‘‘आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. कलाकृतींवर सर्व बाजूंनी चर्चा होत राहिल्यामुळे त्याविषयी जाणीव वाढत जाते. एकच गोष्ट दोघांना वेगवेगळ्या प्रकारे समजलेली असते, त्यामुळे एकमेकांशी बोलताना त्यातले छुपे, गर्भितार्थ लक्षात येतात. साहित्याविषयीच्या समान आवडीमुळे आमच्या संसाराला फायदाच झाला. दुसरं म्हणजे तिच्या कामात आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं, त्यातून तिचा व्यक्तिमत्त्व विकास झाला, ती स्वत: कमावती झाली. तिला अनेक पुरस्कार मिळाले, पुस्तकांची रॉयल्टी मिळाली, या सगळ्या जमेच्या बाजू आहेतच ना.’’ विरुपाक्ष कुलकर्णी यांनी सांगितलेले लेखिका पत्नी उमा यांच्यासोबतचे  काही सर्जनशील क्षण, प्रसंग. सर्वार्थाने जोडीदार असल्याची खात्री पटवणारे!

इतर भाषांमधील साहित्य वाचण्याची आवड खाशा रसिकांना नक्कीच असते, अशा वेळी त्यांना मोठा आधार मिळतो तो सकसपणे अनुवाद करणाऱ्या लेखकांचा. कन्नड साहित्याची आवड असणाऱ्यांसाठी कन्नड साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या उमाताई कुलकर्णी हे असंच एक हक्काचं नाव. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ त्यानंतर त्यांनी भैरप्पांची कन्नड कादंबरी मराठीमध्ये आणली, ‘वंशवृक्ष’. त्याचं जोरदार स्वागत झालं. तेव्हापासून हे लेखक-वाचकांचं नातं दृढ होत गेलंय. आतापर्यंत उमाताईंनी केलेले ५५ पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

भैरप्पा, शिवराम कारंत, गिरीश कर्नाड अशा दिग्गजांचं साहित्य त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलंय. या ३५ वर्षांच्या कालखंडात पती विरुपाक्ष यांची त्यांना भक्कम साथ मिळाली.. म्हणण्यापेक्षाही त्यांच्याबरोबर चालताना उमाताईंना ही वाट सापडली, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल.

कर्नाटकमधल्या कुलकर्णी या मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या सुषमांच्या घरामध्ये लिखाणापेक्षाही संगीताला पोषक वातावरण होतं. वडील बासरी वाजवायचे. घरात शिस्तीबरोबरच मर्यादशील मोकळीक मुलांबरोबरच मुलींनाही अनुभवायला मिळाली. त्याचबरोबर पारंपरिक संस्कारही झाले. १९७० मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं पत्रिका बघून, मुलगी दाखवून त्यांचा विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला, तेव्हा सुषमा बीएच्या शेवटच्या वर्षांला होत्या. विरुपाक्ष हे शंकराचं नाव, म्हणून लग्नानंतर सुषमाची उमा झाली. विरुपाक्ष कुलकर्णी तेव्हा संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या. पण साहित्याची वाट मात्र रसिक वाचक ते अनुवादक अशी ठरवून झाली नाही. वाचनाची आवड होती, घरात दोघेच असल्यामुळे सवडही मिळायची. दिवसभर भरपूर वाचायचं आणि संध्याकाळी फिरायला जाताना आज दिवसभरात काय वाचलं त्याची चर्चा करायची असा दोघांचा दिनक्रम ठरून गेला होता.

‘मला विशेषत: कादंबऱ्या वाचायला आवडायच्या. मी त्याविषयी बोलायचे. तेव्हा हे कन्नडमध्ये काय चांगलं वाचलं आहे त्याची माहिती द्यायचे. त्यामुळे कन्नड साहित्याची ओळख होत गेली.’ विरुपाक्ष यांचं हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये काम तसं धोक्याचं होतं. त्यातच रस्त्यावर जड वाहनांची वर्दळही भरपूर असायची. त्यामुळे घरी येईपर्यंत कामाचा, प्रवासाचा खूप ताण आलेला असायचा. संध्याकाळी नोकरीवरून घरी परत आल्यानंतर घरगुती मन:स्थितीत येण्यासाठी विरुपाक्ष स्वत:साठी थोडा वेळ राखून ठेवायचे. दिवसभराचा थकवा शांत केल्यानंतर मगच चर्चेला सुरुवात व्हायची. दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी आल्यानंतर ही साहित्यिक चर्चा मनाला विसावा देऊन जायची. याच चर्चामधून अनुवादाची बीजं पेरली गेली.

१९७८ मध्ये थोर कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. उमाताईंना त्या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं. तोपर्यंत कन्नड बोलता येऊ  लागलं होतं, पण वाचता येत नव्हतं. त्यामुळे विरुपाक्ष यांनी ते वाचून दाखवावं आणि उमाताईंनी त्याचं मराठी भाषांतर करावं असा उपक्रम सुरू झाला. मात्र तेव्हा या मराठी अनुवादाचं पुस्तक होऊ शकतं हे काही लक्षात आलं नाही. सगळं काही ‘स्वान्त सुखाय:।’ नंतर मात्र या ज्ञानपीठविजेत्या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाल्यानंतर आपणही हे करू शकलो असतो ही बाब ध्यानात आली. नंतर मात्र १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, ‘तनमनाच्या भोवऱ्यात’. आता टेपरेकॉर्डरचीही साथ सुरू झाली. विरुपाक्ष कामावर जाण्यापूर्वी शक्य तितका कादंबरीचा भाग टेप करून जायचे आणि उमाताई त्यावरून मराठी अनुवाद करायच्या. शिवराम कारंत यांच्यानंतर भैरप्पांच्या कादंबऱ्यांनी उमा यांना खुणवायला सुरुवात केली. ‘वंशवृक्ष’ या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या वर्षी पहिल्यांदाच अनुवादासाठी अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यासाठी १९४७ पासूनची पुस्तकं स्पर्धेत होती.

दरम्यानच्या काळात विरुपाक्ष कुलकर्णी यांनीही मराठी पुस्तकांचा कन्नड अनुवाद करायला सुरुवात केली. त्यांची आतापर्यंत २५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आकडय़ांच्या हिशेबात पाहिलं तर उमाताई पुढे गेल्याचं दिसतं, याचं कधी वैषम्य वाटलं नाही. कारण विचारल्यावर ‘करंटे पुरुषच असा विचार करतात’, असं चोख उत्तर मिळालं. मुळात दोघांमध्ये मनमोकळा संवाद असल्यामुळे विसंवादाला फारसा वाव उरला नाही. ‘‘तिला जे आवडत होतं, ते ती करत होती. मी कधी तिला अडवलं नाही की माझी आवडही तिच्यावर लादली नाही. दोघांचाच संसार असल्यामुळे आम्हाला स्वत:चा अवकाशही मिळत होता. ती जे करत होती, ते चांगलं करत होती त्यामुळे तिला मी कधी अडवलं नाही. लग्न झाल्यापासून आम्ही रोज संध्याकाळी फिरायला जातो. त्या वेळच्या गप्पांमध्ये साहित्याचीच चर्चा अधिक व्हायची.’’ विरुपाक्ष स्वत:कडे कोणताही मोठेपणा न घेता सांगतात. ‘‘आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. कलाकृतींवर सर्व बाजूंनी चर्चा होत राहिल्यामुळे त्याविषयी जाणीव वाढत जाते. एकच गोष्ट दोघांना वेगवेगळ्या प्रकारे समजलेली असते, त्यामुळे एकमेकांशी बोलताना त्यातले छुपे, गर्भितार्थ लक्षात येतात. साहित्याविषयीच्या समान आवडीमुळे आमच्या संसाराला फायदाच झाला. दुसरं म्हणजे तिच्या कामात आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं, त्यातून तिचा व्यक्तिमत्त्व विकास झाला, ती स्वत: कमावती झाली. तिला अनेक पुरस्कार मिळाले, पुस्तकांची रॉयल्टी मिळाली, या सगळ्या जमेच्या बाजू आहेतच ना.’’

पती-पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असले पाहिजेत हा मंत्र बोलून न दाखवता दोघेही पाळताना दिसतात. दोघांच्या लग्नाला ४६ वर्षे झालीत. या दीर्घ सहजीवनाच्या काळात अनुरागाबरोबरच रागाचेही क्षण येणं स्वाभाविकच. मात्र त्यासाठीही एक मजेशीर नियम घालून ठेवलाय, तो म्हणजे रोज भांडण झालं तरी चालेल, पण रोजचा विषय नवा पाहिजे. शिळे विषय काढून भांडायचं नाही. त्यामुळे उगाच जुन्या खपल्या काढून वादावादीला इथे स्थान नाही. रोजचा संवाद असल्यामुळे परस्परपूरकता वाढीला लागली आहे. स्पष्ट संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानं दोघांच्याही वाढीला वाव मिळतो. ‘‘एकमेकांशी बोलताना तुम्ही दोघेही वाढत जाता, दृष्टी विस्तारते, व्यक्तिमत्त्वाची खोली वाढते. पती-पत्नीच्या नात्याची निकोप वाढ झाल्यानं घराला एक संस्कृती, घरपण लाभतं, त्याचे फायदे सगळ्यांनाच मिळतात. आम्हाला, नातेवाईकांना, मित्रमंडळींना. पोटापाण्यापुरते पैसे मिळाल्यानंतर या गोष्टी जगण्यासाठी अधिक आवश्यक असतात. जीवन इतकं विस्तीर्ण आहे, त्याचे अनेक अंगोपांग आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला उत्साह, ऊर्जा मिळते. जगाबरोबर जिवंत संपर्क राहिल्यामुळे आपलीही स्पंदनं जिवंत राहतात. समोर आलेल्या गोष्टींना तोंड द्यायचं. पलायन करायचं नाही, यातून समस्यांवर उपाय मिळत जातात,’’ विरुपाक्ष यांनी थोडक्यात सुखी संसाराची सूत्रं सांगितली.

‘‘१९९० पासून ते आजपर्यंत सकाळचा नाश्ता, चहादेखील हेच करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर मला लिखाण आणि पेंटिंगसाठी ताजातवाना वेळ मिळतो तो थेट मी साडेबारा वाजता कुकर लावायला उठते तोपर्यंत.’’ उमा यांनी विरुपाक्ष यांची त्यांना मिळणारी साथ अगदी थेट शब्दांमध्ये मांडली.

उमाताई आणि विरुपाक्ष यांच्या वयामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे चुकण्याचा अधिकार उमाताईंचा, सुधारण्याचा अधिकार विरुपाक्ष यांचा अशी वाटणी अगदी सुरुवातीलाच झालीये. ‘‘एकमेकांच्या साथीनं आयुष्य समृद्ध होत असताना आम्ही एकमेकांसाठी काही भेटवस्तू आणल्याचं आठवत नाही. त्यांनी मला कधी गजरा आणला नाही की मी त्यांना कफलिंग्ज आणली नाहीत. मला कोणता पुरस्कार मिळणार असेल तर बायकोचं कौतुक बघायला हे आवर्जून येतात. माझं भाषण असेल तर मात्र येत नाहीत, अशी काहीशी रीत पडलीय,’’ त्या सांगतात.

‘‘दोघांच्या या संसारात देवाला फार स्थान नाही. माझा देव हा ज्ञानेश्वरांचा देव. देवाशी माझं काही भांडण नाही. त्याच्याकडे काही मागणीही नाही. हट्ट नाही की रुसवे-फुगवे नाहीत. त्याला जितकं द्यायचं तितकं तो देतो, त्यात आम्ही समाधानी असतो. त्यामुळे आम्ही सुखानं नांदतोय,’’ विरुपाक्ष यांनी त्यांचं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगितलं.

उमाताईंची अनुवादाची कामं सुरू असतानाच त्यांना पेंटिंगची आवड पुन्हा खुणावू लागली. १९८१-८३ मध्ये एसएनडीटीमधून त्यांनी ‘आर्ट अ‍ॅण्ड पेंटिंग’ हा विषय घेऊन एमए केलं. त्यानंतर द्राविडी मंदिरांची स्थापत्यशैली यावर पीएच.डी. केली. या काळात दोघेही खूप फिरले, विषयाच्या गरजेमुळे दक्षिण भारतात खूप भटकंती झाली. २००५-०६ पासून प्रत्यक्ष पेंटिंग करायला सुरुवात केली. उमाताईंना विशेषकरून अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रांची आवड आहे, तर विरुपाक्ष यांना संगीताची आवड आहे. शास्त्रीय संगीत ऐकायला त्यांना मनापासून आवडतं. येत्या मार्चमध्ये दोघांच्या लग्नाला ४७ र्वष पूर्ण होतील आणि विरुपाक्ष म्हणतात त्यानुसार, साहित्य, संगीत, कला अशा भक्कम प्लॅटफॉर्मवर दोघेही उभे आहेत..

निमा पाटील nima_patil@hotmail.com