लेखन व कला यांतील एकंदर २१ उपक्षेत्रांसाठी दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांत काव्यलेखनासाठीही १० हजार डॉलरचा पुरस्कार असतो, तो यंदा अमेरिकन कवी विजय शेषाद्री (स्पेलिंगप्रमाणे उच्चार ‘सेशाद्री’!) यांना जाहीर झाला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून आईवडिलांसह भारत सोडलेले विजय हे अमेरिकी नागरिक आहेत. त्यामुळे १९५४ साली, तेव्हाच्या ‘बँगलोर’मध्ये ते जन्मले होते, याला भारतीयांच्याही लेखी महत्त्व असू नये. परंतु ‘आयसेनहॉवर हे अध्यक्ष होते तेव्हापासून मी अमेरिकन असलो तरी माझा इतिहास हा अमेरिकनांचा इतिहास नाही.. तसा तो माझ्या जन्मामुळे असू शकत नाही आणि हा निराळा इतिहास मला माझ्याच समाजाशी परात्म होण्यास भाग पाडतो,’ अशी विधाने केवळ एखाद्या मुलाखतीत न करता विजय शेषाद्री आपली कविता त्या परात्म जाणिवेच्या आधारे समजून घेता येईल, असेही म्हणतात, तेव्हा ‘विविधता में एकता’ जपणाऱ्या भारतीयांचे त्यांच्याबद्दलचे कुतूहल वाढायला हवे.
न्यूयॉर्कमधील सारा लॉरेन्स कॉलेजातील काव्य आणि (ललितेतर गद्य) लेखन याच विषयाची प्राध्यापकी आणि एरवी काव्यलेखन करणारे शेषाद्री यांनी कोलंबिया विद्यापीठातून ललित लेखनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. पीएच.डी. मात्र राहिली. याआधीच, तब्बल पाच वर्षे मत्स्य व्यवसाय आणि ओंडके व्यवसायात त्यांनी घालवली. या व्यवसायांचा उल्लेख त्यांच्या ‘द लाँग मेडो’ या संग्रहातील एका कवितेत ‘एका बाजूला जंगल, कभिन्न- कभिन्न. दुसरीकडे उथळसा समुद्र.. उबदार, अथांग’ अशा ओळींतून येतो. प्रतिमांच्याच भाषेत बोलण्याची अमेरिकी कवितेची सवय मीही अंगीकारली, परंतु नंतर तिच्यापासून सुटत गेलो, असे विजय यांनी म्हटले आहे. ते खरेही आहे, असे त्यांच्या कविता सांगतात. प्रतिमांना उपमा-उत्प्रेक्षा म्हणून महत्त्व न देता असंबद्ध प्रतिमांच्या वापरातून निराळीच कथा रचण्याचा या कवितेचा स्वभाव दिसतो. कथारम्यतेत नेण्याच्या बहाण्याने त्यांची कविता नैतिक प्रश्न उभे करते आणि हे प्रश्न ‘एकटय़ा’पुढे आले असले तरी राजकीयसुद्धा असतात. ‘अंगाराची नदी’ किंवा ‘नदीभर आग’ अशी प्रतिमा त्यांच्या अनेक कवितांत येते, पण एका कवितेमध्ये देवच (कवीला) सांगतो की, तुझे सारेच आप्तजन अग्निप्रवाहातून दूर गेले. हे आप्तजन न्यायाची तहान असलेले होते आणि ‘वैश्विक सत्तांना तर न्यायाचा हेवाच जणू’ अशी अवांतर- काहीशी असंबद्ध माहिती देतादेता कवी महासत्तेवर टीका करतो.
अनेक अभ्यासवृत्त्या आणि ‘पॅरिस रिव्ह्य़ू’सारख्या मासिकांचे वाङ्मयीन पुरस्कार मिळवलेले विजय शेषाद्री ‘पुलित्झर’मुळे ज्येष्ठ ठरले आहेत.