मुलीचे लग्न करून देणे हा एकमेव उद्देश सध्या मुस्लीम समाजात दिसतो. त्यात अनेकदा अल्पवयीन मुलींचा मर्जीविरोधात विवाह करून दिल्याने त्यांची फरफट होते. हे सगळे टाळायचे असेल तर मुलींना शिक्षण दिले पाहिजे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे व त्यांना समान अधिकारही दिले पाहिजेत..

मी येत्या २१ जूनपासून १५ इस्लामी देशांमध्ये ‘वर्ल्ड पीस अ‍ॅण्ड फ्रेण्डशिप मिशन’ कार्यक्रमांतर्गत तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी दीड महिन्याकरिता जाणार आहे. तेथे जाण्यापूर्वी असा विचार मनात आला की, भारतामधील मुस्लीम मुलींची स्थितीही फार बिकट आहे. आमच्या संस्थेमध्ये मागील वर्षी १७ नं.चा फॉर्म भरून २० शाळाबाह्य़ मुलींना दहावीच्या परीक्षेसाठी मोफत शिक्षण देण्यात आले. त्याचा सर्व खर्च संस्थेने केला. मुलींनी शाळा सोडून  सहा-सात वर्षे झालेली होती. काही मुली ६ वी, ७ वी किंवा ८ वी शिकलेल्या होत्या. त्यांच्या मागे संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. त्यांना वर्गात आणण्यापासून ते परीक्षा होईपर्यंत इतकेच काय, ज्या शाळेत शिबीर किंवा प्रात्यक्षिक होते, तिथे आणण्यासाठी त्यांच्या पालकांची मानसिकता तयार करणे, त्यांची सहमती मिळविणे व मुलींना पाठविण्यास राजी करणे तसे कठीण काम होते. एक तर मुलींना शिकून काय करायचे आहे किंवा मुलींचे तर लग्नच करायचे आहे व त्यांना चूल व मूलच सांभाळायचे आहे म्हणून त्यांचे शिक्षण सोडून दिले गेले  होते. त्याला आर्थिक परिस्थितीही कारणीभूत होती. काही मुलींच्या शिक्षण सोडण्यामागचे कारण घरातील कामे होते, तर काहींच्या मागे स्वत: शाळा जबाबदार होत्या. ज्या मुली शिकायला तयार झाल्या व ज्या दररोज वर्गात यायच्या व ज्यांनी इतक्या वर्षांनंतर पेन व पुस्तक हातात घेतले व विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची ही हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांपैकी बऱ्याच जणी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णही झाल्या. मुलींच्या आयुष्याचे लक्ष्य फक्त लग्नच असते, हे मिथक तोडण्याचा व लग्नाशिवायही स्वप्ने असतात व हे स्वप्न देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता.

mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
Meera Phadnis and Anirudh Hoshing
लोकजागर: नापास’ स्वयंसेवकांची गोष्ट…

आता या वर्षी मागील तुकडीतील मुलींकडे बघून ज्या नवीन मुली काही इंग्लिश स्पीकिंग, कॉम्प्युटर किंवा संस्थेमध्ये अस्तित्वात असलेले इतर अभ्यासक्रम शिकायला येत आहेत, त्यामध्ये एका मुलीचे मला आश्चर्य वाटते. समीना  गणित  व  इंग्रजीच्या वर्गात जेव्हा जाते, तेव्हा आपल्या सात महिन्यांच्या बाळाला सोडून कार्यालयात जाते. ती अवघी सोळा वर्षांची आहे.  मला वाटले, स्थळ चांगले असेल म्हणून आई-वडिलांनी लवकर वयात लग्न लावून दिले असेल. परंतु तिची आई जी बहिणीसारखी दिसत होती, तिला विचारले असता तिने सांगितले की, समीनाने आपल्या पसंतीने लग्न केलेले आहे. मला प्रश्न विचारला गेला, की आता  बोला. तुम्ही कमी वयात व बळजबरीने करून दिल्या गेलेल्या मुलींच्या लग्नाच्या विरोधामध्ये काम करीत आहात. पण या सोळा वर्षांच्या समीनाने जेव्हा वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या पसंतीने लग्न केले त्याचे काय? तर त्याचे कारण मी त्यांना सांगितले, की मुलींना लग्नाशिवाय स्वप्ने दाखविली जातात काय? वयात आली की तिच्या लग्नाविषयीच बोलले जाते.  आमच्या समाजात जितका पैसा (कर्जही काढून) मुलींच्या लग्नावर खर्च केला जातो त्यापैकी एक भागदेखील मुलीच्या शिक्षणावर खर्च केला जात नाही. काही अपवाद सोडले तर.. आणि ज्या मुलींना आपले कलागुण विकसित करायचे असतील किंवा पुढे शिकायचे असेल तर तिला पालकांचा, समाजाचा पाठिंबा मिळत नाही व लग्न हेच मुलींच्या जीवनाचे एकमेव ध्येय असते, हेच बिंबवले जाते. त्यामुळे अशा मुलींकडे पर्याय नसल्यामुळे लग्नाचे नातेसंबंध व जबाबदारी न  समजून घेता अपरिपक्वतेमुळे व त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळत नसल्यामुळे लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतात. समीनाला मी एकदा विचारले, की तू  खूप लवकर लग्न केलेले आहेस. आम्हाला जर तुझ्या लग्नाच्या वेळेस आधी माहिती मिळाली असती, तर आम्ही ते  लग्न थांबवले असते. त्यावर तिने उत्तर दिले, की ते बरे झाले असते.

अर्थात तिला आता लग्नात किती जबाबदारी असते ते कळायला लागले आहे आणि जेव्हा अशा लहान वयात मुलींची लग्ने करून दिली जातात, त्या कशा काय  एवढय़ा मोठय़ा संसाराची जबाबदारी पार पाडणार आहेत? आणि कशा काय त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा केल्या जातात. त्याच वयाच्या मुलाला मात्र तो लहान आहे, त्याला समजत नाही असे म्हटले जाते. मागील तुकडीमध्ये  खेळण्या-बागडण्याचे  दिवस  असलेल्या  पण  अशा वयात मुलगा पदरी घेऊन तलाक झालेल्या दोन मुली शिकल्या. हनिफा १९ वर्षांची मुलगी. जेव्हा आपल्यावर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात तक्रार घेऊन आली, तेव्हा तिला ५ वर्षांचा मुलगा होता. हनिफा १४ वर्षांची असताना आई-वडिलांनी जमीलला ती आवडली होती व त्याने स्थळ पाठविले होते म्हणून  तिचे लग्न लावून दिले होते. मागील  वर्षांपासून जमील दुसऱ्या स्त्रीबरोबर राहत होता. ही घरीच राहून अहोरात्र मेहनत करून पर्स शिवण्याचे काम करीत होती. परंतु तिला पैसे खर्च करण्याचा अधिकार नव्हता. जमील तिला  दारू पिऊन शिव्या  द्यायचा  व मारहाण करायचा. दिवसा सासू व नवरा कामाला गेल्यानंतर सासऱ्याच्या वाईट नजरेचा तिला त्रास सहन होत नव्हता. शेवटी तिने निर्णय घेतला की  मला आता त्या घरात राहावयाचे नाही. परंतु वडील व भावांचा हनिफाच्या निर्णयाला विरोध होता. त्यांच्या मते तिने पतीच्याच घरी राहावयास हवे होते.  शेवटी तिने आमच्याकडे येऊन तलाक घेतला व त्या जाचापासून ती मुक्त झाली. आता तिला नवीन स्वप्न मिळाले. तिने पर्स शिवण्याचे काम वाढविले व त्या कामात ती व्यस्त राहू लागली. मुलाचाही चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. तिने १० वी शिकायचे ठरविले. आमच्या संस्थेमध्ये शाळाबाह्य़ मुलींना एकत्र करून वर्गात प्रवेश घेण्याआधी प्राथमिक बैठकीमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन केले गेले, तेव्हा सर्वात आधी हनिफाने हात वर करून म्हटले, की लग्नाशिवायही स्वप्ने असू शकतात आणि म्हणून मला १० वी शिकायचे आहे. माझा आधी अर्ज भरा.

पुढे ती वर्गात यायला लागली. तिचे घर लांब असल्यामुळे येण्यास  त्रास व्हायचा, शिवाय ती घरी पर्स शिवण्याचे काम करीत होती. ती तयार होऊन जेव्हा संस्थेमध्ये यायला निघायची, तेव्हा जमील अनेकदा आडवा यायचा आणि म्हणायचा, ‘तू अशी कशी चांगली राहतेस? मी त्या दुसऱ्या स्त्रीला सोडलेले आहे. तू परत ये.’ परंतु हनिफाने स्पष्ट शब्दात नकार दिला. ‘मला तुझी गरज नाही. मी आनंदाने आपले जीवन जगू शकते. तू जर परत आडवा आलास तर पोलिसांत तक्रार करीन,’ असे खडसावून सांगितले. तिकडे वडील पाठ फिरवून बसायचे व ‘मी हिचे तोंड पाहणार नाही,’ असे म्हणत असत. इतकी हेटाळणी सहन करून भाऊ व वडिलांचा नेहमी विरोध व शिव्याही सहन करीत होती. ती आम्हाला सर्व हकीकत सांगायची. ती बोलत असे, की ‘मला तुमच्याकडून ऊर्जा मिळते व मला ताकद येते. जेणेकरून मी परिस्थितीचा सामना करू शकते.’ हनिफात खूप परिवर्तन झालेले होते. हनिफाला आता स्वत:चा कारखाना टाकायचा आहे. तिचे स्वप्न साकारताना बघून आनंद होतो.

दुसरी आणखी हनिफासारखीच मागच्या वर्षी आई झालेली मुलगी १८ वर्षांची निकहत. चार वर्षांचा मुलगा पदरी घेऊन तलाक झाल्यानंतर ती शिकायला आली.   तलाक झाल्यानंतर निकहत जी फक्त ४ थी शिकलेली होती, १० वीच्या परीक्षेसाठी वर्गात येऊ लागली. यूथ ग्रुपच्या मीटिंगमध्ये तसेच लिंगभेदभाव कार्यशाळेत ती बसू लागली. निकहतचा आवाज जो कधीच कुणी ऐकला नव्हता, कानी ऐकायला यायला लागला. निकहत खेळायला (मुलींबरोबर) लागली. तिला सायकल चालविणे शिकविले गेले. तिच्या आयुष्यात हे मोठे परिवर्तन होते.

निकहत आता लिहायला व वाचायला शिकली होती. परंतु काकाला व भावाला निकहत व तिच्या मुलाचे ओझे नको होते. परीक्षा संपली. घरी पुनर्विवाहाचे विचारू सुरू झाले. निकहतच्या मावशीला बोलावून आणि बऱ्याच वेळा तिच्या घरी जाऊन समजाविण्यात आले. तिच्या जीवनात आता शिकून काही तरी नवीन घडत होते. तिने काही स्वप्ने रंगविली होती; परंतु ती वास्तवात साकार करता आली नाहीत. मावशी-काकाने आम्हाला कळू न देता गुपचूप सुटीच्या दिवशी एका माणसाशी लग्न करून दिले. ज्या व्यक्तीची मुले निकहतपेक्षा मोठी होती व मुलीचे लग्न झालेले होते व त्याला नातू होता. आम्हाला दु:ख झाले. निकहत जीभ असूनदेखील मुकी होऊन गेली होती. केवळ तिला छत नसल्यामुळे. तिला हक्काचं घर असतं तर ती आपल्या स्वमर्जीने मुलांसोबत एकटी जीवन जगू शकली असती. मावशीने तिला कधीच बाजूच्या घरीदेखील एकटी जाऊ दिले नाही. त्यांना वाटले लग्न हाच एकमेव उपाय आहे. समाजाला केव्हा कळेल की स्त्रियांना संधी दिली की त्या संधीचे सोने करतात. होऊ द्या त्यांना आत्मनिर्भर, जाऊ देत त्यांना एकटय़ा बाहेर आणि शिकू द्या एकटे जगणे. संघर्षांतूनच त्या शिकतील आणि पुढे जातीलही. परंतु जर ही संधीच दिली नाही, तर निकहतसारख्या स्त्रियांना पिंजऱ्यातले जीवन जगावे लागेल. का मुलींना लग्नाव्यतिरिक्त स्वप्ने पाहू दिली जात नाहीत? कालपरवा जेव्हा १० वीचा निकाल आला, तेव्हा वसतीमध्ये अशा काही मुली होत्या ज्यांना अध्यापनाची सोय नव्हती.  मुलींना घरची सर्व कामे करावी लागत होती तरीदेखील भाऊ अनुत्तीर्ण झाला व  मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. केव्हा कळणार आहे समाजाला की मुलींना शिकायचे आहे, त्यांना बांधू नका. मुलींना समान अधिकार देणार आहोत की नाही? त्यांनाही स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे की नाही?

 

रुबिना पटेल
लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत.
त्यांचा ई-मेल : rubinaptl@gmail.com