भारतीय संगीत परंपरेशी इमान राखत सातत्याने नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या पंडित रविशंकर यांना निधनोत्तर ग्रॅमी आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे या घटनेचे महत्त्व भारतीयांसाठी विशेष आहे. याचे कारण आपल्या संगीताला मिळालेली जागतिक स्तरावरील दाद आहे. अल्प सांगीतिक परंपरा असलेल्या अमेरिकेत गेल्या काही शतकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात जे प्रयोग झाले, त्याने तेथीलच नव्हे, तर पाश्चात्त्य संगीतातही फार मोठे बदल घडून आले. या बदलांचा वेग भारतीय संगीतातील बदलांपेक्षा खूपच वेगवान असल्याने आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येत नाही. सतारवादनात लहान वयातच प्रावीण्य मिळवणाऱ्या पंडित रविशंकर यांच्या प्रतिभेमध्ये पाश्चात्त्य संगीतातील बदलांचा हा वेग आपल्या कवेत घेण्याची क्षमता होती. उत्तम तालीम मिळाल्यामुळे रविशंकर हे भारतातील एक नामांकित सतारिये म्हणून ख्यातकीर्त झालेलेच होते. केवळ उत्तम वादनापलीकडे स्वप्रतिभेने संगीतातील अनेक नवे रंग खुलवण्याची त्यांची ताकद अफाट म्हणावी अशी होती. सतत प्रयोग करत राहण्यासाठी कलावंताला सर्जनशीलतेची साथ आवश्यक असते. ती मिळत गेली म्हणून या असामान्य प्रतिभेच्या कलावंताने आयुष्याच्या अखेरीपर्यंत सर्जनाचे स्वर आळवले. ग्रॅमी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले, ते त्यांच्या ‘द लिव्हिंग रूम पार्ट १’ या अल्बमसाठी. त्याचबरोबर त्यांच्या संगीतसेवेबद्दल जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला. सतारवादनातील प्रभुत्वाशिवाय नवे संगीत आत्मसात करण्याची त्यांची शक्ती प्रचंड होती. त्यामुळेच अमेरिकेतील नव्या दमाच्या संगीतकारांनाही आपल्या प्रतिभेने चाट पाडू शकणारे रविशंकर हे तेथील संगीतविश्वातील एक अतिशय आदराचे स्थान बनले. बीटल्ससारखा रॉक संगीतातील वाद्यवृंद आणि येहुदी मेन्युहिन, जॉर्ज हॅरिसन, फिलिप ग्लास यांच्यासारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी केलेले सांगीतिक प्रयोग जगभर लोकप्रिय झाले. ‘ग्रामोफोन पुरस्कार’ या नावाने १९५९ मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे पाश्चात्त्य संगीतातील महत्त्व सतत वाढत गेले, याचे कारण चित्रपटांमुळे संगीताला मिळालेली नवी बाजारपेठ हे होते.  चित्रपटातून संगीत वेगळे होऊन त्याची स्वतंत्र बाजारपेठ होण्यासाठी गेल्या ८० वर्षांत मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न झाले. संगीत ही केवळ श्रवणानंदाची गोष्ट न राहता, तिचा प्रचार आणि प्रसार नव्या तंत्रज्ञानामुळे सतत वाढत गेला. इंटरनेटमुळे ते जगात पोहोचण्याचा कालावधीही कमी झाला.  या साऱ्याचा परिणाम संगीताच्या अभिव्यक्तीवरही होणे स्वाभाविक होते. हे सारे ज्या वेगाने घडत होते, तो वेग लक्षात घेऊन स्वत:ची प्रतिभा सतत परजत रविशंकर यांनी काळाबरोबर (काही वेळा काळाच्याही पुढे!) राहण्यात यश मिळवले. भारतीय संगीताची पुरेपूर संवेदना असल्याशिवाय जगातल्या कोणत्याही संगीत परंपरेत नवे काही मांडता येऊ शकणार नाही, एवढी येथील परंपरा समृद्ध आणि संपन्न आहे. जागतिक संगीत अशी संकल्पना जेव्हा जन्मालाही आली नव्हती, तेव्हा रविशंकर यांनी त्या दिशेने झेप घेतली होती. ‘फ्यूजन’ या कल्पनेला अभिजाततेचा दर्जा केवळ रविशंकर यांच्यामुळेच मिळू शकला, कारण त्यांच्याकडे भारतीय संगीतातील परंपरेचे संचित होते. त्याचा उपयोग अतिशय खुबीने करून त्यांनी त्या संगीताला नवे परिमाण मिळवून दिले. चौथ्यांदा असा जागतिक पुरस्कार मिळवणारे ते एक श्रेष्ठ कलावंत होते, म्हणूनच भारतीय संगीतावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना त्याचे अप्रूप असायला हवे.