गोंदियाच्या नवेगाव पार्क वन क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या दोन नरभक्षकांना जेरबंद करण्यात वा गोळ्या घालण्यात वन विभागाची यंत्रणा अपयशी ठरल्याने गोंदियातील परिस्थिती प्रचंड स्फोटक बनली आहे. दोन्ही नरभक्षकांनी मिळून पाच महिलांचे बळी घेतले आहेत. यासाठी एकटा वन विभाग जबाबदार नाही. गावक ऱ्यांचा हटवादीपणा आणि ‘मॉब मेंटॅलिटी’ने बेशिस्तीने वागणेदेखील तेवढेच जबाबदार आहे. काही वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी वन विभागात अशा अभूतपूर्व परिस्थितीत नरभक्षकाच्या हल्ल्यात ३५ लोकांचा बळी गेला होता. शेवटी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या वेळी पहिल्या तीन महिलांचा बळी घेणारा प्राणी बिबटय़ा आणि नंतरच्या दोन महिलांचा बळी घेणारा पट्टेदार वाघ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापैकी बिबटय़ाला गोळ्या घालण्याचे आदेश मुख्य वन्यजीव संरक्षक एस.डब्लू.एच. नकवी यांनी जारी केल्यानंतर गोंदियात खऱ्या अर्थाने हालचाली सुरू झाल्या. वाघालाही गोळ्या घालण्याचे आदेश जारी होण्याची शक्यता दिसू लागली आहे. देशात वाघांची संख्या कमी असताना एका वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश देण्याचा निर्णय पूर्ण विचार करूनच घ्यावा लागणार आहे. नुसते गावकरी म्हणतात आणि राजकीय नेते दबाब आणतात म्हणून आदेश दिले जाणार नाहीत. गोंदियाच्या नवेगाव परिसरात हिंस्र प्राण्यांचे भक्ष्य जवळजवळ संपल्यातच जमा आहे. जंगल परिसरात तृणभक्षी प्राण्यांची गावक ऱ्यांकडूनही शिकार झालेली आहे. जंगलातील हरीण-चितळ मारून खाण्याची मनोवृत्ती गावक ऱ्यांमध्ये वाढली आहे. जंगलातून फुकटची लाकडे तोडण्यासाठी गावकरी हपापलेले असतात. या फुकटय़ा मनोवृत्तीतून संरक्षित वन क्षेत्रात मुद्दाम शिरणे, वन कर्मचाऱ्यांचे न ऐकता आतील जंगलात जाणे असेही प्रकार घडत आहेत. वन विभागाजवळ पुरेसे मनुष्यबळ नसल्याने  प्रत्येक वेळी आळा घालणे शक्यच नाही. या नरभक्षकांनी बैल, शेळ्यादेखील मारल्या आहेत. प्राणी मारून खात असताना गावकऱ्यांचा जमाव आरडाओरडा करत असताना तो खाणे अर्धवट टाकून पळालेला आहे. बैल-शैळी मारली असेल तर त्याला पोट भरून खाऊ द्या, तृप्त झाल्यावर तो जंगलात निघून आपले भक्ष्य शोधेल, हे समजावणारे कोणी नाही. त्यामुळे हा अर्धवट उपाशी नरभक्षक पुन:पुन्हा गावात येत आहे. भक्ष्य संपले, पाण्याची टंचाई, कॉरिडॉर नष्ट झाले तर प्राणी गावात शिरणारच आणि नेमके तेच सध्या घडत आहे. वाघाला ट्रँक्विलायझरने बेशुद्ध करण्यासाठी शूटरला शांतपणे काम करावे लागते. त्यासाठी मोठमोठय़ाने ओरडणारा जमाव पाहून प्राणी एक तर हल्ला करतो वा आत पळून जातो. पिंजऱ्यातील बंदिस्त प्राण्यापेक्षा जंगलातील मुक्त प्राण्यावर ट्रँक्विलायझर मारणे सोपे नाही. तो अ‍ॅनेस्थेशिया आहे आणि वैज्ञानिक कसोटीवरच हे काम करावे लागते, पण गावक ऱ्यांना हे कोण समजावणार? गावातील तीन महिला बिबटय़ाने मारल्यानंतरही गावकरी कुणाला न जुमानता जंगलात जात असतील आणि नरभक्षकाच्या तोंडी बळी जात असतील, तर तो वन विभागाचा दोष नाही आणि असे गोंदियात घडत आहे. वन विभागावर असलेला राजकीय पुढाऱ्यांचा दबाब हीदेखील मोठी समस्या आहे. गावाचा नेता वाघ पकडण्यासाठी उपयोगाचा नाही, पण लोकांना जमा करून धमक्या दिल्या जात असतील, तर कोणते सरकारी कर्मचारी शांतपणे त्यांचे काम करतील? पाचपैकी एक बळी संरक्षित क्षेत्रात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा मृतदेह गावकऱ्यांनी तेथून बाहेर आणून बफर झोनमध्ये ठेवला आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा प्रकारही तेवढाच संतापजनक आहे.