पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे..
महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ती नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळय़ापर्यंत तिचेच राज्य असते. खरेतर हे स्वाभाविक आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश.. जलपर्णीला फोफावायला आणखी काय हवे? कितीही काढली तरी ती वाढतच राहते, कारण नदीच्या पात्रात तिचे खाद्य वाढून ठेवलेले असते.
प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, तशा ती जलपर्णीलाही आहे. त्याचा उपयोग करून घेतला तर ती शापाऐवजी वरदानही ठरू शकते. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यावर जसा तो त्रास न राहता उत्पन्न देणारा ठरू शकतो, अगदी त्याप्रमाणे! कारण जलपर्णीचीही स्वत:ची अशी काही वैशिष्टय़े आहेत. आपण इथे चर्चा करत आहोत ती ‘वॉटर हायसिंथ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणवनस्पतीची. पाण्यावर तरंगणारी. लांब देठ असलेली जाड हिरवी पानं आणि जांभळय़ा रंगाची फुले असलेली. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील. तिचे शास्त्रीय नाव ‘इकॉर्निया क्रासिप्स’ (Eichhornia crassipes). माणसाबरोबर ती आता जगाच्या बऱ्याचशा भागात पसरली आहे, विशेषत: उष्ण प्रदेशातील नद्या व जलसाठय़ांमध्ये तिने जम बसवला आहे. कारण आता बहुतांश नद्या व जलसाठे प्रदूषणाने बरबटलेले आहेत. जलप्रदूषण आणि ही जलपर्णी यांचा घट्ट संबंध आहे, कारण ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जगते. खरेतर ही वनस्पती प्रदूषणाची उत्तम निदर्शक आहे. तिच्यामुळे प्रदूषण होत नाही, तर प्रदूषण असेल तिथे ती वाढते. अर्थात तिचे काही तोटे आहेत. पाण्यावरील तिच्या घट्ट थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि तिच्याद्वारे होणाऱ्या परागसंश्लेषणाच्या प्रक्रियेत पाणी उडून जाते. इतकेच नव्हे तर डासांसारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी जलपर्णी उत्तम जागा ठरते. ती पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी धोकादायक ठरते. ती फोफावायला लागली की तिला थोपवणे अवघड बनते.. अशा तिच्या बाजू आहेतच. त्याचबरोबर ती काही बाबतीत फायदेशीरही आहे. त्यापैकी प्रमुख म्हणजे ती प्रदूषित घटक शोषून घेते आणि सतत पाणी शुद्ध करत राहते, तेही कोणत्याही खर्चाविना! ही जलपर्णी पाण्यातील नायट्रोजन-सोडियम-पोटॅशियम हे घटक, सूक्ष्म घनपदार्थ, अगदी जड धातूसुद्धा शोषून घेते आणि पाणी बऱ्यापैकी शुद्ध करू शकते. फक्त तिचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यायला हवा.
जगाच्या वेगवेगळय़ा भागांत त्याचे उपयोग करून घेणे कधीपासूनच सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये १९७०च्या दशकात त्याला सुरुवात झाली. ‘नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’तर्फे (नासा) त्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मिसिसिपीच्या ‘सेंट लुईस बे’मध्ये मैलापाणी साठवण्याच्या ४० एकरावरील तळय़ात ही जलपर्णी लावण्यात आली. त्याचा परिणाम इतका झाला, की एकेकाळी दरुगधीने भरून जाणारा हा परिसर पूर्णपणे पालटला. टेक्सास, फ्लोरिडा, जॉर्जिया अशा अनेक प्रांतांमध्येही असे प्रायोगिक प्रकल्प उभे राहिले. काहींनी जलपर्णीचा पुढेही वापर करून घेतला- त्यापासून मिथेनची निर्मिती करून इंधन मिळवले. काहींनी त्यापासून खत तयार केले. जॉर्जिया प्रांतातील हक्र्युलस शहरात फार पूर्वी अशा पद्धतीचा प्रतिदिवशी १३ लाख लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. त्याची क्षमता दिवसाला ७०-८० लाख लीटपर्यंत वाढविणे शक्य असल्याचे तेव्हाच अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले. अमेरिकेशिवाय ब्राझील, चीन, बांगलादेश, म्यानमार, फिलिपिन्स व आफ्रिकेतील काही देश त्यापासून खतनिर्मिती करतात, टोपल्यासारख्या काही वस्तूही बनवतात. भारतात अजूनही त्याच्या उपयोगांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, पण त्याची काही ठिकाणी सुरुवात झाली आहे हे नक्की.
आपल्याकडे सांगली येथेही १९९०च्या दशकात हे प्रयोग झाले.ज्येष्ठ अभियंता व्ही. आर. जोगळेकर यांनी तेथील शिवसदन सहकारी औद्योगिक वसाहतीत तो यशस्वीपणे राबवला. सांगली पालिकेसाठीही पाच गुंठय़ावर असा प्रायोगिक जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीही त्यात रस घेतला होता. मात्र, आता या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले आहे. असे प्रकल्प भारताच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. जोगळेकर यांचा याबाबतचा अनुभव बरेच काही सांगतो. ‘जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभा करताना सांडपाण्याचे प्रमाण लक्षात घ्यावे लागते. जलपर्णी दूषित घटक शोषून घेत असते. त्यामुळे तिची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तिचा काही भाग सातत्याने काढावा लागतो. शुद्धीकरण तलावातील जलपर्णीपैकी साधारणत: तीन टक्के जलपर्णी दररोज काढावी लागते. जलपर्णीचा वाढीचा वेग चांगला असल्याने ती पुन्हा आपोआप उगवते. अशा प्रकारे साधारणत: एका महिन्यानंतर जलपर्णी पूर्णपणे बदलली जाते व नव्याने उगवलेली जलपर्णी प्रकल्पात राहते. या काढलेल्या जलपर्णीचा वापर खत, जनावरांसाठी खाद्य, जैविक इंधननिर्मिती किंवा इतरही कारणांसाठी करता येऊ शकतो..’ जोगळेकर सांगतात.
‘या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत उपलब्ध दूषित पाण्यापैकी साधारणत: १३ टक्केपाणी वापरले जाते. मात्र, शुद्धीकरण होते ते १०० टक्के. भारतात वर्षभर भरपूर ऊन असल्यामुळे जलपर्णीच्या वाढीला व अशा प्रकारे जलशुद्धीकरण करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्याचा वापर केला तर फारशा विजेविना व अतिशय कमी पैशात जलशुद्धीकरण शक्य आहे. त्यासाठी जास्त जागा लागते खरी, पण आपल्याकडील मोठय़ा प्रमाणावर ओसाड जमिनी, जागा ही अडचण नसावी. जवळपास जागा नसेल तर हे पाणी पंप करून इतरत्र नेणेही परवडेल,’ असे मत जोगळेकर व्यक्त करतात. असे म्हणण्यामागे त्यांचा यशस्वी अनुभव आहेच. जलपर्णीला काही भारतीय पर्याय आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होईल. जोगळेकर यांच्या मते, आपल्याकडे अळू, कर्दळ या वनस्पतीही पाण्यातील दूषित घटक शोषून घेतात, पण जलपर्णीच्या शुद्धीकरणाच्या क्षमतेपुढे त्या अगदीच किरकोळ ठरतात. त्यामुळे सध्यातरी या जलपर्णीला पर्याय नाही.
..पाण्यावर राक्षसासारखी वाढणाऱ्या जलपर्णीची दुसरी बाजू सकारात्मक असेल, तर वाढत्या जलप्रदूषणाच्या काळात तिचा उपयोग करून घ्यायलाच हवा. एवीतेवी ही वनस्पती भारतभरातील जलसाठय़ांमध्ये पसरली आहेच. मग तिचा उपयोग करून घेतला, तर जलस्रोतांवरील तिचा विळखा फायदेशीर ठरवता येईल- सध्याच्या राक्षसापासून उद्याच्या रक्षकापर्यंत! अर्थात, त्यासाठी धोरणकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालावे लागेल. सांगलीच्या प्रयोगाची त्या वेळी आताचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती घेतली होती, आता अधिकारपदावर असताना त्यांनी लक्ष दिले तर ते या प्रयोगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल!

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल