नातं टिकण्यासाठी संवाद आणि स्वीकार लागतातच. म्हणून जोडीदार निवडताना दोघांची जगण्याची मूल्यंच परस्परविरोधी नाहीत ना? आपण कोणत्या मूल्यांमध्ये तडजोड करू शकत नाही? कुठे करू शकतो? ते जाणीवपूर्वक तपासायचं आणि एकदा डाव खेळूनच पाहायचा. गणित चुकू शकतं या भीतीतून गणित सोडवायचंच नाही, हा पर्याय नाही. हा तर पलायनवाद.

‘‘मावशी, घरच्यांना एक स्थळ पसंत पडलंय. मुलाला एकदा भेट तरी म्हणून पुन्हा मागे लागलेत.’’ रिया नाराजीच्या सुरात म्हणाली.
‘‘भेटून पहा. जमूनही जाईल.’’ मी म्हणाले.
रिया तरतरीत, बोलकी, उच्चशिक्षित, गेली दोन र्वष एका कंपनीत चांगल्या पदावर होती. सत्तावीस वर्षांची, त्यामुळे घरातून लग्नाची घाई सुरू होती. हो-नाही करत ती एक-दोन मुलांना भेटली, पण जमलं नाही. त्यानंतर मात्र ‘मी लग्नच करणार नाही’ असं रियानं जाहीर करून टाकलं. तिच्या आईला तर हे झेपलंच नाही. घरात सतत तोच विषय आणि वादविवाद.
‘‘मावशी. लग्न करावंसं वाटत नाहीये मला.’’
‘‘का गं? हेच तर वय जोडीदार मिळवण्याचं.’’
‘‘आईबाबांची भांडणं एवढय़ा लहानपणापासून पाहतेय ना, असा कटकटीचा संसार नकोच वाटतो. लग्नाच्या विचारानंसुद्धा घाबरायला होतं.’’
‘‘अगं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, परिस्थिती वेगळी. कशावरून तुमचीपण भांडणं होतील?.. की दुसरा कुणी आवडलाय?’’
‘‘..एक मित्र आवडला होता मावशी. पण जरा विरोधी सूर लागला, वाद झाले की आईबाबांमधल्या कटकटीच आठवायच्या. ‘कशाला लग्नात अडकायचं? चाललंय ते बरं चाललंय,’ असं वाटून मी अलिप्त होऊन जायचे. बहुतेक त्यामुळेच शेवटी ब्रेक-अप झाला आमचा.’’
‘‘मला वाटतं रिया, तुमची पिढी प्रगल्भ आहे, तशीच कम्फर्ट झोन सोडायची भीतीपण खूप आहे तुमच्या मनात. जराही रिस्क घेण्याची तयारी नाही.’’
‘‘तसंही नाही. कंटाळा आला तर आम्ही जॉब पटकन सोडू शकतो, बिनधास्त परदेशी जाऊ शकतो पण लग्नाचं वेगळं पडतं ग. एकदा अडकलं की आयुष्यभर सुटका नाही.’’
‘‘लग्नाकडे नकाराच्या चष्म्यातून पाहिलं की वागण्यातूनही नकार आणि शंकाच पाझरणार. अपयश नक्की. किती भीती गं मनात. त्या मानानं आमच्या पिढीनं लग्नाकडे खूप सहजपणे पाहिलं.’’
‘‘तुमच्याकडे लग्नाशिवाय दुसरे पर्यायच नव्हते.’’
‘‘तेही खरं, पण गणित चुकू शकतं या भीतीतून गणित सोडवायचंच नाही, हा कुठला तुमचा पर्याय? हा तर पलायनवाद झाला. एवढं शिक्षण, वैचारिक प्रगल्भता असताना या स्वाभाविक विषयाचा एवढा ‘इश्यू’ कशासाठी?’’
‘‘फार तडजोड करावी लागते गं. प्रेमविवाह केलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींमधलीसुद्धा फारच कमी जोडपी आनंदात आहेत.’’
‘‘कारण प्रत्येकाला जोडीदाराने आपल्या अपेक्षेप्रमाणे बदलायला हवं असतं. मी परफेक्ट आहे, पण जोडीदाराने मात्र २५-३० र्वष जे काही शिकलंय, आपला स्वभाव म्हणून जपलंय, ते त्यानं/तिनं एक दिवसात विसरून माझ्या म्हणण्याप्रमाणे बदललं पाहिजे. असा उरफाटा हक्कदोघांनीही गाजवत बसायचं. समस्येबद्दल काथ्याकूट. कृती शून्य. उपाय दोघांकडूनही एकच, ‘तू बदल’. वर्षांनुर्वष गाडी तिथेच रुतलेली. ‘सोबत हवी, पण माझ्याच अटींवर. रिया शांतपणे बघ परिस्थितीकडे. विसंवाद ‘कशामुळे’ होतात? च्या कारणांची भलीमोठी यादी पण ते ‘कशामुळे’ बदलू शकतात? ला उत्तरच नाही. असं असू शकतं का? तू मोठेमोठे प्रोजेक्ट हॅण्डल करतेस. त्रयस्थपणे विश्लेषण करण्याची ती क्षमता लग्न, नातेसंबंध यासाठीही वापरून पाहायची, की कम्फर्ट झोनमध्ये राहून सोयीचा, एकांगी विचार करायचा?’’
‘‘मी सर्व बाजूंचा विचार करते बरं का.’’
‘‘हो ना? मग ऑफिसच्या कामात ट्रबल शूटरची तंत्रं वापरतेस की ‘हा प्रोजेक्टच नको’ असं म्हणतेस?’’
‘‘इथे कसा वापरणार ट्रबल शूटर?’’
‘‘विचार बदलले की कृती बदलते. त्यामुळे प्रश्न सुटणार आहे हे आधी ठरवायचं. सुखी, दु:खी दोन्ही जोडप्यांशी बोलायचं, निरीक्षण करायचं, काही तरी कॉमन सापडेल, काय करायचं, काय टाळायचं याची दिशा मिळेल. किमान बदल कुठे हवा ते कळेल. हे करण्याऐवजी तू फक्त सोयीचं उत्तर मिळणाऱ्या कहाण्यांमागे लपतेयस.’’
‘‘तसंही होत असेल. स्पष्टता येण्यासाठी अनेकांचा डाटा तपासून त्रयस्थपणे नीट विश्लेषण करायचं म्हटलं, तर नातलग बाद. इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि लेक्चर मिळेल फक्त.’’ रियाला टाळायचंच होतं.
‘‘संतुलित विचाराचे थोडे तरी नातलग, परिचित असतीलच. शिवाय अशा विषयांसाठी संवादगट, कार्यशाळा असतात, समुपदेशन उपलब्ध असतं. जिथे अनुभवांची देवाणघेवाण होतं. आपली मतंही तटस्थपणे तपासली जातात. यातलं तुला रुचेल ते करून पाहा.’’
‘‘पण एवढय़ा खासगी विषयात बाहेरची मदत घ्यायची गरजच काय? ज्याचं त्याला कळतंच ना?’’ रिया वैतागली.
‘‘तुला जी स्वत:ची मतं वाटतायत रिया, ती कुठून आलीत? तर घरातल्या व आसपासच्या परिस्थितीतून, अनुभवातून. आयुष्याचा निर्णय घेताना हे अनुभव एकांगी असू शकतात. लहानपणी कधीकाळी, काही प्रसंगांनी बनलेली तुझी मतं सवयीनं एवढी पक्की झालीत, की एकदा तपासून पाहा असं सुचवलं तरी रागावलीस. एकदा लग्न झालं की जन्मभर सुटका नाही’ हे तुझ्या आईच्या पिढीचं मत, जे तू नकळतपणे आपलंसं केलंस. तिच्या पिढीत ते खरं होतं, समाज पुरुषधार्जिणा, बायकांसाठी ठरावीकच नोकऱ्या, आर्थिक स्वातंत्र्य नाही, एकटं राहणं अशक्यच, वर ‘लग्नानंतर माहेर संपलं’ ही शिकवण होती. यातलं आज काय शिल्लक आहे गं? तुझ्याकडे शिक्षण आहे, प्रगल्भ विचार आहे, आर्थिक स्वातंत्र्य तर आहेच. समाज बदलतोय, जुळलं नाही तरी माहेरचा आधार मिळू शकतो. ’’
‘‘हो, पण तुझं पटतंय तरीही ‘माझ्या लग्नाचं काही खरं नाही’ अशीच घंटा वाजतेय मनात.’’
‘‘कारण तिथे तू भीतीनं दरवाजे बंद करून घेतले आहेस. त्यामुळे जोडीदाराची साथ, मुलं, संसार या आनंदाच्या बाजूसाठीही दार बंद झालंय.’’
‘‘पण अपेक्षेप्रमाणे झालंच नाही तर?’’
‘‘अपेक्षाभंगाची शक्यता कुठे? तर जोडीदाराबाबतच्या अपेक्षा फार घट्ट असतील आणि तडजोडीची जराही तयारी नसेल तिथे. त्यामुळे ‘अस्सा म्हणजे अस्साच जोडीदार हवा’ ऐवजी ‘असा जोडीदार असावा’ इतपत अपेक्षा लवचीक ठेवल्या, तर्कसंगत विचार जागा ठेवला, तर एवढं अवघड जाणार नाही. परिस्थिती बदलते गं रिया. आज जे आयुष्य तुला सुखाचं वाटतंय, ते वीस वर्षांनी वाटेल का? एकटी पडशील तेव्हा.’’
‘‘लग्न करूनही एकटी पडणार नाही कशावरून?’’
‘‘पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नसतं. पण मृत्यू किंवा विभक्त होणं देखील शक्यता म्हणून मनात स्वीकारलेलं हवं. मग दुर्दैवानं तसं घडलंच तरी तो धक्का उद्ध्वस्त करणार नाही. सुख आणि दु:ख, दोन्ही अनुभवांसाठी दरवाजा उघडा असतो तेव्हा अवघड परिस्थितीसुद्धा परिपक्वता देते.’’
‘‘इतका पुढचा विचार अवघड आहे गं?’’
‘‘अगं, मध्यंतरी आम्ही शाळेतले जिवलग मित्र-मैत्रिणीचं वीस वर्षांनी गेट-टुगेदर झालं. भेटलो, बोललो. समस्या तर प्रत्येकालाच होत्या, सुखी-समाधानी, भांडकुदळ, विभक्त, जोडीदार गमावलेले, अविवाहित.. प्रत्येकाची वेगळी कहाणी. पण त्यातले जे मित्र-मैत्रिणी अपेक्षांमध्ये किंवा भूतकाळात अडकून एकटे राहिले होते, ते फार भकास, निरुत्साही, तक्रारखोर वाटले. नकारानं त्यांच्यातला जीवनरस पिळून घेतलाय असं वाटलं मला. स्वत:च्या कोशात एकटं राहण्यापेक्षा न घाबरता आयुष्याला कधी भिडूनही बघितलं पाहिजे. विपरीत घडू शकतं तशीच चांगलं घडण्याची शक्यताही पन्नास टक्के असतेच की.’’
‘‘खरं आहे. पण सोबतीसाठी लग्न हवंच का?’’
‘‘असा नियम नाही, पण सोबत लागतेच. जोडीदारासाठी लिव्ह इन किंवा तत्सम पर्याय निवडण्याचं आणि त्याची वेगळी आव्हानं निभावण्याचं धाडस तुझ्यात आहे का? ते तुझं तू ठरवायचंस. दुसरा पर्याय समाजकार्याचा. तिथे कामासाठी समानधर्मी सोबत मिळू शकते. ती तुझी वृती आहे का? ते शोध. पण कुठल्याही पर्यायात गुंतवणूक आणि विसंवाद असतीलच. नातं टिकण्यासाठी संवाद आणि स्वीकार लागतातच. म्हणून जोडीदार निवडताना दोघांची जगण्याची मूल्यंच परस्परविरोधी नाहीत ना? आपण कोणत्या मूल्यांमध्ये तडजोड करू शकत नाही? कुठे करू शकतो? ते जाणीवपूर्वक तपासायचं आणि एकदा डाव खेळूनच पाहायचा. काय म्हणतेस?’’
‘‘माहीत नाही. पण आता स्वीकाराचा चष्मा लावून पुन्हा नव्याने तपासून पाहणार हे नक्की.’’

– नीलिमा किराणे