१९५१ चा जून उगवण्यात होता. बाबा आमटे आणि त्यांच्या सहा कुष्ठरुग्ण सोबत्यांनी जिद्दीने खणलेल्या विहिरीला आता दगडांची पाळ बांधून झाली होती. रहाटही बसवला गेला होता. आजवर सगळी शक्ती विहीर खणण्यात खर्च झाल्याने विहिरीलगतची थोडी जमीन सोडली तर जंगल अजून फारसं साफ करून झालं नव्हतं. पावसाळा सुरू होण्याआधी या जागी राहायला येता यायला हवं यादृष्टीने जंगलसफाई जोमाने सुरू झाली. आसपास वावरता येईल एवढं जंगल हळूहळू साफ झालं आणि बांबूचं तरट आणि गवताच्या साहाय्याने कुष्ठरोग्यांसाठी पहिली झोपडी उभी राहिली. लगेचच पुढची झोपडी बांधण्याचं काम हाती घेतलं गेलं. ती बांधून झाली की आमचा मुक्कामही इथे हलणार होता. एकदा बाबांचे वडील बापूजी बलगाडीत बसून ही जागा पाहायला आले. सोबत इंदू, मी आणि प्रकाश. बलगाडी बाबा हाकत होते. इंदू मागच्या बाजूला बसली होती. अचानक बलगाडीचं चाक खड्डय़ात गेलं आणि इंदू खाली पडली. सुदैवाने तिला इजा झाली नाही. बापूजी खेदाने बाबांना म्हणाले, ‘‘अरे बाबा, आमचे दिवस वानप्रस्थाचे.. अन् तूच अगोदर छोटय़ा दोन मुलांना पाठीला घेऊन चाललाय!’’ बाबा म्हणाले, ‘‘वृद्धापकाळात रोमान्स करण्यापेक्षा ऐन तारुण्यात केलेला किती आल्हाददायक असतो!’’ आता यावर बापूजी काय बोलणार!

पाणी आलं तसं बाबांच्या मनात शेती करण्याचं घाटू लागलं. बाबांनी हा विचार आपल्या सोबत्यांना बोलून दाखवला, तशी झोपडीच्या पडवीत बसलेल्या त्या सहाजणांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. ‘‘नांगर नाही अन् बलही नाही. शेती कशी करणार? फार तर भाज्यांचे वाफे करता येतील. भाज्या लावू,’’ एक जण बोलला. ‘‘आपल्याजवळ पसा नाही. बाबांना दान-देणग्या मागायच्या नाहीत. मग भागणार कसं? आपण धान्य, भाज्या काढल्या तरच बाहेरचा पसा लागणार नाही..’’ दुसऱ्याने मत दिलं. त्यांची चर्चा बाबांना ऐकू आली. ते म्हणाले, ‘‘पावसाळा फुकट जाऊ द्यायचा नाही आपण. महादेवला मी बी-बियाणं, भाज्यांची रोपटी आणायला सांगितलं आहे.’’ इंदू म्हणाली, ‘‘मला एक सुचलंय.. एक-दोन शेतंच आपण तयार करू तूर्त! नांगराच्या ऐवजी पहारीने किंवा कुदळ-खुरप्याने सारख्या ओळी नांगरायच्या. मग त्यात बी घालायचं. पाहू काय होतं!’’

आणि काम सुरू झालं. त्या माळरान जमिनीच्या तुकडय़ावर थोडय़ाफार प्रमाणात शिल्लक मातीची जागा बाबांनी सारखी केली. विहिरीच्या खोदकामात बाहेर काढलेल्या दगडांच्या राशी आपल्या बोटं झडलेल्या हातांनी रचत प्रत्येकाने या जमिनीला बांध घातले. पावसाने माती वाहून जाऊ नये हा उद्देश तर होताच; पण अपार कष्ट करून खोदलेल्या विहिरीतील पाण्याचा थेंब न् थेंब बाबांना जपायचा होता, सत्कारणी लावायचा होता. ‘More Crop per Drop’ हे बाबांचं तत्त्व होतं! अशा प्रकारे छोटी छोटी शेतं तयार झाली. बाबांनी कुदळीने जमिनीत रेषा ओढल्या. पाठोपाठ इंदू आणि इतरांनी पिशवीत बियाणं घेऊन त्या रेषांत टाकलं. आता प्रतीक्षा होती पावसाची..

पावसाच्या दोन-चार सरी येऊन गेल्या. बाबा, इंदू रोज सकाळी भाज्यांचे वाफे नि शेतं पाहत. रोपटी उगवत होती. कोवळी पिवळसर पालवी फुटत होती. धान्यालाही कोंब फुटले होते. बाबा-इंदूचा आनंद गगनात मावेना. दैनंदिन वाढीची निसर्गाच्या निर्मितीची प्रक्रिया ते पाहत होते अन् चकित होत होते. बल-नांगराशिवाय खुरप्यांनी ओढलेल्या रेघोटय़ांतून टाकून दिलेलं बी मूळ धरून उगवत होतं. बाबांच्या मनात आलं- ‘अवजारांशिवाय सहज टाकलेल्या बीपासून रोपटं उगवावं अन् एकाच बीने आपल्यातून असंख्य बिया निर्माण कराव्यात, ही सृष्टीची किमया रानटी अवस्थेतल्या आदिमानवाने अनुभवली असेल तेव्हा त्याच्या मनात कोणते तरंग उठले असतील? मग त्यातूनच शेती जन्मली. अवजारं आली. एक दाणा माणसाला एक शास्त्र शिकवून गेला.’

जसजसं शेतातलं बी रुजत होतं तसतसं कुष्ठरोग्यांच्या मनातही आत्मविश्वासाचं बी रुजत होतं. इतरांप्रमाणे आपणही कष्ट करून स्वत:चं पोट भरू शकतो, भुकेसाठी आता लाचार व्हावं लागणार नाही, या जाणिवेची पालवी आता फुटू लागली होती. बाबा त्यांना म्हणाले, ‘‘या समाजाच्या दृष्टीने मोडकेतोडके झालेले तुमचे अधू हात-पाय काय करू शकतात हे पाहिलंत ना तुम्ही? हे पीक तुम्ही त्याच हातांनी लावलंय. हा मका नाही- तुम्ही गाळलेल्या घामातून उगवलेलं हे सोनं असेल. तुमचे हात सोनं पिकवू शकतील उद्या.’’ बाबा पुढे म्हणाले, ‘‘मित्रांनो, एक लक्षात असू द्या. कधीच भिकेसाठी हात पसरू नका, दान मागू नका. दानाने मनुष्य नादान बनतो. कामाने उभा राहतो. आपल्याला लोकांचे दान नको आणि दयाही नको. स्वत:चं सामथ्र्य हवं. दानाऐवजी सामथ्र्य हाच तुमचा मंत्र!’’

धड अवजारं, साधनसामग्री नसताना कुष्ठरोग्यांनी खडकाला पाझर फोडत पाणी आणलं, धान्य पिकवलं. मग जेव्हा हे सारं मिळेल तेव्हा ही वसाहत निश्चितच स्वयंपूर्ण होईल, तिला कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत, याची खात्री बाबांना मनोमन पटली. बाबांना एखादं ‘करुणालय’ किंवा ‘कुष्ठनिवास’ कधीच उभारायचा नव्हता. त्यांना असं एक घरकुल उभारायचं होतं- जिथे फक्त आनंद कोंदला आहे.. ज्यामुळे व्याधिग्रस्ताला शारीरिक व्यंगाचं कायमस्वरूपी विस्मरण होईल. म्हणूनच त्यांनी या जागेचं नामकरण केलं- ‘आनंदवन’ – ‘Forest of BlissX’! Bliss  म्हणजे परमोच्च आनंद.

‘‘आनंदवनातला आनंद हा इथल्या रोगापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे..’’ असं बाबा कायम म्हणायचे. आयुष्यातला प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा, ही अस्वस्थता जपणारी हीच ती ध्येयवेडी ‘आनंदवन’ प्रवृत्ती. ही प्रवृत्ती या कुष्ठरुग्णांमध्येही झपाटय़ाने भिनत गेली. ‘माणूस माझे नाव’ या बाबांच्या एका गीतातील ओळी आनंदवनाच्या निर्मितीविषयी बोलून जातात..

‘माणूस माझे नाव, माणूस माझे नाव

दहा दिशांच्या िरगणात या पुढेच माझी धाव..

मीच इथे ओसाडावरती

नांगर धरुनी दुबळ्या हाती

कणकण ही जागवली माती

दुíभक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव..’

याच दरम्यान निरोप आला, की विनोबाजी आणि त्यांचे पंचवीस-तीस सहकारी ‘भूदान यात्रे’दरम्यान तेलंगणातून परतत आहेत आणि आनंदवनात दाखल होत आहेत. विनोबाजींना बाबांबद्दल विलक्षण प्रेम आणि कौतुक! त्यामुळे बाबांचा हा नवा प्रयोग बघण्यासाठी ते वेळात वेळ काढून येत होते.

विनोबाजींचं आगमन म्हणजे पर्वणीच! त्यांच्यासारख्या आधुनिक ऋषींच्या हस्ते आनंदवनाचं उद्घाटन करायचं असं बाबांनी ठरवलं आणि तयारी सुरू झाली. कुष्ठरोग्यांसाठी पहिली झोपडी बांधून तयार होतीच. तिला आंब्याचं तोरण बांधलं गेलं. विनोबाजी येणार म्हणून मुख्य रस्त्यापासून आनंदवनापर्यंत झुडपं साफ करून पायवाट नीट केली गेली. इंदूने पहाटेच उठून सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवला, कारण काम पाहून विनोबाजी लगेचच निघणार होते.

विनोबाजींची शरीरयष्टी किरकोळ होती, पण आत्मिक बळ तपस्वी ऋषीचं होतं. त्यांचं चालणं झपाटय़ाचं.. तरुणांनाही मागे टाकणारं होतं. झपाझप पावलं टाकत विनोबाजी आले. त्यांच्यापाठोपाठ गौतम बजाज आणि इतर मंडळी होती. झोपडीच्या पडवीत बाबांनी खांद्यावरचं कांबळं अंथरून बठक तयार केली होती. त्यावर विनोबाजी विसावले. थोडा फलाहार आणि दूध घेत ते बाबांना म्हणाले, ‘‘चला, इथे तुम्ही काय काय काम केलं आहे ते बघू या.’’ बाबांनी विनोबाजी आणि सोबतच्या मंडळींना घेऊन आनंदवनाला फेरफटका मारला. बाबा सारं दाखवीत होते. एकेक सांगत होते- ‘‘ही विहीर, ही शेतं.. भाज्यांचे वाफे, झोपडय़ा कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या आहेत. आपलं रक्त आटवून आणि घाम गाळून त्यांनी हे सारं उभारलं आहे, विनोबाजी.’’

सारं पाहून, ऐकून विनोबाजी अतिशय प्रसन्न झाले. तोवर झोपडीसमोर बाबांचे सहा सोबती गोळा झाले होते. विनोबाजींनी त्या सर्वाना सन्मानपूर्वक झोपडीत नेऊन आनंदवनाचं प्रतीकात्मक उद्घाटन केलं. मग पडवीत टाकलेल्या कांबळ्यावर आसनस्थ होत सर्वाना उद्देशून ते म्हणाले, ‘‘आनंदवन पाहून मी फार प्रसन्न झालो. स्वत:च्या श्रमांतून तुम्ही जीवनात आनंद निर्माण केला आहे. त्यामुळे ‘आनंदवन’ हे नावही साजेसं व सार्थ आहे. भिक्षापात्राऐवजी श्रम- अशी श्रमाची महती तुम्ही ओळखली. श्रमातला श्रीराम तुम्ही ओळखला. तुमचे हे आनंदवन ‘नंदनवन’ बनावे, ही माझी शुभेच्छा. इथे सेवेचे रामायण लिहिले जाईल!’’

विनोबाजींच्या शब्दांनी सारेच भारावले. तारीख होती- २१ जून १९५१. ‘आनंदवन’चा जन्मदिवस..!

विकास आमटे vikasamte@gmail.com