भीमा भोईचा पिंड वेगळा होता. पंथीय कर्मकांड आणि तांत्रिक उपचार यात त्याला रस नव्हता. त्याला महिमा पंथाचं प्राणतत्त्व काय ते लोकांना समजावून देण्याची इच्छा होती. तो उत्कट संवेदनशील होता आणि मानवी दु:खांची तीव्र जाणीव असणारा होता.

काळ सर्वभक्षक आहे. क्षणाक्षणाचा इतिहास तो अखंड गिळत असतो. त्याच्या अजस्र पंजातून गळालेले जीवनाचे अंश शोधणं, सांभाळणं आणि त्यांच्या जुळणीतून कधी इतिहासाचं, कधी संस्कृतीचं- खरं तर जीवनाच्याच वेगवेगळ्या अंगांचं रूप पुन्हा अंदाजानं उभं करू पाहणं, हा संशोधकांचा आणि अभ्यासकांचा प्रांत.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

संतचरित्रांच्या बाबतीत अशा संशोधक-अभ्यासकांचे कष्ट आणि दुर्दम्य प्रयत्नही कसे अपुरे पडतात याचा अनुभव आपल्याला वारंवार येतो. काळ सात-आठशे वर्षांपूर्वीचा असो, की शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा; फारच थोडे तपशील त्या माणसांविषयी आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध असतात. कधी एखादं स्मारक, कधी एखादा समकालीन किंवा उत्तरकालीन साहित्यातला उल्लेख, कधी त्या संतानंच केलेलं- जाता जाता केलेलं एखादं विधान आणि जनमनात बहुधा चमत्कारांच्या स्वरूपात राहून गेलेल्या काही दंतकथा- बस्स! कल्पनेनं रिकाम्या जागा भरण्याचं अतिकठीण आणि अतिजोखमीचं काम अभ्यासक सतत करीत राहतात.

भीमा भोई नावाच्या अल्पज्ञात संतकवीचं उदाहरण या संदर्भात इतर अनेक संतकवींप्रमाणेच देता येतं. प्रा. एन. एन. बसू, प्रा. अतिबल लव महंती, बी. सी. मुझुमदार, डॉ. मायाधर मानसिंह किंवा भागीरथी नेपाक यांच्यासारखे उडिया साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक आणि त्या सर्वाच्या अभ्यासाचा सम्यक् विचार करणारे सीताकांत महापात्रांसारखेथोर साहित्यकारही भीमा भोईविषयी खात्रीपूर्वक आणि निश्चित अशी जी माहिती देतात ती अगदी त्रोटक आहे- जवळजवळ नाहीच आहे. आहे तो तपशील अगदी अनिश्चित अशा अंदाजांच्या स्वरूपाचाच आहे. काळाच्या पंजातून तो तेवढाच निसटला आहे.

खरं तर भीमा भोई अवघा दीड शतकापूर्वीचा संत. ओरिसातल्या अलेखापंथाचा किंवा महिमापंथाचा श्रेष्ठ उपदेशक. तरीही त्याच्या जन्म-मृत्यूविषयी अंदाजानंच बोलावं लागतं. भीमा जन्मानं कोंढ जातीचा होता. कुणी मानतात की दानरा आणि गुरुबारी या गरीब कोंढ जोडप्याला भीमा जंगलात सापडला आणि ते मूल त्यांनी आपलं म्हणून वाढवलं. ओरिसातल्या संबळपूरच्या आसपासच्या प्रदेशात कुठल्या तरी गावात त्याचा जन्म झाला असावा. कुणी त्याचं जन्मगाव काकडापारा सांगतात, तर कुणी धेनकताल प्रांतातलं जोरांदा गाव सांगतात.

असं म्हणतात, की तो जन्मांध होता. ओरिसातल्या महिमा पंथाचे संस्थापक महिमा स्वामी आणि त्यांचे श्रेष्ठ शिष्य गोविंदबाबा हे एक दिवस भीमाच्या झोपडीपाशी आले. तेव्हा मध्यरात्र होती. भीमाला त्यांनी हाक मारली. भीमानं त्यांना ओळख विचारली. त्यांनी ती सांगितली, तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुम्हाला पाहण्यासाठी मला दृष्टी द्या!’’ त्यांनी ती दिली आणि त्याला दिव्य प्रतिभेचं वरदानही दिलं. भीमा म्हणाला, ‘तुमचं रूप पाहिलं. तुमचे चरण दिसले. आता जगातली मलिनता पाहण्याची इच्छा नाही. मला पुन्हा अंधत्व द्या!’ आणि भीम अंध म्हणूनच जगला. जवळजवळ पन्नास वर्षांचं त्याचं आयुष्य असावं आणि जन्म १८४५ ते ५० च्या दरम्यान केव्हा तरी. अस्सल कोंढ जमातीमधला होता तो. धरित्रीदेवी आणि आकाशदेव यांच्यावर श्रद्धा असणारा. दैवी न्याय असतो असा विश्वास बाळगणारा.

तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना ग्रामदिहा गावात त्याची महिमा स्वामींशी भेट झाली. गोविंदबाबा हे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य. कटक आणि पुरी जिल्ह्य़ात महिमा पंथ फार प्रभावी होता. हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांवर आघात करणारा आणि ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारा पंथ म्हणून त्याला तीव्र विरोधही होत होता. भीमाला भेटल्यानंतर अवघ्या पाचएक वर्षांत गोविंदबाबांचं निधन झालं आणि पुढे आणखी दहा वर्षांनी महिमा स्वामींचंही देहावसान झालं. भीमा तेव्हा तिशीच्या आसपासचा असावा. तो पंथाचा अगदी निस्सीम अनुयायी होता. पण स्वामींच्या मृत्यूनंतर पंथप्रसाराच्या योजना ठरवण्यात मात्र तो सामील झाला नाही.

त्याचा पिंड वेगळा होता. पंथीय कर्मकांड आणि तांत्रिक उपचार यात त्याला रस नव्हता. त्याला महिमा पंथाचं प्राणतत्त्व काय ते लोकांना समजावून देण्याची इच्छा होती. वेगळाच होता भीमा. तो बहुसंख्य श्रद्धावंतांप्रमाणे धर्मबधिर तर नव्हताच, पण उत्कट संवेदनशील होता आणि मानवी दु:खांची तीव्र जाणीव असणारा होता. खलियापलि आश्रम हा भीमानं महिमा पंथाचा स्थापन केलेला स्वतंत्र मठ होता. मा अन्नपूर्णा ही त्याची सहकारी. कमरेभोवती कुंभी वृक्षाच्या सालाची दोरी बांधणारे ‘कुंभीपतिया’ हे भीमाचे अनुयायी. मूर्तीपूजेला कडवा विरोध करणारे. जातिभेद न मानणारे. असं म्हणतात, की भीमाच्या काही अनुयायांनी तर एकत्र जमून पुरीच्या जगन्नाथ मूर्तीलाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या वेळी मोठा संघर्ष आणि रक्तपात झाला. भीमा प्रत्यक्ष त्यात नव्हता.

मात्र अधिकृत दस्तावेजात, देवस्थानच्या नोंदणीत किंवा भीमाच्या स्वत:च्या बोलीत त्याचा उल्लेख नाही. उलट, ओरिसातले दोन श्रेष्ठ भक्तकवी जगन्नाथदास आणि बलरामदास यांनी भीमाचा ‘जगन्नाथभक्त’ म्हणूनच उल्लेख केला आहे. भीमानं जगन्नाथ उपासनेच्या तत्त्वांशी महिमा तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचाच प्रयत्न केला. त्याचा आश्रम म्हणजे भक्तीनं भारलेलं एक श्रद्धाकेंद्र होतं. नाचून, गाऊन तो उपासना करी. स्वत: गीतरचना करी. भीमाची काव्यं अतिशय उत्कट आहेत. भावनांची गहिरी डूब असणारी आहेत.

भीमा परमेश्वराचं मूर्तिरूप ध्यान करत नाही. अलेख म्हणजेच निर्गुण निरंजन, महिमा, शून्य ब्रह्म! परमेश्वराचं वर्णन याच स्वरूपात, याच शब्दांनी त्याच्याकडून केलं जातं. भीमानं धर्मातल्या जड, बौद्धिक अशा संकल्पनांना प्राणवान केलं. सरस केलं.

हित आणि अहित । मोक्ष आणि दुर्गत

निर्मिले हे द्वैत । तूचि स्वये ।।

पापांचे हे पर्वत । उचलायासी तू शक्त

घेई हे भगवंत । चरणापास ।।

औषध जालीम देवोन । जैसे मृत्यूचे कारण

वैद्य करी हरण । सहजचि ।।

तैसा माझा पापनिधी । देवोनिया ज्ञानौषधी

नष्ट करून रोगव्याधी । मुक्त करी ।।

अशा साध्या कळवळ्याच्या दृष्टांतांनी भीमाची गीतं हृदयाचा ठाव घेणारी आहेत. म्हणून तर ओरिसातल्या शेकडो- हजारो भक्तांच्या मुखी आजही ती आहेत आणि महिमा पंथाचे अनुयायी नसूनही ती अनेकांची झाली आहेत.

‘स्तुतिचिंतामणी’ हे भीमाचं सर्वात महत्त्वाचं काव्य. भजनमाला, ब्रह्मनिरूपण गीते, श्रुतिनिषेधगीता, कौतिसा मधुचक्र आदि-अंत गीता अशी आणखीही काही काव्यं त्यानं रचली आहेत. औपचारिक शिक्षण नसलेल्या भीमाजवळ विलक्षण प्रगल्भ अशी कवित्वशक्ती मात्र होती. लोकभाषेचा रसरशीतपणा, शैलीचा डौल आणि भावनांची तीव्रता यामुळे भीमाची कविता उडिया साहित्याची परंपरा विकसित करणारी ठरली आहे.

समाजाची आत्यंतिक चिंता, मानवी जीवनाविषयीची आस्था आणि अवघड आध्यात्मिक संकल्पनांची सहजसोपी अभिव्यक्ती यामुळे भीमाच्या भजनांना ओरिसाच्या ग्रामजीवनात फार महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. संस्कृत पंडितांची परंपरा पाठीशी नसताना गरीब कोंढ जमातीतल्या या संतकवीनं आत्मनिवेदनाच्या सुरात व्यक्त केलेली ईश्वरभक्तीची आर्तता उडिया भाषा आणि काव्य यांच्यासाठी मोलाची देणगी ठरली आहे.

 

– डॉ. अरुणा ढेरे
aruna.dhere@gmail.com