औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे सोडणे आणि आमदारकीचा राजीनामा देऊन तो मागे घेणे या घटनांना मनसेने फारसे महत्त्व दिले नसले तरी ही परिस्थिती महाराष्ट्राचे नवनिर्माण करू पाहणाऱ्यांसाठी फारशी चांगली नाही. मनसेच्या तिकिटावर हर्षवर्धन जाधव हे निवडून आले असले तरी ते प्रथमपासूनच मनसेमध्ये फारसे रुळले नव्हते. विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात याचे प्रत्यंतर येत होते. जाधव यांची सत्तेची हाव आणि त्यातून सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न हे मनसेच्या नेत्यांनाही खुपत होते. त्यातूनच मराठवाडय़ात मनसेच्या राजकीय वाटचालीत त्यांना सवतासुभा निर्माण करण्याची संधी राज ठाकरे यांनी दिली नाही. मराठवाडय़ातील मनसेचा एकमेव आमदार असल्यामुळे संपूर्ण मराठवाडय़ातील सर्व निर्णय हे केवळ आपल्या मर्जीने व्हावेत, अशी त्यांची धारणा होती. खरे तर जाधव यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या वडिलांची पुण्याई. त्या पुण्याईच्या जोरावर व राज यांच्या करिश्म्यामुळेच ते निवडून आले होते. बेडकी फुगून बैल होऊ शकत नाही या म्हणीचा मथितार्थ विसरल्यानेच त्यांनी मनसे म्हणजेच पर्यायाने राज ठाकरे यांना डिवचण्याचे काम सुरू केले. यापूर्वीही मराठवाडय़ात आपल्याला सर्वाधिकार मिळावेत यासाठी त्यांनी राजीनाम्याचे दबावतंत्र उपसून पाहिले होते. त्या वेळी राज यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला होता. शिवसेनेतही असाच प्रकार झाल्याचे पाहावयास मिळेल. पक्ष जसा महाराष्ट्रात पसरू लागला तसे जागोजागी नवीन सुभेदार निर्माण होऊ लागले. या सुभेदारांना आवरणे हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच शक्य होते. त्याउप्परही वेळोवेळी सेनेला राज्याच्या ग्रामीण भागात बंडखोरीचा फटका बसला होता. मनसेचा विस्तार राज्यात करताना काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मुलांना-पदाधिकाऱ्यांना घेऊन राज यांनी पक्ष वाढविण्याचा जो प्रयत्न चालवला आहे त्यालाच ‘सुभेदारी’ची फळे येत आहेत. आताच ही स्थिती आहे तर भविष्यात पक्षवाढीनंतर किती ताप निर्माण होईल याचा विचार राज ठाकरे यांना करावा लागेल. हर्षवर्धन जाधव यांच्याविषयीच्या तक्रारी सातत्याने पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्याचे मनसेच्याच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु जाताना जाधव यांनीही मीडियासमोर आरोप केले. गंभीर बाब म्हणजे थेट राज ठाकरे यांच्यावरच सेटलमेंट व पैसे खाण्याचा आरोप जाधव यांनी केला. शिवसेनेतही अनेक बंडे झाली होती. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारख्यांनी सेना सोडली तेव्हाही कोणी बाळासाहेबांवर थेट आरोप करण्याची हिंमत केली नाही. राज ठाकरे यांनीही ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा’ आरोप करीत सेना सोडली. शिवसेना सोडणाऱ्या बहुतेक नेत्यांनी पक्ष सोडताना बाळासाहेबांविषयी आदरच दाखवला होता. यामागे बाळासाहेबांचा धाक व त्यांचे वलय हेच कारणीभूत होते. राज यांच्याभोवती वलय आहे; मात्र मनसेतील सुभेदारी प्रवृत्तीवर त्यांचा धाक कमी पडतो आहे, हेच हर्षवर्धन जाधव प्रकरणावरून दिसून येते. आता मराठवाडय़ातील दुष्काळाच्या मुद्दय़ावरून आमदार जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेऊन स्वत:ला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतले आहे. मनसेचे राजकीय खच्चीकरण करण्याचे उद्योग यापुढेही राष्ट्रवादीकडून होऊ शकतात, असे चित्र आहे. पक्षस्थापनेपासून राज यांनी केलेली भाषणे व घोषणा यामुळे तरुणांसह वेगवेगळे वर्ग त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते. परंतु त्यांच्या राजकीय वाटचालीत सातत्य नाही. याचाच फटका त्यांना आगामी काळातही बसू शकतो. शेवटी राजकारण असो की समाजकारण, ‘जे पेरले तेच उगवते’ हेच खरे.