अवकाशात एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे हे सर्वाना माहीत आहे, तेथे अंतराळवीर अनेक प्रयोग करीत असतात, अलीकडेच त्यांनी एक वेगळे पाणी तयार केले आहे. मंतरलेले वगैरे नाही.. या पाण्याला विज्ञानाने मंतरलेले आहे एवढे मात्र खरे. हे पाणी एखाद्या वस्तूवर टाकले तर ती पेट घेते. आपण नेहमी असे बघतो की, पाणी टाकल्यावर आग विझते, पण येथे पाणी टाकल्यावर आग लागते. या पाण्याला ‘सुपरक्रिटिकल वॉटर’ असे म्हटले जाते. ते घन, द्रव किंवा वायू यापैकी कुठल्याही अवस्थेत नाही तर तो द्रवसदृश वायू असतो. हे जरा ऐकायला विचित्र वाटते, पण विज्ञानात अनेक अशक्य गोष्टी शक्य करता येतात. आपले साधे पाणी जर समुद्रसपाटीला जो दाब असतो त्याच्या २१७ पट अधिक दाबाने संप्रेषित केले व ३७३ अंश सेल्सिअस तापमानाला तापवले तर ते ‘सुपरक्रिटिकल वॉटर’ बनते. हे पाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास उपयोगी ठरते, अगदी अवकाशात व पृथ्वीवरही त्याचा असा उपयोग असतो. सुपरक्रिटिकल वॉटर टाकून एखादा पदार्थ पेटवला तर द्रव कचरा निर्माण होतो, पण त्यातील घातक पदार्थाचे विघटन होते. त्यामुळे जी काही उपउत्पादने तयार होतात ती घातक नसतात. त्यात पाणी आणि कार्बन डायॉक्साइड हे पदार्थ तयार होतात, पण ते सहज दूर करता येतात.