गेले जवळजवळ वर्षभर गाजत असलेला धूमकेतू आयसॉन आता परत दिसेल की नाही आणि दिसला तर किती प्रखर दिसेल हे आज तरी सांगता येणार नाही. पण एक नक्की या वेळी या धूमकेतूबद्दल हौशी आकाश निरीक्षकांमध्ये फार मोठी जागरूकता निर्माण झाली होती.
या धूमकेतूबद्दल आपण मागे बरीच चर्चा केली होती पण फक्त उजळणी करता काही मुख्य बाबी. या धूमकेतूचा शोध २१ सप्टेंबर २०१२ रोजी आरटीयम नोव्हिजिनोक आणि विटाली नेव्हिस्की दोन रशियन खगोलनिरीक्षकांनी किसलोव्हॉस्क येथील इंटरनॅशनल सायंटिफिक ऑप्टिकल नेटवर्क या वेधशाळेच्या ४० सेंटीमीटर व्यासाची दुर्बीण वापरून लावला होता. या वेधशाळेच्या नावावरून या धूमकेतूला आयसॉन हे नाव देण्यात आले. या धूमकेतूचा जेव्हा शोध लागला, तेव्हा असेल वाटले होते की हा या शतकातला धूमकेतू म्हणून नावाजला जाईल. पण नंतर घेण्यात आलेल्या निरीक्षणातून हा धूमकेतू जेमतेम नुसत्या डोळ्यांना दिसेल असे लक्षात येत आहे.
आणि झालंही तसंच. खरंतर फार लोकांनी हा धूमकेतू नुसत्या डोळ्यांनी, म्हणजे कुठलेही निरीक्षण साधन न वापरता बघितल्याचे ऐकायला आले नाही. पण अनेकांनी दुर्बणिीतून मात्र तो बघितला होता. तसेच काही हौशी आकाश निरीक्षकांना या धूमकेतूचे छायाचित्र घेण्यातही यश आले होते.  
शोध लागल्यानंतर तो धूमकेतू किती प्रखर दिसेल याचा अचूक अंदाज सांगणे अजूनही शास्त्रज्ञांना शक्य झालेले नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. एखाद्या धूमकेतूच्या घटकांचा अंदाज आणि त्यांची मात्रा ही त्या धूमकेतूच्या वर्णमालेच्या आणि इतर काही निरीक्षणांवरून करण्यात येते आणि हे देखील फार सोप नसतं. अनेक धूमकेतूंच्या निरीक्षणांवरून धूमकेतू हे बऱ्यापकी ठिसूळ असतात आणि त्यांचे प्रमुख घटक दगड माती (सिलीकेट्स), पाणी, मिथेन वगरे असतात असे लक्षात आले आहे.
असा हा धूमकेतू जेव्हा सूर्याजवळ येतो, तेव्हा घन स्वरूपातील पाणी, मिथेन आदींचे सरळ वायू रूपात परिवर्तन होते. या क्रियेला आपण संप्लवन म्हणतो. आणि हा वायू आपल्याला धूमकेतूची शेपूट म्हणून दिसतो. जेव्हा हा वायू फवाऱ्याच्या स्वरूपात बाहेर पडतो, तेव्हा तो धूमकेतूची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरतो. आता एखाद्या धूमकेतूची दिशा किती बदलेल हे त्या त्या धूमकेतूमधून निघालेल्या फवाऱ्याच्या वेगावर तसेच तो नेमका कुठून निघाला आहे यावर पण अवलंबून असतं. या सर्वाच्या बरोबर धूमकेतूंवर इतर ग्रहांच्या गुरुत्वीय बलाचा आणि प्रामुख्याने गुरू आणि शनी यांच्या गुरुत्वीय बलाचाही प्रभाव असतो. गुरू ग्रहाने काही धूमकेतू आपल्या सूर्यमालेत कैद केले आहेत, तर काहींना त्याने दूरही फेकले आले.
दर वेळी जेव्हा एखादा धूमकेतू सूर्याजवळून जातो, तेव्हा त्याचे वस्तुमानही कमी होत जाते. दर खेपेला हे वस्तुमान कमी कमी होत शेवटी त्या धूमकेतूमधून बाहेर पडण्यासाठी काहीही पदार्थ उरत नाही आणि मग आपण त्याला लघुग्रह म्हणून ओळखू लागतो. धूमकेतूच्या शेपटीतील पदार्थ हे देखील साधारणपणे धूमकेतूच्या कक्षेतून सूर्याची परिक्रमा करतात. आता जर एखाद्या धूमकेतूची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेदत असेल किंवा खूप जवळून जात असेल, तर जेव्हा अशा या धूमकेतूच्या धुरळ्यातून पृथ्वी जाते, तेव्हा आपल्याला उल्का वर्षांवही दिसतो.  
इतर खगोलीय पदार्थासारखेच जेव्हा धूमकेतू सूर्याच्या दिशेने असतो, तेव्हा तो आपल्याला सूर्य प्रकाशाच्या तेजात दिसत नाही. आयसनबद्दल ही असेच झाले होते. पण अवकाशात नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेली सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्वेटरी किंवा सोहो ही अंतराळात एक दुर्बीण आहे. या दुर्बणिी सूर्याच्या जवळच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यास स्थापित केल्या आहेत. या दुर्बणिीतून आपल्याला खुद्द सूर्य बघता येत नाही. त्याला एका काळ्या तबकडीने झाकण्यात आले आहे. कारण या दुर्बिणीच्या अतिसंवेदनशील कॅमेऱ्याला त्यापासून धोका आहे. तर जेव्हा धूमकेतू आयसन सूर्याजवळ होता, तेव्हा या दुर्बणिीने आपल्याला त्याची चित्रे पाठवली होती. धूमकेतू सूर्याजवळ येत असताना त्याची लांब शेपूट दिसत होती. नंतर हा धूमकेतू पण काळ्या तबकडी मागे झाकला गेला. तो जेव्हा तबकडीच्या बाहेर दिसू लागला  तेव्हा त्याचा अवतार बदलेला होता. लांब शेपूट आता दिसत नव्हती. काही शास्त्रज्ञांनी मत जाहीर केले, की धूमकेतू कदाचित फुटला असावा. धूमकेतूला सूर्याची बाधा झाली असण्याची शक्यता होती.  तरीही त्याच्या अस्तित्वाचे हे वेगळे रूप दिसत होते. काहीही असो या निरीक्षणातून आपल्याला धूमकेतूंबद्दल नवीन माहिती नक्कीच मिळत आहे. जर धूमकेतू सूर्याच्या जवळून जाताना फुटला नसेल, तर याचा अर्थ त्याच्यातील दगडांचे प्रमाण अधिक असून कदाचित हा एक मोठा दगड असेल ज्याच्या भोवती इतर पदार्थाची मात्रा (पाणी वगरे) कमी असेल. आणि सूर्याच्या जवळून गेल्यावर मग या पदार्थाचे वायुस्वरूपातील अस्तित्व सूर्याच्या तीव्र ऊर्जेत उडून गेले असे समजावे लागेल. आता हा धूमकेतू आपला उरलेला प्रवास असाच करत राहील. पण या नंतर मात्र हा आपल्याला कधीच दिसणार नाही. पण जर धूमकेतूचा मोठय़ा प्रमाणात नाश झाला असेल, तर मात्र परिस्थिती नेमकी उलटी असेल. तसे असेल तर येत्या २८ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी त्या िबदूजवळून जाईल जिथे या दोघाची कक्षा एकमेकांना छेदते. इथे एक सांगणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे पृथ्वी आणि धूमकेतूच्या कक्षा अवकाशात जिथे जवळ येतात, तिथे हा धूमकेतू सूर्याच्या जवळ येताना आला होता. त्याचा परतीचा मार्ग पृथ्वीच्या कक्षेच्या बराच वर आहे. तर आयसन हा धूमकेतू जर ठिसूळ असला, तर त्याने आपल्या मागे बराच धुरळा सोडला असण्याची शक्यता आहे आणि त्या वेळी आपल्याला चांगला उल्का वर्षांव बघायला शकेल.                              
paranjpye.arvind@gmail.com