शिबिरांमार्फत एक लाख बाटल्या रक्त जमा करणारे, रोज शंभर गरजू निवासी रुग्णांना तीन वेळचं खाणं पुरवणारे, गरजूंना आर्थिक साहाय्यासाठी मदत करणारे ७२ वर्षीय दानशूर आणि सेवाभावी राजकुमार (काका) खिंवसरा.  तृप्तीची तीर्थोदके ठरलेल्या या काकांविषयी..

लहानपणी एक गोष्ट वाचली होती. एक गाव होतं. एकदा जोराचा पाऊस अन् वादळ सुरू झालं. सोबत विजांचा कडकडाट. लोक घाबरले आणि गावातीलच एका मंदिरापाशी आडोशाला गेले. आपल्या गावावर असं संकट का आलं असावं.. चर्चा सुरू झाली. या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की आपल्यात कुणी तरी एक पापी आहे, म्हणून निसर्ग आपल्यावर कोपलाय. त्याला इथून दूर केलं तरच हे वादळ थांबेल. या समुदायात एक गरीब पण सत्त्वशील माणूस होता. स्वत:ला सज्जन समजणाऱ्या धनिकांनी त्याला एकमताने पापी ठरवून मंदिराच्या बाहेर काढलं. तो पुरेसा दूर गेल्यानंतर विजेचा एक प्रचंड लोळ मंदिरावर कोसळला आणि सर्व तथाकथित सज्जन क्षणात गारद झाले. त्या समुदायात जोपर्यंत तो एक पुण्यात्मा होता तोपर्यंत वीज कोसळण्याचं धाडस करत नव्हती. त्याच्या पुण्याईने सर्वाचं रक्षण होत होतं. तो बाहेर जाताच विजेने आपला डाव साधला.
ही गोष्ट अनेक र्वष मनात घर करून होती. वाटायचं, आपल्या पुण्याईने समाजाचं रक्षण करणारी माणसं खरोखर असतात का? औरंगाबाद शहरातील एक जैन व्यापारी राजकुमार (काका) खिंवसरा यांना भेटल्यावर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपल्या सेवाभावी वृत्तीने व दानशूरपणाने हा ७२ वर्षीय राजकुमार औरंगाबादमधील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल व या हॉस्पिटलचीच ‘दत्ताजी भाले रक्तपेढी’ येथे येणाऱ्या असंख्य गरीब ग्रामीण रुग्णांचा तारणहार ठरलाय. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला स्थापनेपासून जोडलेले डॉ. तुपकरी हे काकांच्या आयुष्यात आले आणि त्यांच्या हृदयातील निरपेक्ष सेवेचा झरा वाहता झाला. ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची. हॉस्पिटल आणि रक्तपेढी दोन्हींची नुकतीच सुरुवात झाली होती. डॉ. तुपकरींनी काकांना रक्तपेढीच्या उभारणीत सामील करून घेतलं आणि काकांनी या कामात स्वत:ला झोकून दिलं. पहिल्या महिन्याभरातच घरोघरी फिरून तीन लाख रुपये (त्या काळी) जमवून दिले आणि त्यानंतर रक्तदान शिबिरांचा धडाका सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ४०/४५ बाटल्या रक्त जमा झालं. मग आपल्या घरी, दुकानांत, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, महाविद्यालयांत, बाजारपेठेत जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे त्यांनी शिबिरांचं आयोजन केलं आणि रक्तपेढीसाठी एक सशक्त चळवळ उभी केली.
हळूहळू लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण झाली आणि शिबिरांतील बाटल्यांची संख्या वाढत वाढत शंभरावर पोहचली. काकांनी वर्षांला ७० ते ७५ याप्रमाणे सलग २१ वर्षांत दीड ते दोन हजार कॅम्प एकटय़ाच्या हिमतीवर घेतले आणि लाखभर बाटल्या रक्त एकहाती जमा केलं. आणीबाणीच्या काळात संघपरिवारातील जे कुटुंबप्रमुख तुरुंगात होते त्यांची घरं पुरी दोन र्वष अविश्रांत कष्ट करून जगवणाऱ्या दत्ताजी भाले यांचं नाव भूषवणारी ही रक्तपेढी आज महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची रक्तपेढी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र, गोवा, गुजरात या तीन राज्यांत नॅट सुविधा (हिपॅटेटिस बी व सी आणि एच्. आय. व्ही. या रोगांच्या विषाणूंची लक्षणे प्रत्यक्ष दिसण्याआधी (विंडो पीरियडमध्ये) ओळखण्याची टेस्ट) उपलब्ध असणारी ही महराष्ट्रातील पहिली रक्तपेढी आहे. सरकारच्या आदेशानुसार थॅलसेमियाच्या सर्व रुग्णांना कोणत्याही रक्तपेढीतून रक्त नि:शुल्क मिळतं; परंतु डॉक्टरांची फी व रक्त चढवण्याचा आकार यासाठी प्रत्येकाला महिन्याकाठी हजार रुपयांचा भरुदड पडतोच. ‘दत्ता भाले रक्तपेढी’त नोंदणी केलेल्या अशा ९४ थॅलसेमिया रुग्णांपैकी २५ गोर-गरिबांचे पैसे (२५ हजार रुपये) काका दरमहा स्वत:च्या खिशातून देतात. उर्वरित रुग्णांसाठीही दाते शोधून इथल्या सर्व थॅलसेमिया रुग्णांशी रक्ताचं नातं जोडण्याचा त्यांचा मानस आहे.
रक्तपेढीची रक्त गोळा करण्याची घडी व्यवस्थित बसल्यावर गेली दोन, अडीच वर्ष काकांनी आपलं लक्ष डॉ. हेडगेवार रुग्णालयात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांच्या अन्न व्यवस्थेवर केंद्रित केलंय. मराठवाडय़ाच्या जवळजवळ सर्व जिल्ह्य़ांतून अत्यंत गरीब लोक इथे येतात. उपचारासाठी कधी कधी त्यांना इथं राहावं लागतं पण पैसे अपुरे असल्याने ते एक तर वडापाव खाऊन दिवस ढकलत नाही तर उपाशी राहत. हे पाहून त्यांच्यासाठी घरून डबे आणण्याची योजना प्रथम प्रभावती खनाळे, अर्चना वैद्य व मालती करंदीकर या सेवाव्रतींनी सुरू केली. त्यानंतर हे व्रत काकांनी हाती घेतलं.     एक वर्षभर त्यांनी शंभर घरांमधून डबे गोळा करून पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर घरोघरी जाऊन डबे गोळा करणं त्रासदायक ठरल्याने, त्यांनी आपल्या कल्पनेपलीकडचं शिवधनुष्य उचललं. ते असं की शंभर-सव्वाशे गरजू निवासी रुग्णांना त्यांनी तीन वेळचं खाणं (नाश्ता आणि दोन वेळचं जेवणं) स्वत: बनवून घ्यायला आणि ते त्या रुग्णांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली.
या प्रकल्पासाठी काकांची आधीच घेतलेल्या एका बैठय़ा घराची जागा कामी आली. जेवण बनवण्यासाठी त्यांनी एक गरीब कुटुंब (आई, मुलगा व सून) नेमलंय. या कुटुंबाची आपल्या अन्नदात्याप्रति एवढी निष्ठा की, ही जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी एकही दिवस रजा घेतलेली नाही.
या भोजनव्यवस्थेसाठी लागणारे सर्व जिन्नस म्हणजे भाज्या, वाणसामान आदी काका स्वत: खरेदी करतात. दर्जात जराही तडजोड करत नाहीत. सर्व पदार्थ शुद्ध तुपात बनवले जातात. त्यांनतर हे जिन्नस आपल्या गाडीच्या डिकीत भरून ती गाडी स्वत: चालवत ते हॉस्पिटलमध्ये ठरावीक वेळेला येतात आणि त्यानंतर सेवाव्रतींच्या मदतीने सढळ हस्ते त्या अन्नाचं वाटप होतं. ज्यात रुग्णांच्या बरोबरचा नातेवाईकही तृप्त होतो. या अन्नदानासाठी दरमहा ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. पण या नेक कामाची ख्याती इतकी पसरलीय की, दरमहा ५० ते ६० हजार रुपये जमा होतात. लागेल ती तूट भरून काढण्यासाठी काका आहेतच. या सेवेसाठी पत्नी सरलाताई व मुले, सुना यांचा पाठिंबा तर आहेत. पण त्यांनी विशेष उल्लेख केला तो मांगीलाल चंडालिया या आपल्या मित्राचा. त्यांनी आवर्जून सांगितलं की, तो लक्ष्मणासारखा पाठीशी आहे म्हणूनच हे अवघड काम सुकर झालंय.
काकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे त्यांची शहरातील सहा दुकानं; परंतु ते स्वत: त्यात जातीने कमी लक्ष घालतात. काकांचं म्हणणं असं की, चांगलं काम घडवून आणण्यासाठी त्यांना ईश्वरी संकेत मिळतात. यासाठी त्यांनी अलीकडेच घडलेली एक घटना सांगितली. गेल्या सप्टेंबरमध्ये मराठवाडय़ातील औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ात पावसाने जो हाहाकार माजवला त्या काळात एके दिवशी त्यांच्या एका मित्राचा ‘इस्कॉन’ या संस्थेतून फोन आला. ही संस्था औरंगाबादमधील महानगपालिकेच्या शाळांतील मुलांना रोज खिचडीचं वाटप करते. पुरामुळे शाळा बंद झाल्याने बनलेल्या ८०० किलो खिचडीचं काय करायचं हा त्यांच्यापुढील प्रश्न होता. काका तेव्हा हॉस्पिटलच्या आवारातच होते. ते म्हणाले, ‘मी जास्तीत जास्त शंभर-सव्वाशे किलो खिचडी वाटू शकतो’ तरीही काही तरी प्रयत्न करून पाहू या म्हणून ते हॉस्पिटलच्या संचालकांना भेटले. तिथे पूरग्रस्तांविषयी चर्चा सुरू होती. ती ऐकताच खिचडीचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं. काही वेळातच ३-४ पूरग्रस्त गावांतील आबालवृद्धांनी कंबरभर पाण्यात उभं राहून ती गरमागरम खिचडी खाल्ली. एवढंच नव्हे तर सर्वस्व गमावून बसलेल्या त्या गावांमधील प्रत्येक गरीब कुटुंबाला पुढचे १५ दिवस पुरेल एवढा शिधा, एक चादर व चटई एवढी सामग्री मिळेल अशी व्यवस्थाही त्यांनी केली.
सकाळी ८ ला रुग्णांना नाश्ता दिल्याापासून संध्याकाळी साडेसहाला रात्रीचं जेवण देईपर्यंत काका हॉस्पिटल, रक्तपेढी व जेवण बनवण्याची जागा या तीन ठिकाणीच भिरभिरत असतात. आज त्यांची सत्तरी उलटलीय, रक्तदाब व मधुमेह सांगाती आहेत. तरीही दिवसभर भटकताना व हॉस्पिटलचे जिने वरखाली करताना त्यांना थकायला होत नाही. अन्नवाटपाचं काम झालं की कधी ते वेटिंग रूममध्ये बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये गुपचूप जाऊन तरी बसतील किंवा बिलिंग डिपार्टमेंटमध्ये एका कोपऱ्यात उभे राहतील. तिथे सुरू असलेल्या दबक्या चर्चामधून त्यांचे कान गरिबांची नड टिपत राहतात. मग कोणा गरजवंताच्या बिलातील पाच-दहा हजार परस्पर भरले जातात किंवा कोणाच्या औषध-इंजेक्शनांची व्यवस्था केली जाते. मात्र या दानाचं श्रेय हॉस्पिटलला देऊन त्याचं कर्तेपण स्वत:कडे येणार नाही याची खबरदारी घेण्यास ते चुकत नाहीत. केवळ याच गोष्टीचं नव्हे तर आपल्या सर्व पुण्यकार्याचं श्रेय ते डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला देतात. म्हणतात, ‘माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशी सर्वत्र संचार करण्याची संधी मिळाली म्हणूनच थोडी फार सेवा मला करता आली.’
एकदा एक गंभीर आजाराने ग्रासलेल्या तान्ह्य़ा बाळाच्या आजी-आजोबांनी मुलाला व सुनेला, होणाऱ्या खर्च व त्रासापायी उपचार थांबण्याविषयी सुचवलं. काका म्हणाले, आधी मी डॉक्टरांशी बोलतो, मग बघू या. डॉक्टरांनी सांगितलं की, इलाज आहे पण त्यासाठी
६० हजार रुपये खर्च येईल. काकांनी त्याच दिवशी तेवढी रक्कम उभी केली आणि त्या बाळाचे प्राण वाचले. अशा प्रकारे तीन लेकरांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून सोडवलंय. म्हणूनच ते या वयातही शांत, समाधानी आहेत. त्यांना पाहताना कवीवर्य बा.भ. बोरकर यांचे शब्द आठवत राहतात..
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र वाऱ्यासारखे
संपर्क – ९६७३९९८२८२
engapp.waluj@yahoo.com n
waglesampada@gmail.com