बीबीसीचे वरिष्ठ पत्रकार ग्रॅहम टर्नर यांना १९७६ मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाबा आमटे सांगतात- ‘‘एका उच्चभ्रू जमीनदाराच्या मुलाचं आयुष्य मी जगत होतो. लहान असूनही मला कायम मानाची, अदबीची वागणूक मिळत असे. लहानपणी जेव्हा मी बलगाडीतून जात असे तेव्हा एकजण बलगाडीसमोर धावत असायचा.. पुढे वर्दी द्यायला- की कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती येते आहे! मला फक्त उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या वा घरची जहागीरदारी असणाऱ्या मुलांसोबतच खेळण्याची परवानगी होती. जेव्हा जेव्हा मी तथाकथित खालच्या जातीच्या मुलांशी संवाद साधण्याचा किंवा खेळण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तेव्हा मला तसं न करण्याची ताकीद देण्यात येत असे. प्रसंगी मारही पडत असे.’’ बाबा पुढे म्हणतात, ‘‘माझ्यासारख्या सुखवस्तू, उच्चभ्रू घरांमध्ये त्या काळात निष्ठुरता इतकी ठासून भरली होती, की या जगापेक्षा वेगळं इतर काही दिसूच नये म्हणून कडक र्निबध घातले जायचे. पण माझं मन या सगळ्याविरुद्ध बंड करून उठू लागलं. माझी अशी बंडखोरी पाहून माझे वडील बापूजी एकदा खूप व्यथित होऊन म्हणाले, की तू जन्माला आलाच नसता तर बरं झालं असतं!’’

बाबा १३ वर्षांचे असतानाची एक घटना ते सांगत.. ‘‘विदर्भातल्या काही भागांत होळीच्या दिवशी एक विशिष्ट मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक म्हणजे समाजातील सगळ्या स्तरांतील लोकांना एकाच पातळीवर आणून एकत्र होळीचा आनंद घेण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न असतो (Social Equalizer१). या मिरवणुकीत खूप चित्रविचित्र प्रकार केले जातात; जेणेकरून सगळ्यांसाठी आनंदाचे काही क्षण निर्माण होतील. एके वर्षी मला (जहागीरदाराच्या मुलाला) जिवंतपणी प्रेतवस्त्रात गुंडाळून, गळ्यात तुटक्या चपलांचे हार घालून चक्क तिरडीवर बांधण्यात आलं आणि मिरवणूक काढण्यात आली! त्या क्षणी माझ्या मनात दोन भिन्न भावना निर्माण झाल्या. एक भीतीची. ती यासाठी- की जर हे सगळं कोणी घरी जाऊन बापूजींना सांगितलं तर..? आणि दुसरी आनंदाची. कारण मानपान, श्रीमंती, घरंदाजपणाची कवचं भेदून मला सगळ्यात जास्त आवडणाऱ्या या लोकांनी मला त्यांचा एक भाग बनवून घेतलं.’’

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

या प्रसंगातून आपल्याला लक्षात येतं, की घरातल्या त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बाबांचा जीव घुसमटत होता. म्हणून आपल्या बालपणीचा आणि तरुणपणाचा मोठा काळ त्यांनी भारतभर भटकंती करण्यात घालवला. ते घरातून मोठय़ा कालावधीसाठी अचानक गायब होत असत. कधी दहा दिवस, तर कधी महिनाभरसुद्धा! अशा प्रकारे वर्षांतले सुमारे तीन महिने बाबांची भटकंती सुरू असे. याबद्दल वडिलांना सांगायचा प्रश्नच नव्हता. पण आईला मात्र परत येण्याचं आश्वासन देऊन ते गुपचूप निघून जात. बाबांनी याबद्दल म्हटलं आहे, ‘‘मी पळून जायचो, कारण मला आयुष्य अनुभवायचं होतं. मला सामान्य लोकांमध्ये मिसळून जायचं होतं. सामान्य माणसं कोणताही मुखवटा घेऊन जगत नाहीत. आमच्यासारख्या तथाकथित उच्चभ्रू लोकांनाच अशा मुखवटय़ांची गरज भासते. त्या काळात मी मुख्यत्वे दुर्गम, आदिवासी भागातील खेडय़ांमध्ये जायचो. कष्टकऱ्यांच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. That microscopic look at village life taught me to hear the heart-beat of reality.’’

बाबा सुरुवातीपासूनच अशा खूप विभिन्न अनुभवांना सामोरे गेले होते. वेडय़ा आईचं हे ‘सो कॉल्ड’ वेडं मूल सांभाळणं बापूजींसाठी किती कठीण होऊन बसलं असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी!

तर अशा या लहरी तरुण मुलाचं बस्तान बसवण्याची एक उत्तम संधी बापूजींकडे अनेक वर्षांनी चालून आली. १९३६ मध्ये वकिलीची परीक्षा पास झाल्यानंतर दुर्ग येथे वकिली व्यवसाय करताना फौजदारी दाव्यांचा बाबांना आलेला प्रचंड तिटकारा लक्षात घेऊन बापूजींनी त्यांना वकिली करण्यासाठी वरोरा येथे स्थायिक होण्याचा पर्याय दिला व केवळ दिवाणी दावे स्वीकारावे असं सांगितलं. वकिली करता करता बाबा वरोऱ्याजवळ गोरजा येथे ४५० एकरांवर पसरलेल्या वडिलोपार्जति मालमत्तेची देखभाल करू शकतील, हासुद्धा यामागचा बापूजींचा हेतू. त्या काळात चांदा जिल्हा जगातील अतिशय श्रीमंत भागांपकी एक गणला जात होता. कारण सागवान (ग्रीन गोल्ड), कोळसा (ब्लॅक गोल्ड), कापूस (व्हाइट गोल्ड) आणि चुना (ग्रे गोल्ड) या मौल्यवान गोष्टी या भागात विपुल प्रमाणात होत्या. आणि चांदा जिल्ह्यतील वरोरा हे दिल्ली-मद्रास ग्रॅन्ड ट्रंक रेल्वेमार्गावर स्थित आणि तत्कालीन ‘बीएनआर’ म्हणजे बंगाल-नागपूर रेल्वेचं शेवटचं स्थानक. त्यामुळे या सर्व गोष्टींची उलाढाल करणारं वरोरा गाव ईस्ट इंडिया कंपनीचं ‘हब’ मानलं जात असे. कामाच्या निमित्ताने वरोऱ्याला येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या करमणुकीसाठी एक क्लबसुद्धा होता. बापूजींना अशी भाबडी आशा होती, की बाबा त्यांची वकिली आणि मालमत्ता सांभाळून फावला वेळ बरोबरीच्या लोकांसोबत क्लबमध्ये टेनिस, ब्रीज वगरे खेळण्यात घालवतील. पण बापूजींच्या पदरी परत निराशाच आली!

गुन्हेगारांची वकिली करून तुंबडय़ा भरणारे वकील अनेक होते; पण श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणारा वकील होणं बाबांनी स्वीकारलं. बाबांनी एक अनोखा प्रयोग आरंभला. त्यांनी वामनराव स्वान आणि बाबूकाका खिस्ती या दोघा वकील मित्रांसोबत सहकारी तत्त्वावर वकिली व्यवसाय सुरू केला. तिघांचं मिळून एकच बँक खातं होतं; ज्यामधून तिघांपकी कोणीही, कितीही पसे केव्हाही काढू शकत असे. हे तीन मित्र मिळून फक्त गरीब अशिलांचीच प्रकरणं चालवीत असत.

वरोऱ्यात थोडं स्थिरस्थावर झाल्यावर बाबांनी जेव्हा गोरजेमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्यांच्यासमोर एक भयाण वास्तव उभं राहिलं. ज्या शेतजमिनीत बाबांनी वा कुटुंबातल्या कुणीच कधी एक दाणाही पेरला नव्हता, त्या जमिनीच्या उत्पन्नाच्या जोरावर आमटे कुटुंब एक सुखवस्तू आयुष्य जगत होतं. तर दुसरीकडे त्या जमिनीमध्ये स्वत:चा घाम गाळून आणि रक्त आटवून सोनं पिकवणाऱ्या कष्टकऱ्यांच्या नशिबी मात्र भीषण दारिद्रय़ाचं जीणं होतं. आपलं अर्थार्जन अन्यायावर उभारलेलं आहे ही जाणीव त्यांना पोखरू लागली. बाबांच्याच शब्दांत सांगायचं तर- ‘‘They were desperately poor, often starving and virtually naked. Worse than that – they were like cowed animals.’’ बाबा सामाजिक विषमतेबद्दल अनभिज्ञ नव्हते, पण या विषमतेची दाहकता एवढय़ा जवळून ते पहिल्यांदाच अनुभवत होते. बाबांना स्वत:च्या बांडगुळासारख्या परावलंबी जगण्याचा उबग येऊ लागला. गोरजेतील बंगलेवजा घरात न राहता ते शेतमजूर राहतात तशा छोटय़ाशा झोपडीत राहू लागले. तिथे गोरजा आणि आजूबाजूच्या गावखेडय़ांतील दलित आणि एकूणच कष्टकरी वर्गाची दुरवस्था बाबांना जवळून अनुभवता आली. स्वत:ला उच्चवर्णीय समजणाऱ्यांच्या प्रचंड प्रतिरोधाचा सामना करत बाबांनी गोरजेतली विहीर हरिजनांसाठी खुली केली. त्यांना पक्की घरं बांधायला मदत केली. त्यांच्यासोबत ते जेवू लागले. भजनं म्हणू लागले. काठावर उभं राहून प्रश्नाचं तटस्थ निरीक्षण न करता थेट प्रवाहात झोकून देण्याच्या आपल्या स्वभावामुळे बाबा कष्टकऱ्यांमध्ये त्यांचाच एक भाग बनत मिसळले.

बाबा म्हणत, ‘‘अन्न हे आजचं अध्यात्म आहे, उपनिषद आहे. आत्म्याची खरी शुद्धी आणि उदात्तीकरण शारीरिक कष्टांमुळेच होते. त्यामुळे अन्न निर्माण करणाऱ्या कष्टकरी वर्गाला त्यांच्या परिश्रमांचा योग्य परतावा मिळावा यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. मला श्रमजीवी बांधवांच्या डोळ्यातून डोकावणाऱ्या आणि पोटात वसणाऱ्या अन्न या पूर्णब्रह्माची साधना करायची आहे.’’ ‘दास कॅपिटल’च्या माध्यमातून कार्ल मार्क्‍स बाबांच्या डोक्यावर आरूढ झाला तो याच काळात. जोडीला होते प्रिन्स क्रोपोट्किनचे ‘कॉन्क्वेस्ट फॉर ब्रेड’, जॉन रस्किनचे ‘अन्टू धिस लास्ट’, जे. सी. कुमारप्पांचे ‘इकॉनॉमी ऑफ परमनन्स’ हे अभ्यासग्रंथ.

धनिकांना- ज्यांनी त्यांची मालमत्ता निर्माण करायला, तिची जपणूक आणि संवर्धन करायला मदत केली त्या श्रमिकांचे आपण सहोदर आहोत याविषयीची यित्कचितही जाणीव नसल्याचं बाबांना लक्षात येऊ लागलं. म्हणून श्रमिकांना संघटित करण्याची गरज बाबांना महत्त्वाची वाटू लागली. समाजातील प्रत्येक घटकाला समान आणि न्याय्य वागणूक मिळायला हवी; जेणेकरून प्रत्येकजण आत्मसन्मानाने आणि सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकेल. हे साध्य करण्यासाठी बाबांनी सफाई कामगार, विणकर, झाडू मारणारे, कचरा गोळा करणारे आणि इतर कष्टकरी बांधवांच्या जवळपास १६ संघटना बांधल्या. बाबांच्या दृष्टीनं युनियन हे केवळ सामुदायिकरीत्या आíथक वाटाघाटी करण्याचं साधन नव्हतं, तर सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या उद्देशानं श्रमिकांना एकत्रित आणण्याचा एक मार्ग होता.

आत्मशोधाच्या प्रवासात बाबांनी अशा अनेकविध वाटा चालून बघितल्या.. आजमावून बघितल्या. पण आत्मशोध अजूनही संपला नव्हता. नक्की काय शोधत होते बाबा? त्यांच्यासमोर भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलं होतं? कोण कोण भेटणार होतं त्यांना पुढच्या प्रवासात?

विकास आमटे vikasamte@gmail.com