खून करणाऱ्या आरोपीला फाशी देणे आणि बलात्कारासारख्या घटनेतील आरोपींनाही फाशी देणे या दोन घटनांचा अर्थ वेगळा असतो, याचे भान अनेकदा दिसून येत नाही. त्यामुळे शक्ती मिलमध्ये एका पत्रकार महिलेवर झालेल्या अत्याचारात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे अनेकांनी काही प्रमाणात आनंदच व्यक्त केला. हा आनंद ‘बरे झाले, आयुष्याची अद्दल घडली’ या सदरातला असला, तरी त्याने बलात्कारासारख्या घटना कमी होतील, असा भ्रम बाळगणे चुकीचे ठरणार आहे. खून आणि बलात्कार या दोन्ही घटना शिक्षेच्या पातळीवर एकाच मापाने तोलण्यासारख्या नाहीत आणि त्यातील आरोपींना एकाच प्रकारची शिक्षा देणेही त्यामुळेच सामाजिकदृष्टय़ा पटणारे नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर यांसारख्या घटनांवरील चर्चाना ऊत आला. तरीही देशातील बलात्कार काही थांबले नाहीत आणि बलात्कार करणाऱ्यांनाही या चर्चेने काही भान आले नाही, हा अनुभव संपूर्ण देशाने घेतला. फाशीची शिक्षा देण्याने आरोपीला खरेच आयुष्याची अद्दल घडेल आणि असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या अन्य कुणालाही त्याची जरब बसेल, असे जर वाटत असेल, तर या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याची आवश्यकता आहे. चित्रपटांमध्ये आरोपीला सगळ्यात जास्त शिक्षा देण्याचे आवाहन करणारा वकील आणि अशा घटनांमध्ये उच्चरवात बोलणारे बोलघेवडे यांच्यात त्यामुळे फारसा फरक उरत नाही. निर्भया प्रकरणानंतर कायद्यात सुधारणा करून बलात्काराचा गुन्हा वारंवार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. परंतु अशाच गुन्ह्य़ात यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या विषयावर देशभरात सुरू असलेल्या चर्चामध्ये बलात्काराच्या गुन्ह्य़ात फाशीची शिक्षा देण्याने असे कृत्य करणारा आरोपी पीडित महिलेचा खून करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जिवंतपणी आयुष्यभर तुरुंगाची हवा खाण्याने एखाद्या आरोपीला जे भोगावे लागेल, त्याची तीव्रता फाशीच्या शिक्षेने कमी होण्याची शक्यताच अधिक. बलात्कारित व्यक्तीला आयुष्यभर वेदनांचे जगणे भोगावे लागते, तसेच हा गुन्हा करणाऱ्यांच्या बाबतही घडायला हवे. परंतु आपल्या देशात ‘कडी से कडी सजा’ यालाच अधिक महत्त्व देण्याची सामाजिक परंपरा आहे. त्यातूनच फाशी झाल्यावर पेढे वाटण्याची मानसिकता तयार होते. समाजाची वैचारिक पातळी अजिबात न उंचावता उन्मादाला जेव्हा प्रतिष्ठा मिळू लागते, तेव्हाच खरे तर विपरीत घडण्यास प्रारंभ होत असतो. शक्ती मिलमध्ये घडलेली घटना अमानुष आणि किळसवाणी होती, याबद्दल दुमत होण्याचे काहीच कारण नाही. केवळ शस्त्रांच्या साहाय्याने एखाद्याचा जीव घेणे आणि बलात्कार करणे, या दोन भिन्न स्वरूपाच्या घटना असतात. अशा घटनांमध्ये क्रूरतेतून त्याची मजा घेण्याची विकृती दिसून येते, तेव्हा त्याबद्दल होणारा अनावर संताप आणि व्यक्त होणारी चीड दुर्बलतेमधून तर येत नाही ना, याचाही विचार सुज्ञपणे करण्यास समाजाने शिकले पाहिजे. बलात्कार होऊच नयेत, अशी सामाजिक स्थिती निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशा प्रकारची चर्चा ही कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या गृहीतांवर आधारित असते. मेणबत्ती संप्रदायातील सगळ्यांचा या गृहीतावर मात्र कमालीचा विश्वास असतो. केवळ दिरंगाईमुळे फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित झाल्याची उदाहरणेही घडली आहेत. समाज सुधारत असताना, असे गुन्हे करणाऱ्या कुणालाही, त्यापासून परावृत्त करण्याएवढी जरब फक्त फाशीच्याच शिक्षेत आहे, असे समजण्याने गुन्हेगार अधिक हिंस्र होण्याच्या शक्यतेचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा.