मंगळयान मोहिमेमध्ये एक यशस्वी क्षण आला. आणखी बरेच येणार आहेत.. पण अशा प्रत्येक क्षणी, सध्या या मोहिमेशी प्रत्यक्ष संबंधित नसलेले ज्येष्ठ अंतराळशास्त्रज्ञ व्ही. आदिमूर्ती यांची आठवण व्हावयास हवी, इतके त्यांचे या संदर्भातील कर्तृत्व आहे. मंगळयानाची संकल्पना तांत्रिक आराखडय़ासह मांडून त्याची यश-संभाव्यता जोखण्याचेही काम करणाऱ्या पथकाचे व्ही. आदिमूर्ती हे प्रमुख होते. सुमारे १०० विविध विशेषज्ञांचा हातभार या कामी लागला, परंतु मंगळयानाच्या बांधणीपासून त्याची कामगिरी फत्ते होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यासपूर्ण आराखडा आदिमूर्ती यांनाच माहीत होता. मंगळयान पाठविणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’चे साहाय्यक संचालक पदावरून निवृत्त झाल्यावर आता ते तिरुवनंतपुरमच्याच ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ संस्थेत सतीश धवन अध्यासनाचे प्रमुख आणि संशोधन शाखेचे अधिष्ठाता आहेत.
मंगळयानापूर्वी चांद्रयान मोहिमेसाठीच्या संशोधनातही आदिमूर्ती यांचा वाटा होता, पण मंगळयानाची आखणी आणि प्रत्यक्ष बांधणी या दोन्हीचे ते शिल्पकार. चंद्रावर पोहोचणे तुलनेने सोपे आहे.. मंगळापर्यंतचा प्रवासच ३०० दिवसांचा आणि आजवरच्या मंगळ-मोहिमांची यशस्विता अवघी निम्मी आहे, हे लक्षात घेऊनच त्यांनी भारतीय आखणी अधिक चोख कशी हवी, याकडे लक्ष दिले. आज जे दिसते आहे, ते त्याचे फळ. २०११ साली ही आखणी पूर्ण झाल्यानंतर- २०१२ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला, तेव्हाही मंगळयान आखणीतील त्यांच्या वाटय़ाचा आवर्जून उल्लेख झाला होता.
मूळचे ते आंध्र प्रदेशातील. आता सीमांध्र राज्यात गेलेल्या राजमुंद्री जिल्ह्यात विप्पर्थी आदिमूर्ती यांचा जन्म झाला आणि महाविद्यालयीन शिक्षणही हैदराबादेत झाले. परंतु कानपूरच्या आयआयटीत ते शिकू लागले आणि १९७३ साली ‘इस्रो’त आले; तेव्हापासून ते केरळीच झाले. मल्याळम उत्तम बोलतात, सामान्यांसाठी अंतराळशास्त्राविषयीची व्याख्यानेही मल्याळम भाषेत देऊ शकतात. अंतराळ संशोधक असूनही ‘पाय जमिनीवर’ असलेल्यांपैकी आदिमूर्ती आहेत. त्यामुळेच इस्रोचे प्रतिनिधी म्हणून ‘अवकाशीय कचरा-विरोधी आंतरराष्ट्रीय समिती’वर त्यांनी केलेले कामदेखील मंगळयानाइतकेच काटेकोर, मेहनतपूर्वक होते. वैज्ञानिक मूल्ये आणि भारतीयता यांचा जो मिलाफ नेहरूकाळात घातला गेला, त्याचे हे फळ. त्यामुळेच इस्रोच्या दलित कर्मचारीविषयक समितीवरील त्यांच्या कामाची कृतज्ञतापूर्वक आठवण काढणारेही कर्मचारी आहेत आणि इस्रोच्या सेवेत असताना, अगदी निवृत्तीपर्यंत ते सायकलवरून कामावर जात, हे तर आणखी अनेकांना आठवते आहे!