प्रस्तावित ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी बाबांना सरकारकडून मिळालेली जमीन सोमनाथाच्या प्राचीन मंदिराजवळ स्थित होती, म्हणून या नव्या प्रकल्पाचं नावही ‘सोमनाथ’ असंच पडलं. बाबांचा अधिकतर मुक्काम आता सोमनाथला राहू लागला. इंदू येऊन-जाऊन असे, कारण तिच्यावर आनंदवनाचीही जबाबदारी होती. बाबांनी सोमनाथ प्रकल्पाची जबाबदारी शंकरभाऊ  आणि सिंधूमावशीवर सोपवली. त्यांच्या सोबतीला मारोती देवगडे, सूर्यभान बल्की अशी पाच-पन्नास कुष्ठमुक्त मंडळी होती. सुरुवातीची पाच-सहा वर्ष सोमनाथमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव होता. निवासाची सोय नव्हती. पाणी लांबवरनं आणावं लागे. वीजही नव्हती. पण कशाचीही पर्वा न करता या सर्वानी अक्षरश: जिवाचं रान करत जंगलजमीन उठवायला सुरुवात केली. जमीन उठवण्यासाठी बाबांनी एक अनोखी पद्धत अवलंबली. एकतर ही जमीन आकारमानाने आनंदवनाच्या अडीचपट होती. आणि ताडोबाच्या परिघात असल्याने सोमनाथमध्ये जंगली जनावरांचा कायमच वावर असे. पण बाबा निर्भीडपणे थेट जंगलातच आपली खाट मांडून मुक्काम करत! मग इतर सहकारीही हिंमत एकवटून बाबांसोबत राहायला येत आणि तिथली जमीन साफ करायला सुरुवात करत. असं करत करतच जागा तयार होऊ  लागली. काही प्रमाणात शेती होऊ  लागली. विहिरी खणल्या जाऊ  लागल्या.

एकीकडे संघर्षांमुळे वर्कर्स युनिव्हर्सिटीचं भवितव्य तसं अधांतरीच होतं, तरी या ठिकाणी ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ उभं राहावं यादृष्टीने बाबांचं काम पहिल्या दिवसापासूनच सुरू झालं होतं. त्या अनुषंगाने ‘How to build a man’ ही संकल्पना मूळ धरू लागली. प्रचलित शिक्षणपद्धतीमुळे समाजजीवनाच्या वास्तवापासून नकळत दूर गेलेल्या रित्या तरुण मनाला समाजाच्या गाभ्याचा स्पर्श व्हावा यासाठी काहीतरी केलं पाहिजे, यादृष्टीने बाबा प्रयत्नशील होते.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

बाबा म्हणत, ‘‘अन्याय, अपमान, उपेक्षांचं जहर ज्यांनी चकार शब्द न बोलता रिचवलं होतं अशी समाजाने तुच्छ लेखलेली माणसं आपल्या बोटं झडलेल्या हातांनी आनंदवनातील वैराण माळरानावर जर एकरी ऐंशी मण धान्य पिकवू लागतात, त्यांच्या गौळवाडय़ातले सांड आणि कोंबडखान्यातली अंडी, मांडीएवढा आठ पौंडी मुळा आणि कवेत न मावणारे कोहळे राष्ट्रीय प्रदर्शनांत विक्रम गाजवू लागतात, त्यांच्या सहकारी समित्या स्वत:ची शेती व उद्योगशाळा यशस्वीपणे चालवू लागतात, आत्मनिर्भर वृत्तीने स्वत:चे पोट भरताना समाजाला परतफेड करण्याची, त्याचे ऋण चुकवण्याचीही तयारी बाळगतात; मग देशातले उमदे, धट्टेकट्टे तरुण हात असं का करू शकत नाहीत? त्यांना निर्मितीची, उन्मेषाची स्वप्नं साद का घालत नाहीत? हे माझ्या अंतरीचं खरं दु:ख (heartache) आहे.’’

मात्र, युवापिढीबद्दल बाबा जसे चिंतित होते तसे आश्वस्तही होते. बाबांच्या मते, ‘‘आपल्या खांद्यावर नवी क्षितिजे पेलण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असते, तो युवा! ‘हे कसे होईल?’ या प्रश्नाला त्याने सुळावर चढवलेले असते. वैफल्य त्याला ग्रासू शकत नसते. Youth is he, whose attention is welded to his purpose! बाबा म्हणत, ‘‘मी सतत चिंतन करीत असतो, गाभा शोधत असतो, तेव्हा मला जाणवते : दुर्दैवाने युवासागराला आपल्या भव्य शक्तीचे भान अद्याप झालेले नाही. या ढगांना आपल्यात लपलेल्या विद्युल्लतेचा पत्ता नाही, अंदाज नाही.’’

युवकांना उद्देशून ते म्हणत, ‘‘दलित-पतित समाजाला न्याय मिळवून द्यायला हृदयाची संवेदना जिवंत असावी लागते. झोपडपट्टय़ांतून हाडांच्या ऐरणीवर भुकेचे घाव पडतात, ते तुम्हाला ऐकू आले नाहीत तर म्हणावे लागेल की महारोग्याच्या संवेदनाशून्य शरीराप्रमाणे तुमची हृदयेसुद्धा संवेदनाशून्य झाली आहेत. संवेदना हरवून बसलेल्या सदसद्विवेकबुद्धीचे शेपूट पिरगळल्याशिवाय ती जागृत होणार नाही. बागेतील पाउलवाटेप्रमाणे रचनात्मक कार्यक्रम नसावेत, कारण त्या पाऊलवाटा शेवटी एकाच दारापाशी नेतात. नवे रस्ते शोधावे लागतात, मळावे लागतात. हे काम तरुणांचे आहे.  ‘मानव का मानव से मुक्त मीलन चाहिए’.. केवढे भव्य-दिव्य स्वप्न आहे हे! हे स्वप्न केवळ शब्दांतून साकार करून उपयोग नाही; ते आपल्या अखंड श्रमांतून साकार व्हायला हवे आहे. ज्या समाजाचा संवेदनेचा शर हरवला आहे व ज्या समाजाचा भाता रिता आहे, त्या समाजाच्या नशिबी अशा स्वप्नांची पूर्ती नसते. अशा समाजाच्या हाती असलेल्या रिक्त धनुष्यांतून हुकूमशाही निर्माण होते. तरुण मनांच्या प्रेरणांना व भुकांना आपल्या खडय़ा समस्यांशी जोडले पाहिजे. तरुण मनांच्या गरजांचे थवे वैफल्याच्या वाळवंटातून वाटचाल करीत जेथे उतरू शकतील त्या हरितभूमीच्या शोधात माझे व्हिजन आहे.’’

बाबांचं हेच व्हिजन सोमनाथमध्ये प्रत्यक्षात आलं एका छावणीच्या माध्यमातून.. जिचं नाव : ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’! ‘आंतर-भारती’ आणि ‘श्रम-संस्कार’ हे दोन्ही शब्द सानेगुरुजींचेच. भारतात अनेक प्रांत असतील, तरीही प्रत्येक भारतीयाचे अंत:करण एकच.. अशी ‘आंतर-भारती’ची संकल्पना. गुरुजींनी आपल्या हृदयीच्या सर्व सद्भावना एकवटून दिलेल्या ‘आंतर-भारती’ या शब्दास बाबा एकतेचा राजमार्ग (Blueprint) म्हणत! बाबांचा विचार होता की, या छावणीच्या माध्यमातून निरक्षर शेतमजूर आणि शिकलेला बेकार तरुण हे दोन थर एकमेकांत कामाच्या माध्यमातून मिसळले जातील; श्रमातील प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या शोधातले श्रम या दोघांचा येथे संयोग होईल आणि एका ‘समूह-जीवन-प्रयोगाचा संस्कार’ त्यांच्यात रुजेल. आधी ‘युवक प्रगती सहयोग’ नावाने एक छोटेखानी श्रम-शिबीर १९६७ च्या डिसेंबरमध्ये आनंदवनात पार पडलं. आणि पहिली ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’ बाबांनी १९६८ च्या मे महिन्यात रणरणत्या उन्हात सोमनाथला आयोजित केली. बाबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतभरातून १४००-१५०० युवक-युवती छावणीत सहभागी झाले होते. मूल-सोमनाथ हे नऊ मैलांचं अंतर डोक्यावर सामान घेऊन पायी तुडवत प्रत्येकजण दाखल झाला होता. पहाटेपासून सहा तास जंगलसफाई, शेतीची बांधबंदिस्ती, मोठमोठाले दगड काढणं, इत्यादी अंगमेहनतीची कामं चालत. दुपारी विविध विषयांवर चर्चा, भाषणं, वादविवाद झडत. भरपूर विचारमंथन चालत असे. त्यानंतर रात्री कधी सांस्कृतिक कार्यक्रम, कधी बाबांकडून विविध रोमांचकारी घटनांचं कथन, तर कधी व्याघ्रदर्शनासाठी जंगलभ्रमण! अशा प्रकारे पहिली पंधरा-दिवसीय छावणी पार पडली. पुढे छावणी हा वार्षिक उपक्रम तर झालाच; तसंच सोमनाथचं एक वैशिष्टय़ही! छावणीचं नियोजन करताना यदुनाथ थत्ते, भाई वेले ही मंडळी प्रामुख्याने असत. ‘उन्हातान्हात राबताना कपाळावरून जे घामाचे थेंब गळू लागतील ते मोत्यांचे हार माना!’, ‘गांधी, लेनिन, मार्क्‍स, मार्टिन ल्युथर, सानेगुरुजी हे केवळ दीपस्तंभासारखे.. खडकावर जहाज आदळू नये, एवढेच त्यांचे दिग्दर्शन. पण वल्हे मारण्याची, खडक टाळण्याची ताकद नाविकांतच हवी,’ असे बाबांचे ज्वलंत, जोशपूर्ण विचार ऐकून युवक प्रेरित होत. यातूनच काहींनी चळवळी, आंदोलनं उभी केली, काहींनी रचनात्मक वाट चोखाळली, तर काहींनी सामाजिक संस्था सुरू केल्या. सुरुवातीच्या छावण्यांमध्ये उपस्थित मान्यवरांमध्ये अण्णासाहेब सहस्रबुद्धे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वसंत पळशीकर, शंकरराव देव, शामराव पटवर्धन, चंद्रकांत पाटगावकर, मोहन धारिया, जॉर्ज फर्नाडिस, नरहर कुरुंदकर, वसंत कानेटकर, सदानंद वर्दे, जस्टिस धर्माधिकारी, कुमार शिराळकर, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, मुकुंदराव किर्लोस्कर, सुनीलकुमार लवटे, के. आर. दाते, चंद्रकांत शहा, प्रा. सोमनाथ रोडे, प्रा. राम शेवाळकर आदींचा समावेश होता. ‘हाँथ लागे निर्माण में; नाही मारने, नाही मांगने’ हा नारा बुलंद करणाऱ्या छावणीचा प्रवास आजही सुरूच आहे. छावणी‘च्या’ आणि छावणीने ‘घडवलेल्या’ इतिहासाविषयी अधनंमधनं पुढे सांगेनच!

पुलंनी बाबांचं ‘ज्वाला आणि फुले’ हे शब्दचिंतन वाचलं आणि साठीच्या दशकाच्या मध्यापासून ते आणि सुनीताबाई आनंदवनाशी कायमचेच जोडले गेले. ते वारंवार आनंदवनाला, सोमनाथला येत राहिले. ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या लेखात पुलंनी सोमनाथच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिलंय- ‘‘प्रकाशाची तहान लागलेली झाडे जंगलात उंच उंच जातात. ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशाची तहान लागलेला समाजच उंच उंच जातो. उंचीची ही नवी शिखरे गाठावी म्हणून हा प्रकल्प आहे. बाबा आमटे नावाचा विज्ञानयोगी सोमनाथाच्या पुढे समाजाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडून बसला आहे. टाकले पाऊल मागे घेणे या माणसाला ठाऊक नाही! जीवनातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर अपरिमित प्रेम करणारा हा माणूस.

तिथे भात पिकवलेल्या एका पेशंटचा बोटे गळून पडलेला हात हाती धरून बाबा मला सांगत होते, ‘‘भाई, म्हाताऱ्या धरित्रीच्या हाडापर्यंत भिडलेला शीण झडझडून टाकण्यासाठी या हाताच्या खुंटानं पाहा केवढा पराक्रम केला. अहो, ज्यांचे हात धड आहेत, त्यांनी का रडावं?’’ आणि बेलाचे पान गळून पडावे तसा ज्या हाताचा पंजा गळून पडला होता त्या हाताच्या खुंटाचे बाबांनी अत्यावेगाने चुंबन घेतले. होय, चुंबन घेतले! माझ्या अंगातून वीज गेली. भीतीने नव्हे! ‘‘आज मी माझ्या डोळ्यांनी एक मृत्युंजय पाहिला होता!’’ या धन्यतेने. क्षणाच्या उत्कटतेने बॉम्ब टाकणारा नव्हे, समोरचा गोळी मारेल म्हणून आधी आपण मारणारा नव्हे; आज कित्येक वर्षे मृत्युगोलात राहून कविता रचित भटकणारा आणि त्या कवितांचा अर्थ मातीतून उलगडून दाखवणारा!

रात्रीच्या वेळी शेकोटीतल्या ज्वालांचे नर्तन पाहत बाबांकडून त्यांच्या सोमनाथ प्रकल्पाच्या योजना मी ऐकत होतो. ‘Opportunities unlimited’- ‘अमर्याद अवसर’ हा इथला मंत्र आहे. बाबा या मंत्राचा अर्थ सांगत होते.. ‘‘तुटक्याफुटक्या देहाच्या वीस-बावीस स्त्री-पुरुषांनी जंगलात साफसुफी करून पिकवलेला तांदूळ पाहून ऐदीपणाने पँटच्या खिशात राहणाऱ्या धडधाकट हातांना लाज वाटेल. ते राबण्यासाठी शिवशिवतील.’’ जंगलात शिलारूप होऊन पडलेल्या अहल्येला प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श झाला आणि ती जिवंत झाली- या कथेचा अर्थ इथे लागतो. आजवर हस्तस्पर्श न झालेली ही अहल्याभूमी आज कशी तरारून आली आहे. जीवनातली प्रत्येक आघाडी- अन्न-आघाडीदेखील- इंच इंच लढवावी लागते. बाबांची भाष्ये ऐकत, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीतून सामर्थ्य घेऊन उभी राहिलेली ती माणसे आणि भर मे महिन्यात श्रमशिबिरातल्या हजारो ‘तरन्या पाव्हन्याले’ खाऊ  घालण्यासाठी फुटायला लागलेली त्या शेतातली कणसे पाहिली म्हणजे बाबांच्या काव्याचे आणि तत्त्वज्ञानाचे कूळ सापडते.’’

सोमनाथविषयी बाबा सुरुवातीपासून म्हणत की, ‘सोमनाथ चालेल तर संस्था चालेल.’ बाबांच्या विचारांचे मर्म आणि दिशा- दोन्ही गोष्टी शंकरभाऊ आणि सिंधूमावशीने आधीच जोखल्या होत्या. शंकरभाऊला तर बाबा ‘व्हाइस चॅन्सलर ऑफ वर्कर्स युनिव्हर्सिटी’ म्हणायचे! आपल्या अविरत कष्टांतून या दोघांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने सोमनाथच्या जमिनीत अक्षरश: सोनं पिकवलं. करडी शिस्त आणि कर्तबगारीच्या जोरावर आपल्यासारखेच कार्यकुशल, वाकबगार कार्यकर्तेही तयार केले. माझ्या पुढील लेखांच्या प्रवाहात सोमनाथची वाटचाल आणि तिथली माणसं आपल्या भेटीला येतीलच..

विकास आमटे vikasamte@gmail.com