‘अमक्यासारखं’वाली तुलना पुन:पुन्हा झाल्याने ते लेबल माणसाला पक्कं चिकटतं. मग ते गुण असोत की दोष. लहानपणापासून ‘वडिलांसारखी’च्या शिक्क्यात अडकलेली प्रियाची वेदा वडिलांना देव मानून त्यांची कमिटमेंट आणि तापटपणा दोन्हीचीही कॉपी करते. लहानपणी त्याचं कौतुक असतं. नंतर त्या गुण/दोषाचा आधार ‘मी ‘अमक्यासारखाच’ आहे ना? त्यामुळे मी असंच वागणार’ असा समर्थनासाठीदेखील घेतला जाऊ शकतो. स्वतंत्र विचार थांबतो. तर काही मुलांच्या स्व-प्रतिमेला धक्का लागल्यामुळे ती खट्टू होतात, चिडकी होतात. तो स्वभाव बनतो..

आज वर्षांचा नवरा टूरवर गेल्यामुळे मैत्रिणींनी तिच्याकडे निवांतपणे गप्पांचा अड्डा जमवला होता. सिनेमा, नाटकं, गाणी, गॉसिप करत एकमेकींची खेचता खेचता, विषय आपापल्या कुटुंबांपाशी स्थिरावला. ‘अथर्व अगदी त्याच्या बाबासारखा गणितात हुशार आहे’, ‘सईच्या आवडीनिवडी अगदी माझ्यासारख्या आहेत’, ‘कौशिक चिडल्यावर त्याच्या कपाळावरची शीर अगदी त्याच्या आजोबांसारखी उभी राहते’, ‘मी अगदी माझ्या वडिलांसारखी हजरजबाबी आहे, त्यांची वकिली मी पुढे चालवायला हवी होती, असं आजी म्हणते’, प्रत्येकीला भावंडं, मुलं, कुटुंबीयांमधलं काही ना काही साम्य आठवत होतं. ‘‘आमची वेदा पितृभक्त. त्यांच्याचसारखी कमिटेड, तशीच तापट. बाबांसारखंच आर्किटेक्ट व्हायचंय..’’ प्रिया कौतुकानं म्हणाली. या गप्पांतून, ‘व्यक्तीच्या स्वभावाच्या घडणीतला आनुवंशिकतेचा भाग किती?’ या सनातन प्रश्नापाशी चर्चा पोहोचली, तेव्हा आसावरी गप्प होऊन चिंतेत गढलीय हे मानसीला जाणवलं. ‘‘काय गं आशू, एकदम गप्प? बोअर झालीस?’’ मानसीनं विचारलं.
आसावरी उदास हसली. दोन वर्षांपूर्वी अनिकेतपासून विभक्त होऊन ती मुलगा तेजससह वेगळी राहत होती. या मैत्रिणींच्या सोबतीचा तिला आधार वाटायचा. ‘‘नाही गं, आनुवंशिकता आणि कुटुंबाकडून येणारे गुणदोष यांच्याच विचारांत अडकलेय सध्या. अनिकेतची बुद्धी आणि अ‍ॅनालिटिकल थिंकिंग तेजसनं सहीसही उचललंय हे मला पदोपदी जाणवतं. पण त्यातूनच भीती वाटते, की तेजसनं रूप आणि बुद्धीसोबत अनिकेतच्या स्वभावातली आढय़तासुद्धा घेतली असेल तर? ‘मी सर्वश्रेष्ठ, मला सगळं कळतं’ असा जबरी इगो त्यांच्या घरातल्या प्रत्येकात भरलाय, त्यामुळे कुणाचंच कुणाशी फारसं पटत नाही. तेजसही तसाच आत्मकेंद्री, आक्रस्ताळा होईल का? अनिकेतसारखाच माझ्याकडे दुर्लक्ष करून आपलंच खरं करायला लागला तर मी काय करू? तगमग होते जीवाची. अनिकेतच्या स्वभावातलं, वागण्यातलं कणभरही काही तेजसमध्ये जाणवलं तरी मी अस्वस्थ होते. त्यातही बोलताना अनिकेतचा टोन जाणवला की माझं डोकंच सटकतं.’’
ग्रुपमधल्या चर्चेनं आता वेगळं वळण घेतलं. स्वत:तले, कुटुंबातले दोष एकेकीला आठवायला लागले. ‘‘माझ्यातला आळशीपणा, गोष्टी पुढे ढकलणं अथर्वमध्ये पण आलंय गं.’’
‘‘सई रागावल्यावर अगदी तिच्या आजीसारखी वागते. तस्साच ठसका आणि लागट बोलणं.’’
‘‘माझ्या भावाला अकरावीत वाईट संगतीतून सवयी लागल्या. वेळेवर लक्षात आलं म्हणून निभावलं. पण आता मनात माझ्या नकुलबद्दल धाकधूक असते. तोही तसाच बुद्धिमान पण वाहवत जाणारा. त्यामुळे ‘मामासारखं करू नकोस’ असं मी सतत बजावते नकुलला.’’ रिमा म्हणाली.
‘‘विश्वजीत, माझा नवरा, यशस्वी उद्योजक, शून्यातून विश्व उभं केलं त्यानं. आमचा वरदही आता फॅक्टरी बघतोय, पण विश्वजीत कायम म्हणतो, ‘उद्योजक असो की कलाकार, यशस्वी माणसांची दुसरी पिढी तेवढी कर्तबगार नसते. आयतं हातात मिळाल्यामुळे कष्ट माहीत नसतात. तू निदान आहे ते तरी टिकव बाबा.’’ वर्षां म्हणाली.
चर्चेचा पालटलेला नूर आणि मैत्रिणींचे गंभीर चेहरे बघून मानसीला हसू आलं. ‘‘अगं, काय चाललंय तुमचं? प्रत्येक कुटुंबात काही चांगलं, काही वाईट असणारच ना. त्याचं भान ठेवलं तर आपलं वागणं बदलता येतं, चांगल्या गोष्टी रुजवता येतात. आशूनं मनातली चिंता व्यक्त केल्याबरोबर सगळ्या मिळून भीतीत काय घुसलात?’’
‘‘मनात भीती असतेच की, आशूच्या बोलण्यामुळे ती वर आली इतकंच.’’
‘‘भीती वाटणं स्वाभाविक आहे गं. पण कुठलाही लहान मोठा ट्रिगर मिळाला की ती भीती अशी गुरफटून घेतेय, हसू संपतंय, छातीत धडधडतंय आणि अनावर अस्वस्थता येतेय हा इंडिकेटर आहे. इथे थोडं थांबून त्या भीतीकडे शांतपणे पाहायला हवं.’’
‘‘काय म्हणायचंय तुला मानसी?’’ आशूनं गोंधळून विचारलं.
‘‘तेजसचा आवाज अनिकेतसारखा जाणवला, तो रागानं बोलला असे ट्रिगर मिळाले की लगेच ‘तेजस वडिलांवर जाणार’ या भीतीत अडकतेस. मनातल्या कल्पनांचं दडपण वाढलं, की तेजसकडे तो जसा आहे तसा, स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी नकळतपणे तुलनेच्या चष्म्यातून साम्य शोधत राहतेस. साम्य सापडल्यावर पुन्हा भीती. या दुष्टचक्रात गरगरत राहण्याची तुला सवय लागतेय गं. या गोंधळात, चांगलं किंवा वाईट हे ‘कोणासारखं’ असल्यामुळे चांगलं/वाईट नसतं, तर त्या वागण्यातून होणाऱ्या परिणामांमुळे असतं हे मूळ तत्त्व बाजूलाच राहतं. तेजस तुझ्या जगण्याचा आधार आहे. तरीही, त्याच्यापर्यंत तुझं प्रेम पोहोचण्याऐवजी मनातली धाकधूकच जास्त पोहोचत असणार आशू.’’
‘‘हो गं, तू कधी हसतच नाहीस, सारखी टेन्शनमध्ये असतेस, चिडचिड करतेस असं खूपदा म्हणतो तो.’’
‘‘मग तुझ्या लाडक्या मुलाकडून येणारा फीडबॅक तुला काहीच सांगत नाही का?’’
..थोडा वेळ शांतता पसरली. मग वर्षां म्हणाली,
‘‘आमचा वरद पण विश्वजीतच्या ‘दुसऱ्या पिढी’च्या तत्त्वज्ञानावर खूपदा वैतागतो बरं का. म्हणतो, ‘माझ्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही. तुमचा यशस्वी व्यवसाय आणि अनुभवाच्या पाठबळावर मी आणखी मोठी झेप घेईन असा आशीर्वाद द्या ना. लताबाई-आशाबाई, शंतनुरावदेखील दुसऱ्या पिढीतलेच होते हे
कसं विसरता?’’
‘‘बरोबरच आहे त्याचं. उदाहरणं दोन्ही बाजूंची देता येतात. पण वाईटच घडणार अशी बाबांची खात्री असेल तर वरदनं धडपड तरी कशासाठी करावी?’’
‘‘विश्वजीतच्या मते, ‘असं बोलल्यामुळे मुलं जमिनीवर राहतात. काही अपवाद असतील पण दुसऱ्या पिढीचं अपयश हा इतिहास आहेच.’’
‘‘विश्वजीतच्या म्हणण्यात सत्याचा अंश आहेच गं, पण त्या अंशाचं ठाम गृहीतक होऊन वरद पुन्हापुन्हा नाउमेद होत राहिला तर त्याचा आत्मविश्वास जमिनीच्या पार खालीही जाऊ शकतो. रिमा तुलासुद्धा नकुलची मामाशी तुलना करताना हे लक्षात ठेवायला हवं. बाहेरच्या जगाशी लढता येतं पण घरच्यांच्या मनातला अविश्वास माणसाला खच्ची करतो. वरद स्पष्टपणे बोलण्याएवढा मोठा तरी आहे. पण आशू, तुझ्या तेजसला खूप बाबासारखा दिसतो एवढय़ाचमुळे तुझ्या भीतीचं सावट झेलावं लागतंय.’’
‘‘अगं, पण मग मी करू काय?’’ आसावरी हवालदिल.
‘‘प्रत्येक व्यक्ती आणि तिची परिस्थिती वेगळी असते, हे आधी स्वत:त खोलवर समजून, रुजवून घ्यायचं. मुलांवर विश्वास ठेवायचा आणि सतर्क राहून आपल्या ‘वागण्यातून’ संस्कार करायचे. अशा तुलनेमुळे आपल्याला कसं वाटलं असतं याचा त्या व्यक्तीच्या जागी, त्या वयात, त्या परिस्थितीत जाऊन विचार करणं जमलं, तर आपल्या शब्दांतून, वागण्यातून जाणारे संदेश आपल्याला स्पष्ट दिसतात.’’
‘‘पण साम्य असतंच ना?’’
‘‘तसं म्हणशील तर अनिकेतसारखे तुझ्यातलेही गुण-दोष तेजसमध्ये येऊ शकतात, नवेही येऊ शकतात. तू धास्तीत राहिल्यामुळे ते संपणार आहेत का? यातून घडतं असं, की ‘अमक्यासारखं’वाली तुलना पुन्हापुन्हा झाल्याने ते लेबल माणसाला पक्कं चिकटतं. मग ते गुण असोत की दोष. लहानपणापासून ‘वडिलांसारखी’च्या शिक्क्यात अडकलेली प्रियाची वेदा वडिलांना देव मानून त्यांची कमिटमेंट आणि तापटपणा दोन्हीचीही कॉपी करते. लहानपणी त्याचं कौतुक असतं. नंतर त्या गुण/दोषाचा आधार ‘मी ‘अमक्यासारखाच’ आहे ना? त्यामुळे मी असंच वागणार’ असा समर्थनासाठीदेखील घेतला जाऊ शकतो. स्वतंत्र विचार थांबतो. याउलट वरद, नकुल किंवा तेजसच्या परिस्थितीतली मुलं स्व-प्रतिमेला धक्का लागल्यामुळे खट्टू होतात, चिडकी होतात. तो स्वभाव बनतो, मोठेपणीही उरतो.’’
‘‘तुझं पटत असलं तरी रोज साम्य दिसतं तेव्हा भीती वाटतेच. त्यातून बाहेर कसं पडायचं?’’
‘‘अधूनमधून भीती ठीक आहे, पण भीतीनं मनात घर करता कामा नये. त्यासाठी, आपण अतिरेकी, काल्पनिक तुलनेच्या आहारी जात नाहीये ना, हे तपासायलाच हवं. टोकाच्या कल्पना करत राहिल्याने परिस्थिती बदलतेय की चिघळतेय? असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहायचा. भीतीतून आपण जे वागतो, त्यामुळे नको तेच घडायला मदत होतेय हे लक्षात येईल. भीतीत राहून तिचाच विचार करत गरगरत राहण्याची सवय बदलायची आहे हे समजून घ्यायचं. समोरच्याकडून येणारा फीडबॅक तपासत राहिलं की आपलं लक्ष भीतीवरून सरकून वागणं आणि परिणामाकडे वळतं. भीतीच्या चक्रातून सुटणं जमलं की पुढे कसं करायला हवं ते ज्याचं त्याच्या लक्षात येतं, कारण फोकस समस्येवरून उपायांकडे सरकलेला असतो.’’
‘‘अवघड आहे मानसी, पण पाहू या प्रयत्न करून. नाहीतरी रात्रंदिवस चिंतेत राहणं तरी कुठे सोपं आहे?..ठरवलं, की जमतंच.’’ चुटकी वाजवत आशू म्हणाली, तशा सगळ्या हसायला लागल्या.
neelima.kirane1@gmail.com