आनंद वाटूनच उपभोगायचा हे सुधीर निरगुडकर यांचं तत्त्व. आपल्या मिळकतीचा जास्तीत जास्त हिस्सा गरजूंना दान करण्यासाठी ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’ या ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. गेली चार दशकं हा दानयज्ञ शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला व संगीत, अध्यात्म आदी क्षेत्रात अव्याहतपणे सुरू आहे.

ही गोष्ट १९७६-७७ ची. व.पुं.च्या कथाकथनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी त्यांच्या खास शैलीत काळजाला हात घालणारी एक कथा सांगितली. गोष्टीतल्या मुलीच्या बाबांना तिला महाविद्यालयात पाठवायचं होतं. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मोठय़ा आशेने श्रीमंत नातेवाईकांकडे गेल्यावर त्याने मदत न करता उलट अवहेलनाच केली.. अशी ती गोष्ट ऐकून सर्व श्रोते सुन्न झाले, हेलावून गेले आणि अचानक व. पु. म्हणाले, गोष्टीतला गरीब बाबा आज इथे उपस्थित आहे. कोण करेल का त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी हजार रुपयांची मदत? एक अवघडलेली शांतता..आणि काही क्षणातच एक तरुण मुलगा उठला आणि म्हणाला, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत, पण पुढच्या २/३ महिन्यांत मी तेवढे पैसे कमवून देईन..’ खरं तर त्या मुलाने स्वत:ची महाविद्यालयाची फीदेखील उसने पैसे घेऊन भरलेली. पण आत्मविश्वास उदंड. थोडय़ाच दिवसात त्याच्या इंजिनीयरिंगच्या शेवटच्या परीक्षेचा निकाल लागला. लगेचच त्याला छोटी छोटी कामंही मिळाली आणि दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

गोरगरिबांविषयीची कणव अशी रक्तातच असलेल्या या मुलाचं नाव सुधीर गणेश (राजाभाऊ) निरगुडकर. पुढे त्याने बांधकाम व्यवसायापासून हिरे उद्योगापर्यंत आणि शेतीपासून केटरिंगपर्यंत अनेक व्यवसाय केले. भरघोस यश मिळवलं. कमाईच्या पहिल्यावहिल्या कामापासूनच मिळकतीचा जास्तीत जास्त हिस्सा गरजूंना दान करण्यासाठी ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना केली आणि एका दानयज्ञाला प्रारंभ झाला. तेव्हापासून जवळजवळ चार दशकं हा यज्ञ शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला व संगीत, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत अव्याहतपणे सुरू आहे.

अडल्या-नडल्यांना मदत करण्याची पहिली गुढी राजाभाऊ व लीलाताईंनी (आई-वडील) १९४६ मध्ये दादरच्या विसनजी चाळीतील आपल्या दीडखणी जागेत उभारली. राजाभाऊंच्या बेताच्या मिळकतीत घरातल्या चार माणसांबरोबर एक शिकणारा विद्यार्थी आणि मुंबईत उपचारांसाठी आलेल्या गावाकडचा एखाददुसरा रुग्ण कायम मुक्कामाला असे. एक वेळ घरातल्या मुलांना कमी पडलं तरी चालेल, पण पाहुण्यांची गैरसोय होता कामा नये ही घराची शिस्त होती. घरातल्या एकुलत्या एक पलंगावर पाहुणा रुग्ण झोपायचा आणि मुलं खाली सतरंजीवर नाही तर गॅलरीत.

आपल्या घराचं हे वेगळेपण सुधीरच्या मनात लहानपणीच वसलं. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही आईवडिलांनी केलेली कर्करोग रुग्णांची शुश्रूषा डोळ्यांसमोर असल्याने ‘फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी कर्करोग रुग्णांना भरीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेपासून केमोथेरपीपर्यंत सर्व खर्चाची जबाबदारी घेऊन आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलेय. याचबरोबर रुग्णांचं समुपदेशन व मानसोपचार सेवा देण्यासाठीही मदत देण्यात आलीय, येतेय.

आळंदीजवळील फुलगावचा सुधीर निरगुडकरांचा संपर्क आला तो त्यांच्या शेतकरी मामामुळे. या फुलगावात धोत्रे कुटुंबाची एक प्राथमिक शाळा होती. ही शाळा वाढवून गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सरकारकडून परवानगी मिळत नव्हती. मामाच्या इच्छेखातर सुधीर यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि मंत्रालयात असंख्य चकरा मारून, नाना लटपटी-खटपटी करून परवानगी तर मिळवलीच, शिवाय शाळेसाठी दहा एकर जागाही पदरात पाडली. त्यानंतरही शाळा उभारणीसाठी निधी उभा करताना पहिल्या घसघशीत देणगीवर ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’चं नाव होतं. मात्र शाळेला स्वत:चं किंवा ‘फाऊंडेशन’चं नाव लागणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली गेली. १३ जून १९८३पासून ‘हरी उद्धव धोत्रे विद्यालय’ या नावानेच फुलगावमध्ये माध्यमिक शिक्षणाची कवाडं खुली झाली.

शिक्षणाविना विकास अशक्य हे जाणून ‘फाऊंडेशन’ दूरदूरच्या गावातील आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, चपला, पौष्टिक आहार यासाठी मदत देतं. आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. शाळांना भेट देताना सुधीर निरगुडकरांची चौकस नजर हेरते..कुठे सुसज्ज असं गं्रथालय नाही, कुठे प्रयोगशाळा नावापुरतीच आहे, कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नाही.. त्यानुसार त्या त्या गरजांची पूर्तता करण्यात येते. शाळेच्या पक्क्या बांधकामापासून स्वच्छतागृहे, बगीचे, मैदाने, व्यायामशाळा..अशा सर्व सुविधा गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी ‘फाऊंडेशन’ दक्ष असतं.

कबड्डी, मल्लखांब व खोखो या खास भारतीय खेळांचा विकास हे आपल्या संस्कृती संवर्धनाचं एक अंग आहे असा निरगुडकर ‘फाऊंडेशन’चा विश्वास आहे. म्हणूनच या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्त्या व इतर मदत देण्यात ‘फाऊंडेशन’चा पुढाकार असतो.

गरजू व्यक्ती मदतीसाठी ‘फाऊंडेशन’कडे येतच असतात, पण कित्येक वेळेला ‘फाऊंडेशन’च चांगली कामं शोधून, त्यांना मदत करतात. अष्टविनायक मंदिराजवळच्या प्रसाधनगृहांबाबत असंच घडलं. मुंबई महापालिकेतील पु. मा. काळे व काही सेवानिवृत्त अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी ‘अष्टविनायक यात्रा सुविधा प्रकल्प’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुधीर निरगुडकरांवर सोपवली. हा प्रकल्प अवघ्या दहा महिन्यांत आकाराला आला. यातील मोरगावच्या सर्वात प्राचीन अशा मंदिरातील स्वच्छता-सुविधांची व्यवस्था पूर्णपणे निरगुडकर ‘फाऊंडेशन’तर्फे करण्यात आलीय.

अष्टविनायक प्रकल्प मार्गी लागल्यावर वडिलांच्या अंतिम इच्छेनुसार निरगुडकर कुटुंबीयांनी तुळापूरचं श्री संगमेश्वर मंदिर व धर्मवीर संभाजी राजे यांची समाधी व सभोवतालचा परिसर यांच्या कायापालटाची जबाबदारी स्वीकारली व पार पाडली. ज्यामुळे तुळापूरचं ऐतिहासिक महत्त्व जगाच्या नजरेसमोर आलं.

एखाद्या गोष्टीचा प्रामाणिक ध्यास घेतला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा शक्य होतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुधीर निरगुडकरांचा ‘अनाहत यात्रा’ हा प्रकल्प. या प्रकल्पासाठी आपल्या २०/२२ पिढय़ांची माहिती मिळवताना त्यांनी  संपूर्ण भारत उभा-आडवा पालथा घातला आणि अथक प्रयत्नांनी पूर्वजांची साडेनऊशे वर्षांची माहिती शोधली. ही अनाहत यात्रा सफल संपूर्ण झाल्यावर शोधलेल्या सर्व निरगुडकरांना वर्षांतून किमान दोनदा म्हणजे वाढदिवस, गुढीपाडवा आदी निमित्ताने शुभेच्छापत्रं पाठवण्याचा त्यांनी वसा घेतला. का, तर जगभरातील साडेचारशे निरगुडकरांशी जोडलं गेलेलं आपुलकीचं नातं टिकून राहावं म्हणून. निरगुडकर कुटुंब कलाप्रेमी आहे. आपल्या घरी एखाद्या गुणी कलाकाराचा कार्यक्रम ठेवायचा आणि शंभर- सव्वाशे परिचितांना त्यासाठी बोलवायचं हा या मंडळींचा छंद आहे. पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पं. सी. आर. व्यास, पं. प्रभाकर कारेकर अशा ज्येष्ठ कलाकारांपासून पं. संजीव अभ्यंकर, अश्विनी भिडे-देशपांडे, पं. गणपती भट, आरती अंकलीकर अशा आजच्या पिढीतील दमदार गायकांपर्यंत अनेक स्वरवंतांच्या मैफिली त्यांच्या वास्तूत रंगल्या आहेत.

गाण्याचं आणि देण्याचं सोडलं तर सुधीर निरगुडकरांना दुसरं कुठलंही व्यसन नाही. आनंद वाटूनच उपभोगायचा हे त्यांचं तत्त्व. या सगळ्यांसाठी त्यांना मिळणारी पत्नीची- चारुशीलाची साथ लाखमोलाची. तिच्याविषयी बोलताना त्यांचे शब्द होते.. सासूसासऱ्यांकडून मिळालेला कमीत कमी गरजांचा संस्कार तिने मुलांना दिल्यामुळेच मला निरगुडकर ‘फाऊंडेशन’चा डोलारा उभा करता आला. जेथे राघव तेथे सीता हा तिचा धर्म आहे.

निरगुडकर दाम्पत्याच्या या विचारसरणीमुळे पुढील पिढीलाही दानाचं महत्त्व पुरेपूर उमगलंय. वाढदिवस साधेपणाने करून ते पैसे ‘फाऊंडेशन’ला द्यायचे हे तर त्यांच्या मुलांनी- मंदार व मंजिरीने समज आल्यापासूनच सुरू केलंय. कमवायला लागल्यापासून तर गेली ७/८ वर्षे ही दोघं व सून प्रियंका आपल्या मिळकतीतील ठरावीक हिस्सा नियमितपणे अन्नदानासाठी खर्च करत आहेत.

आतापर्यंत सुधीर निरगुडकरांची मराठी व इंग्रजीत मिळून एकूण दहा पुस्तकं प्रकाशित झालीत. या पुस्तकांच्या मानधनाची रक्कमही अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतून पुस्तकं बनविण्याच्या कामी येते.

निरगुडकर ‘फाऊंडेशन’ने गेल्या ४० वर्षांच्या वाटचालीत अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला, पण कुठेही आपल्या नावाच्या पाटय़ा लावाव्यात असा विचारदेखील त्यांच्यातील कोणाच्याच मनाला शिवला नाही. हजारो विद्यार्थ्यांना, रुग्णांना आधार देण्यात आला- त्यांच्या मनात आपलं नाव जपलं जाईल याची या परिवाराला खात्री आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती’ या पुस्तकातील समर्थाचं एक वचन हेच तर सांगतं..

भूमंडळी विख्यात व्हावे।

कीर्तिरूपी उरावे।

ऐसी कीर्ती करून जावे।

निस्पृहपणे विख्यात व्हावे॥

आणि हेच निरगुडकर कुटुंबाच्या जगण्याचं सूत्र आहे.

 

– संपर्क ईमेल : info@nirgudkar.in n
wagle.sampada@gmail.com