कोणतेही प्रसारमाध्यम हाताशी असले तरी त्याचा वापर करताना संयम बाळगण्याची गरज असते. आजकाल हातातील मोबाइलवरच्या एका टिचकीवर अनेक समाजमाध्यमे सहज उपलब्ध होऊ लागल्याने प्रत्येकालाच बातमी मिळविण्याची आणि सर्वात आधी ती सर्वांपर्यंत पोहोचविण्याची अनावश्यक हाव सुटलेली दिसते. या हावरटपणामुळे समाजमाध्यमांवरून पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांची शहानिशा करण्याचे शहाणपणही संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे, जेव्हा अशा बातम्या शहानिशा न करताच समाजापर्यंत केवळ उतावीळपणाने पोहोचविल्या जातात, तेव्हा त्याचे दुष्परिणाम कोणाला कसे भोगावे लागत असतील याची मात्र या माध्यमवीरांना कल्पनादेखील नसते. एखाद्या रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एखाद्या मुलाचे छायाचित्र दूरध्वनी क्रमांकासह एखाद्या सोशल साइटवर दिसू लागते आणि ते पुढे सर्वदूर वाऱ्यासारखे पसरवून माणुसकीला साद घालणारे माध्यमवीर त्या वृत्ताची खात्री करून घेण्याचा समंजसपणादेखील दाखवत नाहीत. अशा उतावळ्या आणि बिनबुडाच्या बातमीदारीमुळे समाजमाध्यमांच्या बातम्यांमधील संवेदनशीलता हरवत चालली आहे आणि त्यामुळे माणसाच्या मनातील संवेदनांचा कोपरादेखील कोरडा होऊ लागला आहे. समाजमाध्यमांचे काही फायदे असले तरी असे अनेक तोटेही असतात आणि त्याचा परिणाम सामाजिक मानसिकतेवरही होऊ लागला आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात रविवारी एका बेस्ट बसच्या अपघातात २७ वर्षांच्या दोघा स्कूटरस्वार महिलांचा अंत झाला. या अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात भररस्त्यात पडून राहिलेल्या त्या दोघींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी आसपासच्या गर्दीने धावपळ केली असती, तर माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले असते. पण त्या संकटात मदतीला धावून जाण्याऐवजी, मोबाइलवरून अपघाताचे चित्रीकरण करण्यातच सभोवती गोळा झालेल्या गर्दीतील अनेक हात मश्गूल झाले, ही बातमी अशाच संवेदनहीन मानसिकतेचे संतापजनक दर्शन घडविते. अगोदरच, सर्वात वेगवान बातमीदारीसाठी दृक्श्राव्य माध्यमांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाल्यापासून, अशा संकटात सापडलेल्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या संकटाचे भडक प्रदर्शन घडविण्याचीच मानसिकता माध्यमांमध्येही चिंताजनक ठरू लागलेली आहे. अशा प्रकारांच्या भडक प्रसारणात आनंद मिळविण्याची एक विकृत मानसिकता अलीकडे जोमाने बळावत चालल्याची चिंता वारंवार व्यक्त होताना दिसू लागली आहे. त्यामुळे, त्रयस्थ आणि बिनचेहऱ्याच्या गर्दीत वावरतानादेखील प्रत्येकाभोवतीचा असुरक्षिततेच्या भावनांचा विळखा दिवसागणिक घट्ट होऊ पाहात आहे. गेल्या काही महिन्यांत, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहने पेटवून देण्याच्या विकृत मानसिकतेचा धुमाकूळ सुरू आहे. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर अशाच विकृत मानसिकतेच्या कुणा अज्ञाताने रविवारी पहाटे विनाकारण तब्बल नव्वद वाहने पेटवून दिली. विकृतीची अशी अनेक रूपे आता जागोजागी दबा धरून बसलेली दिसू लागली आहेत. समाजमाध्यमातून या विकृतींचेही दर्शन घडविण्याची स्पर्धा सुरू आहे. वरंधा घाटात माकडाच्या नवजात पिल्लांना फासात पकडून त्यांची तस्करी करणाऱ्या टोळक्याची ध्वनिचित्रफीतही अलीकडेच समाजमाध्यमांतून सर्वदूर पोहोचल्याने विकृतीचा आणखी एक चेहरा समाजासमोर आला. खरे म्हणजे, आता माध्यमांची शक्ती सर्वाच्या हाती आहे. त्याचा समंजस वापर भयावहपणे डोके  वर काढणाऱ्या विकृतींवर वचक ठेवण्यासाठी झाला पाहिजे. त्यासाठी माणुसकी जागी ठेवली पाहिजे. त्यासाठी, ‘सर्वात अगोदर’ लोकांपर्यंत बातमी पोहोचविण्याच्या उन्मादी उतावळेपणाला सोडचिठ्ठी द्यावी लागेल.