महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच दलित युवकाच्या निर्घृण पद्धतीने सवर्णानी केलेल्या हत्येची बातमी उजेडात यावी, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. प्रगत महाराष्ट्राच्या बाता राजकारण्यांकडून मारल्या जातात, पण जातीजातींमध्ये जेवढी दरी पाडता येईल तेवढे राजकारण्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असते. त्यामुळेच जातिभेद मिटवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जातिभेद ज्यावेळी समाजातून, मुख्यत्वे मनातून मिटला जाईल तोच खरा सुदिन आणि त्यावेळीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा करता येईल.

हा सुधारकांचा पराभव!
‘भय महाराष्ट्र’ (१ व २ मे) वाचलं.. खरंच भय वाटलं आणि लाजही वाटली. हाच का तो शिवबाचा महाराष्ट्र की जिथे अठरापगड जातीची माणसे सुखात जगली, हाच का तो महाराष्ट्र जिथे आंतरजातीय लग्न होण्यासाठी कित्येक सुधारकांनी आपल्या जिवाचे रान केले? ही आमची, महाराष्ट्रीयांची शोकांतिका आहे. एखाद्या दलित व्यक्तीवर अन्याय होणे म्हणजे तो दलितांचा पराभव नव्हे, तर तो शिवरायांपासून आंबेडकरांपर्यंतच्या सर्वच सुधारकांचा पराभव आहे.         
विठ्ठल राऊत पाटील, बुलढाणा</strong>

गांभीर्याने विचार होणार की नाही?
मतदान अधिकाऱ्याचे कर्तव्य बजावत असताना वैशाली भाले या शिक्षिकेचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे हे सर्वाचे प्रथम कर्तव्य असले तरीही वैशाली भाले यांच्याप्रमाणेच अनेक शिक्षक बंधू-भगिनींना निवडणूक कामाच्या यातनांतून जावे लागले. त्यात उर्मट निवडणूक कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना रात्रभर केंद्रावर थांबविणे, कामावर हजर न झाल्यास निलंबनाची धमकी, यंत्रसामुग्री जमा करताना रात्र रात्रभर केंद्रांवर अडवून ठेवणे, मतदान केंद्रांवरील अपुऱ्या सोयीसुविधा, अप्रशिक्षित व अर्धवट ज्ञान असणारे झोनल ऑफिसर्स इ. व अनेक प्रकार सर्रासपणे या निवडणुकीत अनुभवावयास मिळाले. खरे तर भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेणे हा सर्वात मोठा गुन्हा असायला हवा. नुसती माफी मागून व मृत परिवारास आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. बेफिकीर यंत्रणेस ताळ्यावर आणायचे असेल तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाच नोंदवायला हवा.
मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करण्याचा माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांचा अनुभव काहीसा असाच आहे. आमचे मतदान केंद्र तर चक्क खासगी निवासाचे पार्किंग होते. ना धड लाइटची पुरेशी व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था. स्त्रिया आणि पुरुष यांना वापरण्यासाठी फक्त एकच स्वच्छतागृह होते. त्यात महिला पीआरओची संख्या जास्त होती. झोपण्यासाठी पार्किंगमध्येच बिछाना होता म्हणजे उघडय़ावरच, त्यात पंखा एकच. सर्व कर्मचाऱ्यांचे काम ७ ते ८ पर्यंत आटोपले. परंतु तरीही रात्री १० वाजेपर्यंत त्यांना बूथवरच थांबण्यास सांगितले. निवडणुकीसाठीचे यंत्रे व साहित्य घेऊन सर्वाची रवानगी collection centre वर करण्यात आली, तर तेथे प्रचंड गोंधळ. त्यातच रात्रीचा १ ते १.३० वाजला. सर्व कर्मचारी दूरवर राहत असल्याने शेवटची ट्रेन मिळावी यासाठी कर्मचारी विनवण्या करीत होते. द्वितीय श्रेणी/ तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना मिळणारी वागणूक अत्यंत दु:खदायक होती. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निरुपद्रवी शिक्षकांना एकीकडे दमदाटी करायची आणि दुसरीकडे खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि वशिलेबाजी करून घरी मौजमजा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालायचा प्रकार तर चीड आणणारा होता.
आयोगाने या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करायला हवा. जर ही प्रक्रिया अत्यंत साधी, सोपी असेल तर हे सर्व प्रकार बंद होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी शिक्षक संघटनांनीदेखील या प्रकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा. भविष्यात कोणत्याही शिक्षकांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी हा पत्रप्रपंच.
प्रा. तुषार बागवे

युरोपने नाकारलेला आंबा आता आपल्याला मिळेलच, पण..
केळं हे तर महाराष्ट्रात सर्वत्र, सर्वकाळ मिळणारं फळ आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत ते खायला सोयीस्कर असल्यामुळे ते सर्व जण व सर्वत्र खातात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वासाठी ते सकस अन्न आहे. पण आता व्यापारीकरणाच्या लाटेमुळे केळी कच्चीच तोडून कार्बाईडच्या पाण्यात टाकली जातात. आठ-दहा तासांत पूर्ण कच्ची केळी साल पिवळी होऊन ती पिकल्याचा आभास निर्माण होतो. लोक ती पिकलेली आहेत असे समजून विकत घेतात. पण ती आतून कच्चीच असतात. ती वेळेआधीच झाडावरून काढल्यामुळे कधीच पिकत नाहीत. रसायनांमुळे त्यांची चव जाते. कार्बाईडच्या प्रयोगामुळे हे अमूल्य फळ कॅन्सरकारक (कारसिनोजेनिक) होतं.
तसेच भाजीचे व्यापारी सर्व हिरव्या भाज्यांना हिरवा रंग लावतात. गाजर, लाल भोपळा अशा लाल भाज्यांना लाल रंग लावतात. लाल फळांना लाल रंग, तेल लावतात. आपला माल आकर्षक दिसून विकला जावा म्हणून गिऱ्हाईकांची फसवणूक करतात. रंगामुळे फळे आणि भाज्या प्रदूषित होऊन कॅन्सरचा फैलाव होतो. दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी अधिकाधिक कॅन्सरसाठी हॉस्पिटल्स बांधली जात आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने याचा विचार करून केळी, फळे, कार्बाईडसारख्या रसायनांत घालण्यास बंदी घालावी, तसेच भाज्यांना रंग लावण्यासही बंदी घालावी आणि कॅन्सरच्या प्रसारास आळा घालावा. ‘Prevention is better than cure’ अशी बंदी घालून प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे.
शालिनी करमरकर, विलेपार्ले

भटारखान्यात डोकावू नये..
‘अन्यथा’ या सदरामध्ये याचं उत्तर शोधावं का? असं चार्ली-चॅप्लिनचं गतायुष्य देऊन गिरीश कुबेर यांनी विचारलेलं आहे.  तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं मला द्यावंसं वाटतं. कारण कलावंत, रंगभूमीवरील काय किंवा सिनेसृष्टीतील काय, हा शेवटी ‘माणूस’ही असतो. त्याच्या जडणघडणीप्रमाणे त्याच्यात गुणावगुणांचा समुच्चय झालेला असतो. त्याचे रंगकर्मी म्हणून योगदान व खासगी आयुष्यातील त्याचे वागणे ही दोन भिन्न अंगे आहेत, म्हणूनच ‘नदीचं मूळ आणि नटीचं कूळ पाहू नये’  असे म्हटले जात असावे. चमचमीत पदार्थ खिलवणाऱ्या हॉटेलातील भटारखान्यात डोकावू नये ते याचसाठी!
अनेक हीरोंच्या खासगी आयुष्यात डोकावले तर ते ‘झीरो’च असल्याचे दिसून येईल. आपल्याकडे नामवंत नट नाटकाचा तिसरा अंक संपल्यावर ‘चौथा अंक’ (मदिरापान) साजरा करीत असल्याचे दिसते. अगदी थोडे कलावंत श्रेष्ठ रंगकर्मी आहेत व माणूस म्हणूनही तेवढेच ग्रेट आहेत, असे असतील. तेव्हा कलावंताचे कलावंत म्हणून वेगळे मोजमाप करावे लागेल.
अरविंद करंदीकर, तळेगाव-दाभाडे