अमली पदार्थ, अश्लील संकेतस्थळे आणि स्मार्टफोन यांच्या तिहेरी विळख्याचे संकट आजच्या मुलांपर्यंत येऊन पोहोचते, तेव्हा दोष फक्त मुलांनाच कसा देता येईल? पालकांनी मुलांना दिलेले स्वातंत्र्य स्वैराचारापर्यंत जाणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी कुणाची?
शिक्षणाचे बाजारीकरण सुरू झाल्यापासून पालकांच्या मनावरील चिंतेचे ओझे मणामणाने वाढू लागले. शिक्षणाच्या स्पर्धेत आपले मूल टिकेल ना, नव्या जगाच्या वेगाशी स्पर्धा करण्याची बौद्धिक क्षमता त्याच्या अंगी असेल ना, या धसक्याने आईबापांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटू लागली. अलीकडच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या काळातील मातापित्यांच्या दिनक्रमातील मुलांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता हा आणखी एक अपरिहार्य असा भाग होऊन राहिला आहे. चिंतेचे हे असे अवजड ओझे याआधीच्या पिढय़ांतील आईवडिलांच्या मानगुटीवर नव्हते, कारण तेव्हा ‘शिक्षणाची दुकाने’ जोमात सुरू नव्हती आणि बौद्धिक स्पर्धेचा जीवघेणा फासदेखील मुलांच्या मानेभोवती आवळला गेला नव्हता.  आता मुलाचे भविष्य घडविण्याची एक स्पर्धा नकळत पालकांमध्येही सुरू झाली आणि कसेही करून ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे, या ईष्र्येने पालकांना झपाटून टाकले. पालकांच्या अलीकडच्या पिढीत हा परिणाम एवढा भिनून गेला आहे, की या स्पर्धेत जिंकण्याच्या ईष्र्येने उतरताना आपण आपल्या मुलाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता पणाला लावत आहोत, याचेही भान नकळत हरपत चालले. शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष असलेल्या तज्ज्ञांच्या पाहणीतून असेच काहीसे निष्कर्ष निघू लागले आहेत. या निष्कर्षांचा दुसरा भाग अधिक चिंताजनक आहे. कारण, मुलांचे भवितव्य घडविण्याच्या स्पर्धेत ईष्र्येने उतरलेल्या पालकांच्या इच्छेखातर अभ्यासाचे आणि स्वयंविकासाचे सर्व मार्ग आत्मसात करण्यासाठी झपाटून जाणाऱ्या मुलांच्या मानसिकतेशी तो निष्कर्ष जाऊन भिडतो. अशा स्पर्धेत उतरलेल्या पालकांची मुले आईवडिलांच्या आग्रहाखातर अभ्यासक्रम निवडतात, आईवडील ठरवतील तेच आपले भविष्य आहे, अशा समजुतीच्या ओझ्याखाली वावरू लागतात. त्यातच आपण कसे दबून जात आहोत, तेही अनेकांना कळत नाही. त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणारे एखादे मूल मुलखावेगळे ठरते आणि पुन्हा त्याच्या चिंतेने पालकांची मने पोखरू लागतात. पालकांचा असा एक वर्ग जोमाने फोफावू लागल्यावर, मुलांच्या भविष्यावर आपल्या इच्छा लादू नयेत असाही सूर उमटू लागला आणि मुलांच्या स्वयंविकासाची चर्चा सुरू झाली. मुलांना स्वयंविकासाचे स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा देणारा दुसरा एक पालकवर्ग निर्माण होऊ लागला. मुलाने आपल्या आवडीनिवडी जोपासाव्यात, यासाठी त्याला पूर्ण स्वातंत्र्य देणारा प्रगत विचारांचा पालक आकार घेऊ लागला आणि पुन्हा नव्या चिंतेचे ढग कुटुंबांवर दाटू लागले.. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेकी उपभोग घेणारी मुले नकळत स्वैराचाराकडे झुकत नाहीत ना, याची काळजी घेण्याची गरज या नव्या चिंतेमुळे अधोरेखित होऊ लागली आहे. अलीकडच्या काही घटना आणि भौतिक प्रगतीच्या झपाटय़ामुळे पालक व मुलांमधील अंतर वाढत चालल्याची चिंता मानसोपचारतज्ज्ञांमध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रातही व्यक्तहोऊ लागली आहे. तीन महिन्यांपूर्वी, मुंबईच्या एका पश्चिम उपनगरात शाळकरी मुलांच्या दप्तरांत अमली पदार्थाच्या पुडय़ा आढळून आल्या आणि मुलांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकविणाऱ्या संघटित टोळ्या कार्यरत असल्याच्या शंकांचे ढग पालकांवर दाटले. प्राथमिक उपचारासाठी घराघरांत असलेल्या औषधांच्या बाटल्या भराभर संपू लागल्या, मुलांच्या दप्तरात आयड्रॉप्सच्या बाटल्या दिसू लागल्या. असे काही झाले, तर काही तरी बिघडले आहे, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे, असा संदेश त्या घटनेने दिला. व्हिक्स, आयोडेक्ससारख्या जुजबी औषधांच्या नशेचा नवा विळखा मुलांच्या विश्वाला ग्रासू पाहात आहे, हे त्या घटनेने उजेडात आले.
शाळकरी मुलांमध्ये आढळणारा नशेबाजीचा हा प्रकार नवा नाही. त्याआधी गेल्या वर्षी, पुण्याच्या परिसरातील शाळकरी मुलांची दारू पार्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याच्या बातम्यांनी पालकांच्या जगाला धक्का बसला होता. अशा बातम्या आल्या म्हणजे त्याची चर्चा होते. नवी पिढी कोठे चालली आहे, त्यांचे भवितव्य काय, अशा काळजीचे सूर निघू लागतात आणि मुलांच्या भविष्याच्या चिंतेने काळवंडलेल्या पालकांची मुलांना ‘वळणावर’ आणण्यासाठी पुन्हा धडपड सुरू होते. मुलांच्या काळजीने खंगलेला, मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत धाव घेणारा एक नवा पालकवर्ग आता उदयाला येऊ लागला आहे.
केवळ नशिल्या पदार्थाचाच विळखा मुलांच्या विश्वाला ग्रासू पाहात आहे, असे नाही. ‘स्मार्ट फोन’ नावाची एक वस्तू तळव्यावर विराजमान झाली तेव्हापासून मुलांचे भावविश्व पालटून गेले. पारंपरिक खेळाच्या संकल्पना पुसल्या गेल्या. थेट संवादही संपत चालले आणि आभासी जगाने मुलांची मने व्यापून टाकली. स्मार्टफोनच्या तळहातावरील पडद्यावरील ‘सोशल मीडिया’ हेच मुलांचे नवे जग होऊ पाहात आहे. आजवर अमली पदार्थाची चटक एवढय़ापुरताच मर्यादित असलेल्या व्यसनाधीनतेच्या व्याख्येची व्याप्ती इंटरनेटच्या अतिवापरामुळे अधिकच विस्तारू लागली आहे. ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन’ हा एक प्रकार आता चिंतेचा नवा विषय होऊ लागला आहे. ज्ञानाचा, माहितीचा खजिना म्हणून जगाने मान्य केलेल्या इंटरनेटवरील अश्लील संकेतस्थळांमध्ये रमणाऱ्या किंवा ‘सायबर रिलेशनशिप’साठी धडपडणाऱ्या मुलांना ताळ्यावर आणण्याच्या नव्या चिंतेचे जाळे आता पालकवर्गावर पसरू पाहात आहे. दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये गेल्या दशकभरात विशीच्या आतील असंख्य मुले ‘इंटरनेट अ‍ॅडिक्ट’ असल्याचे जेव्हा स्पष्ट झाले होते, तेव्हा हे वारे आपल्यापर्यंत पोहोचण्यास फार काळ लागणार नाही, हे ओळखणे पालकांना जमलेच नाही. आता अशा इंटरनेट व्यसनाधीनांसाठी व्यसनमुक्ती केंद्रे सुरू करण्याची वेळ आल्यावर केवळ चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहेत.  
एकटेपणाची वाढती भावना, संवादाचा आणि व्यक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक जवळिकीचा अभाव ही मुलांमधील वाढत्या व्यसनांची कारणे असल्याचा एक निष्कर्ष काही वर्षांपूर्वी काढला गेला होता. कल्पनारम्यतेच्या दुनियेत रमणे हे तर लहानपणाचे लक्षणच असते. संवादाच्या अभावामुळे एकटेपणात अडकलेल्या मुलांमध्ये वैफल्य दाटते आणि त्यातून व्यसने आणि आभासी जगाची ओढ वाढते, असे दक्षिण कोरियामध्ये केल्या गेलेल्या एका पाहणीत निष्पन्न झाले होते. हीच साथ झपाटय़ाने फैलावत गेली आणि तिची लक्षणे आता आपल्याकडेही आढळू लागली, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कारण, व्यसनमुक्तीसाठी कामे करणाऱ्या संस्थांमध्ये आता इंटरनेटच्या विळख्यात अडकलेल्यांना सोडविण्यासाठी उपचार केंद्रे आपल्याकडेही सुरू झाली आहेत आणि ती एक गरज झाली आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाचा’ उपक्रमाच्या ताज्या मालिकेत याच चिंतेचा सूर उमटला. अमली पदार्थ, अश्लील संकेतस्थळे आणि स्मार्टफोन यांचा तिहेरी विळखा मुलांच्या विश्वाला गिळून टाकत असल्याचे धक्कादायक मत या शिबिरात व्यक्त झाले.  हे काही अचानक येऊन ठेपलेले संकट नाही. याची चाहूल कधीचीच लागलेली होती. कारणेही कधीचीच स्पष्ट झालेली होती आणि निष्कर्षही अगोदरच पुढे आलेले होते. मुलांना एकाकीपणा का येतो, मुलांना आभासी संवादात रमावेसे का वाटते आणि त्यांचे स्वातंत्र्य स्वैराचारापर्यंत कसे जाऊन थडकते, या मुद्दय़ांच्या मुळाचा शोध पालकांनी घ्यावयास हवा. तसे झाले, तर ‘मुले चुकली’ असा निष्कर्ष काढण्याआधी आत्मपरीक्षण करण्याचे धाडसही पालकांना दाखवावे लागेल.
वाढत्या वयात पुढच्या पावलापुरता रस्ता दाखविणाऱ्या प्रकाशाची गरज असते. ती पूर्ण झाली नाही, तर पुढचे पाऊल अंधारात पडण्याचाच धोका अधिक. तसे झाले, तर त्यासाठी केवळ मुलांनाच कसे जबाबदार ठरवता येईल?