सुमारे ८५ वर्षांपूर्वी एक भारतीय विद्यार्थी बोटीने केंब्रिज इंग्लंडला चालला होता. त्या काळात इतक्या दूर प्रवासाचे साधन बोट हेच होते. प्रवासही अनेक दिवसांचा असायचा आणि प्रवाशाच्या करमणुकीसाठी बोटीवर अनके कार्यक्रम ठेवले जायचे. पण या विद्यार्थ्यांला या सर्वाशी जणू काही घेणं-देणच नव्हतं. दूरच्या या प्रवासात मिळालेल्या या एकांतात तो आपला गणित सोडवण्यात मग्न होता.  
आज या माणसाने एक मोठा इतिहास रचला आहे. आज शास्त्रज्ञ या व्यक्तीची गणना न्यूटन आणि आईनस्टाइनसारख्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत करतात.
हे होते प्रख्यात शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम. त्यांनी बोटीवर केलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे ताऱ्याच्या उत्क्रांतीचा क्रम जाणून घेण्याचा पाया घातला गेला, पण आजचा विषय प्रा. चंद्रशेखर यांचे कार्य हा नसून एका तरुण भारतीयाने केलेल्या संशोधनाचा आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर खोडद येथे विशिष्ट तरंग लांबीच्या रेडिओ लहरींचे निरीक्षण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी दुर्बीण म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण आहे. या दुर्बणिीचा वापर करून
डॉ. दीपांजन मित्रा यांना एक अभूतपूर्व शोध लावण्यात यश आले आहे.
या शोधाची थोडी पाश्र्वभूमी अशी की, जर एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा १.४४ पटीपेक्षा जास्त असेल तर त्या ताऱ्याचा अंताचा मार्ग न्यूट्रॉन तारे किंवा कृष्णविवर यांच्या दिशेने जातो आणि त्याच गणिताचा पाया प्रा. चंद्रशेखर यांनी रचला होता. त्यांनी शोधून काढलेल्या १.४४ या आकडय़ाला चंद्रशेखर सीमा (चंद्रशेखर लिमिट) म्हणून ओळखले जाते.
न्यूट्रॉन तारे अत्यंत जास्त वस्तुमान असलेले तारे आहेत, पण यांचा आकार किंवा खरेतर व्यास मात्र खूप लहान असतो. फक्त २० कि.मी. म्हणजे एका मोठय़ा शहराइतका तर सूर्याचा व्यासच मुळी पृथ्वीच्या १०८ पट आहे. अर्थात या ताऱ्याची घनता पण तितकीच जास्त असते. अशा ताऱ्यामधील एका मोठय़ा आकाराच्या गोटीसारख्या वस्तूचे वजन १० कोटी टन इतके असू शकते.
हे तारे आपल्या अक्षावर वेगाने फिरत असतात. अशा ताऱ्यांचे चुंबकीय क्षेत्र पण खूप प्रबळ असते इतके प्रबळ की पृथ्वीवरील तयार केलेल्या सर्वात जास्त प्रबळ चुंबकाच्याही १० लाख पट जास्त. अशा या ताऱ्याच्या ध्रुवीय भागातून अति शक्तिशाली असे प्रारण बाहेर पडत असते. अशा ताऱ्यांना पल्सार (स्पंदक तारे) म्हणून ओळखण्यात येते. आता जर अशा ताऱ्याचा चुंबकीय अक्ष जर पृथ्वीच्या दिशेने असेल तर पृथ्वीवरील निरीक्षकांना याच्या प्रारणाचा अभ्यास करता येईल. पण गंमत अशी आहे की ताऱ्याच्या फिरण्याबरोबर याच्या चुंबकीय अक्षांची दिशा पण सतत बदलत असते जेणेकरून जेव्हा या ताऱ्याचा चुंबकीय अक्ष पृथ्वीच्या दिशेने असतो तेव्हाच आपल्याला हे प्रारण दिसू शकते. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच्या एखाद्या प्रकाश स्तंभासारखे.
हे प्रारण म्हणजे विद्युत चुंबकीय असल्यामुळे आपल्याला क्ष-किरण ते रेडिओ लहरींमध्येसुद्धा दिसू शकते, पण हे नेमके कसे घडते याचा मात्र संपूर्ण उलगडा झालेला नाही. निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, काही रेडिओ पल्सार यांच्या उत्सर्जनाचा प्रकार आणि तीव्रता बदलत असतात आणि हे बदल केव्हातरी अचानक आणि वेगाने होतात. रेडिओ पल्सार म्हणजे असे पल्सार जे प्रारण जास्त करून ते रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर टाकतात आणि ज्यांचा अभ्यास रेडियो दुर्बीण वापरून करण्यात येतो. त्यांच्या निरीक्षणातून असेही दिसून आले आहे की, काही मोजके रेडिओ पल्सार क्ष-किरणे ही उत्सर्जति करतात, पण यांची तीव्रता इतकी कमी असते की त्यांच्यात जर बदल होत असले तर त्यांची माहिती आपल्याला नाही.
दीपांजन मित्रा  यांनी २००९ मध्ये एका अशा पल्सारचे निरीक्षण त्याच्या उदयापासून ते अस्तापर्यंत केले आणि या निरीक्षणांचा मग  सखोल अभ्यास केला. या पल्सारचा क्रमांक आहे PSR B0943+10. हा पल्सार क्ष किरणांचे प्रारण देतो हे माहीत होते. त्याच्या  निरीक्षणातून असे दिसून आले की, या पल्सारपासून उत्सर्जति होणाऱ्या प्रारणात काही सूक्ष्म बदल घडतात. या प्रारणांची तीव्रता कमी आणि विस्कळीत होते, अशा अवस्थेत हा पल्सार काही तास राहतो. मग त्यांनी इतर काही परदेशी शास्त्रज्ञांबरोबर काम करून या पल्सारचे युरोपियन स्पेस एजंसीच्या  XMM-Newton आणि लो फ्रिक्वेन्सी अ‍ॅरे (लोफर) या दोन दुर्बणिी वापरून निरिक्षणे घेतली. XMM-Newton ही अंतराळात खूप कमी तीव्रतेच्या क्ष-किरणांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेली दुर्बीण आहे, तर लोफरही नेदरलॅण्डमधली रेडिओ दुर्बीण आहे. या निरीक्षणातून आश्चर्यचकित करणारे परिणाम मिळाले आहेत आणि ते असे की जेव्हा या पल्सारच्या रेडिओ लहरींच्या प्रारणांची तीव्रता अर्धी होते तेव्हा क्ष-किरणाच्या प्रारणांची तीव्रता दुप्पट होते. तसेच क्ष-किरणांच्या तीव्रतेचे स्वरूप रेडिओ लहरींच्या तीव्रतेच्या स्वरूपापेक्षा फारच वेगळे दिसून आले आहे. याचे अशा प्रकारचे वर्तन अगदीच अनपेक्षित होते.
डॉ. मित्रांच्या मते या पल्सारच्या ध्रुवीय भागात काही काळाकरिता उष्ण क्षेत्र निर्माण होत असावेत. अर्थात भौतिकशास्त्राचे कुठले नियम या पल्सारच्या विचित्र वर्तनाला जबाबदार आहेत याचा शोध लावण्याकरिता अजून खूप अभ्यासाची गरज आहे.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com