अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हर ही स्पिरिट रोव्हरची यंत्रमानवरूपी जुळी गाडी आहे. तिचे शास्त्रीय किंवा तांत्रिक नाव  मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर- बी (किंवा एम ए आर- ए) बी आहे. तिने ७ जुलै २००३ रोजी पृथ्वीवरून आपल्या प्रवासास सुरुवात केली आणि २५ जानेवारी २००४ रोजी ती मंगळावर उतरली. त्या वेळी तिथल्या वेळेप्रमाणे दुपारचा सव्वा वाजला होता. स्पिरिट रोव्हरसारखेच तिचा कार्यकाळसुद्धा ९० सोल होता (एक सोल म्हणजे मंगळावरचा एक दिवस. याची चर्चा आपण मागे केली होती.) पण हा गेली साडेनऊ वर्षे मंगळावर कार्य करत आहे. या कालावधीत तिने मंगळावर जवळजवळ ३७ किलोमीटर प्रवास केला आहे.
अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हरला मंगळाच्या सपाट भागावर उतरवण्यात आले होते ज्या ठिकाणी ही रोव्हर गाडी उतरली ते योगायोगाने एक अशनी पडल्यामुळे तयार झालेले विवर होते ज्याबद्दल आपल्याला पूर्वकल्पना नव्हती. या विवराचा व्यास २२ मीटर आहे आणि ज्या ठिकाणी रोव्हर गाडी उतरली होती तिथून विवराची कड १० मीटर दूर होती. या विवराला ‘होल इन वन’ असे नाव देण्यात आले. गोल्फ या खेळात जेव्हा खेळाडू एका फटक्यात आपला चेंडू गोलात टाकतो तेव्हा त्याला ‘होल इन वन’ म्हणतात, त्यावरून हे नाव देण्यात आले, पण नंतर या विवराला ‘ईगल क्रेटर’ असे नाव दिले.
अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हरने सर्वप्रथम आपल्याला त्या संपूर्ण भागाचे पॅनोरॅमिक चित्र आणि या विवराच्या भागातील मातीच्या आणि दगडांच्या नमुन्यांचे विश्लेषण करून त्याची माहिती आपल्याला पाठवली. ही सर्व माहिती मंगळावर हेमेटाईट खनिज आणि कधीकाळी असलेल्या पाण्याच्या अस्तित्वाबद्दल काही ठोस गृहीते करण्यास उपयोगी ठरली. कारण रोव्हरला इथल्या भागात अनेक दगड विखुरलेले दिसते आणि त्याचबरोबर विवरातील मातीत काही राखाडी रंगाचे तर काही लाल रंगांचे कण दिसले. ही निरीक्षणे शास्त्रज्ञांना आश्चर्य चकित करणारी होती. यात पापुद्रय़ांसारखे दगड होते. यावरून असा निष्कर्ष निघू शकतो, की हे दगड ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे असतील नाही तर हवेच्या झोताबरोबर आले असतील किंवा वाहत्या पाण्याने आलेल्या मातीचे एकावर एक थर साचून हे पापुद्रे तयार झालेले असावेत. या दगडाची जाडी सुमारे १० सेंटिमीटर अगदी बोटांइतकीच दिसून आली. या विवराच्या जवळ असलेल्या एंडय़ुरन्स या विवराकडे रोव्हरला पाठवण्यात आले तिथे तो डिसेंबर २००४ पर्यंत होता.
मंगळाच्या वातावरणात प्रवेश करताना यानाचे वातावरणाच्या घटकांशी अति घर्षण होऊन तापमान खूप वाढते आणि त्या तापमानापासून यानाच्या बचाव करता असे उष्मा कवच लावलेले असते जे यानाची गती कमी झाल्यावर एकीकडे फेकून दिले जाते, तर त्याला मग जिथे मंगळावर उतरतेवेळी त्याचे उष्मा कवच पडले होते तिथे रोव्हर पाठवण्यात आले. वाटेत त्याला एक उल्का पाषाण दिसला. एका ग्रहावर असा उल्का पाषाण सापडण्याची ही पहिलीच वेळ होती.
स्पिरिट रोव्हरसारखेच अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हरपण अडकून बसले होते. एप्रिल २००५च्या शेवटी याची सहा चाके वाळूच्या ढिगाऱ्यात अडकली. रोव्हरच्या प्रत्येक चाकाला फिरवण्याकरिता वेगळी मोटार असते आणि या वेळी असे वाटत होते की ती कधीच निघणार नाहीत. मग याच्या प्रतिकृतीची पृथ्वीवर तशी अवस्था तयार करण्यात आली. आणि त्यावरून अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हरला काढण्याची युक्ती शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहा आठवडय़ांच्या अथक प्रयत्नाअंती शास्त्रज्ञांना त्याला बाहेर काढण्यात यश आले. त्यांनी त्यासाठी रोव्हरची चाके एका वेळी फक्त काही सेंटिमीटरच पुढे जातील असे संदेश रोव्हरला पाठवण्यास सुरुवात केली आणि शेवटी रोव्हरची या वाळूतून सुटका झाली.जून २००७च्या शेवटी मंगळावर धुळीचे मोठे वादळ आले होते. त्याचा तडाखा दोन्ही रोव्हर (स्पिरिट आणि अ‍ॅपॉच्र्युनिटी) यांना बसला होता. या धुळीच्या वादळाची तीव्रता एका महिन्यात इतकी वाढली की जवळपास ९९ टक्के सूर्यप्रकाश या धुळीने झाकून टाकला होता. याचा परिणाम असा झाला, की या रोव्हरमधल्या बॅटरी (विजेरी) विद्युतभारित (चार्ज) होत नव्हत्या. त्यामुळे शेवटी त्यांच्या यंत्राना झोपवण्यात आले म्हणजे तात्पुरते त्यांना बंद करण्यात आले. कारण एकदा का या विजेरी पूर्ण उतरल्या असत्या (डिस्चार्ज) तर त्यांना परत विद्युतभारित (चार्ज) करणे अवघड गेले असते. त्यामुळे फक्त एक छोटी यंत्रणा प्रकाशाची तीव्रता मोजत होती. मग ७ ऑगस्ट रोजी वादळाची तीव्रता कमी होऊ लागली आणि २१ ऑगस्टपर्यंत अ‍ॅपॉच्र्युनिटीच्या विजेरी पूर्ण विद्युतभारित झाल्या होत्या. गेल्या वर्षी २ जुलै रोजी अ‍ॅपॉच्र्युनिटीने ३००० सोल पूर्ण केले. सध्या तिचा प्रवास दिवसाला २० ते १०० मीटर इतका होत आहे. या ९ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत अ‍ॅपॉच्र्युनिटीने या मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. त्यांनी मंगळावर कधीकाळी पाणी असल्याचे पुरावे आपल्याला पाठवले आहेत. याशिवाय त्यांनी काही खगोलीय निरीक्षणे घेतली आणि सतत मंगळाच्या वातवरणासंबंधी माहिती आपल्याला पाठवत
आहे. अ‍ॅपॉच्र्युनिटीच्या सन्मानार्थ ३९३८२ क्रमांकाच्या लघुग्रहाला अ‍ॅपॉच्र्युनिटी हे नाव देण्यात आले आहे.