‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष. समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची ओळख या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाते. यंदा गणेशोत्सवादरम्यान अशाच काही उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा परिचय ‘सर्वकार्येषु..’च्या माध्यमातून करून देण्यात आला. त्यात अनाथ मुलांच्या संगोपनासाठी पदरमोड करणाऱ्या संतोष गर्जे यांचे सहारा अनाथालय, कर्करोगावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणारी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, गतिमंद, अपंगांचा मायेने सांभाळ करणारे श्रीकृष्ण शांतिनिकेतन, दुष्काळाशी समर्थपणे दोन हात करणारी संस्था अशा विविध संस्थांच्या कार्याचा समावेश आहे. या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघही सुरू झाला आहे. पुन्हा एकदा या सर्व संस्थांच्या कार्याची थोडक्यात ओळख..

एशियाटिक सोसायटी
‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या संग्रहातील तब्बल एक लाख ग्रंथ- म्हणजे किमान दोन कोटी पाने, अडीच हजार पोथ्या आणि हस्तलिखिते आणि १२०० नकाशे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ठेवा आता संगणकीय स्वरूपात चिरंतन होण्याच्या मार्गावर आहे. ग्रंथांना नवजीवन देण्यासाठी, त्यांचा डिजिटल ‘पुनर्जन्म’ होण्यासाठी मिळेल तितकी मदत हवीच आहे. संशोधनाची संस्कृती आणि शहराचीच सभ्यता जपणारी ‘एशियाटिक सोसायटी’मोठय़ा नावारूपाची, खानदानी संस्था! आपल्या मदतीविना तिचं काय अडणार आहे किंवा सरकार तर तिला मदत करतंच आहे असं क्षणभर कुणाला वाटेलही.. पण प्रश्न केवळ संस्थेला गरज असण्याचा नाहीच. आपल्याच एका महान संस्थेशी असलेलं नातं सिद्ध करण्याची ही आपल्याला संधी आहे. नऊ कोटी ७३ लाख ३५ हजार रुपये हा केवळ ग्रंथ आणि पोथ्यांच्या ‘डिजिटायझेशन’चा खर्च; त्यामुळे केवळ राज्य सरकारने आश्वस्त केलेले पाच कोटी पुरणार नाहीतच.
ही या ऐतिहासिक संस्थेची आजवरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा थेट फायदा पुढील पिढय़ांना होणार आहे.
धनादेश : द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ((The Asiatic Society of Mumbai)
श्री समर्थ वाग्देवता मंदिर

१९३५ मध्ये धुळय़ात श्री समर्थ वाग्देवता मंदिराची निर्मिती झाली. जुनी कागदपत्रे, त्याची बाडे, पोथ्या, ग्रंथ, काव्यरचना, पत्रव्यवहार आणि अन्य साहित्यसाधनांचे जतन या मंदिरात मोठय़ा निगुतीने करण्यात आले आहे. अशा या अक्षरमंदिरात फिरू लागलो, की भोवतीने सर्वत्र ही वाङ्मयाची दालने एकापाठी किलकिलू लागतात. हे सारे वाङ्मय समर्थ रामदास, त्यांचे शिष्य आणि तत्कालीन साधुसंतांचा स्पर्श अनुभवलेले. सुरुवातीचा काही काळ संतवाङ्मयाच्या या सोहळय़ातच गढून जायला होते. आज या सगळय़ा वाङ्मयाचे जतन करणे, अभ्यासक-संशोधकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, अद्ययावत संग्रहालयाची उभारणी ही संस्थेपुढची तातडीची कामे आहेत. पण आर्थिक पाठबळाअभावी या सर्व योजना आजतरी कागदावरच आहेत. केवळ निधीअभावी लांबणारा हा प्रत्येक दिवस या ‘वाङ्मया’विषयी काळजी वाढवतो आहे. त्याचीच चिंता या विश्वस्तांना रोज भेडसावते आहे.

धनादेश : श्री समर्थ वाग्देवता मंदिर (Shree Samartha
Vagdevata Mandir) पॅन : AAHTS6905P

सहारा अनाथालय

समाजाच्या दातृत्वावर विश्वास ठेवून रोजची रात्र काढायची. ती संतोष गर्जेची आता सवय झाली आहे. ४२ अनाथ मुलांच्या आयुष्यातील पोरकेपण त्यांना जाणवू द्यायचेच नाही, हा त्यांचा ध्यास. तब्बल १२ वर्षांपासून संतोष हेच काम करतात. बीड जिल्ह्य़ात गेवराईत, शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर ते सहारा अनाथालय चालवितात. तेथील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना हसू आणायचे असते. त्यांच्या आनंदासाठी, पोरकेपणाची सावली त्या मुलांवर पडू नये, हा त्यांच्या जगण्याचा ध्यास आहे. त्यांना मदत करणारे हात दिवसागणिक वाढताहेत, पण भ्रांत काही संपत नाही. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय महिन्याला दीड लाख रुपये उभे करताना होणारी दमछाक काही थांबत नाही. वेश्या वस्तीतील काही अनाथ मुले, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरकी झालेली मुले आणि वेगवेगळ्या कारणाने आई-वडील नसणाऱ्या मुलांचा समावेश त्यांच्या अनाथालयात आहे. दररोजच्या अडचणींवर मात करत नव्या संकल्पासह संतोष रोज बाहेर पडतात तेव्हा मदतीसाठी रोज अनेकांना भेटतात. हे सगळे का करतात, कारण स्वत:च्या आयुष्यात आलेले पोरकेपण दुसऱ्याला जाणवू नये यासाठीच. किमान १०० मुलांच्या आयुष्याला सहारा द्यायचा, असा त्यांचा नवा संकल्प आहे. त्यासाठी आवश्यक असणारे मुलींचे वसतिगृह सुरू करणे ही त्यांची नवी गरज आहे. या उपक्रमांसाठी संस्थेला आर्थिक आधाराची गरज आहे.

धनादेश : आई जनहित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (अं्र खंल्लँ्र३ इंँ४४ीि२ँ्र८ री५ं रंल्ल२३ँं) पॅन : अअउळअ7281फ

औंध संस्थानचे राजगायक पंडित अनंत मनोहर जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजाननबुवा यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मरणार्थ १९४० साली ‘औंध संगीत महोत्सव’ सुरू केला. हा उत्सव या वर्षी ७५व्या वर्षांत पदार्पण करत आहे. सातारा जिल्ह्य़ातील औंध येथे शिवानंद स्वामी यांच्या समाधीसमोर हा उत्सव होतो. शहरी भागांत अनेक महोत्सव होतात. मात्र ग्रामीण भागातील रसिकांसाठी, कानसेनांसाठी एवढी वर्षे नि:शुल्क चालणारा ‘औंध संगीत महोत्सव’ हा एकमेव असावा. संस्था औंध संगीत महोत्सवाव्यतिरिक्त संगीतविषयक तीन ते चार कार्यक्रम डोंबिवली येथे आयोजित करत असते. भविष्यात संगीतविषयक अनेक उपक्रम सुरू करण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत. मात्र दिवसेंदिवस निधीअभावी या महोत्सवाचे आयोजन करणे आणि संस्था चालवणे संस्थेला अवघड होत चालले आहे. संगीतप्रेमींनी आर्थिक मदत केल्यास या संस्थेचे कार्य असेच पुढे सुरू ठेवून ग्रामीण भागातील रसिकांसाठी सुरू असलेला हा महोत्सव सुरू ठेवता येणे शक्य आहे.

धनादेश : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान Shivanand Swami
Sangeet Pratishthan) पॅन : aagts9298c

जीवन आनंद संस्था

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रमामध्ये राहणाऱ्या निराधारांची पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या निवासाची सोय झाली असली तरी त्यांच्यासाठी कायमस्वरूपी वास्तू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. पणदूरमध्ये जीवन आनंद संस्थेच्या मालकीची जमीन असून तेथे सध्या तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बहुसंख्य निराधारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण ती अजिबात पुरेशी नाही. या व्यक्तींच्या वेगवेगळ्या गरजांनुसार आवश्यक सुविधा असलेली स्वतंत्र वास्तू उभारण्याची गरज आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून बांधकामाला सुरुवातही झाली आहे. तळमजल्यासह तीन मजली इमारतीसाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजांसाठी दरमहा एकूण सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी वस्तूरूप किंवा रोख रकमेच्या स्वरूपातही संस्थेतर्फे देणग्या स्वीकारल्या जातात.

धनादेश : जीवन आनंद संस्था (Jeevan Anand Sanstha) पॅन :AABTJ7121J

प्रगती प्रतिष्ठान

जव्हार तालुक्यातील एकूण २७२ पैकी निम्म्याहून अधिक तर मोखाडा तालुक्यातील शंभरहून अधिक पाडय़ांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात प्रचलित व्यवस्था अपयशी ठरली आहे. दुर्गम भागातील अनेक गावांपर्यंत अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. दुर्गमता आणि दारिद्रय़ या दुष्टचक्रात अडकलेल्या या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी जव्हार येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’ निरनिराळे उपक्रम राबवीत आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सौर ऊर्जेद्वारे वीज आदी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. कर्णबधिर मुलांसाठी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, छोटे बंधारे, शेततळी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वीज नसणाऱ्या पाडय़ांना सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिजेंटा फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या शेती सुधार उपक्रमाचा या भागातील चार हजार शेतकरी लाभ घेत आहेत. मात्र तरीही गरजेच्या तुलनेत या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. ‘प्रगती प्रतिष्ठान’ला आता या विभागात अधिक सक्षमपणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकवर्गणीचे दान हवे आहे.
धनादेश : प्रगती प्रतिष्ठान (Pragati Pratishthan)
पॅन : AAATP3595P

महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था

महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, ठिकाण श्रीगोंदे, जिल्हा नगर. फारसे शिक्षण नसलेल्या अनंत झेंडे या ध्येयवेडय़ा तरुणाने ही संस्था उभी केली. खासगी शिक्षणसंस्थेत शिपायाची नोकरी सांभाळून त्याने या आदिवासी, फासेपारधी, डोंबारी अशा उपेक्षित समाजातील मुलांसाठी हा संसार उभा केला, तो केवळ लोकसहभागातून. ‘विद्यार्थी सहायक समिती’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या या उपक्रमाचे रूपांतर आता शोषित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था प्रकल्पात झाले आहे. संस्थेचा व्याप आता वाढतो आहे, मात्र आर्थिक मेळ घालणे हेच मोठे आव्हान आहे. सरकारी किंवा तशा तत्सम मदतीशिवाय सगळा उपद्व्याप सुरू ठेवताना आता त्याच्या मर्यादाही जाणवू लागल्या आहेत. मात्र लोकसहभागावर श्रद्धा ठेवून झेंडे यांचा हा खटाटोप सुरू आहे. संस्थेत सध्या १७८ मुले आहेत, दुसरीकडे शाश्वत उत्पन्न काहीच नाही. त्यामुळे संस्थेच्या विस्तारासही मर्यादा आहेत. लोकसहभाग एवढा एकच आधार संस्थेला आहे. तो सढळ हाताने लाभला तरच या उपेक्षितांचा हा प्रपंच चालेल, बहरेल..

धनादेश : महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था (Mahamanav
Baba Amte Vikas Seva Sanstha) पॅन : AADAM1475D

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

दुष्काळाची दाहकता सांगणारे अनेक जण. पाणलोट योजनांतून मिळणाऱ्या कोटय़वधींवर डोळा ठेवून संवेदनशीलतेने वावरणारेही खूप. पण दुष्काळाशी पाय रोवून लढा देताना रोज काम करणारे, शेतकऱ्यांना मानसिक आधारासह त्यांची आíथक घडी बसावी यासाठी झगडणारे मोजकेच. औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ ही संस्था त्यापैकी एक. या संस्थेने सुरू केलेल्या कामामुळे हळूहळू बदल होऊ लागले आहेत. औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्य़ांतील १०२ गावांची भौगोलिकता आणि मानसिकता तपासत ही संस्था दुष्काळ निर्मूलनासाठी घट्ट पाय रोऊन उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या सहली, गावातील विहिरींच्या पुनर्भरणासाठी उतारावर पाझरणारा रामकुंड, डोहरचना करीत गावागावांत अस्तित्वात असणारे पाण्याचे स्रोत मजबूत करण्यावर संस्थेने जोर दिला. काही कंपन्यांकडून सामाजिक दायित्वाची रक्कम मिळविली.
काही गावांसाठी ‘नाबार्ड’चे सहकार्य घेतले आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तींपासून उत्पादनवाढीचे अनेक प्रयोग हाती घेण्यात आले. समस्येची व्याप्ती पाहता हे काम एवढे आहे की, प्रबोधनासह विविध कामांसाठी संस्थेला समाजाच्याही आíथक पाठबळाची गरज आहे.

धनादेश : सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ (avitribai Phule
Mahila Ekatma Samaj Manda) पॅन : AADTS0790E

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० (०२२-२७६३९९००)

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)

नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१ (०१२०- ६६५१५००)