‘जातीवरच्या ओव्या’ हे शनिवारचे संपादकीय (१९ जुलै) वाचले. वाय. सुदर्शन राव यांच्यासारख्या  व्यक्तीच्या नियुक्त्या भविष्यात समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जाण्याचा सरकारचा विचार आहे, हे स्पष्ट दर्शवितात.
राव यांचे म्हणणे असे आहे की प्राचीन काळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय चांगले काम करीत होती. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत तत्कालीन समाजाच्या गरजा भागविण्याच्या हेतूने ही व्यवस्था उत्क्रांत होत गेली. ती वर्णव्यवस्थेशी एकात्म होती. अशा या व्यवस्थेविरोधात कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. गळ्यात मडके आणि पाठीवर झाडू बांधायला भाग पाडून एक दिवस जरी फिरवले तरी राव यांच्या जाती व वर्णव्यवस्थेबाबत वरील मताशी कोणीही सहमत होणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मात जन्मलो त्याच धर्मात राहून मरणार नाही, ही प्रतिज्ञा का केली होती? व आपल्या लाखो अनुयायांसह, ज्ञातिबांधवांसह १४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मातर का केले याचं कारण राव सांगू शकतील काय? अग्रलेखात उल्लेख केल्याप्रमाणे या वर्ण व जातिव्यवस्थेविरोधात गौतम बुद्ध व चक्रधर स्वामींचे धार्मिक दंड, संतसज्जनांचे जातिव्यवस्थेवर ओढलेले कोरडे, भारतातील सुधारक मंडळींनी वेळोवेळी केलेली आंदोलने, जातिव्यवस्थेत खालच्या स्तरावर असलेल्या जातींचे आक्रोश, इतिहासाच्या पानापानांत भरलेले असताना भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष असलेल्या राव यांना हे दिसत नाही?
झोपलेल्या माणसाला झोपेतून उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला झोपेतून कसे उठवायचे? राव हे झोपेचे सोंग घेतलेले आहेत. कारण त्यांना काळाची चक्रे उलटी फिरवायची आहेत असे दिसते.
राव यांना हे माहीतच असेल की, सॉक्रेटिस, गॅलिलिओ आदी विचारवंत, शास्त्रज्ञांचे तत्कालीन ख्रिश्चन धार्मिक ठेकेदारांनी प्राण घेतले, पण त्याच चर्चने आता प्रामाणिकपणे उक्त विचारवंतांची, शास्त्रज्ञांची माफी मागणारा ‘माफीनामा’ जाहीर केला आहे.
प्रामाणिक लोकांच्या जगात रावसाहेबांचे स्थान कुठे आहे? अशी माणसे इतिहासाला न्याय देऊ शकतीय काय? की देशाला मध्ययुगीन काळात नेण्यातच धन्यता मानतील.

सहगान आणि समूहगान
मुकुंद संगोराम यांचा सहगानासंबंधीचा लेख (लोकसत्ता, १९ जुलै) वाचल्यानंतर काही प्रश्न मनात उपस्थित झाले. ‘जगातल्या कोणत्याही मानवी समूहात अभिजात संगीताची पहिली पायरी समूह संगीताची असली, तरीही भारतानं त्यातून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि अभिजाततेच्या पायरीवर जाताना समूहाला दूर ठेवून स्व-सर्जनाचीच कास धरली’ असं एक विधान लेखात केलं आहे.
आता समूहगानापासून ते स्व-सर्जनापर्यंतचा (म्हणजे स्थूलमानाने व्यक्तिकेंद्री) हा प्रवास नेमका कसा झाला आणि त्यात आपण काय कमावलं आणि काय गमावलं यावर कोणी तरी संगीततज्ज्ञाने प्रकाशझोत टाकणं आवश्यक आहे.  भारतीय अभिजात संगीतात ही समूहाला दूर ठेवण्याची प्रवृत्ती का आढळते, हा एक छळणारा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सर्जनशील पद्धतीने सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे. एका अर्थाने अभिजात संगीताची परंपरा आणि ती टिकवणारी माणसं तगून राहण्याशी तिचा संबंध आहे. सहगानाने एक पाऊल पुढे पडत असलं तरी त्यातून संगीताचा नवा श्रोतृवर्ग निर्माण होण्यास फारशी मदत होईल असं म्हणता येत नाही. याउलट समूहगान करताना क्षणार्धात स्व-निर्मिती करण्याचा आनंद मिळणार नसला तरी म्हणणाऱ्याच्या कानात प्रभावी रचनांमधले सूर अनेक र्वष साठून राहिले तर कदाचित त्यातून नवा श्रोता निर्माण व्हायला मदत होईल.
 हे सगळं करण्यासाठी एका वेगळ्या प्रतिभेची गरज आहे आणि ही मोहीम यशस्वी करणाऱ्यांची गरज आहे.
संगीताचा एक महत्त्वाचा भाग संस्कृती-सापेक्ष आहे आणि आपण निरनिराळ्या प्रकारे ही संगीताची महत्त्वाची सहचरी अंगं हरवून चाललो आहोत. उदा. भाषा हे एक महत्त्वाचं अंग आहे आणि प्रादेशिक बोली आणि अगदी प्रादेशिक प्रमाणभाषांशीही पुढच्या पिढीचा संपर्क कमी  होण्याचा धोका उघडपणे समोर आहे आणि अशा एकेक गोष्टी क्षीण होऊ लागल्या तर भविष्यात अभिजात संगीत समजावं कसं? आणि त्यातून अशा संगीताचा इवलासा श्रोतृवर्ग (सुद्धा) पुढे कसा टिकावा? अशा वेळी समूहगान, सामूहिक वादन, वाद्यवृंद, प्रार्थना-संगीत अशा कृती उपयोगी ठरू शकतात.
अशोक राजवाडे, मुंबई</strong>

बेजबाबदार प्रसारमाध्यमे ..
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सदनात केलेला प्रकार हा अक्षम्यच होता. फारफार तर एखाद्या असंस्कृत नगरसेवकाला साजेसे असे हे कृत्य होते. त्यामुळे ना विचारे यांना प्रतिष्ठा लाभली ना शिवसेनेच्या िहदुत्वाला झळाळी प्राप्त झाली; पण ज्या पद्धतीने या सर्व घटनेला प्रसिद्धी दिली गेली त्यावरून प्रसारमाध्यमेही जबाबदारीने वागली असे म्हणता येणार नाही.  इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील संपूर्ण दिवस प्रेक्षकांना काही तरी दाखवण्याचे बंधन, हे अशा अतिरेकाला कारणीभूत होणारच; परंतु वृत्तपत्रांनीही या बातमीला धार्मिक रंग दिला, ही दुर्दैवी बाब आहे.  भारत सध्या सर्वच पातळ्यांवर एका महत्त्वपूर्ण संक्रमणावस्थेतून जात आहे. मागील सर्व पिढय़ांचे उभे आयुष्य िहदू-मुस्लीम संघर्ष बघण्यात गेले. आता कुठे दोन्ही समाजांत थोडे सामंजस्य दिसू लागले आहे. विविध राजकीय पक्ष आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी या दोन्ही धर्माना वापरून घेत आहेतच. जे काही सामंजस्य या दोन धर्मात सध्या दिसत आहे त्यात कला आणि क्रीडा क्षेत्राचे बहुमोल योगदान आहे. वृत्तपत्रांनीही अशा क्षुल्लक घटनेतून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
– संजय जगताप, ठाणे</strong>

हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक डॉ. प्रकाश कवळी यांच्या निधनाने एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शिवाजी पार्क भागात व्यवसाय करीत असल्याने डॉ. कवळी यांना त्या भागातील अनेक नामवंतांना वैद्यकीय सेवा देण्याची संधी मिळाली. गदिमांच्या ‘हॅलो, मिस्टर डेथ’ या सुप्रसिद्ध लेखातदेखील डॉ. कवळी यांचा उल्लेख आहे. विविध विषयांवरील विपुल लिखाणाबरोबरच प्रचलित सामाजिक विषयांवर डॉ. कवळी यांनी निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून सातत्याने अनेक वर्षे पत्रलेखन केले आहे. सामाजिक जाणिवेचे भान त्यांनी केवळ पत्रलेखनातच नव्हे, तर दादरच्या टॉवर संस्कृतीला हातभार लावायचा नाही, अशा निश्चयाने स्वत:चे जुने घर न सोडता प्रत्यक्षातही जपले. त्यांच्या दवाखान्यातील टेबलावर केसपेपर्सच्या बरोबरीने लिखाण करण्यासाठी कोरे कागद व पेन कायम ठेवलेले असत.
अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>