स्त्री-भ्रूणहत्या, विनयभंग, खून आणि बलात्कार. महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशातील निम्म्या जनतेचे-  महिलांचे, हे प्राक्तन आहे आणि ते बदलण्यासाठी नक्की काय करावे याचा अंदाज कोणाला आहे असे दिसत नाही. गेल्या आठवडय़ात राजधानी दिल्लीच्या हमरस्त्यावर एका अश्राप तरुणीस जे सहन करावे लागले त्यामुळे देशातील कोणाही विचारी माणसाची मान शरमेने खाली जाईल यात शंका नाही. परंतु त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीस सामोरे कसे जावे याचा सत्ताधाऱ्यांत उडालेला गोंधळ पाहता त्याच मनात काळजीची पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेत समोर आले ते वखवखलेले वावदूक.
या वखवखलेल्यांची सुरुवात होते ती लैंगिक अत्याचार करणाऱ्यांपासून. स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तूच आहे असे मानणारा एक प्रचंड मोठा समाज आपल्या देशात आहे आणि त्यातूनच दिल्लीसारखे प्रकार घडतात. या मंडळींच्या घरात महिलांना कोणतेही स्थान नसते आणि आई, बहीण वा पत्नी अशा तीनही रूपांतील महिलांना दुय्यम भूमिकाच पत्करावी लागते. लैंगिक अत्याचार हा यातील सर्वात घृणास्पद गुन्हा. परंतु दिल्लीत जे काही घडले ते त्याच्याही पलीकडचे. वखवखलेल्यांच्या वासनांची शिकार झालेली ही तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना नंतर प्रसारमाध्यमांची वखवख सहन करावी लागली. या तरुणीस जे काही भोगावे लागले तो प्रकार म्हणजे टीआरपीची सुसंधी आहे असे मानून वखवखलेल्या प्रसारमाध्यमांनी त्यावर झडप घातली. त्या तरुणीच्या प्रकृतीविषयीच्या खऱ्या-खोटय़ा बातम्या चवीने सांगण्यात त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. या असहाय तरुणीच्या भावाने मंगळवारी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत या माध्यमांविषयी जी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ती पाहता त्यांना कोणत्या परिस्थितीस सामोरे जावे लागले असेल याचा अंदाज यावा. ज्या क्षणी ती तरुणी अत्यंत नाजूक अवस्थेत उपचारांना सामोरी जात होती त्या वेळी तिच्या अवस्थेविषयी खऱ्या-खोटय़ा बातम्या देण्याची चढाओढ या माध्यमांत लागलेली होती. त्यात या तरुणीस निर्भया, दामिनी वगैरे नावे देण्याची विकृत कल्पकता काही माध्यमांनी दाखवली. एरवी जाहिरातींच्या दरात बातम्या विकण्यात ज्यांना जराही शरम वाटत नाही त्या वर्तमानपत्रांना अचानक नैतिकतेचा पान्हा फुटला आणि हे सर्व आपल्या नैतिकतेचे नग्न दर्शन करण्यात मग्न झाले. हल्ली कॅमेरेवाले दिसले की राजकारणी त्यापाठोपाठ हमखास येतात. येथेही तेच झाले. एरवी ज्यांना हिंग लावून कोणी विचारणार नाही असे कचकडय़ाचे राजकारणी कॅमेऱ्यांसमोर उभे राहून आपल्या स्त्रीदाक्षिण्याचे दर्शन घडवू लागले. या राजकारण्यांनीही त्या अभागी तरुणीच्या कुटुंबीयांना वात आणला. एरवी ज्या प्रांतात आपल्या हाती सत्ता आहे तेथे काही जनकल्याणाचे काम करण्याविषयी यांच्यापैकी अनेकांचा लौकिक नाही. परंतु फुकटात टीव्हीवरून चेहरे झळकवण्याची संधी मिळाल्यावर या वखवखलेल्या मंडळींनी ती साधली. अलीकडच्या काळात यापाठोपाठ आणखी एक मोठा गट देशात मोठय़ा प्रमाणावर वाढू लागला आहे. तो म्हणजे मेणबत्ती संप्रदाय. एरवी जगताना कोणतीही मूल्ये पाळायची नाहीत, वाडवडिलांच्या नैतिक-अनैतिक व्यवसायांतून मिळवलेल्या संपत्तीवर हवी तशी उधळपट्टी करायची, पैसे फेकून शाळा-महाविद्यालयांत प्रवेश मिळवायचा, त्याच पैशाच्या जोरावर उत्तम गुण पदरात पाडून घ्यायचे आणि ओळखीपाळखींच्या साहय़ाने पोराटोरांना मार्गी लावायचे यात कसलाही कमीपणा न मानणारा हा नवश्रीमंतांचा वर्ग समाजात काही खुट्ट झाले की मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यास तयार. स्वत: जगताना कोणत्याच यमनियमांची पर्वा या वर्गास नसते. यातील मोठा गट करही भरत नाही आणि रस्त्यावर चौकात पोलीस नसला तर वाहतुकीचे नियम मोडण्यास त्यास लाज वाटत नाही. वर परदेशात कसे सगळे शिस्तप्रिय असते याच्या बाता तिथल्या काकामामांच्या नावाने मारण्यास तयार. मेणबत्त्या लावून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा आणला की आपले कर्तव्य संपले, असे या वर्गास वाटते आणि मग पुन्हा आपापल्या मार्गानी आपापले उद्योग करण्यास ही मंडळी तयार. दिल्लीत जे काही झाले त्यामुळे घराघरातील मेणबत्त्या पुन्हा एकदा बाहेर आल्या आणि कॅमेऱ्यांच्या साहय़ाने या संप्रदायाचे चेहरे उजळून निघाले. हल्ली अनुयायी नेतृत्व घडवतात. पूर्वी नेत्यांची आपल्या अनुयायांवर जरब असायची आणि अनुयायी वेडेवाकडे वागले तर आंदोलन मागे घेण्याची हिंमत गांधीजी यांच्यासारख्यांकडे दिसून यायची. त्यांच्या नावाचा जप करणाऱ्या अलीकडच्या नवगांधीवाद्यांची गोष्ट वेगळी. त्यांना त्यांचे अनुयायी चालवतात. आताही तसेच घडले. आंदोलनाच्या वासावर असणाऱ्या बाबा रामदेव, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग आदींनी या आंदोलनाला गती येत आहे हे पाहून त्यात उडी घेतली आणि आपल्याकडे जणू या सगळय़ांची उत्तरे आहेत असा आव आणला. दिल्लीतील जनक्षोभाच्या ठिणग्यांचा उजेड आपल्याही चेहऱ्यावर कसा पाडून घेता येईल या विचारांनी या भंपक लोकांनी या आंदोलनात उडी घेतली. यातील बाबा रामदेव यांनी आपल्या आयुर्वेदिक उद्योगांतून मिळवलेल्या संपत्तीवर कर भरलेला नाही आणि जनरल सिंग यांना वय चोरण्यासारखे बालिश कृत्य करताना नैतिकता आठवली नाही. आताही निवृत्त झाल्यावर हा शेंदाड शिपाई सरकारच्या सर्व सवलतींचा उपभोग घेत आहे आणि सरकारच्याच पैशावर देशभर प्रवचने देत हिंडत आहे. सरकारी व्यवस्थेवर हात मारायचा आणि तीच व्यवस्था कशी बदलायला हवी हे सांगत हिंडायचे ही यांची नैतिकता. तेव्हा यात ते सामील झाले नसते तरच नवल. तरीही किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि अर्थातच अण्णा हजारे आदी मान्यवर कसे यात उतरले नाहीत, हा प्रश्न आहे.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे या अशा वावदुकांच्या उद्योगांना उभारी येते. देशाच्या राजधानीत इतका गंभीर गुन्हा घडूनही सरकारला जाग आली ती मेणबत्ती संप्रदाय इंडिया गेट परिसरात जमा होऊ लागल्यावर. हा सत्ताधारी वर्ग किती सुस्त होता याचा दाखला दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या सुरुवातीच्या वक्तव्यावरून येऊ शकेल. या गुन्ह्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे ही बस आमची नाही, ही. म्हणजे खासगी बसमध्ये गुन्हा झाल्याचे सांगत स्वत:चे हात झटकणे हेच पहिले कर्तव्य त्यांना सुचले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर यामुळे परिस्थिती हाताळण्याची वेळ आली. ते बिचारे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मनात नक्की काय आहे याचा अंदाज घेत कारवाईची दिशा ठरवत राहिले. त्यामुळे कधी दरडावणे तर कधी सामोपचार यात सरकारी कारवाई हेलखावे खात राहिली आणि नक्की काय चालू आहे याचा अंदाज यायच्या आत परिस्थिती हाताबाहेर निघून गेली. तशात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यालाही तीन मुली असल्याचे सांगत आपल्या लाकडी चेहऱ्यावर काही भावना दाखवण्याचा प्रयत्न केला.
अशा परिस्थितीत मागणी होते ती व्यवस्था बदलण्याची वा नवे कडक कायदे करण्याची. याचे कारण व्यवस्थेस जनतेचे काही भान आहे असे सरकारी कृतीवरून वाटत नाही आणि न्यायदानातील विलंबामुळे शिक्षेची परिणामकारकताही कमी होते. लोकपाल असो वा आताची महिला संरक्षणासाठी नव्या कायद्याची मागणी. तिच्या मुळाशी आहे ती कायद्याच्या अंमलबजावणीतील दिरंगाई. भ्रष्टाचार रोखण्याचा मुद्दा असो वा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड देण्याचा. विद्यमान कायद्यांची कार्यक्षम आणि कालबद्ध अंमलबजावणी केल्यास कायद्याविषयी
आणि व्यवस्थेविषयी आदर निर्माण होईल. अन्यथा या वखवखलेल्यांची वस्ती अधिकच विस्तारत जाईल. त्यातून साध्य मात्र काहीच होणार नाही.