पेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत आणि कोणत्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळविण्याचा विचार करताना आपण या तीन अटींत बसतो आहोत का हे तपासून पाहिले पाहिजे. या तीन निकषांपकी नावीन्य हा पहिला निकष म्हणजे नक्की काय? एखादे संशोधन नवे आहे की नाही हे कसे ठरवायचे त्याबाबत..

परवाच एक नवीनवेली आई भेटली.. सहा महिन्यांच्या बाळाची आई. आपल्या बाळाचं गुणगान करायला तिला शब्द अपुरे पडत होते. आपल्या बाळाचं दिसणं, त्याचा आवाज, त्याची समज किती अफाट आहे.. आणि तशी जगात कुणाकुणाची नाही असं ती मला पुन:पुन्हा सांगत होती. हे ऐकताना मला माझ्याकडे येणारे संशोधक आणि त्यांचं स्वत:च्या संशोधनाबद्दलचं बोलणं आठवलं.. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि कौतुक आणि त्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी सारखेच असतात हे आठवलं. ‘माझ्या शोधासारखा शोध जगात कुणीऽहीऽ लावलेला नाही’ हे त्यांचं बोलणं आठवलं.. आणि ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ ही म्हण केवढी सार्वत्रिक आहे याची खात्री पटून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं!
आपण लावलेला शोध एकमेवाद्वितीय आहे आणि म्हणून त्याला पेटंट नक्की मिळेल असं प्रत्येक संशोधकाला वाटतच असतं, पण तरी सगळ्यावर पेटंट मिळतंच असं नाही.. ते का? कारण पेटंट कशाला द्यायचे आणि कशाला नाही हे ठरवायचे कसे, यासाठी ट्रिप्स करारात काही नियम घालून देण्यात आले आहेत. कुठलेही असे संशोधन जे एक तर उत्पादन असेल किंवा प्रक्रिया असेल आणि असे हे संशोधन जर:
१) नवे असेल (novelty)
२) त्यातले नावीन्य चटकन कुणाला सुचण्यासारखे नसेल (ठल्ल डु५्र४२ल्ली२२- याला आपण असाहजिकता असा शब्द वापरू या) आणि
३) जर त्या संशोधनाला औद्योगिक उपयुक्तता (कल्ल४ि२३१्रं’ अस्र्स्र्’्रूं३्रल्ल) असेल- म्हणजे ते कारखान्यात मोठय़ा प्रमाणावर बनवता येण्याजोगे असेल तर त्यावर पेटंट मिळू शकते, असे हे नियम सांगतात. म्हणजेच पेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत आणि कोणत्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळविण्याचा विचार करताना ते या तीन अटींत बसते आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे.
पण मग पुढचा प्रश्न असा आहे की, आपले संशोधन नवे आहे हे संशोधकाने कसे ठरवायचे? केवळ त्याच्या ऐकिवात असे काही कधी आले नाही म्हणून ते नवे होते का? संशोधनातले नावीन्य म्हणजे काय नक्की? आणि ते आहे की नाही हे कसे ओळखायचे? तर पेटंट फाइल करण्याआधी त्याच संशोधनावर जगात कुठेही कुणीही पेटंट घेतलेले नको किंवा कोणत्याही शोधनिबंधात किंवा पुस्तकात किंवा इतर कुठेही ते संशोधन प्रकाशित झालेले नको किंवा त्याचा तोंडी उल्लेख ‘लोकांमध्ये’ झालेला नको किंवा ते कुठेही वापरात नको अथवा विक्रीला ठेवलेले नको किंवा अन्य कुठल्याही मार्गाने लोकांना उपलब्ध नको. यापैकी काहीही नसेल, तर ते संशोधन पेटंट मिळण्यासाठी ‘नवीन’ समजले जाते.
नावीन्यासाठीच्या या अटी पेटंट कायद्यात का घातलेल्या आहेत? तर संशोधकाच्या आधी त्या संशोधनाबद्दल जगात कुठेही कुणालाही माहिती नव्हती आणि म्हणून हे संशोधन पूर्णपणे संशोधकाची बौद्धिक संपदा आहे हे सिद्ध करण्यासाठी. कारण लावलेल्या शोधाचे बक्षीस म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. जर ते संशोधन त्याआधीपासून लोकांना माहिती असेल तर त्याचा अर्थ ते संशोधन जनतेचे आहे.. जनतेच्या मालकीचे आहे. म्हणजेच ते सार्वजनिक अखत्यारीत (पब्लिक डोमेन) आहे आणि अशा संशोधनासाठी पेटंटच्या रूपाने मक्तेदारी देण्याची मग काहीच गरज नाही. ही खात्री पटविण्यासाठी पेटंटमधल्या संशोधनाच्या नावीन्याची अशी कसून तपासणी केली जाते.
संशोधनाचे नावीन्य तपासण्यांतील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निकष हा की, संशोधनावर पेटंट ज्या देशात घ्यायचे आहे त्याच देशातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील अन्य कुठल्याही देशात ते वर सांगितलेल्या कुठल्याही प्रकारे कुणाला ज्ञात नसावे. म्हणजे समजा इंग्लंडमध्ये एका नव्या प्रकारच्या शेतीसाठी वापरायच्या नांगरावर एका संशोधकाने पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये याआधी अशा प्रकारच्या नांगरावर कुठलेही पेटंट नाही किंवा त्यावर कुठलाही शोधनिबंधही नाही किंवा कोणत्याही पुस्तकात त्याचा उल्लेख नाही किंवा कुणीही असा नांगर वापरत नाही. म्हणजे इंग्लंडमधील या विषयातील संशोधनाची व्याप्ती पाहिली तर हा नांगर निश्चितच नवा आहे; पण पेटंट मिळण्यासाठी फक्त इंग्लंडमधील नावीन्य पुरेसे नाही, तर जगाच्या पाठीवर अन्य कुठेही तो नांगर ज्ञात नसावा हे अपेक्षित आहे. तर आणि तरच तो नांगर पेटंट देण्यासाठीचा ‘नावीन्य’ हा निकष पुरा करेल आणि हा निकष इतका कठोर नसेल तर संशोधक सरळ दुसऱ्या देशांतील संकल्पना पळवून आपापल्या देशात कॉपी करतील आणि त्यावर मक्तेदारी बळकावून बसतील. असे होऊ नये म्हणून हा निकष इतका कठोर आहे.
जगातील प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात नावीन्याची व्याख्या ही अशीच आहे. म्हणजे त्या संशोधनावर जगात कुठेही पेटंट किंवा इतर काही पुस्तक किंवा शोधनिबंध लिहिला गेलेला नको किंवा ते अन्य कुठल्या मार्गाने लोकांना ज्ञात नको. आता यातल्या ‘अन्य कुठल्या मार्गाने’ या शब्दाचा अर्थ काय? तर प्रत्येक देशात असे पिढय़ान्पिढय़ा चालत आलेले पारंपरिक ज्ञान. उदा. आपल्या देशातील आजीबाईच्या बटव्यातील औषधे किंवा आदिवासी जमातींमध्ये कित्येक पिढय़ांपासून वापरत असलेली औषधे. यावर काहीही लिहिले गेले नाही किंवा त्यावर शोधनिबंध नाहीत किंवा इतर काहीही साहित्य नाही. तर अशा पारंपरिक ज्ञानांवर कुठल्याही देशात कुणीही पेटंट घेऊ शकत नाही, असाच प्रत्येक देशाचा कायदा आहे; पण अमेरिकन पेटंट कायदा मात्र नेहमीच्या अमेरिकन ‘एक्सेप्शनॅलिझम’मुळे २०११ पर्यंत स्वत:ला चार अंगुळे वर समजत असे. त्यामुळे अमेरिकन पेटंट कायद्यात नावीन्य या संकल्पनेची व्याख्या अतिशय स्वार्थीपणे करण्यात आलेली होती. या व्याख्येनुसार एखाद्या संशोधनावर अमेरिकेत पेटंट मिळण्यासाठी ‘‘त्यावर जगात कुठेही पेटंट किंवा इतर काही साहित्य प्रकाशित झालेले नसावे आणि ते संशोधन अमेरिकेत कुणालाही माहीत नसावे किंवा वापरत नसावे.’’ ठळक अक्षरांत लिहिलेल्या या वाक्याच्या भागात खरी गोम होती. याचाच दुसरा अर्थ असा होता की, समजा एखादे ज्ञान प्रकाशित झाले नाही.. पण तरीही ते दुसऱ्या कुठल्याही देशात वर्षांनुवर्षांपासून माहीत आहे किंवा वापरले जाते आहे (पण अमेरिकेत मात्र माहिती नाही), तर त्यावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल आणि नावीन्याच्या या स्वैर व्याख्येमुळे इतर देशांच्या परंपरागत ज्ञानांवर अमेरिका खुशाल पेटंट देऊ करत होती आणि या व्याख्येमुळेच भारताच्या हळद किंवा कडुिनब यांसारख्या पारंपरिक औषधावर संशोधक अमेरिकेत पेटंट फाइल करण्यास लोक धजावू शकले आणि त्याविरोधात आपल्याला प्रचंड लढा द्यावा लागला. याबद्दल नंतर विस्ताराने बोलूच, पण हळूहळू मात्र इतर सर्व देशांचा या बाबतीतील अमेरिकेवरील दबाव वाढू लागला आणि शेवटी २०११ मध्ये अमेरिकेने एकदाचा अमेरिकाज इन्वेंट्स अ‍ॅक्ट मंजूर केला आणि ‘नावीन्याची’ व्याख्या बदलली. आता मात्र ती इतर सर्व देशांसारखीच आहे. इतर कुठल्याही देशात ‘ज्ञात’ असलेल्या गोष्टींवर आता अमेरिकेत पेटंट दिले जात नाही.
तात्पर्य हे की, कुठल्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळण्यासाठी ते पेटंट कायद्यातील नावीन्याच्या व्याख्येत बसते आहे का हे तपासून पाहिले पाहिजे आणि त्यासाठी विविध देशांचे पेटंट आणि शोधनिबंधांचे डेटा बेसेस वापरून शोध घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, संशोधकाने आपल्या संशोधनावर आधी शोधनिबंध लिहून प्रकाशित केला आणि मग त्यावरच पेटंटसाठी अर्ज केला तर त्याचे स्वत:चे संशोधनही त्याला पेटंट मिळवण्यापासून थांबवते. कारण त्याचेच संशोधनसुद्धा प्रायर आर्ट म्हणजे ‘आधीच सार्वजनिक अखत्यारीत उपलब्ध असलेले ज्ञान’ म्हणून समजले जाते. म्हणूनच आपले संशोधन जर पेटंट मिळण्यालायक आहे असे संशोधकाला वाटत असेल तर पेटंटसाठी अर्ज करण्याआधी त्यावर कुणाशी चर्चा करणे, ते बनवून विकणे, त्यावर भाषणे देणे, ते प्रदर्शनात मांडणे, त्यावर शोधनिबंध लिहिणे या सर्व गोष्टी संशोधकाने टाळल्या पाहिजेत.
आपले संशोधन पेटंट मिळण्यालायक आहे याची खात्री करण्याची पहिली चाचणी म्हणजे, त्याचे नावीन्य विविध पेटंट डेटा बेसेसमधून तपासणे. हा शोध घेऊन झाल्यावरही ते नक्की नवीन आहे अशी खात्री पटली की, मग पुढच्या पायऱ्यांत तपासून पाहायला हरकत नाही. थोडक्यात- संशोधन पेटंट मिळण्यायोग्य आहे हे ठरविण्यासाठी पहिला प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे तो हा की, ‘क्या नया है वह?’

प्रा. डॉ. मृदुला बेळे, लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका
असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
ईमेल : mrudulabele@gmail.com