षुद्र आहे असे तत्त्वज्ञान उभारण्यापर्यंत त्याचा विस्तार आहे. आशावाद ही पूर्वी कोणाचा छंद झाला असेल, पण निराशावाद हा आज अनेकांचा धंदा होत आहे.  
वि. वा. शिरवाडकर, १९६४, मडगाव

वाचन संस्कृतीची चिंता..
 आजच चोवीस तास करमणूक करणाऱ्या, अफाट माहिती पुरविणाऱ्या शेकडो वाहिन्या आणि सर्वज्ञ परमेश्वराप्रमाणे तात्काळ कोणतीही माहिती, संगीत वा चित्रपट हजर करणारे संगणकीय महाजाल सेवेत असताना पानामागून पाने उलटत वेळ खाणाऱ्या वाचन संस्कृतीचे काय होणार ही चिंता ग्रासते आहे. ललित साहित्याचे महत्त्वच नव्हे, तर गरजही आता कमी होते आहे असे निदान आधुनिक समाजशास्त्रज्ञ करातात. हृदयाचे, यकृताचे, रक्ताचे संतुलन व रक्षण करण्यासाठी संगणकाच्या चिपा शरीराच्या वेगवेगळय़ा भागांत बसविल्या जाऊ लागल्या आहेत. मानवी मेंदूचा अभ्यास वेगाने विकसित होत असल्याने काही दिवसांनी या चिपा मेंदूतही जाऊन बसतील. कष्टपूर्वक, अभ्यास करून माहिती मिळविण्याचे प्रयोजन उरणार नाही. दोन माणसांच्या चिपा रिमोटने एकमेकींशी संवाद करू लागल्या की प्रत्यक्ष संभाषण करणे म्हणजे मागासलेपणा होईल. आणि सर्व मनुष्यप्राण्यांच्या मेंदूतील चिपा एकाच महाजालात गुंफल्या गेल्या तर..?
ही नुसतीच वेडी फँटसी नसून शक्यतेच्या कोटीतील गोष्ट आहे. कविता- गाणी टिकतील, कथा टिकतील, पण दीर्घ कादंबरी? असे म्हणतात की, ज्ञान- माहिती लोकशाही पद्धतीने पसरू लागली की त्यांच्या वापराचे थिल्लरीकरण होऊ लागते. कलेचेही तसेच होते. डिजिटल आक्रमण होऊनही अजूनतरी वाचनसंस्कृती टिकून आहे. काही क्षेत्रांमध्ये वाढते आहे. कादंबरीचा आकार वाढतो आहे आणि तिचा खपही वाढतो आहे. पण कोणता वयोगट सध्या कादंबऱ्या वाचतो याची पाहणी होणे आवश्यक आहे. ज्यांच्या महत्त्वाकांक्षा ताज्या आहेत आणि जे नव्या जगाची सकारात्मक स्वप्ने पाहातात अशा युवा पिढीतील लोक उत्सुकतेने कादंबऱ्या वाचत असतील तर फारच चांगले. मात्र ज्यांची स्वप्ने फक्त भूतकाळासंबंधी आहेत, अशा केवळ स्मृतिमधुर अवस्थेतील वयस्कर पिढीच जर अधिक करून कादंबऱ्या वाचत असेल, तर मात्र खरे नाही.
-अरुण साधू , २००७,  नागपूर</strong>

जागतिकीकरणाच्या कल्पनाप्रणालीत सपाटीकरण अभिप्रेत
साहित्य ही संस्कृतीची निर्मिती आहे आणि साहित्यातून संस्कृतीचा आविष्कार होतो. संस्कृतीमधून कल्पनाप्रणालाही व्यक्त होते. मात्र एकच एक कल्पनाप्रणाली नसते, अनेक कल्पनाप्रणाली असतात.  सामाजिक जीवनात अर्थाची, चिन्हांची आणि मूल्यांची निर्मिती करणारी प्रक्रिया म्हणजे कल्पनाप्रणाली अशी व्याख्या केली जाते. प्रभावी राजकीय सत्ता नियमित, कायदेशीर ठरवण्यासाठी प्रचारित केली जाणारी भ्रामक विचारसरणी अशीही कल्पनाप्रणालीची एक व्याख्या आहे. कधी, विशिष्ट सामाजिक गटाचा किंवा वर्गाचा विचारव्यूह म्हणजे कल्पनाप्रणाली असते आणि तो विचारव्यूह सर्वाचा असल्याचे भासवले जाते. कधी, संस्कृती हा शब्द उच्चारला जात असला तरी तेथे विवक्षित कल्पनाप्रणाली अध्याहृत असते. एका भूभागात राहत असलेल्या सर्वाची एकच एक संस्कृती असते, असे मानणे हादेखील विशिष्ट कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाखाली होत असलेला आग्रह असतो.
भारतासारख्या विशाल भूभागात अनेक वर्षांपासून विविध वंशांचे, जातींचे, धर्माचे, विविध भूप्रदेशांतून आलेले लोक राहत आहेत. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत अनेक समूहांनी भिन्न समूहांशी जुळवून घेतलेले असले तरी आपल्या वंशाचे, जातीचे, भूभागाचे स्मरण आणि त्यानुसार आचरण कायमच ठेवलेले दिसते. त्यामुळे राष्ट्रवादाच्या प्रभावी कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाच्या काळातही आपापल्या वेगळेपणाच्या, आपल्या उपरेपणाच्या, आपल्या गुलामीच्या, समाजश्रेणीतील आपल्या खालच्या स्थानाच्या जाणिवांनी विद्रोहाच्या चळवळीही सुरू झाल्या होत्या. मराठी साहित्यातील मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे, दलित-आदिवासी-भटक्या-विमुक्तांची स्वकथने पाहिली तरी सांस्कृतिक भिन्नता लक्षात येते. जागतिकीकरणाच्या कल्पनाप्रणालीत सपाटीकरण अभिप्रेत आहे.
एक भाषा (व्यापाराची), एक संस्कृती (बाजारवादी), एक जीवनशैली (चंगळवादी), एक कला (सुशोभीकरणाची), एक साहित्य (करमणूकप्रधान), एक मूल्य (आर्थिक संपन्नता), एक सत्ता (आर्थिक उदारीकरणवादी), असे हे सपाटीकरण आहे. अशा सपाटीकरणाला नकार देण्याची क्षमताही साहित्यादी कलांमध्ये असते.
-वसंत आबाजी डहाके, २०१२, चंद्रपूर</strong>