एलपीजीवरील सबसिडी मर्यादित झाल्यावर विजेवर चालणाऱ्या स्वयंपाक साधनांची विक्री वाढली. पण विजेवरही सबसिडी आहे आणि तीही केव्हाही काढली जाऊ शकते. वीज आपल्याला इतर अनेक कामांसाठी हवी आहे, त्यामुळे स्वयंपाकाच्या ऊर्जेची मागणीही विजेवर टाकायची का, हा विचारही केला पाहिजे.
जागतिक मान्यतेनुसार स्वयंपाकासाठी माणशी रोज किमान २५० किलोकॅलरी उष्णता लागते. एलपीजी शेगडीची कार्यक्षमता ६० टक्के असते. म्हणजे रोज माणशी साधारण ४२० किलोकॅलरी ऊर्जा एलपीजीच स्वरूपात उपलब्ध व्हायला हवी. दर १ किलोग्रॅम एलपीजीमध्ये ११,००० किलोकॅलरी ऊर्जा असते. म्हणजे स्वयंपाकासाठी दररोज माणशी ४० ग्रॅम एलपीजी किंवा वर्षांला माणशी किमान १५ किलोग्रॅम एलपीजीची गरज आहे. एका घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये १४.२ किलोग्रॅम गॅस असतो. म्हणजेच जागतिक मान्यतेनुसार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी माणशी किमान एक सिलिंडर एलपीजीची आवश्यकता केवळ दैनंदिन स्वयंपाकासाठी आहे. सणासुदीचा किंवा पाहुण्यांच्या सरबराईसाठीचा जादा स्वयंपाक, अंघोळीचे पाणी तापवणे, इ. चा विचार करता, वार्षिक गरज आणखी वाढते.
एलपीजीवरील सबसिडी मर्यादित झाल्यावर विजेवर चालणाऱ्या स्वयंपाक साधनांची विक्री वाढली. पण विजेवरही सबसिडी आहे आणि तीही केव्हाही काढली जाऊ शकते. वीज आपल्याला इतर अनेक कामांसाठी हवी आहे, त्यामुळे स्वयंपाकाच्या ऊर्जेची मागणीही विजेवर टाकायची का, हा विचारही केला पाहिजे.
अमर्यादित सबसिडीमुळे एलपीजीवर चालणारे गॅस गिझर लोकप्रिय झाले होते. पण आता ते परवडत नाही. सौरबंब हा चांगला पर्याय आहे. योग्य रचनेच्या सौरबंबाची निवड केली आणि अंघोळीच्या सवयी गरम पाण्याच्या उपलब्धतेशी जुळवून घेतल्या, तर यात काही अडचण येत नाही. पण सर्वच घरांना वर्षभर दिवसा कडक ऊन पडेल अशी स्वत:ची जागा उपलब्ध नाही, त्यामुळे सौरबंबाचा वापर सरसकट सगळीकडे होणार नाही. लाकडावर चालणाऱ्या पारंपरिक बंबांच्याच धर्तीवर काम करणारे पण अधिक कार्यक्षम असे बंब आता उपलब्ध आहेत. योग्य रचनेचा बंब वापरला, तर अक्षरश: घरातल्याच वर्तमानपत्राच्या रद्दीवरही कुटुंबातील सर्वाच्या अंघोळीला पुरेल इतके पाणी तापवता येते.
एलपीजीचा स्वयंपाकासाठी वापर जगभरात मोठय़ा प्रमाणावर केला जातो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वापराची सुलभता. एलपीजी पटकन पेटतो व पटकन विझवता येतो. ज्वाळेची तीव्रता आपण सहजगत्या कमी-जास्त करू शकतो. त्यातून कोणतेही अपायकारक प्रदूषण होत नाही. स्वयंपाकाचे काम सोपे करणारी इतरही साधने उपलब्ध आहेत. उदा. सराई स्वयंपाक प्रणाली.
सराई स्वयंपाक प्रणाली हा वाफेवर चालणारा स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे. यामध्ये लाकडी कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. शास्त्रशुद्ध रचनेमुळे ५-६ व्यक्तींसाठी डाळ-भात-भाजी शिजवायला फक्त १०० ग्रॅम कोळसा लागतो. मंद आचेवर शिजत असल्याने चवदार व आरोग्यदायक जेवण मिळते. कोळसा साधारण ३० मिनिटांमध्ये आपोआप विझून जातो. तासाभरात अन्न पूर्ण शिजते. स्वयंपाक चालू आहे तोवर इतर कामे करता येतात. कुकरकडे लक्ष द्यावे लागत नाही. तासाभरानंतरही कुकर उघडला नाही, तरी अन्न करपत वगैरे नाही. तर ताजे व गरम राहाते. अशा अनेक फायद्यांमुळे तसेच आकर्षक रूपामुळे हा कुकर लोकप्रिय आहे.
रोज दोन वेळा सराई स्वयंपाक प्रणालीचा वापर केला, तर आपली रोजंची साधारण १०० ग्रॅम एलपीजीची गरज २०० ग्रॅम कोळशाने भागवता येते. वाचवलेल्या एलपीजीची सबसिडीविना किंमत साधारण रु. ८-९ होते, तर लागणाऱ्या कोळशाची किंमत साधारण रु. ३-५ होते. शहरी भागात कोळसा कोढून आणायचा, लाकडी कोळशाचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असे प्रश्न पडतील. परंतु सराई स्वयंपाक प्रणालीसाठी काडीकचऱ्यापासून बनवलेला पर्यावरणपूरक कोळसाही वापरता येतो. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कोळशाची शहरातील उपलब्धता वाढवण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. यातून रोजगारनिर्मितीचा हेतूही साध्य होईल.
आणखी एक पर्याय म्हणजे सौर कुकर, मात्र यासाठी जिथे कडक ऊन पडेल अशी स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. सकाळी लवकर खाऊन-पिऊन, डबा घेऊन बाहेर पडण्याच्या जीवनशैलीशी सौर कुकरचा मेळ बसत नाही. पण या मर्यादा नसतील तिथे सौर कुकर नक्कीच फायदेशीर आहे.
पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशनच्या वेबसाइटवर (पीसीआरए ऑर्ग) इंधनबचतीचे अनेक सोपे उपाय दिलेले आहेत. उदा. भांडे शेगडीवर ठेवल्यानंतर गॅस पेटवणे, प्रेशरकुकरच्या विनाकारण शिट्टय़ामागून शिट्टय़ा न काढणे, इ. स्वयंपाक करताना अशा युक्तया वापरल्या, तरी रोज किमान १० ते २० ग्रॅम एलपीजीची बचत होऊ शकेल.
आता खनिज इंधनांच्या किमती आणि उपलब्धतेची अनिश्चितताही वाढणार आहे. दूरदृष्टीने विचार करून घरगुती बायोगॅस संयंत्र हाही पर्याय विचारात घ्यायला हवा. शहरी मध्यमवर्गीय घरात रोज ४०० ग्रॅम ओला कचरा (स्वयंपाकघरातील भाज्यांची देठे, फळांची साले, ताटातील खरकटे इ.) निघतो. यापासून घरच्या घरी साधारण ४० ग्रॅम एलपीजीशी समतुल्य इतका बायोगॅस मिळू शकतो, असे बायोगॅस संयंत्र स्वत:च तयार करता येते आणि त्याला साधारण रु. १०-१२ हजार इतका खर्च येतो. संयंत्रासाठी स्वयंपाकघराच्या बाहेर १ मीटर x १ मीटर इतकी मोकळी जागा लागते. बहुमजली इमारतीत स्वयंपाकघराजवळ बाल्कनी किंवा वर गच्ची असेल, तर तिथे हे संयंत्र बसवता येते. बायोगॅससाठी एलपीजीच्या शेगडीसारखीच पण वेगळी शेगडी लागते. अशा संयंत्रावर एक बर्नरची बायोगॅसची शेगडी साधारण अर्धा तास चालू शकेल. रोजचे किमान चहा-नाश्ता इतपत काम तरी या यंत्रणेवर करता येईल. आता आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. घरगुती बायोगॅस संयंत्रामुळे यासाठीचा खर्चही वाचतो. एलपीजीची किंमत जशी वाढेल तशी आपली बचतही वाढणार आहे. आपल्या घरातील ओल्या कचऱ्यात भर घातली (उदा. शेजाऱ्यांचा ओला कचरा, भाजी-फळे विक्रेत्यांकडून आणलेला कचरा, हिरवी पाने, इ.) आणि पुरेशी जागा असेल, तर मोठे बायोगॅस संयंत्रही उभे करता येते. जितके मोठे संयंत्र तितकी एलपीजीची जास्त बचत होते. (पूर्वार्ध)