मोटार चालवीत असताना झोप आल्याने अनेक अपघात होतात असा आजवरचा अनुभव आहे पण आता वैज्ञानिकांनी एक नवे उपकरण शोधून काढले आहे जे तुम्हाला डुलकी येताच पुन्हा सावध करते. या यंत्राचे नाव व्हिगो असे असून ते मोटार चालकांना सतत जागते रहो हा संदेश देते. त्याचा एवढाच उपयोग नाही तर वर्गातील प्राध्यापकांचे व्याख्यान ऐकताना कंटाळा येऊन डुलकी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनाही वापरता येण्यासारखे आहे. व्हिगो तुमच्या डुलक्यांचे पॅटर्न तयार करते व तुम्ही प्रत्यक्ष कामाच्या वेळी किती सतर्क आहात हे त्याला समजते. तुमच्या मेंदूची प्रवृत्ती ही तुम्हाला सतत कामात ठेवण्याची असते पण म्हणून तुम्ही दमत नाही असे नाही. परिणामी विश्रांती न मिळाल्याने अशा डुलक्या लागण्याची शक्यता असते. या यंत्रात इन्फ्रारेड संवेदक असून त्यात त्वरणक (अ‍ॅक्सिलरोमीटर), विशिष्ट अलगॉरिथम यांचा वापर केलेला आहे. व्हिगो यंत्राला तुम्ही झोपेला आला आहात हे समजते, असे किकस्टार्टर या संकेतस्थळाने म्हटले आहे. व्हिगो हे ब्लूटूथ हेडसेटसारखे काम करते त्यामुळे तुमचे हात मोकळे असतात. हे यंत्र तुम्हाला ब्लूटूथने स्मार्टफोनशी जोडते व तुम्हाला केव्हा जागे करायचे याची एक वेगळी पद्धतही यात ठरवता येते. यात हलकीशी स्पंदने, एलईडी लाइटचे प्रकाशणे किंवा चक्क गाणे सुरू करून तुम्हाला जागे केले जाते. व्हिगोमुळे त्या व्यक्तीला तिचा उच्च उर्जा कालावधी समजतो. इतर काही अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही स्वत:ला जागे ठेवू शकता. कामाच्या वेळात बदल करू शकता. पेनसिल्वानिया विद्यापीठात अभ्यास करताना संशोधकांच्या मनात व्हिगोसारख्या यंत्राची कल्पना आली. गेले दोन महिने ते हे यंत्र तयार करीत होते. चीनच्या एचएएक्सएलआर ८ आर या कार्यक्रमांतर्गत त्यांनी हे यंत्र तयार केले आहे.