अंत:करण आत्मज्ञानानं प्रकाशित कधी होऊ शकेल? इथे पुन्हा ‘गुरुगीते’चाच आधार घ्यावासा वाटतो. पार्वतीमातेनं प्रश्न केला होता की, केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत? देहधारी माणूस हा कोणत्या उपायानं ब्रह्ममय होईल? त्यावर शिवजींनी ब्रह्म तर आधी जाणलं पाहिजे, असं सांगितलं. मग सद्गुरूंशिवाय ब्रह्म अन्य नाहीच, हे ठामपणे सांगितलं. अर्थात जीव सद्गुरूमय झाला तरच ब्रह्ममय होऊ शकेल. अगदी त्याचप्रमाणे अंत:करण सद्गुरूमय झालं तरच ते आत्मज्ञानानं पूर्ण प्रकाशित होऊ शकतं! असं ज्याचं अंत:करण आहे तो देहाकडे आणि त्या देहानं होणाऱ्या कर्माकडे कसं पाहिल? आपण देहाच्याच आधारानं र्कम करतो पण देह म्हणजेच मी या सहज भावनेनं इतके व्याप्त असतो की कर्मामध्येही देहभावनेनंच गुंतून जातो. ज्याचं अंत:करण आत्मज्ञानानं सदाप्रकाशित आहे त्याच्यावर देहाचा, देहभावनेचा, देहबुद्धीचा किंचितही प्रभाव नसतो. ‘तरि आतां देह असो अथवा जावो। आम्हीं तों केवळ वस्तूचि आहों।’ याच एका भावनेनं तो वावरत असतो. ‘आम्हीं तों केवळ वस्तूचि आहों’ म्हणजेच ‘स: अहम्’ अर्थात ‘सोऽहं’ नाही का?  श्री. म. दा. भट लिहितात- ‘‘प्रकाशांतुनी आलों आम्ही। प्रकाश करण्या येथ।।’’ असं दाखवणं हे स्वामी स्वरूपानंदांच्या साधन मार्गातील एक ध्येय होतं (स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी, पृ. ६५). परमतत्त्वाचा संकेतही प्रकाशाने केला जातो. तेव्हा प्रकाशातुनी आलो आम्ही, म्हणजे त्या परमतत्त्वातूनच आम्ही आलो, आणि ते कशासाठी? तर, प्रकाश करण्या येथ.. म्हणजे त्याच परमतत्त्वाच्या प्रकाशानं प्रत्येकाचं अंत:करण प्रकाशित करण्यासाठी आलो! ज्याचं अंत:करण असं झालं तो प्रकाशरूपच झाला. स्वामींचं ज्यांनी ज्यांनी दर्शन घेतलं त्यांना त्यांच्या आकारात तेजप्रकाशही जाणवला, असे उल्लेख आहेत. श्री. म. दा. भट यांनी वर उल्लेख केलेल्या पुस्तकातच डॉ. रा. चिं. ढेरे यांची आठवण दिली आहे.  ढेरे यांची एका वृद्ध गृहस्थाशी भेट झाली. तेव्हा स्वामी स्वरूपानंदांचा काहीतरी विषय डॉ. ढेरे यांनी काढला. त्यावर तो वृद्ध म्हणाला, ‘‘स्वामींचं काय विचारता? ते तर प्रकाश होऊनच राहिले आहेत!’’ या प्रकाशाचं विश्लेषण भट यांनी योगशास्त्रानुसारही केलं आहे. गोरक्षनाथांनी ‘सिद्धसिद्धांतपद्धति’ या ग्रंथात ‘निर्विकारत्वं निष्कलत्वं निर्विकल्पत्वं समता विश्रान्ति:। इति पंचगुण: प्रकाश:।।’ असे या प्रकाशस्थितीचे पाच गुण सांगितले आहेत. या स्थितीत जो आहे तो देहात असूनही देहातीतच नाही का? अशा योगयुक्ताचं वर्णन करताना माउली म्हणतात, ‘‘मज तरंगपण असे कीं नसे। ऐसें हें उदकाप्रति कहीं भासे। तें भलतेव्हां जैसें तैसें। उदकचि कीं।। तरंगाकारें न जन्मेंचि। ना तरंगलोपें न निमेंचि।..’’ मला तरंगपणा आहे की नाही, याची पाण्याला कधी काळजी असते का? फिकीर असते का? पाणी हे कोणत्याही स्थितीत पाणीच असते. तरंग उत्पन्न झाला म्हणून ते जन्मत नाही की तरंग विरला म्हणून ते नष्टही होत नाही. तसं योगयुक्ताची ‘सोऽहं’ स्थिती देहावर अवलंबून नसते! ती कधीच भंग पावत नाही.