भारतीय राष्ट्रवादाची भावनिक पायाभरणी संस्कृतीवर झाली. त्यात आधीच्या काही वर्षांत हिंदूंना स्वतच्या सांस्कृतिक बलस्थानांचा आणि इतिहासाचा आलेला प्रत्यय आणि नेहरू आदींनी भारतीयतेचा घेतलेला पुनशरेध अशी वाटचाल दिसून येते..

ब्रिटिश राज्याचे स्वागत करून हिंदूंनीही पाश्चात्त्य विद्या आत्मसात करण्यास सुरुवात केली. लोकशाही, मानवी हक्क, बुद्धिवाद, धर्मचिकित्सा, ध्येयवाद, राष्ट्रवाद, देशभक्ती इ. आधुनिक मूल्यांची त्यांना ओळख झाली. हजारो कोसांवरून आलेल्या मूठभर इंग्रजांचे आपण गुलाम का झालो याची आत्मचिकित्सा सुरू झाली. तसेच ‘आपण’ कोण आहोत याचाही शोध सुरू झाला. त्यातून हिंदूंना कळाले की, आपणही एक ‘राष्ट्र’ आहोत. हेही कळाले की हे ‘भारतीय राष्ट्र’ युरोपातील राष्ट्रांप्रमाणे फ्रेंच क्रांतीनंतर निर्माण झालेले नाही, तर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. हे कळणे भारताच्या इतिहासातील फ्रेंच क्रांतीसारखीच एक वैचारिक क्रांती होती.

nagpur, Director General of Police, rashmi shukla, rashtriya swayamsevak sangh, Headquarters, Surprise Security Check,
पोलीस महासंचालक संघ मुख्यालयात, काय आहे कारण…
Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
solhapur university
सोलापूर विद्यापीठाचा २९८.२५ कोटींचा अर्थसंकल्प; तीन अध्यासन केंद्रांची होणार उभारणी

आपल्याला हे कळण्याचे कामही पाश्चात्त्यांनीच केले होते. ‘आपण’ कळण्यासाठी भारताचा इतिहास, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास आवश्यक होता. तोही हिंदूंकडे नव्हता. त्यांनीच भाषांतरे करून संस्कृत ग्रंथ जगासमोर आणले. १७८५ साली गीतेचे भाषांतर प्रसिद्ध केले. त्यानंतर ‘शाकुंतल’ नाटकाचे व ‘ऋतुसंहार’ काव्याचे भाषांतर प्रसिद्ध झाले. नंतर क्रमाने धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, हितोपदेश, व्याकरण, ज्योतिषशास्त्र, वैद्यक, गणितशास्त्र इत्यादी विषयांवरील संस्कृत ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली. सर्व वेद, उपनिषदे, पुराणे यांचीही भाषांतरे झाली. ग्रँड डफ, प्रिन्सेप, टॉड, एल्फिन्स्टन, स्मिथ, मालकम प्रभृती इतिहासकारांनी भारताच्या इतिहासावर ग्रंथ लिहिले. एडविन आर्नोल्डने बुद्धचरित्रपर महाकाव्य लिहिले. १८३४ साली अशोकाचे शिलालेख शोधून काढण्यात आले. १८६१ पासून अलेक्झांडर कन्नीनधम यांच्या निरीक्षणाखाली पुरातत्त्वीय संशोधनासाठी उत्खननाचे नियमित काम सुरू झाले. १८१७ साली कलकत्त्याला शासकीय ‘हिंदू कॉलेज’ स्थापन झाले. १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. प्राचीन इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाने शिक्षित भारतीय तरुणांत सांस्कृतिक अभिमान जागा होऊ लागला.

संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या प्रा. मॅक्समुल्लर (मृ. १९००) यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांच्यासंबंधी लो. टिळकांनी लिहिले होते, ‘आर्य लोकांचे प्राचीन ग्रंथ, धर्मविचार किंवा बुद्धिवैभव यास युरोपातील राष्ट्रांत आपल्या ग्रंथलेखनाने त्यांनी पूज्यबुद्धी निर्माण करून जे अग्रस्थान मिळवून दिले आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे उपकार मानावे तितके थोडेच आहेत.’ त्यांनी १८८८ मध्ये केंब्रिज विद्यापीठात ‘भारताकडून आम्ही काय शिकावे?’ या विषयावर सात व्याख्याने दिली होती. त्यात म्हटले होते, ‘‘आजच्या काळातील कोणताही ज्वलंत प्रश्न घ्या.. तो सोडविण्यासाठी भारत ही प्रयोगशाळा आहे.. मानवी जीवनाच्या विशेष अभ्यासासाठी तुम्हाला भारताकडेच जावे लागेल, कारण त्याचा खजिना भारताकडेच आहे.. हिंदू हे प्राचीन व आधुनिक काळातही एक राष्ट्र आहेत.’’

अशा प्रकारे एकीकडे भारताचा वैभवशाली इतिहास जगासमोर येत असतानाच काही इंग्रज विद्वान भारतीयांना असंस्कृत व कमी दर्जाचे म्हणून हिणवीत होते. इतिहासकार ग्रेव्हजने लिहिले, ‘हिंदू हे रानटी लोक आहेत.’ भारतात शिक्षणाचा पाया घालणारा मेकॉले म्हणाला की, ‘हिंदूंचा धर्म खोटा आणि त्या धर्माभोवतीचा त्यांचा इतिहास, ज्योतिष, वैद्यक हेही खोटे. असले विषय शिकून काय फायदा?’ रस्किन या कलातज्ज्ञाने लिहिले, ‘हिंदूंचे मूर्तिशिल्प म्हणजे विक्षिप्त, भेसूर व रानटीपणाचा अर्क होय.’ उपनिषदांचे भाषांतर करणाऱ्या गॉफने लिहिले, ‘ही उपनिषदे मागासलेल्या काळच्या बुरसटलेल्या आणि प्रगतिविन्मुख लोकांचे ग्रंथ होत.’ इतिहासकार जॉन स्टुअर्ट मिलने लिहिले, ‘अठराव्या शतकात इंग्रजांनी हिंदूंना जिंकले. त्याच अवनत अवस्थेत ते संपूर्ण इतिहासात राहत आले आहेत.’ ब्रिटिश राज्यकर्त्यांचे म्हणणे होते की, भारत हे एक राष्ट्र नसून तो केवळ जाती-जमातींचा एक समूह आहे. भारतीयांत राष्ट्रवाद नाही, देशभक्ती नाही, एकात्मता नाही, गौरवास्पद काही नाही. त्यांना शहाणे व सुसंस्कृत बनविण्यासाठी आम्ही येथे आलो, असाही त्यांचा दावा होता.

वरील सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की, पाश्चात्त्य विद्येने भारलेली तरुण पिढी इतिहास व संस्कृतीचा स्वत: सखोल अभ्यास करू लागली. या अभ्यासाने त्यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय अभिमान जागा झाला व प्राचीन काळापासून ‘आपण’ एक राष्ट्र आहोत याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या राष्ट्राला नव्या पाश्चात्त्य मूल्यांची जोड देऊन आधुनिक राष्ट्र उभे करण्यासाठी ते प्रेरित झाले. प्रत्यक्ष कार्यासाठी सुधारणावादी नेते व संघटना निर्माण होऊ लागल्या. बंगालचे राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ‘ब्रह्मो समाज’ संस्थेची स्थापना केली. ते वेद अनुल्लंघनीय मानत नसले तरी त्या समाजाचा पाया वेद- वेदान्त- उपनिषदे हाच होता. ते सांगत की, त्यांची मते प्राचीन व सत्य हिंदू धर्मग्रंथांवरच आधारलेली आहेत. ते केवळ ‘आद्य समाजसुधारक’ नव्हते, तर ‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ही होते. ब्रह्मो समाजाचे तिसरे अध्यक्ष (१८६६) राजनारायण बोस यांनी तर घोषित केले होते की, ‘हिंदू धर्म व संस्कृती ही पाश्चात्त्य व ख्रिश्चन धर्म व संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे.’ त्यांनी राष्ट्रवादाच्या वृद्धीसाठी ‘नॅशनॅलिटी प्रमोशन सोसायटी’ स्थापन केली. दरवर्षी भरणारा ‘हिंदू मेळा’ सुरू केला. मुखपत्र म्हणून ‘नॅशनल पेपर’ चालू केला. एवढेच नाही, तर ‘हिंदू हे स्वत:च एक राष्ट्र आहेत’, असेही घोषित करण्यात आले.

त्यानंतर स्थापन झालेल्या ‘प्रार्थना समाज’ (१८६७), ‘आर्य समाज’ (१८७५), ‘रामकृष्ण मिशन’, ‘थिओसॉफिकल सोसायटी’ या समाजसुधारक संस्थाही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा गौरव करणाऱ्या व राष्ट्रवादीच होत्या. आजच्या ‘राष्ट्रा’चा संबंध त्या संस्कृतीशी जोडीत होत्या. त्या काळात सर्वच जण ‘आपण’ कोण आहोत हे प्राचीन सांस्कृतिक आरशात पाहून ठरवीत होते. याच भारतीय राष्ट्रवादाच्या पायावर १८८५ ला ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ची स्थापना झाली. नंतरच्या काळात न्या. रानडे, ना. गोखले, लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू प्रभृती काँग्रेस नेते हाच राष्ट्रवाद मांडीत राहिले.

ना. गोखले सांगत असत, ‘आमचा देश (जगात) सर्वाआधी रानटी स्थितीतून बाहेर पडला. तो एकदा फार मोठय़ा योग्यतेस चढलेला होता.. उदात्त धर्माचे, तत्त्वज्ञानाचे, सर्व प्रकारच्या शास्त्रांचे व कलांचे माहेरघर समजला जात होता. तसेच आम्ही एकदा ज्या गुणांच्या आधारे अग्रभागी होतो, ते गुण आजही टिकून आहेत.’ न्या. रानडे म्हणत, ‘प्राचीन काळी हिंदू हे वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते.’

पं. नेहरू तर आधुनिकांचे अग्रणी. १९४६ साली ‘भारताचा शोध’ ग्रंथात त्यांनी लिहिले आहे : ‘भारताकडे पाच-सहा हजार वर्षांपासूनची सतत परिवर्तन व प्रागतिक होत जाणारी संस्कृती आहे. तसेच विविध गटांना एकत्र बांधून ठेवणारे समान राष्ट्रीय बंध निर्माण करण्याचा येथे मोठा व यशस्वी प्रयत्न झाला. ते राष्ट्रीय बंध म्हणजे समान संस्कृती, समान परंपरा, समान ऐतिहासिक पुरुष, समान भूमी.. हे होत.’ राष्ट्रवादाविषयी ते लिहितात, ‘भूतकाळाचा आंधळा अभिमान जसा वाईट तसा त्याचा तिरस्कारही वाईटच.. वर्तमान व भविष्य हे अनिवार्यपणे भूतकाळातून व त्याचा ठसा धारण करून उदय पावते व त्यास विसरणे म्हणजे पायाशिवाय घर उभारण्यासारखे व राष्ट्रीय भावनेच्या वाढीची मुळेच कापून टाकण्यासारखे होय.. राष्ट्रवाद म्हणजे पूर्वजांच्या भूतकाळातील मोठय़ा कार्याची, परंपरांची व अनुभवांची सामूहिक स्मृती होय.’ राष्ट्रवादाच्या आजच्या गरजेविषयी ते म्हणतात, ‘अनेकांना असे वाटते की, आता राष्ट्रवाद कालबाह्य़ झाला आहे.. त्याची जागा समाजवादाने व आंतरराष्ट्रवादाने घेतली आहे. (हे चूक आहे).. आजच्या युगाची लक्षणीय अभिव्यक्ती म्हणजे भूतकाळाचा शोध व राष्ट्राची जाणीव होय.. सामाजिक व आर्थिक कार्यक्रम तोच (पुरोगामी) ठेवून रशियाही अधिकच राष्ट्रवादी बनला आहे.. तेथे राष्ट्रीय इतिहासातील थोर व्यक्तींना समोर आणून लोकांचे राष्ट्रपुरुष बनविले गेले आहे.. मात्र भारतीय कम्युनिस्टांनी राष्ट्रीय परंपरांपासून पूर्ण फारकत घेतली आहे.. त्यांना वाटते की, जगाचा इतिहास नोव्हेंबर १९१७ पासून (रशियन क्रांती) सुरू झाला आहे.’

अर्थात सर्व भारतीयांचे मिळून हे राष्ट्र राहणार होते. धर्म, पंथ, जात, भाषा इ.चा विचार न करता सर्वाना समान हक्क राहणार होते. ‘एक राष्ट्र- एक राज्य’ अशीच ही भूमिका होती. डॉ. आंबेडकरांनी अर्नेस्ट रेनन यांनी केलेली ‘राष्ट्रा’ची पुढील व्याख्या अतिशय योग्य म्हणून उद्धृत केली आहे. ‘राष्ट्र म्हणजे आत्मा.. त्याचा एक घटक भूतकाळाचा, दुसरा वर्तमानाचा.. भूतकाळाचा घटक म्हणजे समृद्ध वारशाची सामूहिक स्मृती; वर्तमानाचा घटक म्हणजे एकत्र राहण्याची तीव्र इच्छा.’ अर्थात हा वारसा म्हणजे सांस्कृतिक वारसा होय. आपले सर्व भारतीय नेते एक राष्ट्रीयत्वासाठी समान भारतीय संस्कृतीचा आधार घेत होते; त्या संस्कृतीचा आरंभ वेदपूर्व काळापासून मानीत होते. या मूळ व मुख्य राष्ट्रीय प्रवाहात नंतर अनेक छोटे-मोठे प्रवाह येऊन मिळाले व सर्वाची मिळून एक संमिश्र अशी भारतीय संस्कृती निर्माण झाली व त्या संस्कृतीचे आपण वारसदार आहोत, अशी त्यांची भूमिका होती.

हा सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद नव्हता, तर राष्ट्राच्या इतिहासाच्या मुळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. आधारासाठीची मुळे, भावनिक या अर्थी, जमिनीतच राहणार होती, राष्ट्रवृक्षाची वाढ वैज्ञानिक व आधुनिक पद्धतीनेच होणार होती. राष्ट्रवाद हा एकत्वासाठी व अस्मितेसाठी पाहिजे होता, आजची जीवनमूल्ये कोणती असावीत यासाठी राहणार नव्हता!

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.