महाराष्ट्रात दारूबंदी कायदा सन १९४९ पासून अस्तित्वात आहे. या तसेच मोटार वाहन कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा आहे. त्यासाठी दारू प्यायलेल्या व्यक्तीला वाहन चालवू न देणे ही त्याच्या बरोबरच्या सहकाऱ्यांचीही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी समजली जाते.
नव वर्षांच्या सुरुवातीसच मद्य प्राशनामुळे मृत्यू ओढवल्याचे आपण वृत्तपत्रातून दरवर्षी वाचतो. त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीसच दुर्दैवाने काही कुटुंबाची समस्या सुरू होते. याचे प्रमुख कारण म्हणजे दारू! दारूमध्ये इथिल अल्कोहोल असते. अल्कोहोल पाण्यात विद्राव्य असून ते शरीरातील पाण्याच्या प्रमाणानुसार सर्वत्र पसरते. जठरातून ते ताबडतोब शोषले जाते. अल्कोहोल सेवन केल्यानंतर ६० ते ९० मिनिटांत रक्तामध्ये त्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी व्यक्तीच्या रक्तातील अल्कोहोलचे मापन केल्यास त्याची सर्वोच्च पातळी गाठलेली असते. त्या नंतर ती पातळी कमी कमी होते.
रक्तातील अल्कोहोलचे चढउतार अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यात मद्यातील अल्कोहोलचे शेकडा प्रमाण, मद्य प्राशनाची गती, व्यक्तीच्या जठरातील अन्नाची स्थिती (उपाशीपोटी किंवा जेवणानंतर) हे घटक महत्त्वाचे आहेत. अधिक अल्कोहोल असलेले मद्य (शेकडा प्रमाण) थोडय़ाच अवधीत घेतले असल्यास रक्तातील अल्कोहोलची पातळी झपाटय़ाने वर चढेल आणि ती उतरण्यास मात्र अधिक अवधी लागेल. रक्तातील अल्कोहोल दर ताशी १५-२५ मि.ग्रॅम प्रतिशत या प्रमाणात कमी होते. ते त्या व्यक्तीच्या यकृताच्या (लिव्हर) कार्यक्षमतेवर अवलंबून असते आणि ते एकूण अल्कोहोल किती सेवन केले यावर अवलंबून नसते. काही प्रमाणात मद्यार्कातील अल्कोहोल उच्छवासातून आणि लघवीतून शरीराबाहेर पडत असते. अशा उच्छवासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे प्रमाण रक्त किंवा लघवीतील प्रमाणापेक्षा फारच कमी असते. उच्छ्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन ब्रिथलायझर या उपकरणाने पोलीस करतात.
शिकागो येथिल केमिस्ट मॅकनाले याने प्रथम ब्रिथलायझर तयार केला. यात अल्कोहोलच्या अंमलाखाली असलेल्या व्यक्तीने एका नळीतून फुंकर मारल्यास ब्रिथलायझर मधील द्रवाचा रंग बदलत असे. हे उपकरण अमेरिकेतील गृहिणीत फारच लोकप्रिय होते. कारण त्यांना या उपकरणाने रात्री उशिरा घरी येणारा आपला पती दारू पिऊन आला किंवा नाही हे समजत असे. सध्या वापरात असलेल्या ब्रिथलायझरमध्ये प्लॅटीनम फ्युयल सेल सेन्सर वापरला जातो. ज्या व्यक्तीची मद्यार्क चाचणी घ्यावयाची आहे. त्याला ब्रिथलायझरच्या नळीतून हवेची फुंकर मारायला लावली जाते. त्याचे मापन उपकरणात होऊन ते दर्शकामार्फत दाखविले जाते. उपकरणावर एक रेड झोन दाखविलेला असतो. फुंकर मारल्यानंतर जर दर्शक या रेड झोनमध्ये किंवा त्या पेक्षा पुढे असेल, तर संबंधित व्यक्तीने मद्यार्काचे सेवन केले असल्याचे आणि तो नशेत असल्याचे समजते.
या तपासणीस फारच कमी अवधी लागत असल्याने अत्यंत वेगाने चाचणी होऊन मद्यार्काच्या अमलाखालील व्यक्ती ताबडतोब पकडली जाते अशा वेळी त्याने
वाहन चालविणे म्हणजे हमखास अपघाताला निमंत्रणच समजले जाते.
रक्तातील अल्कोहोलच्या पातळीचे मापन ही व्यक्तीने केलेल्या नशेचे दर्शकच समजले जाते. अल्कोहोलच्या उच्छ्वास परीक्षणापेक्षा रक्तातील अल्कोहोलचे मापन अत्यंत अचूक समजले जाते. रक्तातील मद्यार्क पातळी काढण्याबाबत विविध देशांत संशोधन झाले आहे. महाराष्ट्रातील फोरेन्सिक प्रयोगशाळात डॉ. महल यांनी शोधलेली रासायनिक पद्धत गेल्या पन्नास वर्षांपासून वापरली जात आहे. या पद्धतीत सल्फ्युरिक आम्लातील डायक्रोमेटचे द्रावण ऑक्सिडीकारक म्हणून वापरले जाते. त्यात अल्कोहोलचे ऑक्सिडीकरण होऊन अ‍ॅसिटालडीहाइड आणि पुढे कार्बन-डाय-ऑक्साइड आणि पाणी तयार होते. या रासायनिक क्रियेत ऑक्सिडीकरणात वापरून राहिलेले डायक्रोमेटचे प्रमाण काढले जाते. त्या वरून रक्तातील अल्कोहोलचे शेकडा प्रमाण काढले जाते.
सध्या वरील पद्धतीपेक्षा अत्यंत संवेदनक्षम हेडस्पेस वायुगती पृथक्करण पद्धती वापरली जाते. यात परीक्षणार्थी रक्त नमुना एका काचेच्या बाटलीत घेतला जातो. आणि तिचे तोंड घट्ट रबरी बुचाने बंद केले जाते. ही बाटली ठराविक तापमानास तापवून रक्त नमुन्यातून बाहेर पडणाऱ्या वायुरूप अल्कोहोलचे वायुगती पृथक्करणाने (जीसी) विश्लेषण केले जाते. रक्तातील इतर घटकांचा रक्त मद्यार्क तपासणीत काहीही अडथळा येत नाही.
मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अन्वये रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ५० मि.ग्रॅ. प्रतिशत किंवा त्या पेक्षा जास्त असल्यास मद्यपीला शिक्षा होऊ शकते. निरनिराळ्या देशात ही पातळी ५० ते १०० मि.ग्रॅ. प्रतिशत या प्रमाणावर गेल्यास व्यक्ती अल्कोहोलच्या नशेत असल्याचे मानले जाते. वाहन चालविण्यासाठी बाहेरच्या देशात अल्कोहोलच्या वेगवेगळ्या पातळ्या निश्चित केल्या आहेत. त्यात ब्रिटन मध्ये ८०, कॅनडा आणि अमेरिकेत १००, स्विडन, नॉर्वे आणि फ्रान्समध्ये ५० तर झेक प्रजासत्ताकात ३० मिली ग्राम प्रतिशत रक्तात अल्कोहोल आढळल्यास शिक्षा होते.
भारतात रस्ते अपघातात गेल्या वर्षी सुमारे सत्तर हजार व्यक्ती मृत्यू पावल्या. यातील सुमारे १५ टक्के व्यक्तींच्या अपघाताचे कारण अल्कोहोल आहे. दारूमुळे अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त उत्तर प्रदेशात असल्याचे महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेत दर २२ मिनिटास एक व्यक्ती दारूच्या संबंधित अपघाताने मृत्यू पावतो. त्यात १५ ते २४ वयोगटातील मुले जास्त आहेत. अमेरिकेत वाहन चालविण्यासाठी अल्कोहोलची पातळी मर्यादा ८० मि.ग्रॅ. प्रतिशत एवढी जास्त असल्याने एकूण वाहनामुळे होणाऱ्या अपघातात ३२ टक्के अपघात केवळ चालक नशेत असल्याने होतात. तेथील गंभीर वाहतूक अपघातात २१ ते २४ वयोगटातील चालकांकडून ३५ टक्के, २५ ते ३४ वयोगटातील ३२ टक्के तर ३५ ते ४४ वयोगटातील २६ टक्के अपघात होतात.
 एकंदरीत जागतिक स्थिती पाहता अल्कोहोल गंभीर वाहन अपघातास कारणीभूत असल्याचे दिसते. आपल्या देशात मोटार वाहन अपघाताची संख्या लक्षात घेता सध्याच्या असलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी सीताराम येचुरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने वाहतूक कायद्यात बरेच बदल सुचविले आहेत. त्यात एखाद्या चालकाने दारूच्या नशेत अपघात केल्यास तो त्याचा निष्काळजीपणा ग्राह्य़ न धरता, त्याची ती कृती भा.दं.वि अंतर्गत पूर्वनियोजित (प्री-मेडीयेटेड) अपघात समजावा.
दारूमुळे होणाऱ्या वाहन अपघातास प्रतिबंध घालण्यासाठी काही मोटार कंपन्यांनी नवीन तंत्र विकसित केले आहे. जपानमधील निस्सान मोटार कंपनीने आपल्या मोटारीत अल्कोहोल सेन्सर बसविले आहेत. एखादा चालक मद्याच्या अमलाखाली वाहन चालविण्यास बसला,
तर मोटारीतील अल्कोहोल सेन्सर कार्यान्वित होतो. मोटार चालू होईल पण गीअर पडणार नाही आणि ‘तुम्ही
मद्याचे सेवन केले आहे’ असा मॉनिटर वर संदेश येतो. टोयोटा व इतर काही कंपन्यांच्या मोटारींमध्येही ही सुविधा आहे.
आपल्या देशात मोटार वाहन अपघाताची संख्या लक्षात घेता सध्याच्या असलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी सीताराम येचुरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने वाहतूक कायद्यात बरेच बदल सुचविले आहेत. त्यात एखाद्या चालकाने दारूच्या नशेत अपघात केल्यास तो त्याचा निष्काळजीपणा ग्राह्य़ न धरता, त्याची ती कृती  पूर्वनियोजित अपघात समजावा. द्रुतगती महामार्गावरील अपघातांनाही या दारूमुळे आमंत्रणच मिळत आहे.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार