आपल्या प्रतिभासंपन्न कलेने साऱ्या भारताला अक्षरश: दिपवून टाकणाऱ्या पं. कुमार गंधर्वासारख्या कलावंताला आवश्यकता होती, ती एका सुरेल संगतीची. ती त्यांना मिळाली म्हणूनच अभिजात संगीतात त्यांना अनेक प्रयोग करता आले. त्यांच्या आयुष्यातील संगीताला एका अतिशय सौंदर्यपूर्ण कोंदणाची गरज होती. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमजलेले बालगंधर्व’, ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी’, ‘टप्पा’, ‘तराणा’ यांसारख्या कुमारजींच्या अनेक नव्या प्रयोगांमध्ये वसुंधराताईंचा सहभाग सुरेल होता. केवळ शैलीच्या आविष्कारातच नव्हे, तर सादरीकरणाच्या अंगाने कुमारजींनी सादर केलेला तो एक अनोखा प्रयोग होता. भारतीय अभिजात संगीतात दोन कलावंतांनी एकत्र कला सादर करणे याला जुगलबंदी असे म्हणतात. कुमारजींनी त्या जुगलबंदीतील लढाई दूर ठेवून त्याला सहगानाचे रूप दिले. हे फार अवघड होते. कारण त्यासाठी त्यांची नवनवोन्मेषी सर्जनशीलता कवेत घेण्याची क्षमता असणारी साथ आवश्यक होती. वसुंधराताईंनी ती अगदी मन:पूर्वक दिली. अतिशय दुर्धर अशा आजारातून कुमार गंधर्व पुन्हा संगीताच्या जगात अवतरले, तेव्हा त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्या वसुंधराताई. भानुमती या कुमारजींच्या आयुष्यात आल्या, त्याही स्वरांसह. त्यांच्या अकल्पित निधनानंतर ताईंनी कुमारांना अतिशय हळुवारपणे सांभाळले. प्रतिभेच्या स्पर्शाने होणारा कैवल्याचा साक्षात्कार म्हणजे धगधगते कुंडच जणू. त्या कुंडाला विझू न देता, त्याचे सगळे लाडकोड प्रेमाने सांभाळत, त्यांच्या प्रतिभेला बहर येण्यासाठी वसुंधराताईंनी आपले स्वत:चे गाणे दूर ठेवले. तशा त्या स्वत:ही उत्तम कलावंत. पण कुमारांसाठी, म्हणजे त्यांच्या प्रज्ञावान संगीतासाठी आपली कला दूर ठेवणे त्यांना अधिक प्रशस्त वाटले. हा त्याग नव्हता. तो संगीतासाठी केलेला परित्याग होता. कुमारजींनाही या सगळ्याची पुरेपूर जाणीव होती. वसुंधराताईंनी मात्र आपली भूमिका कधीच अग्रेसर केली नाही. तसे करावेसे त्यांना वाटले नाही, कारण कुमारजींसारख्या कलावंताच्या गाण्याला सतत धरून राहणे हीही एक अतिशय अवघड गोष्ट होती. भलेभले त्याच्या मागे लागले आणि थकलेदेखील. देशभरातील दौरे, प्रवासाची धावपळ, खाण्यापिण्याची तंत्रे आणि या सगळ्याच्या वर गायनानुकूल वातावरणाची हमी. हे ज्या काळात घडत होते, तेव्हा आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या. कुमारजी जिथे राहात होते, त्या देवासहून हे सगळे घडवणे हे तर त्याहून बिकट. ताईंनी हे सारे केवळ बिनबोभाटपणे केले नाही, तर त्यात कमालीचा आदर आणि त्याहून अधिक प्रेम होते. भानुमती कोमकली यांनी बांधलेल्या भानुकुलात त्यांच्या साऱ्या आठवणी जागवत ताईंनी कुमारांना साथ दिली. आयुष्यात कुठेही थोडीशीही कटुता येऊ न देता आपले आयुष्य केवळ स्वरांना समर्पित करण्याची त्यांची ही वृत्ती एखाद्या योग्याप्रमाणेच. भानुताईंचे स्वप्न पडल्याने व्याकूळ झालेल्या वसुंधराताईंना कुमारजींनी जी भेट दिली, तीही स्वरांची आणि त्यातून निर्माण झालेल्या ‘याद आयी री जागी मैं’ या बंदिशीची. एखाद्या असामान्य कर्तृत्वाला अधिक भरारी घेण्यासाठी पंखात बळ आणून देणे ही सहजपणे लक्षात न येणारी गोष्ट असते. वसुंधराताईंनी ती फार निगुतीने केली. आपले गाणेही वाढवले आणि कुमारांपासूनच सुरू झालेल्या नव्या शैलीचा प्रसार करणारे नवे कलावंतही घडवले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एका देदीप्यमान काळाच्या साक्षीदार आपल्यातून निघून गेल्या आहेत.