डॉ. नंदिता आणि प्रदीप पालशेतकर यांच्या लग्नाला ३१ वर्षे झालीत. त्या डॉक्टर तर ते उद्योजक, भिन्न व्यवसाय असूनही ते एकमेकांसाठी पूरक करून घेण्यातच यांच्या यशस्वी लग्नाचं रहस्य दडलेलं आहे. सर्वसामान्य पतीपत्नींचे सर्व गुणदोष त्यांच्यात आहेत, पण त्यापलीकडे जात एकमेकांविषयी प्रेम-आदर, एकमेकांच्या कामात रस घेणं, एकत्र सणसमारंभ साजरे करणं, नातेवाईकांना धरून राहणं, मोठय़ांचा आदर करत लहानांच्या भवितव्याचा विचार करणं.. या आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी ते एकत्रितपणे करत आहेत. त्यांच्याविषयी..

एक तरी मूल व्हावं म्हणून झुरणाऱ्या असंख्य दाम्पत्यांसाठी डॉ. नंदिता पालशेतकर हे नाव नवीन नाही. आयव्हीएफ, असिस्टंट लेझर हॅचिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केलेल्या उपचारांमुळे अनेक जोडप्यांना मूल झालंय. डॉ. नंदिता यांचे वडील डी. वाय. पाटील हे काँग्रेसमधलं बडं नाव, शैक्षणिक क्षेत्रात चांगलाच दबदबा; तर सासरे अनंतराव ऊर्फ भाऊ पालशेतकर हे हिऱ्यांच्या व्यवसायातलं अग्रगण्य मराठी नाव. सासरचा गोतावळा मोठा आणि यामध्ये पती

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

प्रदीप पालशेतकर यांनी दिलेली भक्कम साथ यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. नंदिता यांना फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं शक्य झालंय.

डॉ. नंदिता यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा भारतात आयव्हीएफच्या उपचारांना सुरुवात केली तेव्हा त्याची लोकांना फारशी माहिती नव्हती. तेव्हा त्याच्या यशाची टक्केवारीही जास्त नव्हती. उपचार केलेल्या १० ते १५ टक्के जोडप्यांना यश मिळायचं. ‘‘सुरुवातीला खूप कठीण गेलं सगळं. एकतर लोकांना आयव्हीएफबद्दल फारशी माहिती नव्हती, यशाचा दरही कमी होता. पण आम्ही प्रयत्न सुरूच ठेवले. तंत्रज्ञानही आधुनिक होत गेलं. आता हाच दर ५० ते ६० टक्क्यांवर गेलाय. त्याचं समाधान मिळतंच आणि अर्थातच मला माझ्या घरातून अगदी भक्कम पाठिंबा मिळाला. प्रदीप कायम माझ्या मदतीला तत्पर असायचाच, पण त्याच्या जोडीला माझ्या सासूबाईंनीदेखील मला खूप सांभाळून घेतलं,’’

डॉ. नंदिता त्यांच्या सासरकडून मिळालेल्या मोकळ्या वातावरणाबद्दल भरभरून बोलतात.

‘‘स्त्रीला करिअरमध्ये झेप घ्यायची असेल तर तिला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा खूप आवश्यक असतो. हा पाठिंबा नसेल तर स्त्री काहीच करू शकणार नाही असं नाही, पण तिला दुप्पट परिश्रम घ्यावे लागतात. माझ्या बाबतीत असं झालं नाही. माझ्या शिक्षणाच्या दिवसांपासूनच प्रदीप माझ्या साथीला होता. त्याच्या सहकार्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्या.’’

नंदिता आणि प्रदीप किशोरवय संपता संपताच एकमेकांना भेटले. दोघांमधली मैत्री अगदी घट्ट होण्यामागे हेही एक कारण असू शकतं. त्या दिवसांबद्दल प्रदीप पालशेतकर अगदी मोकळेपणाने सांगतात. ‘‘नंदिता आणि माझी पहिली भेट १९८०मध्ये झाली. तेव्हा आम्ही ‘हीरा-पन्ना’ बिल्डिंगमध्ये राहायचो. नंदिता तेव्हा आमच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहायची. प्रत्येक सणाला बिल्डिंगमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात माझा पुढाकार असायचा. त्या वर्षीदेखील आम्ही नवरात्रीत दांडियाचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. नंदिता तिथे तिच्या मैत्रिणीसोबत आली होती, तिथेच आमची पहिली भेट झाली, तेव्हा आम्ही दोघंही १८ वर्षांचे होतो, बारावीत शिकत होतो. मला ती इतकी आवडली होती, की मी तिला आठवडय़ाचा पास देऊन टाकला. आमचे सूर जुळले आणि आमच्या गाठीभेटी सुरू झाल्या. मी लाला लजपतराय कॉलेजमध्ये कॉमर्सला होतो, तर नंदिता सोफिया कॉलेजला होती. तिने नंतर जे.जे.ला मेडिकलला अ‍ॅडमिशन घेतली, मी बीकॉमला. माझं कॉलेज सकाळी होतं. त्याच काळात वडील आजारी पडल्यामुळे माझ्यावर ऑफिसचीही जबाबदारी आली. सकाळी कॉलेज, दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी नंदिताला भेटणं असं सुरू होतं. हळूहळू घरच्यांना याची कुणकुण लागली आणि मग जातीचा बाऊ  न करता घरच्यांनी पुढाकार घेतला आणि मे १९८६मध्ये आमचं लग्न झालं.’’

‘‘लग्न झालं तेव्हा नंदिताचं एमबीबीएस पूर्ण झालं होतं आणि तिची इंटर्नशिप सुरू होती. तिच्या एमबीबीएसच्या पाचही वर्षांमध्ये मी तिच्यासोबत होतो. त्यामुळे तिचं शिक्षण, तिचे विषय, त्यातली तिची आवड याविषयी ती माझ्याशी खूप बोलायची. त्यामुळे मलाही वैद्यकीय क्षेत्रातलं बरंच काही कळायला लागलं होतं. ऑगस्ट १९८८मध्ये आमच्या मुलाचा, रोहनचा जन्म झाला. रोहनच्या वेळेस नंदिताच्या गरोदरपणात आईनं तिची खूप काळजी घेतली. आई कधी कधी तिच्यासाठी डबा घेऊन जे.जे.ला जायची. अगदी नंदिताच्या वरिष्ठांनाही त्याबाबत सल्ला द्यायला तिने मागेपुढे पाहिलं नाही. १९९० मध्ये माझी आई वारली तेव्हा रोहन दीड वर्षांचा होता. मग नंदितानं पीजी स्टुडंटशिप घेतली, अभ्यासावर लक्ष वाढवलं आणि हॉस्पिटलच्या कामाचा भार थोडा कमी केला. तिनं एमडी करावं असं आम्हालाही वाटत होतं. माझ्या वडिलांनी तर तिला सांगितलंच, ‘तू एमडी केलंस तर मी तुला गाडी घेऊन देईन.’ आणि त्यांनी ते वचन पाळलंही. नंदिता एमडी झाल्यानंतर त्यांनी तिला ‘मारुती ८००’ घेऊन दिली.’’ प्रदीप यांचं बोलणं पुढे नेताना नंदिता सांगतात की, ‘‘मला ती गाडी खूप आवडायची. मी ती जवळपास ७-८ र्वष वापरली. आज माझ्याकडे दुसऱ्या आलिशान गाडय़ा आहेत, पण त्या गाडीची सर नाही.’’

१९९२ मध्ये नंदिता यांनी पहिलं नर्सिग होम सुरू केलं आणि १९९३ मध्ये एमडीची पदवी मिळाली. कामाचा व्याप वाढला. रोहन लहान होता, पण त्याला त्याच्या आईबरोबर थोडा तरी वेळ मिळेल याची खबरदारी प्रदीप घेत राहिले. ‘‘तेव्हा मी नंदितासाठी डबा घेऊन जायचो आणि रोहनला सोबत घेऊन जायचो. त्यामुळे त्याला आईचा क्वालिटी टाइम मिळायचा.’’ १९९८ मध्ये डॉ. नंदिता यांनी लीलावती हॉस्पिटलबरोबर काम सुरू केलं. त्यानंतर मग कामाला खऱ्या अर्थानं गती आली. इतकं मोठं रुग्णालय सोबत असल्याचा फायदाही खूप झाला. आतापर्यंत अक्षरश: हजारो रुग्णांवर उपचार करता आलेत. त्यापैकी अनेक रुग्णांशी प्रदीपही संवाद साधतात. त्याबद्दल ते सांगतात, ‘‘नंदिताचं रुग्णाशी खूप चांगलं नातं तयार होतं. या उपचारांमध्ये समुपदेशनाची गरज असते. त्यासाठी वेगळे डॉक्टरही असतात. पण अनेक रुग्णांना नंदिताशी बोलूनच हुरूप येतो. एका ७५ वर्षांच्या गृहस्थांचा प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. त्यांच्या मुलीला मूल होत नव्हतं, नंदिताच्या उपचारांमुळे तिला मूल झालं. ज्या दिवशी तिची डिलिव्हरी होती, त्या दिवशी मी नंदिताला घ्यायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी तिथे पोहोचलो तेव्हा त्या मुलीची नुकतीच डिलिव्हरी झाली होती. नंदिताने बाहेर येऊन त्या गृहस्थांना ‘तुम्ही आजोबा झालात’ ही खूशखबर दिली, त्या आजोबांनी वयाचा विचार न करता अक्षरश: नंदिताचे पाय धरले. ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाळ म्हणजे एखाद्यासाठी काय असू शकतं याचा अनुभव मी त्या दिवशी घेतला.’’

रोहन स्वत: गायनॅकॉलॉजिस्ट आहे, दोन वर्षांपूर्वी त्याचंही लग्न झालं. त्याची पत्नी करिष्मा ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहे. प्रदीप सांगतात, ‘‘आम्ही चुलत भावंडं मिळून पाचजण. आम्हा सर्वामध्ये नंदिता सर्वात जास्त शिकलेली. तिच्या शिक्षणाचा फायदा फक्त स्वत:पुरता राहिला नाही, तर तो पुढच्या पिढीलाही झाला. फक्त रोहनच नाही तर नंदिता पुढच्या पिढीतल्या सर्वाच्या करिअरबद्दल जागरूक असते. मुलांनी स्वत:ला काय हवं ते करावं, वडिलोपार्जित व्यवसायातच उतरलं पाहिजे असं नाही, तुम्ही स्वत:चं कौशल्य विकसित करा, असा तिचा आग्रह असतो. आमचे भाचे-पुतण्याही त्यामुळे तिच्याकडेच मार्गदर्शक म्हणून पाहतात. काहीजण शिकण्यासाठी परदेशात गेले आणि आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताहेत.’’

नंदिता आणि प्रदीप यांच्या लग्नाला जवळपास ३१ र्वष झाली आहेत आणि तब्बल ३७ वर्षांची त्यांची मैत्री आहे. या काळात कामातून एकमेकांसाठी वेळ कसा मिळाला असं विचारल्यावर नंदिता सांगतात, ‘‘आम्ही आवर्जून एकमेकांसाठी वेळ काढतो. रविवारी तर सुटी घेतोच. लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्ही दोन दिवस का होईना कुठेना कुठे फिरायला जायचो. आताही तीन-चार महिन्यांतून आम्ही २-३ दिवसांचा ब्रेक घेतो. प्रदीपला स्वयंपाकाची आवड आहे, त्याच्या हातचे मासे मला फार आवडतात आणि मी त्यासाठी फर्माईशही करत राहते, तो ती पुरवतो. मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. माझ्या हातचा चहादेखील कोणी आवडीनं पित नाही. प्रदीप उत्तम चहा करतो. आमच्या घरी रविवारी दुपारचा चहा तोच करतो. इतकंच नाही, आम्ही परदेशात फिरायला गेलो तर आमचे मित्र-मैत्रिणी त्याच्या हातचा चहा पिण्यासाठी आमच्या रूममध्येच जमलेले असतात.’’

प्रदीप यांना फिरण्याची आवड आहे. ‘‘मला फिरायला खूप आवडतं. मी कुठेही फिरू शकतो. कार ड्रायव्हिंग हा माझा दुसरा शौक. १९९२-९७ या कालावधीत मी ९ कार रॅलीजमध्ये भाग घेतला आणि त्या सर्व ट्रॉफीज मी जिंकलो. प्रत्येक रॅलीला नंदिता माझ्यासोबत असायची. अर्थात कधी कधी आमच्या फिरण्याचे प्लॅन ऐनवेळी रद्दही करावे लागतात, कारण नंदितासाठी आणि आमच्यासाठीही तिचे रुग्ण सर्वात महत्त्वाचे.’’ पत्नीच्या यशात समाधानी असणं, त्याचा अभिमान बाळगणं आणि स्वत: मिरवायला न आवडणं असे टिपिकल गुणी नवऱ्याचे गुणदेखील प्रदीपमध्ये आहेत. इतर पती-पत्नींप्रमाणे यांच्यातही भांडणं होतात, विसरलीही जातात. सर्वसामान्य पतीपत्नींचे सर्व गुणदोष त्यांच्यात आहेत. एकमेकांच्या कामात रस घेणं, एकत्र सणसमारंभ साजरे करणं, नातेवाईकांना धरून राहणं, मोठय़ांचा आदर करणं आणि लहानांच्या भवितव्याचा विचार करणं.. आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी यांच्याकडेही होतात.

नवरा-बायकोंपैकी एकालाच त्याग करायला लावून त्याच्या पायावर उभारलेले संसार खऱ्या अर्थाने सुखी होत नाहीत, एकमेकांच्या कामात साथ देऊन, त्याचा आदर करून ते यशस्वी होत असतात. डॉ. नंदिता आणि प्रदीप हे याचं आणखी एक उदाहरण.

निमा पाटील nima_patil@hotmail.com