अमेरिकेचे ओबामा आणि व्हेनेझुएलाचे ह्यूगो चावेझ या राष्ट्रांध्यक्षांसकट संख्याश: लाखो वाचकांच्या प्रेमादरास पात्र असलेले स्पॅनिश लेखक, अशी एदुआर्दो गलिआनो यांची ख्याती होती. १५ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. १९६३ पासून अर्धशतकभर त्यांची पुस्तके ‘प्रेरणादायी’ ठरत आहेत. ही प्रेरणा झटपट यशस्वी होण्याची नसून लढण्याची होती, तसेच समता व स्वातंत्र्य यांतून ‘आधी समता’ अशी निवड करण्याची प्रेरणा होती. ‘जगाची आजची श्रमविभागणी कशी आहे पाहा.. काही देशांनी हरायचेच आणि काहींनी कायम जिंकायचेच, अशी ही विभागणी आहे’ अशी त्यांची वाक्ये आजही अनेकांच्या तोंडी आहेत.
उरुग्वे येथे १९४० साली जन्मलेला एदुआर्दो हा आईचे गलिआनो हे आडनाव लावी. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने एका समाजवादी नियतकालिकात व्यंगचित्रे काढणे सुरू केले. याच मासिकापासून त्याने पत्रकारितेचीही सुरुवात केली. पत्रकार मंडळी ‘ललितेतर’ पुस्तकांत अधिक रमतात, पण एदुआर्दोने पुढे कादंबऱ्याही लिहिल्या. तो कवीही होता आणि संपादक म्हणून तर सरसच ठरला. गॅब्रिएल गार्सिआ मार्केझ, मारिओ ल्योसा असे लेखक हे गलिआनो यांचे समकालीन. एकेकटय़ा देशांऐवजी, ‘दक्षिण अमेरिकेचे स्पॅनिश साहित्यिक’ अशी ओळख ज्या अनेकांनी टिकवली, त्यांपैकी हे तिघे बिनीचे. अर्थात, एदुआर्दो हे वैचारिक लेखक म्हणूनच अधिक लक्षात राहिले. अशा लिखाणातही चपखल शब्द, वाचकांना आपलीच वाटणारी भाषा अशा वैशिष्टय़ांनी त्यांनी आपले स्थान राखले. फुटबॉलसारख्या विषयाबद्दल त्यांनी लिहिलेल्या ‘सॉकर सन अ‍ॅण्ड श्ॉडो’ या पुस्तकाबद्दल दिएगो मॅराडोना याने ‘तुम्ही आम्हाला फुटबॉल ‘वाचायला’ शिकवले’ अशी दाद दिली होती. याच मॅराडोनावर ड्रग्जचा ठपका आला, तेव्हा गलिआनो यांनी ‘चुका करणारा देव’ अशी त्याची संभावना करीत, कुणालाही देव मानण्यात अर्थ नसतो हे स्पष्ट केले होते.  वाचलेच पाहिजे असे त्यांचे पुस्तक म्हणजे ‘ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका’ हे दक्षिण अमेरिकेतील वसाहतवादी दमनशाहीचा इतिहास सांगणारे पुस्तक. हेच पुस्तक शावेझ यांनी ओबामांच्या हाती (त्रिनिदाद येथील शिखर बैठकीत) ठेवले, परंतु ओबामांनी ते आधीच वाचले होते! तिखट, मार्मिक आणि अभ्यासकी शिस्त पाळूनही लोकांच्या बाजूने लिखाण, ही या लिखाणाची वैशिष्टय़े इतिहासालाही जिवंत करणारी- म्हणजे आजच्या अधिक-उण्याचा इतिहासाशी काय संबंध आहे, हे दाखवून देणारी आहेत.