संपादकीय
- अग्रलेख
- विशेष लेख
- अन्वयार्थ
- चैतन्य चिंतन
- लाल किल्ला
- कलाभान
- सह्याद्रिचे वारे
- राखेखालचे निखारे
- व्यक्तिवेध
- गल्लत , गफलत , गहजब !
- राजधानीवर मराठी मोहोर
- जमाखर्च राजकारणाचा
- आज..कालच्या नजरेतून
- बुकमार्क
- वार्ता ग्रंथांची
- बुक-अप!
- बुक - वर्म
- लोकमानस
- अन्यथा
- रविवार विशेष
- भवताल
- रुजुवात
- आकलन
- वाचावे नेटके
- पसायधन
- प्रसार-भान
- ग्रंथविश्व
- आनंदयोग
- ई-लोकमानस
- अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- पीएच.डी. सर्वात सोपी!
- हे राज्य ही तो बिल्डरांची इच्छा!
- सचिन चालिसा!
- वापरलेलं...
मोस्ट रीड
सतत सोप्यातून सोप्याकडे जाण्याच्या राजकीय प्रवृत्तीमुळे महाराष्ट्रातील शिक्षणावर वाईट परिणाम होत आहेत, हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. खरे तर शिक्षण हा राजकारण्यांचा विषयच नव्हे. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्यकर्त्यांनी फक्त व्यवस्थापन करणे अपेक्षित असते..
अभ्यासक्रम बदलला, तर त्याबरोबरच परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करायला हवा आणि तसे करताना मुलांच्या शैक्षणिक तयारीची आणि मानसिकतेची जाणीव ठेवायला हवी, हे सूत्र राज्याच्या उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने विसरायचे ठरवलेले दिसते. वर्षांच्या सुरुवातीलाच परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करताना मंडळाने त्यातील खाचाखोचा लक्षात घेतल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. पूर्वीच्या काळी म्हणजे अकरावीच्या परीक्षांमध्ये एकाच दिवशी दोन दोन उत्तरपत्रिका लिहिण्याची पद्धत असे. सकाळी एक आणि दुपारी एक अशा या परीक्षांच्या काळात मधल्या सुटीत अभ्यासाने 'गांजून' गेलेल्या आपल्या पाल्याला आवडणारा खाऊ घेऊन परीक्षा केंद्रांवर पालकांची अक्षरश: झुंबड उडत असे. या सुटीत पुढील परीक्षेची तयारी करावी, आईबाबांच्या सूचनांकडे लक्ष द्यावे की आवडता डबा खावा, अशा कोंडीत सापडलेली ही मुले काय प्रकारची उत्तरपत्रिका लिहीत असतील, याचा विचारच केलेला बरा! दहा अधिक दोन अधिक तीन या नव्या अभ्यासक्रम पद्धतीमध्ये ज्ञानाची काठिण्यपातळी वाढवण्याचे ठरवण्यात आले. असे करायचे तर एकाच दिवशी दोन दोन प्रश्नपत्रिका ठेवून चालणार नाही, असा सहृदयी विचारही तेव्हा शिक्षण मंडळाने केला आणि रोज एकाच विषयाची परीक्षा असे सूत्र अमलात आले. आता नव्या परिस्थितीत कोणत्या विषयांच्या परीक्षांमध्ये किती दिवसांचे अंतर असायला हवे, याचाही विचार सहृदयतेने नव्हे, तर शैक्षणिक पद्धतीने करायला हवा होता. तसा तो न झाल्याने राज्यातील सुमारे पंधरा लाख विद्यार्थी परीक्षेच्या दडपणाखाली आले आहेत. शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची शिक्षकांची तक्रार आणि विशिष्ट विषयांच्या परीक्षांमधील कमी अंतर यामुळे या विद्यार्थ्यांची झोप आता उडाली आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करायची असते. जरी त्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेतल्या जात असल्या तरीही बारावीच्या परीक्षेतील गुणांनाही महत्त्व दिले जाते. देशातील विविध परीक्षा मंडळांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीचा अभ्यासक्रम केंद्रीय पातळीवरील सीबीएसई या परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत करण्याचे ठरवले. सीबीएसईचा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या तुलनेत कठीण असतो, असे मानले जाते. विविध अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात आणि त्यांना अधिक प्राधान्यही मिळते, हे लक्षात घेऊन आपणही त्या अभ्यासक्रमाच्या बरोबरीने राहणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्राला उशिरा का होईना पण लक्षात आले. तरीही इयत्ता आठवीपर्यंत परीक्षाच न घेता 'पुढील वर्गात घातले आहे', असा शेरा प्रगतिपुस्तकात लिहून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याच्या शैक्षणिक धोरणाने, कोणत्याच विद्यार्थ्यांला तो खरेच किती पाण्यात उभा आहे, हे कळत नाही. ते जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये कळते, तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. अनुत्तीर्ण होण्यापेक्षा अज्ञान लपवणे जर अधिक उपयुक्त ठरणार असेल, तर महाराष्ट्रातील ही 'वरच्या वर्गात घातलेली' मुले वयात आल्यानंतर जगातल्या अतिशय अवघड अशा स्पर्धेत कशी टिकून राहणार, याचा विचार शैक्षणिक धोरणात करण्याची गरज महाराष्ट्रासारख्या शिक्षणाच्या बाबत जागरूक असलेल्या राज्यालाही वाटत नाही. अभ्यासक्रम सोपा करा किंवा परीक्षाच घेऊ नका, हे धोरण राजकीय दबावापोटी घेतले गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक अपंगत्व येते, याची जाण निर्माण होणे अधिक आवश्यक आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्येही अस्वस्थता पसरणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. सीबीएसईने याच विषयांच्या परीक्षा घेताना त्यामध्ये जास्तीत जास्त दिवसांचे अंतर ठेवले आहे, तर महाराष्ट्रात या विषयांच्या परीक्षांमध्ये एक-दोन दिवसांचेच अंतर आहे. वरवर पाहता त्यात फारसे काही महत्त्वाचे नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते. परंतु ज्ञान संपादन करण्याला जर महत्त्व द्यायचे असेल, तर त्याच्यासंबंधीच्या परीक्षांकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार परीक्षांचे वेळापत्रक आखताना करायलाच हवा. कोणा बाबूने तयार केलेल्या वेळापत्रकात जर शैक्षणिक आणि मानसिक विचार नसेल, तर त्यात दुरुस्ती करण्याची तयारीही असायला हवी. परीक्षा मंडळाचे म्हणणे असे की, हे वेळापत्रक वर्षांच्या सुरुवातीलाच जाहीर केले, तेव्हा कुणी हरकत का घेतली नाही. खरे तर अशी हरकत वेळापत्रक तयार करतानाच घ्यायला हवी होती. ज्यांनी अभ्यासक्रम बदलला, त्यांच्याशी जरी सल्लामसलत केली असती, तरी हे वेळापत्रक असे झाले नसते. सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणाऱ्या अभ्यासगटाने प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक शिकविण्यास किती वेळ लागेल, याचे कोष्टक तयार केले. त्यानुसार हा अभ्यासक्रम वर्षांतील शैक्षणिक काळात पूर्ण होणे अपेक्षित होते. वर्ष संपत येत असताना असे लक्षात आले, की नव्या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक ठरवून दिलेल्या वेळेत शिकवता आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना वेळ मारून नेण्यासाठी पटापट अभ्यासक्रम पुढे नेण्यावाचून पर्याय उरला नाही. त्याचा परिणाम मात्र विद्यार्थ्यांना भोगावा लागणार आहे.
शहरांमध्ये क्लासेस उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतील वा महाविद्यालयातील अभ्यासाच्या जोडीला आणखी एक इंजिन मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था अशा इंजिनाविना भयावह होणे स्वाभाविक आहे. केवळ घोकंपट्टी करण्यापेक्षा विषय समजून घेणे आणि परीक्षेच्या तंत्राचा सराव करणे यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. परीक्षाकेंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना किती ज्ञान प्राप्त झाले आहे, याची तपासणी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विशिष्ट वेळेत विशिष्ट पद्धतीने उत्तरे लिहिण्याला महत्त्व असते. ते मान्य केले, की त्यासाठी त्या प्रकारची तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे विषय अधिक महत्त्वाचे असतात, त्याच्या परीक्षा घेताना दोन प्रश्नपत्रिकांमध्ये पुरेसे दिवस ठेवणे जर सीबीएसईला शक्य होते, तर उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला का होत नाही, असा प्रश्न विचारला, तर आता फार उशीर झाला आहे, असे उत्तर दिले जाते. हे उत्तर शैक्षणिक नसून व्यवस्थापकीय स्वरूपाचे आहे. पंधरा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही, हे खरे असले तरी परीक्षा ज्या कारणासाठी घेतल्या जातात, त्या कारणालाच हरताळ फासून व्यवस्थापन करणे हे व्यवस्थापनशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांमध्येही न बसणारे आहे. सतत सोप्यातून सोप्याकडे जाण्याच्या राजकीय प्रवृत्तीमुळे महाराष्ट्रातील शिक्षणावर वाईट परिणाम होत आहेत, हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. खरे तर शिक्षण हा राजकारण्यांचा विषयच नव्हे. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्यकर्त्यांनी फक्त व्यवस्थापन करणे अपेक्षित असते. जगातल्या सगळ्या प्रगत देशांमध्ये याच स्वरूपाच्या पद्धती अस्तित्वात आहेत. आपणही त्या मार्गावर जायला हवे, असे केवळ वाटून उपयोग नाही. त्यासाठी शिक्षणावरील राजकीय पकड आधी ढिली व्हायला हवी. परीक्षांचे वेळापत्रक हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा प्रश्न आहे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे अशैक्षणिक तर आहेच, परंतु मराठी मुलांचे नुकसान करणारेही आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.




















धन्यवाद संपादक महोदय.
आमचा आवाज किमान तुम्ही तरी ऐकला, नव्हे तो समस्त राज्याच्या जनतेपुढे व राज्यकर्त्यंाचे उत्कृष्ट पद्धतीने मांडला. राज्याचे शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत निव्वळ व्यवस्थापकीय दृष्टीने पहाणारे आहेत तो पर्यंत शिक्षणाचा बोजवाराच उडणार दुसरे काय होणार.
आज साकल्याने विचार करता १२ वी काही तरी तातडीने करणे गरजेचे आहे. दि ११ जाने. च्या लोकसत्तेतील पर्याय म्हणजे दि २७/२ व १/३ चे शास्त्र शाखेचे अनुक्रमे रसायन शास्त्र व गणिताचे पेपर पुढील रविवारी म्हणजे दि. १०/३ व १७/३ रोजी घेण्याचा सोपा पर्याय बोर्डापुढे ठेवला आहे, परंतु व्यवस्थापकीय अडचण बोर्डाकडुन पुढे केली जाते. किमान आज तरी बोर्डाने ती सबब पुढे करू नये. लवकर निर्णय घेवून या क्षेत्रतील अनिश्चतता सत्वर दूर करावी.
महासत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वायत्त ” शिक्षण नियोजन” विभाग हवाच :सर्व प्रथम लोकसत्ता ला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . लोकसत्ता (१४ जाने ) मधील “अशैक्षणिक वेळापत्रक ” हा अग्रलेख महराष्ट्राच्या शिक्षण विभागाची ‘यत्ता’ कोणती या प्रश्नांचे उत्तर देणारा वाटला . राजकारणी आणि शिक्षण हे ‘लोह चुंबकाचे ‘ दोन ध्रुव होत , त्यामुळे ‘ शिक्षण हा राज्यकर्त्यांचा विषयच नाही ‘ हे वाक्यच आजवरच्या शैक्षणिक गोंधळाचे उगम सांगण्यास पुरेशे वाटते . अंधानुकरण हा आपल्या व्यवस्थेचा स्थायीभाव बनला आहे . सिबिएसई चा अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण असतो या गृहितकावर आधारून सर्व बदल केले गेले आहेत . मुळात मुद्दा हा आहे कि असा तुलानात्मक अभ्यास करणारी शासकीय यंत्रणा आहे का ? असल्यास असा अभ्यास केला गेला आहे का ? त्याचा मसुदा कोणा कडे आहे ? नसल्यास ज्याच्या कपाटात जास्त पुस्तके तो हुशार किंवा ज्याच्या हातात जाड पुस्तक तो अभ्यासू अश्या ठोक ताळ्यावर निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल .
बदल हा निसर्गाचा नियमच आहे आणि ते स्वीकारणे अनिवार्य आहे या विषयी दुमत असण्याचे कारण नाही . पण बदल टप्या टप्या ने स्वीकारने जास्त सोयीस्कर ठरते हे हि तितकच खरे . सुसंगत अभ्यासक्रम हि ‘हनुमान उडी’ घेण्या आधी प्रशासकीय विसंगती ध्यानात घेणे गरजेचे होते .परंतु अभ्यास पूर्ण निर्णय आता इतिहास जमा होताना दिसत आहेत . आधी सवंग निर्णय घ्यावयाचे आणि नंतर त्यातील त्रुटी विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यात सुधारणा करत जनतेवर उपकार केल्याचा आव आणावयाचा हे आता नित्याचेच झाले आहे . शिक्षकाकडून प्रत्येक तासिकेच्या नियोजनाची अपेक्षा करणारे शिक्षण खाते मात्र विविध बोर्डाच्या शाळांना मान्यता देताना सर्वांसाठी अनिवार्य असे सुनियोजित “शैक्षणिक कॅलेंडर” तयार करण्याचे मात्र वर्षानुवर्षे टाळत आहे . एका बोर्डाच्या शैक्षणिक वर्षाची सांगता हि अन्य बोर्डाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात असा हा गोंधळ चालू आहे . अभ्यासक्रम समान करताना प्रवेश प्रक्रिये पासून ते परीक्षेपर्यंत सर्व बोर्डात सुसूत्रता मात्र दुर्लक्षित राहते .
शिक्षणावरील “संक्रांत” दूर करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ‘शिक्षणावरील राजकीय पकड ‘ कमी करणे हाच ठरू शकतो . अधिकार हवेत पण उत्तरदायित्व नको असा हा प्रकार आहे . ग्राम विकास खात्याने राज्यकर्त्यांसाठी किमान ८ वी ची अट लागू करण्याचे सुतोवाच केले होते परंतु ती सुद्धा बासनात गुंडाळण्यात धन्यता मानली . परंतु जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य /अध्यक्ष ते शिक्षण मंत्री मात्र हवे असे हे विसंगत , दुटप्पी धोरणच शिक्षणाचा दर्जा ढासलण्याचे प्रमुख कारण असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही .
महासत्तेच्या स्वप्नपूर्तीचा दरवाजा “दर्जेदार शिक्षण च ” उघडू शकते हे वास्तव आहे . त्या दृष्टीने आपली पावले पडायला हवीत. आपले महासत्तेचे स्वप्न वास्तवात प्रत्यक्ष उतरावयाचे असेल तर सध्याच्या तीव्र जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी व्यापक पातळीवर सुधारणा करायला हव्यात. फक्त त्या करताना हवाय सखोल अभ्यास, द्रष्टेपणा, पुरेसे नियोजन, सद्य:स्थितीला अनुकूल व्यावसायिक उपयोगिता, अंमलबजावणीची पूर्वतयारी व त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दुर्दम्य प्रशासकीय इच्छाशक्ती. एक गोष्ट निश्चित आहे की, प्रवाही शिक्षण पद्धतीच प्रगती साधू शकते. त्यामुळे नजिकच्या भविष्यात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन अनिवार्य आहे. परिवर्तनाचा दृढनिश्चय झाल्यावर प्रश्न उरतो की, हे ईप्सित कुणी साध्य करावयाचे? कसे करावयाचे? त्याची आराखडा कुणी ठरवावयाचा? त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करावयाची? आपल्या शिक्षण क्षेत्राची मांडणी, त्याचे विविध स्तर व त्यावर अंकुश असणारी यंत्रणा, परवाना पद्धत यामुळे अतिशय गुंतागुंतीची आहे. त्या व अशा अनेक कारणांमुळे परिवर्तनाची उद्दिष्टपूर्ती सहजसाध्य नाही. सर्वसाधारणपणे आपल्या शिक्षण क्षेत्रात सरकारी व खासगी शिक्षण संस्था आहेत. बहुतांश खासगी संस्था या सत्तेतील, सत्तेबाहेरील राज्यकर्त्यांच्या निगडित आहेत. बोटावर मोजण्याइतक्या संस्था या खऱ्या अर्थाने शिक्षणसेवेचे व्रत घेतलेल्यांच्या ताब्यात आहेत. पर्यायाने समाजउपयोगी निर्णयांची अपेक्षा असताना राजकीय- प्रशासकीय हितसंबंधामुळे शिक्षणाशी निगडित प्रत्येक निर्णयाचे राजकीय धुव्रीकरण झालेले दिसते, हे कटुवास्तव कोणीही नाकारू शकत नाही. अर्थात त्यांच्याही व्यावहारिक पातळीवर अडचणी असू शकतील.. ‘‘घोडा घास से दोस्ती करेगा, तो क्या खायेगा’’ यातच सर्व काही आले. खऱ्या अर्थाने देशहित, समाजहित समोर ठेवून या क्षेत्रात सुधारणा, बदल घडवायचे असतील तर प्रथम प्राधान्य शिक्षण क्षेत्राच्या ‘स्वातंत्र्याला’ देणे आवश्यक वाटते. यासाठी दृष्टिक्षेपात असलेला तोडगा म्हणजे ‘शिक्षण क्षेत्राचे नियोजन’ व ‘अंमलबजावणी’ या दोन स्तरांवर विभाजन असावे. पहिला स्तर हा न्यायव्यवस्थेप्रमाणे पूर्णपणे पारदर्शक व सर्वोच्च स्वायत्त असावा यामध्ये फक्त आणि फक्त शिक्षणतज्ज्ञांचाच समावेश असावा. तर अंमलबजावणीचा विभाग हा शासकीय असावा.