बाबा आमटे वरोऱ्याला स्थायिक झाल्यानंतरच्या- म्हणजे १९४० नंतरच्या विविध घटना आपण मागील काही लेखांपासून बघतो आहोत. हा त्यांच्या आयुष्यातील विलक्षण अस्वस्थतेचा आणि विभिन्न घटनाक्रमांनी भरलेला काळ होता. बाबा वरोरा येथे वकिली करीत असतानाच्या काही महत्त्वपूर्ण घटना थोडक्यात इथे नमूद करतो.

दुसरे महायुद्ध म्हणजे ब्रिटनच्या साम्राज्यवादाला मोठा तडाखा होता. १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ब्रिटिश राजवटीविरोधात ‘भारत छोडो’चा नारा बुलंद केला. त्याचा परिणाम गांधीजी आणि इतर अनेक नेत्यांना अटक होण्यामध्ये झाला. ब्रिटिश सरकारने ‘मार्शल लॉ’ लावला. त्याचे पडसाद भारतभर उठले. इंग्रजांविरुद्धचा असंतोष विविध मार्गानी व्यक्त होऊ  लागला. देशभर उठाव, आंदोलनं होत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने ‘चले जाव’ चळवळीचा एक भाग बनून विरोध दर्शवीत होता. बाबांनीही त्यांच्या वकील मित्रांना संघटित करत स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळे अटक झालेल्या सत्याग्रहींचे खटले मोफत चालवायला सुरुवात केली.

pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

१६ ऑगस्ट १९४२ ची घटना. चांदा जिल्ह्यतल्या चिमूर येथे नागरिकांनी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी काढलेल्या विशाल मोर्चाला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. याचं रूपांतर पुढे नागरिक आणि पोलीस यांच्यादरम्यान भीषण चकमकी घडण्यात झालं. पूर्ण गावच ब्रिटिश सरकारविरुद्ध पेटून उठलं. याचा बदला म्हणून पुढल्या काही दिवसांत अख्ख्या ब्रिटिश रेजिमेंटने चिमूरवर हल्ला केला आणि माणसांना घराघरातून बाहेर काढत झोडपून काढलं, स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सोजिरांना कंठस्नान घालणाऱ्या स्थानिकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. ब्रिटिशांच्या या अमानुषतेविरुद्ध काँग्रेसने आवाज उठवला तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात आलं. स्थानिक लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्येष्ठ वकील आणि राजनीतिज्ञ सी. राजगोपालाचारी आणि के. एम. मुन्शी यांच्यासोबत बाबा आमटे यांची निवड केली गेली. मात्र, सी. राजगोपालाचारी आणि के. एम. मुन्शी स्वातंत्र्याच्या चळवळीशी निगडित विविध बाबींमध्ये गुंतलेले असल्यामुळे या खटल्याची संपूर्ण जबाबदारी बाबांनी उचलली. बाबांनी केलेल्या युक्तिवादामुळे प्रभावित झालेल्या सी. राजगोपालाचारी यांनी त्यांचं खूप कौतुकही केलं.

बाबांचे वडील बापूजी आमटे यांना वाटू लागलं की, बाबांनी गृहस्थाश्रम स्वीकारला व घराची सगळी जबाबदारी अंगावर घेतली तर त्यांच्या स्वैर (बापूजींच्या दृष्टीने) वागण्यावर आपोआपच र्निबध येतील. बापूजींनी बाबांसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण लग्न करून संसारात पडत चाकोरीबद्ध आयुष्य जगावं लागणार, या नुसत्या कल्पनेनेही बाबांना गुदमरल्यासारखं वाटू लागलं. वरोऱ्याला आल्यापासून बाबांनी ‘अहिंसा- सत्य- अस्तेय-ब्रह्मचर्य- असंग्रह’ या व्रतांचं काटेकोर पालन सुरू केलं होतं. बापूजींच्या तगाद्यापासून सुटका करून घेण्यासाठी बाबांनी आध्यात्मिक मार्ग जवळ करायचं ठरवलं. त्यांनी देशभर पदभ्रमंती करण्यास सुरुवात केली. याआधी ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान सार्वजनिक ठिकाणी ब्रिटिशांविरोधात घोषणा देत ‘वंदे मातरम्’ गायल्यामुळे बाबांना अटक होऊन त्यांची रवानगी काही दिवसांसाठी चांदा कारागृहात झाली होती. तेव्हा बाबांनी ‘हजामतीची कटकट नको’ आणि ‘विलायती ब्लेड्स वापरायची नाहीत’ हा निर्धार करीत दाढी आणि केस वाढवायला सुरुवात केली; त्यात आता अंगावर भगवी कफनी आणि हातात भिक्षेची कटोरी यांची भर पडली! ईश्वराचा शोध घेत त्यांनी हिमालयातील अनेक आश्रम पालथे घातले. पण महंत, साधू यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर बाबांच्या लक्षात आलं की, आपला भविष्यकाळ असं गुहेत, समाजापासून, जनसामान्यांच्या दु:ख-वेदनांपासून दूर राहण्यात नाही. बाबा वरोऱ्याला परत आले; पण ते संन्याशाची वस्त्रं धारण करूनच जगत राहिले. आणि अंगीकारलेल्या साधनशुचितेच्या कलमांचं पालन करणं त्यांनी चालू ठेवलं. पहाटे चारला उठून प्रार्थना म्हणणे, नंतर खांद्यावर कफनी व पंचा टाकून चार मैल दूर असलेल्या वर्धा नदीवर स्नानासाठी जाणे, कपडे धुणे आणि नंतर परत येऊन दूध पिऊन स्वयंपाकघरात कामाला लागणे, दुपारच्या जेवणासाठी स्वत:च्या तीन पोळ्या आणि भाजी बनवून ठेवणे आणि नंतर वेगवेगळ्या केसेस, दावे हाताळणे- हाच त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या व्रतस्थ, स्वावलंबी जीवनामुळे त्यांची आई आणि बापूजी नागपूरला परत निघून गेले.

ते १९४६ साल होतं. उन्हाळ्याचे दिवस. एक दिवस कोर्टातून घरी आल्यावर बाबांच्या हाती त्यांच्या मोठय़ा बहिणीचे यजमान गोविंदराव पोळ यांचं पत्र पडलं. त्यांनी बाबांना नागपूरला बोलावलं होतं. गोविंदराव तिथे बाबांना भेटणार होते. पत्रात लिहिल्याप्रमाणे, गोविंदरावांची पुतणी- दुर्गाताई घुले यांच्या यजमानांचं अकाली निधन झालं होतं. पदरी सहा मुली. वरच्या दोघींची लग्नं कशीबशी करून दिली. आता मधल्या दोघी- लीला आणि इंदू यांचं जमायला हवं होतं. पण घरात कर्ता पुरुष माणूस कोणीही नाही म्हणून दुर्गाताईंनी गोविंदरावांची आणि बाबांची मदत मागितली होती. लीलाचं लग्न ज्या व्यक्तीशी जमण्याचं घाटत होतं त्या व्यक्तीच्या वडीलभावाशी बाबांचे जवळचे संबंध होते. यानिमित्ताने बाबांनीही लग्नाचा विचार करावा असा गोविंदरावांचा मनसुबा होताच. पण बाबांनी त्यांना स्वत:च्या ब्रह्मचर्य व्रताची आठवण करून दिली.

घुले घराणं हे नागपुरातील प्रख्यात घराणं. विद्वत्तेची, व्यासंगाची परंपरा लाभलेलं. घुले घराण्यात सात-आठ महामहोपाध्याय होऊन गेले होते. घुले आणि आमटे दोन्ही परिवारांचा जुना परिचय होताच. साधू वेशातील बाबा गोविंदरावांसोबत घुलेंच्या घरी पोहोचले आणि लीलाचं लग्न जमवण्याच्या निमित्ताने पुढचे काही दिवस त्याच घरी मुक्कामी राहिले. मुक्कामात या साधूची बडदास्त ठेवण्याचं अवघड काम इंदूकडे आलं. असली ‘विभूती’ घुले घराण्याने पहिल्यांदाच पाहिली होती. इतरांपेक्षा वेगळे आचारविचार पाहून घरात या साधूचा लवकरच दबदबा निर्माण झाला. थोडीफार चेष्टामस्करी पण होत होती- ‘‘दाढी-जटा भरघोस आहेत, गळ्यात रुद्राक्ष माळ आहेच; फक्त एखादा साप गळ्याला गुंडाळला की शंकर शोभेल! नाही तरी इंदू पार्वतीच्या भक्तिभावाने त्यांची सेवा करतेच आहे! बाकी हा ‘मुरली’साधू बडबडय़ा दिसतो.’’

रात्री सारी कामं उरकली की बैठकीत तख्तपोसावर बसून घुले परिवाराला बाबा त्यांच्या पूर्वायुष्यातील अनुभवांच्या गोष्टी सांगत असत. यात कधी गांधीजींशी केलेल्या चर्चेचे मुद्दे असत, तर कधी रवींद्रनाथांशी झालेल्या काव्यगोष्टी. आगगाडीच्या डब्यात एकदा ब्रिटिश सोजिरांनी एका नववधूशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कसं बुकललं, अंगावर जखमा कशा झाल्या, क्रांतिकारी राजगुरूंना पिस्तुलं-सुरे आपण कसे पुरवले, हिमालयाच्या गुंफांतून कसे भटकलो, काय अनुभव आले, वगैरे रोमांचकारी किस्सेही ते सुनवत. यावर श्रोते अगदी मंत्रमुग्ध! इंदू तर या साधूच्या व्यक्तिमत्त्वाने पूर्ण दिपून गेली होती. पण या विचाराने ती भयभीतही झाली, की हा तर व्रतस्थ ब्रह्मचारी.. याच्याशी आपलं कसं जुळणार? मग आपल्या भावनांना आवर घालून ती त्याची भक्तिभावाने सेवा करू लागली. अशातच लीलाचं लग्न जवळ येऊन ठेपलं. लग्नात बाबा घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखे वागत होते. त्यांचं बारीकसारीक गोष्टींकडे चौफेर लक्ष होतं. या धामधुमीच्या चार-पाच दिवसांत बाबांच्या नजरेने एक गोष्ट अगदी अचूक टिपली. कपडय़ांचे ढीगच्या ढीग भर पावसात धुवत बसलेल्या म्हाताऱ्या मोलकरणीला घरच्यांपासून लपूनछपून रोज मदत करणारे इंदूचे नाजूक हात बाबांनी बघितले. एकीकडे लग्नाचे विधी चालले होते.. बायका, मुली नटूनथटून मिरवत होत्या. पण इंदूला या कशातच स्वारस्य नव्हतं. बाबांना जाणवलं, की ही मुलगी खरंच वेगळी आहे. चारचौघींपेक्षा दयाळू, सेवाभावी आहे. हिचा पिंडच वेगळा आहे. बाबांना या कनवाळू मुलीचं वेगळेपण खूप भावलं आणि त्यांच्या मनात इंदूबद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली.

लीलाचं लग्न पार पडलं, बाबा परत जायला निघाले तेव्हा दुर्गाताईंनी बाबांकडून इंदूसाठी उत्तम स्थळ शोधण्याचं वचन घेतलं. बाबा वरोऱ्याला परत आले. काही दिवसांतच बाबांनी इंदूच्या नावे पाठवलेलं एक भलं जाडजूड पाकीट घुल्यांच्या दारात पोस्टाने येऊन पडलं. त्या पत्राने घुलेंच्या घरी अक्षरश: स्फोट झाला. कारण त्या काळात एका परपुरुषाने एका तरुण मुलीला लिहिलेलं पत्र हे एखाद्या क्षेपणास्त्रापेक्षा नक्कीच कमी नव्हतं! आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं, पती-पत्नीचं प्रेम कसं असावं यावर भाष्य करणारं (तो भाग नुकत्याच लग्न होऊन गेलेल्या लीलासाठी होता!), इंदूच्या गुणांचं, बुद्धिमत्तेचं, सौंदर्याचं वर्णन करणारं पत्र! प्रत्यक्ष मागणी घातली नसली तरी ‘‘माझ्या भावना न समजण्याइतकी तू अप्रबुद्ध खास नाहीस..’’ असंही पत्रात लिहिलं होतंच!

मधल्या काळात इंदूने अनेक उत्तम स्थळे नाकारली. काही दिवसांनी बाबा परत घुल्यांच्या घरी येऊन धडकले आणि दुर्गाताईंना म्हणाले, ‘‘बघा आई, तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी माझं व्रत मोडायची पाळी माझ्यावर आली आहे.’’ दुर्गाताईंनी गोंधळून जाऊन विचारलं, ‘‘म्हणजे?’’ ‘‘इंदूसाठी एक बऱ्यापैकी स्थळ सापडलंय..’’ बाबा म्हणाले. दुर्गाताईंनी पुन्हा विचारलं, ‘‘हो का? पण त्याचा तुमच्या व्रताशी काय संबंध?’’ यावर बाबा म्हणाले, ‘‘कारण ते स्थळ मीच आहे. आजपर्यंत जोपासलेलं ब्रह्मचर्याचं व्रत मोडायची वेळ आली आहे. बोला.. पसंत आहे का हे स्थळ?’’ दुर्गाताईंना जबरदस्त धक्का बसला. हा मनस्वी तरुण स्थिरपणे संसार करील अशी शाश्वती त्यांना नव्हती. परत त्याच्याबद्दल अनेक लोकापवादही होते. अंगाला राख फासणाऱ्या या कलंदर फकिराला आपली घरंदाज, रूपवान, शीलवती कन्या कशी द्यायची? तसंच मुलगा काळासावळा, वयाने अकरा-साडेअकरा वर्षांनी मोठा. जोडा एकूणच विजोड. त्यामुळे लग्नाला दुर्गाताईंचाच नाही, तर सर्वच हितचिंतकांचा विरोध. पण इंदूने तर मनाने कधीच बाबांचा पती म्हणून स्वीकार केला होता. आणि बाबा तर निग्रही होतेच. त्यात आता बाबांच्या काव्यालंकारांनी नटलेल्या प्रेमपत्रांचा ससेमिराच सुरू झाला. इंदूने आजपर्यंत स्वत:च्या वागणुकीने घरात मिळवलेली पत-प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली होती. समस्त घुले कुटुंबासमोर मोठाच प्रश्न उभा ठाकला. अनेक शंका-कुशंका, समज-गैरसमजांच्या हिंदोळ्यांवर झुलणारी ही आगळीवेगळी ‘लव्ह स्टोरी’ आत्ता तर कुठे सुरू झाली होती! पण पुढे काय काय वाढून ठेवलं होतं? खरंच, कसा असणार होता यांचा संसार?

विकास आमटे vikasamte@gmail.com