आजच्या खाद्यपदार्थाच्या दुनियेत काही पदार्थावर ‘प्रोबायोटिक्सयुक्त’ असे विशेषण लावले जाते. त्याचा नक्की अर्थ काय आणि तो कसा उपयोगी आहे, हाही प्रश्न उभा राहतो. खरे तर १९९० पर्यंत ‘प्रोबायोटिक्स’ (सुजैविके) हा शब्दच प्रचारात नव्हता. पण तो वापरून जपानच्या याकुल्ट कंपनीने एक पेय बनवले आणि युरोपियन देशात ते विक्रीला पाठवले. त्यावर प्रोबायोटिकयुक्त  हा उल्लेख केला. विदेशातील लोक आरोग्यप्रेमी त्यांनी ते उचलून धरले. तेव्हापासून खरा प्रोबायोटिक्सचा सिलसिला सुरू झाला. याआधी लोकांना अँटिबायोटिक्स हा शब्द जास्त परिचयाचा होता. सूक्ष्मजंतूंचा संसर्ग घालवणारा रामबाण उपाय म्हणून ती औषधे लोकप्रिय होती. पण व्याधिकारी (पॅथोजेनिक) बॅक्टेरियाचा मुकाबला आपण आरोग्यवर्धक बॅक्टेरियांनी करू शकतो. हा संदेश खाद्यउद्योगाला या नवीन उत्पादनातून द्यायचा होता. त्यांच्या संदेशाचा लोकमानसावर अनुकूल परिणाम होऊन सर्वात आवडता पदार्थ बनला योगर्ट! त्याखालोखाल हे उपकारी सूक्ष्मजंतू कॅपसूल्सच्या स्वरूपात आणि विविध ब्रँड्समध्ये झळकू लागले.
उपकारी बॅक्टेरियांचे आपल्या पचनसंस्थेतील स्थान जाणून घेण्यासाठी काही माहिती मोलाची ठरेल. पचनसंस्थेत खास करून मोठय़ा आतडय़ात सूक्ष्मजंतूंचा वास आणि त्यांचे शरीरावर अवलंबून याला दीर्घ पूर्वपीठिका आहे. खरं तर बॅक्टेरिया आपल्यावर अवलंबून आहेत. एवढेच नव्हे तर आपणही त्यांच्यावर विसंबून आहोत. त्यामुळे हे परस्परावलंबन आहे. सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीत अनेक परोपजीवी सूक्ष्मजंतूंचे वेगळे अस्तित्व जाऊन त्यांचे अवशेष प्राणीपेशीत मायटोकॉन्ड्रियामध्ये, तर वनस्पतीत क्लोरोप्लास्टमध्ये रूपांतरित झाले, पण पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवाणूंचे (बॅक्टेरियांचे) वेगळे अस्तित्व व परस्परावलंबन अबाधित राहिले.
आपल्या शरीरात जेवढय़ा पेशी आहेत त्याच्या दसपट सूक्ष्मजंतू हे आपल्या आतडय़ात बस्तान मांडून आहेत! तसेच आपल्या पेशीत जेवढी जनुके आहेत त्यांच्या शंभरपट जनुके त्यांच्यात सक्रिय आहेत. प्रत्येक जनुक विशिष्ट गुणवैशिष्टय़ांसाठी गृहित धरले तर सूक्ष्मजंतूंच्या किती गुणवैशिष्ठय़ांची आपल्याला मदत होते याची कल्पना यावी. बॅक्टेरिथॉइड्स, फर्मिक्युट्स, बॅसिली, कॉक्स, क्लोस्ट्रिडियम, कोलाय अशा विविध प्रकारचे बॅक्टेरिया आतडय़ाच्या म्युकोसल आवरणात राहात आहेत. या बॅक्टेरियांचे प्रमाण आहार शैलीनुसार व व्यक्तीवैशिष्टय़ानुसार बदलते असते. बॅक्टेरियांच्या प्रमाणाप्रमाणे व्यक्तिप्रकृतीचे तीन प्रकार सांगता येतील. ते प्रकार आहेत- प्रेव्हेटोला बॅक्टेरिया प्रधान, बॅक्टेरिथॉइड्स प्रधान आणि रुमिनोकॉक्स बॅक्टेरिया प्रधान. पिष्टमय पदार्थ अधिक खाणाऱ्यात प्रेव्हेटोला जातीचे बॅक्टेरिया अधिक तर मांसाहारी व्यक्तीत बॅक्टेरिऑइड्सचे प्रमाण अधिक.
आपल्या आहारात एखादा बदल दीर्घकाळासाठी केला तर त्यामुळे मोठय़ा आतडय़ातील बॅक्टेरियाचा प्रकारही बदलू शकतो. काही व्यक्तींना स्थूलत्व येते तेव्हा त्यांचा आहार जसा जबाबदार असतो तसे आतडय़ातील बॅक्टेरियॉइड्सही काहीअंशी कारणीभूत असतात. या बॅक्टेरिया त्यांनी विघटित केलेल्या स्निग्ध घटकांचे शरीराने शोषण करावे म्हणून काही हार्मोन्स शरीराला बहाल करतात. अशारीतीने अप्रत्यक्षरीत्या ते तुमचे स्थूलत्व वाढायला मदत करतात. त्यासाठी आहार बदलून या सूक्ष्मजंतूंची ‘उपासमार’ करून तुम्ही स्थूलत्वाला रोखू शकता.
मोठय़ा आतडय़ातील उपकारी बॅक्टेरियांची तुलना करायची झाली, तर ती घरातील प्रामाणिक सेवकाशी करावी लागेल. सेवकाला अन्न व निवारा मालकामुळे मिळतो. त्या बदल्यात हवी ती कामे तो करतो. तसेच तो घराचे रक्षणही करतो. हे सेवक बॅक्टेरिया काय कामे करतात तर एक यादी तयार होईल. मुख्यत्वेकरून ते पचन न झालेल्या क्लिष्ट कबरेदकांचे विघटन करून मिळणाऱ्या शर्करांचा ‘बोनस’ शरीराला देतात. त्याच्या सततच्या वाढीमुळे ते अपायकारी सूक्ष्मजंतूंचा ‘सफाया’ करतात. काही बॅक्टेरिया ‘बॅक्टिरियोसीन्स’ नावाची विषद्रव्ये निर्माण करून हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करतात. याचा परिणाम म्हणून अतिसाराचा त्रास होत असेल तर तो कमी होतो. प्रामाणिक बॅक्टेरियांमुळे अन्नातील आयॉन्स आणि पाणी यांचे शोषण व्हायला मदत होते. तसेच कर्करोगकारी पदार्थाचे विघटन करून त्यांना ते निष्क्रिय करतात. बायोटिन व व्हिटॅमिन के सारखी जीवनसत्त्वे सुलभतेने मिळतात. बॅक्टेरियांचा आतडय़ातील थारा अशारीतीने आपल्या पथ्यावर पडतो.
वर वर्णन केलेल्या बॅक्टेरियांचा आपल्या आहारात समावेश करता येईल का आणि त्यांच्या निवडीने पचनसंस्थेच्या व्याधी आणि त्याबरोबरच शरीराचे सर्वागीण आरोग्य सुधारता येईल का या उद्देशाने प्रोबायोटिक्स खाद्यांची आणि पेयांची निर्मिती सुरू झाली. त्यासाठी उद्योगांची पहिली पसंती दुधाच्या लॅक्टोज शर्करेवर वाढणाऱ्या लॅक्टोबॅसिल्स बॅक्टेरियांसाठी होती. त्यानंतर बिफिडोबॅक्टेरिया आणि स्ट्रेप्टोकॉक्स बॅक्टेरियाचा वापर सुरू झाला. त्यांचा वापर करून जगभरात तऱ्हेतऱ्हेचे ‘योगर्ट’ बनवण्यात आले. योगर्ट म्हणजे एकप्रकारचे दहीच. ते सहसा गाईच्या दुधापासून बनवले असल्याने त्याला पिवळसर झाक असते. शुद्ध बॅक्टेरियाच्या कल्चरचे विरजण लावल्याने ते श्रीखंडासारखे दाट व पाणी न सुटणारे बनते. लहान मुलांना स्ट्रॉबेरीचा स्वाद आवडतो म्हणून डॅनोनसारख्या कंपन्यांनी खास योगर्ट बनवून बच्चे कंपनीला खूष केले आहे.
विशिष्ट बॅक्टेरियांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी अमेरिकेच्या गॅनेडेन कंपनीने वेगवेगळ्या गुणांचे योगर्ट बॅसिल्स कोअ‍ॅग्युलन्स बॅक्टेरिया वापरून बनवले आहे. त्यात ज्यांना पचनाचा त्रास होतो, ज्यांना खास करून गॅसेसचा त्रास होतो तर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो अशा निरनिराळ्या लक्षणांसाठी निरनिराळी उत्पादने केली आहेत. आता त्याप्रमाणे गुण मिळतो का हे तुम्ही आजमावून बघायचे! योगर्टसारख्या खाद्याची लोकप्रियता वाढावी म्हणून जपानच्या याकुल्ट होन्शा लिमिटेडने त्यांच्या ब्रँडसाठी अभिनेत्री काजोलची निवड केली आहे. या योगर्टचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी होतो, असा दावाही करण्यात आला आहे. ज्यांना योगर्ट घ्यायला व बाळगायला जमणार नाही अशांसाठी प्रोबायोटिक्सचे फायदे देण्यासाठी आघाडीच्या औषध कंपन्यांनी शुद्ध बॅक्टेरिया कॅप्सुल्समध्ये पॅक करून देऊ केले आहेत. परंतु त्यांच्या ब्रँड्सची चढाओढ आहेच.
प्रोबायोटिक्सबाबत आयुर्वेदाचाही स्पष्ट दृष्टिकोन आहे. आयुर्वेदात दह्य़ापेक्षा ताज्या ताकाला जास्त महत्त्व दिले आहे. ताक म्हणजे तक्र हे पचनाला प्रदीप्त करते आणि कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांना काबूत ठेवते. तसे पाहता आपले जेवण वरणभाताने सुरू होऊन, दहीभाताने किंवा ताकभाताने संपते हेही शास्त्रसंगत म्हणावे लागेल.
प्रोबायोटिक्स कंपन्या आपल्या उत्पादनांची जी जाहिरात करतात त्यात अतिशयोक्ती तर काहींमध्ये मुळीच तथ्य नसल्याची टीका लंडनच्या ‘गार्डियन’ पत्रिकेच्या महिला पत्रकार फेलिसिटी लॉरेन्स यांनी पुराव्यानिशी केली आहे. युरोपियन फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने त्याची दखल घेऊन कंपन्यांना काही दावे मागे घ्यायला लावले आहेत. पण कंपन्या नव्या चाचण्या घेऊन परत कार्यरत आहेत. कारण प्रत्येक निष्कर्ष त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
चालू जमान्यात प्रोबायोटिक्सने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे हे निश्चित. त्याच्या उत्पादनाचा २०१२ ते २०१८ मधील आढावा तेच दाखवतो. २०११ मध्ये त्यांचे एकूण मार्केट २७.९ बिलियन्स डॉलर्सचे होते. ते २०१८ मध्ये ४५ बिलियन डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. एक बिलियन म्हणजे एक महापद्म! त्यामुळे अब्जावधी रुपयांची कमाई जगभरच्या कंपन्यांना होत आहे.
प्रोबायोटिक्सचा शास्त्रीय पाया मजबूत करण्यासाठी जपानच्या याकुल्ट कंपनीच्या पुढाकाराने एप्रिल २२ व २३ ला लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद होणार असून त्यात उपकारी बॅक्टेरियांचा व्याधीत व शरीराच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो यावर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत. तसेच मार्चमध्ये स्वीडनच्या बायोगैया बायोलॉजिक्स या प्रोबायोटिक कंपनीतर्फे दंतआरोग्यावर व तोंडातील व्याधीवर प्रोबायोटिक्सचे उपचार यावर परिषद बोलावली आहे. त्याला ५८ देशातून जवळजवळ एक लाख प्रतिनिधी येणार आहेत. कंपन्या काही करोत, तुम्हा-आम्हाला परवडणारी प्रोबायोटिक्स डोळसपणे वापरण्याची आणि आरोग्यसंपन्न होण्याची संधी सर्वानाच आहे!
योगर्ट म्हणजे एकप्रकारचे दहीच. ते सहसा गाईच्या दुधापासून बनवले असल्याने त्याला पिवळसर झाक असते. शुद्ध बॅक्टेरियाच्या कल्चरचे विरजण लावल्याने ते श्रीखंडासारखे दाट व पाणी न सुटणारे बनते. लहान मुलांना स्ट्रॉबेरीचा स्वाद आवडतो म्हणून डॅनोन सारख्या कंपन्यांनी खास योगर्ट बनवून बच्चे कंपनीला खूष केले आहे.