‘‘माझ्याच बाबतीत सगळं चांगलं कसं,’ असा प्रश्न चांगलं घडतेवेळी का नाही विचारावासा वाटत? कारण हवं ते नेहमीच मिळत गेल्यामुळे तो हक्कच वाटायला लागतो. पण वास्तवात स्त्री-पुरुष, लहान-मोठय़ा प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे नकाराशी सामना करावाच लागतो हे समजून घेतलं तर नकार पचवणं कठीण जात नाही.. हेच नकाराचं देणं असतं.

तो क्लिनिकमध्ये आला तेव्हा डोळ्यांत भरलेलं दु:ख स्वच्छ वाचता येत होतं. अतिशय खचलेला, निराश. बोलताना दु:खाचे कढ आवरत नव्हते. साधारण वर्षांपूर्वी, ओळखीतून मुलगी पाहून त्याचा साखरपुडा झाला होता. ती बंगळुरूची, नोकरीवाली, मुंबईत बदली शक्य. तो तिच्या प्रेमात पागल, तीही खुशीत. मधल्या काळात शिरस्त्याप्रमाणे भरपूर चॅटिंग, फोन झाले. दोन-तीन भेटी झाल्या. असं सगळं नीट चाललं असताना ‘आमच्या घरात अमुक चालतं-तमुक नाही’ वरून त्यांची वादावादी झाली, हा चिडला, चॅटिंगमध्येही ते भांडण चालू राहिलं आणि एका टप्प्यावर तिनं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

त्याला धक्का बसला. ‘तू असं करूच कसं शकतेस?’ म्हणत तरीही भांडलाच तो आधी तिच्याशी. आवडलेल्या मुलीकडून असा ‘नकार’ त्याला झेपलाच नाही. ती खरंच ‘नाही’ म्हणतेय हे पोहोचतच नव्हतं त्याच्या मनापर्यंत. तिचं मन वळवण्याचे प्रयत्न दोन्ही घरांनी केले, पण ती ठाम होती. गेले आठेक महिने तो तिला, तिच्या भावाला रोज फोन करायचा. स्वत:च्या घरच्यांना ‘तिच्या घरच्यांशी बोला’ म्हणून सांगायचा. एकदोनदा बोलल्यानंतर तिनं त्याला ‘ब्लॉक’ केलं. कालांतरानं तिचा भाऊ फोन घेईनासा झाला. याचे मित्र, घरचेही कंटाळले. पण त्याचं दु:ख संपतच नव्हतं. ‘नकार’ स्वीकारताच येत नव्हता. कामावरही परिणाम होत होता. अखेरीस मित्रानं राजी केल्यावर तो मला भेटायला आला. म्हणाला, ‘‘साखरपुडा झाल्यावर, चार वेळा भेटल्यानंतर, एवढय़ा चॅटिंगनंतर ती असं कसं करू शकते? तिच्या डोळ्यांतलं प्रेम खोटं नव्हतं.’’

‘‘एकदा वाद झाल्याबरोबर ‘नाही’ कळवलं का तिनं?’’
‘‘तसं नाही. लहान-मोठे वाद नेहमी व्हायचे. माझ्या घरच्या पद्धतींबद्दल, माझ्या काही मतांवर ती नेहमीच अस्वस्थ व्हायची. तिच्या घरच्यांच्या काही गोष्टी मला पटायच्या नाहीत.’’
‘‘दर वेळी तिनंच बदललं पाहिजे, असा आग्रह असायचा का तुझा?’’
‘‘बरेचदा असायचा. कारण ती आता आमच्या घरात येणार म्हणजे तिलाच बदलावं लागणार ना? तर ती एका मैत्रिणीपाशी मला ‘अडेलतट्टू’ म्हणाली. ही काय कमी ‘अडेल’ आहे? माझं काय होईल याचा विचारही केला नाही तिनं.’’
‘‘अरे, तू आवडलास म्हणूनच तिनं आधी होकार दिला असणार. परिचय वाढल्यानंतर काही गंभीर मतभेद लक्षात आले असतील. काही तडजोडी आयुष्यभर झेपणार नाहीत, असं वाटलं असेल. हा निर्णय तिच्यासाठी सोपा होता कशावरून? तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती?’’
‘‘वडील संतापले. म्हणाले, ‘असली आगाऊ मुलगी नकोच. रांग उभी करतो मुलींची. एका मुलीवर आयुष्य लावून बसणारा तुझ्यासारखा मूर्ख आपल्या सात पिढय़ात झाला नाही..’ आई लगेच स्थळं पाहायला लागली. मला ‘त्या’ मुलीची स्वतंत्र वृती, हुशारी आवडली होती. आईनं आणलेल्या घरेलू मुली तिच्या आसपाससुद्धा पोहोचत नाहीत. आई म्हणते, ‘आधी आपल्या समाजात शिकलेल्या मुली कमी. त्यात आपली बाजू लंगडी. चांगलं मिळालेलं टिकवता आलं नाही, आता तरी जुळवून घे, नाही तर काही दिवसांनी इतपतसुद्धा स्थळं येणार नाहीत.’’

‘‘आई-बाबांच्या अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया आल्यावर तुला त्यांचा, जगाचा, तिचा खूप राग येतो, भीती वाटते, एकटं वाटतं आणि ताण खूप वाढतो. हो ना? शिवाय दर वेळी तिच्याशी तुलना होतच असणार.’’
‘‘हो. अगदी असंच होतं. आपल्याला चांगली जोडीदार मिळणारच नाही, मिळाली तरी आपण हिला विसरू शकणार नाही, एका मुलीच्या नकारानंतर आईलासुद्धा माझी बाजू लंगडी वाटते. तिचा भाऊ माझा मित्र, तरीही त्यांच्याकडचे कुणी माझा फोन घेत नाहीत, माझे मित्र माझ्याकडे ‘बिचारा’ म्हणून बघतात, मला टाळतात. यातलं काहीच मला सहन होत नाही. ‘माझ्याच नशिबात असं का? माझं काय चुकलं? ती असं करूच कशी शकते?’ असे प्रश्न सतत डोक्यात फिरत असतात. तिचं लग्न ठरल्याचं मध्यंतरी कळल्यापासून तर काही सुधरतच नाहीये.’’

‘‘स्वाभाविक आहे. पण दु:खाच्या किंवा कुठल्याही भावनेची तीव्रता कायमची नसते, थोडय़ा वेळानं आपोआप उतरते. मात्र दु:ख वाढवणारे विचार पुन:पुन्हा करत राहिल्यावर ती भावना तीव्र होऊन पुन:पुन्हा वर येते. ‘मी कुणालाच नकोय’ हा तुझा विचार दु:ख, एकटेपणा, संताप, असहायपणा अशा भावनांच्या चक्रात तू अडकून पडला आहेस.’’
‘‘तसंही असेल, पण यातून बाहेर कसं पडायचं?’’

‘‘माझं काय चुकलं? ती असं वागलीच कशी? माझं शिक्षण, हुशारी, चांगलेपणा कशालाच किंमत नाही? असे विचार तू गेले दहा महिने करतोयस. दहा र्वषही करू शकतोस. अशा उत्तर नसलेल्या प्रश्नांचे भोवरे तुम्हाला गरगरवत ठेवतात, ज्यातून बाहेर पडायचा रस्ता नसतोच. त्यामुळे गुदमरल्यासारखं वाटतं, आणखी असहाय वाटतं. म्हणून मनातले प्रश्न बदलायचे. ‘माझ्यात चांगलं काय काय आहे? लोक मला का टाळत असतील?’ अशा प्रश्नांची उत्तरं शोधायची. समज, ‘तिच्या’ जागी तुझी बहीण आहे आणि तो मुलगा ‘तिला समजवा’ म्हणून महिनोन्महिने तुला रोज फोन करतोय.’’
‘‘मी बहिणीचं मन वळवलं असतं.’’
‘‘तरीही बहिणीचा ‘नकार’च असेल तर तू आठ महिने रोज रात्री त्या मुलाची समजूत काढशील? की ‘मी तुला समजू शकतो, पण नाही जमत रे’ असं सांगून तोच तो संवाद थांबवशील?’’
‘‘..’’
‘‘तुझ्या घरच्यांनी, मित्रांनी सुरुवातीला तुला समजून घेतलंच असणार. पण रोजचं सुतकी राहणं कुणीही किती दिवस सहन करेल? प्रत्येकाला आपलं आयुष्य आनंदी हवं असतं. तुझ्या कामाच्या बाबतीत ‘मनासारखं होईपर्यंत मी सोडणार नाही’ ही वृत्ती तुझं बलस्थान असेल. पण भावना आणि आयुष्याचा प्रश्न असताना हा दुराग्रह अडेलतट्टूपणाच नाही का? तुला तिची स्वतंत्र वृत्ती आवडली. पण तीच वृत्ती तिनं तुझ्याबाबतही वापरली. पुरुष म्हणून, नवरा म्हणून तुझी मतं इतकी ठाम असणं, तिच्या मतांना जागाही न देणं तिला भावी पतीकडून अपेक्षित नसेल. आत्तापासूनच एवढा गृहीत धरतोय तर लग्नानंतर काय होईल? स्वभाव आणि अपेक्षांमधला हा फरक पुढे रोजच्या भांडणांना कारणीभूत ठरेल, आयुष्यभर जमवून नाही घेता येणार अशी भीती वाटली असेल.’’
‘‘असेलही, पण तरीही तिच्या नसण्याचं दु:ख संपत नाही, पराभूत वाटतं.’’
‘‘मनातलं दु:ख ही वस्तुस्थिती आहेच, पण त्यात पराभव कसला? जगातल्या एका व्यक्तीला तू कॉम्पॅटिबल वाटला नाहीस म्हणजे तू आयुष्य हरलास, निरुपयोगी झालास का?’’
‘‘तरीही दुसऱ्या मुलीवर प्रेम करणं नाही जमणार.’’
‘‘बघ. पुन्हा वेगळ्या नकारात घुसलास. पुढचं आत्ताच कशाला ठरवतोस? आधी हा नकार पचव. मनातली तुलना थांबव, नाही तर तुझ्या आईनं आणलेली स्थळं, दुय्यमपणाची भावना, घरच्यांच्या पारंपरिक अपेक्षा..कुठलंही कारण तुला नव्या भोवऱ्यात घुसण्यासाठी पुरेल.’’
‘‘कसा पचवायचा नकार? लहानपणापासून मी कधी ‘नाही’ ऐकलंच नाहीये.’’
‘‘माझ्याच बाबतीत सगळं चांगलं कसं?’ असा प्रश्न त्या वेळी का नाही विचारावासा वाटला? कारण हवं ते नेहमीच मिळत गेल्यामुळे तो तुला तुझा हक्कच वाटायला लागला. पण असं काही नसतं. स्त्री-पुरुष, लहान-मोठय़ा प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे नकाराशी सामना करावाच लागतो हे समजून घेतलंस तर नकार पचवणं सोपं जाईल. नकाराच्या विळख्यात गुरफटून घेऊन जगत राहण्यापेक्षा त्या ‘नकारानं दिलेलं देणं’ घेऊन बाहेर पडणं समजायला हवं.. या अनुभवातून तुझ्यात काही चांगला बदल झाला असेल? काही जाणिवा नव्यानं झाल्या असतील?’’
‘‘..माझा अडेलतट्टूपणा तर आता दिसतोच आहे मला. सहनशक्ती वाढलीय. खूप जणांनी सोबत दिली या काळात, मीच रुसून, त्यांना दूर लोटून स्वत:ला एकाकी करीत होतो हेदेखील कळतंय आता.’’
‘‘पूर्वी कधीच न अनुभवलेला प्रेमाचा एक जिवंत अनुभव तुझ्याकडे आहे. ‘तिची’ सोबत मिळाली नसली तरी प्रेमातलं बेभानपण आणि जीवघेणी वेदना दोन्ही अनुभवलंयस. पूर्वी तुझ्या घरच्यांचं सगळं काही तुला बरोबर वाटायचं. आता स्वत:च्या आणि घरच्यांच्या स्वभावातले गुणदोष तू त्रयस्थपणे पाहू शकतोस. दुसऱ्याला स्पेस द्यायला हवी हे तुला कळलंय. शिवाय तुझी बुद्धी, चांगुलपणा ही जुनी बलस्थानं तर तुझ्याबरोबर कायमच आहेत.
ही समृद्धी या नकारानं दिलीय. पूर्वीपेक्षा खूप वेगळा, प्रगल्भ बनू शकतोस तू, जर स्वत:च तयार केलेल्या दु:खाच्या भोवऱ्यातून बाहेर यायचं ठरवलंस तर आणि तरच. ’’

– नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com