विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आणि बदललेल्या अर्थव्यवस्थेमुळे  भाषिक समीकरणेही बदलली. या बदलत्या समीकरणामुळे अभिजनांच्या वृत्तीची लागण बहुजनांनाही झाली. मराठी माध्यमाच्या शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली. इंग्रजी शाळांत मराठी शब्दांचा उच्चार केला म्हणून पोरे मार खाऊ लागली!  अशा शाळांच्या संचालकांवर टीका करण्यात कोणीच मागे राहणार नाही. परंतु, आत्मपरीक्षण कोण करणार?
मराठी समाजाच्या स्थितिगतीची चर्चा करायची झाल्यास पहिली समस्या उभी राहते, ती अर्थातच पुराव्यांची. यादवपूर्व काळातील पुरेसे पुरावे उपलब्धच नसल्यामुळे त्या वेळच्या समाजाविषयी फारशी विधाने करता येत नाहीत आणि जी करता येतात तीसुद्धा पुरेशा ठामपणाने नाहीत. पुराव्यामध्ये वाङ्मयीन पुराव्यांचे किंवा साधनांचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते. वाङ्मयातून एका बाजूने समकालीन परिस्थितीचे प्रतिबिंब दिसून येते, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने या परिस्थितीचाही वाङ्मयनिर्मितीशी संबंध असतो. हे वाङ्मय परिस्थितीला दिलेला प्रतिसाद असू शकतो, परिस्थिती बदलण्याचे ते एक प्रभावी हत्यारही असू शकते. समाज आणि साहित्य यांचा संबंध बिंब-प्रतिबिंब असा असतो, असे म्हणणे फारच सरळ आणि सरधोपट झाले. समाज घडवण्यात साहित्याची सक्रिय भूमिकाही असते. हा संबंध एकदिश आणि यांत्रिक नसून गुंतागुंतीचा व जटिल असतो. त्याची चर्चा करताना समाजाचा संवेदन स्वभाव व संस्कृती स्वभाव विचारात घ्यावा लागतो.
आता ज्ञानेश्वर, नामदेव, म्हाइंभट यांच्यापासून होनाजी सगन-मोरोपंत याच्यापर्यंतच्या चार-साडेचार शतकांच्या मराठी साहित्याचा तेव्हाच्या मराठी समाजाचा काय संबंध होता, ते त्या समाजातून उगवून आलेले साहित्य होते की उपरे होते, तेव्हाचे साहित्यिक समाजाचे प्रतिनिधी आणि पथदर्शक होते, की नुसते उपदेशक होते, या प्रश्नांची चर्चा झाली तरच मराठी समाजाचा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन इतिहास सिद्ध करता येईल. त्यानंतरचा इतिहास हा अर्थातच इंग्रजी राजवटीत घडलेला इतिहास आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या आणि सांस्कृतिक आणि वाङ्मयीन इतिहासावर ब्रिटिश राजवटीचा आणि पाश्चात्त्य-युरोपियन साहित्य संस्कृतीचा प्रभाव पडला, तितका प्रभाव तेराव्या शतकाच्या अखेरीपासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या इतिहासावर मुसलमानी राजवटीतील साहित्य संस्कृतीचा झाला नाही. याच दरम्यानच्या काळातील मराठी समाजाचा विचार करून प्रसिद्ध ब्रिटिश प्रशासक विल्यम विल्सन हंटर यांनी मराठे ही  ‘Political’ आणि ‘Literary’ Community असल्याचा निर्वाळा दिला होता. पण ब्रिटिश राजवटीत लिहिल्या गेलेल्या साहित्यात आणि समीक्षेत या वास्तवाची दखल घेतलेली दिसत नाही. या काळात महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात युरोपियन साहित्य आणि साहित्यमूल्ये दाखल झाली.
आता युरोपातच निर्माण झालेल्या साहित्यमूल्यांच्या चौकटीत मराठी साहित्याची समीक्षा करण्याचा उपक्रम महाराष्ट्रातील विद्वान करू लागले. या विद्वानांना पूर्वकालीन मराठी साहित्याला ‘साहित्य’ म्हणून स्वीकारणे जड जाऊ लागले. संतांचे साहित्य देवाचे, धर्माचे, परमार्थाचे, आध्यात्मिक, पारलौकिक, बहुधा प्रतिगामीसुद्धा. त्याचा संबंध देवळात कीर्तन ऐकायला जमलेल्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांशी, फार तर खेडय़ापाडय़ांत भोळ्याभाबडय़ा     वारक ऱ्यांशी. आता या पाश्र्वभूमीवर युरोपियन साहित्याचा विचार केला, तर काय दिसते? मराठीसारख्या आधुनिक भारतीय भाषांचा इकडे उदय होत असताना तिकडे युरोपातही असेच काही घडत होते. आपल्याकडील संस्कृतप्रमाणे तिकडेही ग्रीक, लॅटिन या भाषा मागे पडल्या. इटालियन, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी अशा भाषा पुढे आल्या. या सर्व भाषांचा एकत्रित विचार केला, तर इटालियन महाकवी डान्टे याचे ‘डिव्हाइन कॉमेडी’ हे महाकाव्य तिकडील पहिली कलाकृती मानावी लागते. याच प्रकारच्या साहित्यकृती इतर युरोपियन भाषांमध्येही निर्माण झाल्या. जसे मिल्टनची ‘पॅरेडाइज लॉस्ट’, गटेची ‘काउस्ट’.
या सर्व साहित्यकृती ख्रिश्चन धर्मातील विषयांवर आधारित आहेत. पूर्णत: धार्मिकच आहेत. ख्रिस्ती परंपरेतील पुराणकथा, विश्वोत्पत्ती शास्त्र, परलोक विद्या याची नीट माहिती असल्याशिवाय त्यांचे आकलन, आस्वाद आणि समीक्षा कोणालाच शक्य नाही.
या कवींचे जाऊ द्या, परंतु शेक्सपीअरसारख्या आधुनिक नाटककाराची नाटकेसुद्धा नीट समजण्यासाठी ख्रिस्ती परंपरेचे किमान ज्ञान असावे लागते.
आता डान्टे, गटे, मिल्टनसारख्यांच्या साहित्यात देवधर्म आहे म्हणून त्यांना चर्चमध्ये ठेवावे असे कोणी म्हटले नाही. उलट ते युरोपच्या वाङ्मयेतिहासाचा जैविक आणि अतूट हिस्सा बनला. परंतु आपल्याकडील संतांच्या साहित्याचे काय करायचे, हे या पिढय़ांना समजेनासे झाले. याला अपवाद फर्गसन कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन. पटवर्धनांनी मराठी संतकाव्याचे मूल्यमापन युरोपियन मापदंडाने करूनसुद्धा ते कसे ज्येष्ठ ठरते ते दाखवून दिले. पटवर्धनांच्या म्हणण्याप्रमाणे मराठी संतकवितेतील ‘रोमान्स’ हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा व प्रतीचा असून, या प्रकारचे साहित्य युरोपियन भाषांमध्ये लिहिले गेले नाही. परंतु पटवर्धनांच्या या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ाची चर्चा मराठी वाङ्मयेतिहासात किंवा समीक्षेत घेतली गेली असे दिसत नाही. पटवर्धन इंग्रजीचे प्राध्यापक होते. मराठीचे नव्हेत म्हणून, की त्यांनी मराठी साहित्यासंबंधीचे आपले सिद्धांत इंग्रजीतून मांडले म्हणून? काहीही असो, डॉ. सरोजिनी वैद्य यांनी निदर्शनास आणीपर्यंत मराठी अभ्यासकांच्या वर्तुळात पटवर्धनांची दखलच घेतली गेली नव्हती. मुख्य मुद्दा हा आहे, की ब्रिटिश पूर्वकालीन मराठी समाज आणि मराठी साहित्य यांच्यात जैविक नाते होते. ते साहित्य सर्वसाधारण समाजाची मराठी गरज लक्षात घेऊन लिहिले जात होते. इंग्रजी राजवटीतील नवशिक्षितांनी मराठी साहित्य लिहिले, तेव्हा त्यांनी आपल्या व्यापक वाचनवर्गाची दखल घेऊन लिहिले असावे असे वाटत नाही. त्यामुळे मराठी वाचकांमध्येच फूट पडून दोन वर्ग निर्माण झाले. इंग्रजी साहित्याची पाश्र्वभूमी लाभलेला नवशिक्षित वर्ग आणि ती नसलेला वाचकवर्ग असे दोन उपसमाज एकाच समाजात निर्माण झाले. पहिल्या वर्गातील लोक दुसऱ्या वर्गातील लोकांकडे तुच्छतेने बघत.
समाजातील पारंपरिक संस्कृत पंडितांचा वर्ग आधीच या दुसऱ्या वर्गाकडे तुच्छतेने बघत असे. त्यात आणखी या दुसऱ्या एका वर्गाची भर पडली.   या दोन्ही वर्गाच्या विरुद्ध परखड प्रतिक्रिया नोंदवणारा एकच विचक्षण विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेला. त्याचे नाव महादेव मोरेश्वर ऊर्फ माधवराव कुंटे. कुंटेंच्या हिमतीला दाद देताना माधव ज्युलियन यांनी त्यांना ‘करवीरवीर’ म्हटले. कुंटे कोल्हापूरहून पुण्यात आले होते. कोणताही समाज अगोदर भाषिक समाज असतो. त्याच्या सदस्यांना सर्वसाधारण असलेल्या सर्व गोष्टी एका विशिष्ट भाषेतून व्यक्त होत असतात. भाषाबंध हा प्रसंगी धर्मबंध, वंशबंध यांच्यासारख्या दृढ बंधनांवरही मात करू शकतो हे आपण बांगलादेशच्या उदाहरणावरून शिकलो आहे. सामाजिक ऐक्य बाधित करायचे असेल, तर आधी भाषिक फूट पाडणे हा सर्वात हुकमी व खात्रीशीर मार्ग. व्यापक भारतीय समाजाचा विचार केला, तर ही फूट संस्कृत आणि प्राकृत या विभागणीतून पडली होती. ती ‘अभिजन’ आणि ‘बहुजन’ या द्वंद्वांतून व्यक्त करायची प्रथा आहे. अभिजन मंडळी आपल्याला समाजातील आपलीच भाषा बोलणाऱ्या बहुजनांना दूर ठेवून परभाषिक दुसरी भाषा आत्मसात करून आपले हितसंबंध जपतात, याची जाणीव ज्ञानकोशकार केतकरांनी करून दिली होती. मात्र मराठी बहुजन अशा हितसंबंध धूर्ताना पुरून उरत असे, असे म. मो. कुंटय़ांचे निरीक्षण आहे. ‘राजा शिवाजी’ या महाकाव्याच्या प्रस्तावनेत कुंटे लिहितात- The uneducated in Maharashtra are not a herd that can be easily led. Because they have resisted the influence of the Mahomedan Civilization and of Sanskrit Civilization.’ पूर्वी संस्कृत बोलणारे अभिजनच इस्लामी राजवटीत पर्शियन शिकून त्या राजवटीच्या सत्तायंत्रणेचा हिस्सा बनले व इंग्रजी राजवटीत इंग्रजी शिकून इंग्रजी राज्ययंत्रणेची सोय करू लागले. ‘मुदबख लिहिणे। तेलतुपावरी जिणे’ ही त्यांच्यावरील टीका तुकोबाच्या अभंगातील आहे. कुंटे इंग्रजी राजवटीत तुकोबांचा वारसा चालवतात.
त्र्यं. शं. शेजवलकरांनी तर कमालच केली. ते म्हणतात, की उद्या इंग्रजाचे राज्य जाऊन रशियनांचे आले तर ही मंडळी रशियन शिकतील. रशियन काय, इराणी, तुराणी कोणतीही भाषा त्यांच्यासाठी वज्र्य नाही. कुंटे, केतकर, शेजवलकर यांच्या लिखाणानंतर आजपर्यंत बरेच पाणी वाहून गेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन अर्धशतक लोटले. दरम्यान विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आणि बदललेल्या अर्थव्यवस्थेमुळे बरीचशी समीकरणे बदलली. त्यात भाषिक समीकरणांचाही समावेश आहे. या बदलत्या समीकरणामुळे अभिजनांच्या वृत्तीची लागण बहुजनांनाही झाली. मराठी माध्यमाच्या शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली. इंग्रजी शाळांत मराठी शब्दांचा उच्चार केला म्हणून पोरे मार खाऊ लागली! अशा शाळांच्या संचालकांवर टीका करण्यात कोणीच मागे राहणार नाही. परंतु आत्मपरीक्षण कोण करणार? अभिजन की बहुजन?
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर